हवामान बदलाला अनुरूप पीक पद्धतीची गरज

जागतिक पातळीवर हवेमधील कार्बन डायऑक्‍साइड आणि इतर हरितगृह वायूंमुळेतापमान वाढत आहे. वातावरण बदलाशी अनुरूप पीक पद्धतीसोबत पीक पद्धतीत बदल करावा लागणार आहे.
Water- Soil and afforestation can balance the environment.
Water- Soil and afforestation can balance the environment.

जागतिक पातळीवर विविध मार्गांनी हवेमधील कार्बन डायऑक्‍साइड आणि इतर हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे तापमान वाढत आहे. हे लक्षात घेता वातावरण बदलाशी अनुरूप पीक पद्धतीसोबत पीक पद्धतीत बदल, जमीन व्यवस्थापन, जलसंधारण, संरक्षित शेती, आंतरपीक पद्धती इत्यादींचा अवलंब करावा लागणार आहे. लोकसंख्या वाढ, औद्योगिकीकरण, शहरीकरण, शेतीचा वाढता विस्तार, खालावत चाललेले जमिनीची प्रत, हवा प्रदूषण, जल प्रदूषण, झपाट्याने कमी होणारी वन संपत्ती, खनिज तेल, दगडी कोळसा आणि सागरी संपत्तीचा अमर्याद वापर या विविध कारणांमुळे पर्यावरणाला बाधा पोहोचली आहे. आजपर्यंत आशिया खंडातील सुमारे ६० दशलक्ष हेक्‍टर, आफ्रिका खंडातील ५५ दशलक्ष हेक्‍टर आणि लॅटीन अमेरिकेतील ८५ दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रावरील वनसंपदा नष्ट झाली आहे. जागतिक पातळीवर विविध मार्गांनी हवेमधील कार्बन डायऑक्‍साइड आणि इतर हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे तापमान वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे होणारा हवामानातील बदल हा सर्वांत चिंताजनक असून, गेल्या काही वर्षांपासून या बदलाचे स्वरूप स्पष्टपणे दिसत आहेत. हा बदल प्रचंड वेगाने होत आहे.  हवामान बदलामुळे तापमान वाढीचे निष्कर्ष 

  • आयपीसीसी आणि गोडार्ट इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस स्टडीजच्या आकडेवारीनुसार १९५० पासून सरासरी तापमानात वाढीला सुरुवात. 
  • दर दशकात ०.०५ अंश सेल्सियसने वाढ. २०१३ पर्यंत तापमान एक अंश सेल्सिअसने वाढले. 
  • गेल्या १०० वर्षांत सन २०००, २००५, २०१०, २०१३ ही वर्षे सर्वाधिक उष्ण.
  • नासा आणि भारतीय हवामान विभागाच्या निष्कर्षानुसार १९८६ नंतर पृथ्वीचे तापमान वाढू लागले. अत्याधिक तापमानवाढीस २००१ पासून सुरुवात. २०१० पासून दरवर्षी तापमानवाढीमध्ये सातत्य.
  • सन २०१० पासूनच उत्तर धृवावरील बर्फ, हिमनद्या वितळणे, समुद्राच्या पातळीत वाढ, थंडी-उष्णतेची वादळे, चक्रीवादळे, ढगफुटी अशा विविध नैसर्गिक आपत्तींत वाढ.
  • २०१८ वर्ष हे गेल्या १५० वर्षांतील सर्वाधिक तापमानाचे वर्ष. इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज संस्थेच्या कॉम्प्युटर मॉडलिंगच्या आधारावर काही भाकिते केली आहेत. यानुसार १९८३ ते २०१२ हा तीस वर्षांचा कालखंड सर्वाधिक उष्ण असल्याचे स्पष्ट.  
  • सन १८५० पूर्वीच्या तापमानाच्या तुलनेमध्ये गेल्या तीस वर्षांमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमान सातत्याने वाढ. २१ व्या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमानात १.५ अंशाने वाढ होण्याचा अनुमान.
  • सन २०५० आणि २०८० पर्यंत अनुक्रमे ५४३ आणि ७८९ पीपीएम इतकी कार्बन डायऑक्‍साइडची पातळी वाढण्याचा धोका. 
  • तापमान बदलामुळे वर्तमान तसेच भविष्यकाळात काय प्रतिकूल किंवा अनुकूल दूरगामी परिणाम होतील हे आता सांगणे खूप कठीण, परंतु तापमान बदलामुळे कदाचित निसर्ग बेभरवशाचा होईल इतकेच आता सांगता येईल, असे वैज्ञानिकांचे मत. 
  • प्राणी आणि वनस्पतींची भवताली बदलाशी जुळवून घेण्याची जी क्षमता आहे, त्यामध्ये तीव्र गतीने बदल होणार. त्यामुळे वन्य पशू आणि वनस्पतींच्या अनेक प्रजातींच्या अस्तित्वाला धोका. 
  • हवामान बदलामुळे विषुववृत्ताजवळील सदाहरित, तसेच ध्रुवांकडील सूचीपर्णी वनांचे पट्टे विस्थापित होणार.
  • एका अहवालानुसार समुद्रामधील पाण्याच्या प्रवाहावर प्रतिकूल परिणाम होऊन जैविक उत्पादकता तसेच समुद्रपक्ष्यांना अन्न मिळण्याच्या प्रक्रियेत अडथळा. 
  • दक्षिण अमेरिकेच्या कोस्टारिका प्रदेशातील तापमानवाढीमुळे बेडकांच्या अनेक प्रजाती एका बुरशीजन्य सांसर्गिक रोगाने नाहीशा झाल्या. अंटार्क्टिक प्रदेशातील ध्रुवीय अस्वल, रेनडियर आणि वालरससारख्या प्राण्यांचा अधिवास वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे संकुचित.
  • जागतिक संवर्धन संस्थेने अभ्यास केलेल्या चाळीस हजार प्रजातींपैकी सोळा हजार प्रजाती संकटग्रस्त. हेच प्रमाण संपूर्ण प्रजातींच्या संख्येशी जोडले, तर सुमारे ४० टक्के म्हणजेच सुमारे सात लाख प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर.
  • जगभरात असलेल्या सुमारे १५० प्रमुख पिकांच्या अनेक जातींची विविधता संकटात.
  • हवामान शास्त्रज्ञांच्या मते सन १९६१ ते २००३ या कालावधीमध्ये समुद्र पाण्याची पातळी १.८ मिमीने दरवर्षी वाढली.
  • हिमालयामध्ये साचणाऱ्या बर्फाचे प्रमाण कमी होत आहे. त्यावर अवलंबून असणाऱ्या जगातील ४० टक्के लोकांना भविष्यामध्ये पाणीपुरवठा खंडित होऊ शकतो. 
  • भारत देश जरी वितळणाऱ्या धृवीय बर्फापासून लांब असला तरी समुद्राच्या पातळीमध्ये होणाऱ्या वाढीचा धोका भारत आणि बांगलादेशातील किनारपट्टीला मोठ्या प्रमाणावर संभवतो. 
  • समुद्र आणि नदीच्या पाण्याचे तापमान वाढल्यामुळे माशांचे पुनरुत्पादन, हंगामी स्थलांतर आणि उत्पादनावर परिणाम होण्याचा संभव. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनाच्या उत्पादकतेलासुद्धा धोका. 
  • संशोधनाची दिशा  

  • हवामानातील बदलांना अनुकूल होताना शेतीशी संबंधित जैवविविधतेचे संरक्षण महत्त्वपूर्ण ठरू शकते. 
  • विभागवार वातावरण बदलाचा अभ्यास करून त्यानुसार विभागवार धोरणे ठरविणे, विभागवार अभ्यास करून हवामान बदलाला प्रतिकारक अशा पिकांच्या जाती शोधून काढणे गरजेचे आहे. स्थानिक तसेच परंपरागत ज्ञानाची शक्‍यता पडताळणे क्रमप्राप्त आहे. 
  • वातावरण बदलाशी अनुरूप पीक पद्धतीसोबत पीक पद्धतीत बदल, जमीन व्यवस्थापन, जलसंधारण, संरक्षित शेती, आंतरपीक पद्धती इत्यादीचा अवलंब करावा लागणार आहे.
  • लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान, हवामान बदलांची दिशा लक्षात घेऊन आवश्यकतेप्रमाणे पेरणीची वेळ आणि पीकचक्रामध्ये बदल करणे आवश्यक.  
  • कृषी वानिकी पद्धती, जमिनीची कमीत कमी मशागत, सेंद्रिय खतांचा वापर, वारा, सूर्यप्रकाश आणि समुद्री लाटा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणे ही काळाची गरज आहे. सर्वांत उत्तम आणि मोठा उपाय म्हणजे वृक्ष लागवड आणि वनीकरण. 
  • तापमान वाढविणारा घटक म्हणजे कर्ब वायू. त्याचे उत्सर्जन कमी करणे गरजेचे आहे.
  • भारतीय कृषी संशोधन परिषदेने  भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीचा अभ्यास केला असून, तापमान बदलानुसार नवी जातींच्या संशोधनाची दिशा स्पष्ट केली आहे. 
  • केंद्र शासनाने हवामान बदलाबाबत धोरणात्मक नियोजन आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय सौर अभियान, ऊर्जेचा योग्य वापर, राष्ट्रीय पाणी अभियान, हरित भारत अभियान  राबविण्यास सुरुवात केली आहे. वातावरण बदलाला योग्य प्रकारे सहन करू शकतील अशा प्रजातींची ओळख पटवली जात आहे. 
  • येत्या काळात निसर्गपूरक जीवनशैलीचा अवलंब महत्त्वाचा ठरणार आहे.
  • संपर्क : डॉ. प्रदीप हळदवणेकर,  ९४२३०४८५९१ (सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, जि. सिंधुदुर्ग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com