agricultural news in marathi New opportunities in sustainable fisheries | Agrowon

शाश्‍वत मत्स्यसंवर्धनात नवीन संधी

रवींद्र बोंद्रे, डॉ. शार्दूल गांगण, डॉ. सुधाकर इंदुलकर
सोमवार, 3 जानेवारी 2022

शाश्‍वत मत्स्यसंवर्धन हे अनेक प्रकारे शेतीशी निगडित आहे. गोड्या पाण्यातील पॅँगॅशिअस फिश, एक लिंगीय तिलापिया माशाचे संवर्धन, खाऱ्या पाण्यातील जिताडा संवर्धनासाठी संधी आहे. तसेच खाडी भागामध्ये पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धन, खेकडा पुष्ठीकरण व्यवसाय वाढत आहे.
 

शाश्‍वत मत्स्यसंवर्धन हे अनेक प्रकारे शेतीशी निगडित आहे. गोड्या पाण्यातील पॅँगॅशिअस फिश, एक लिंगीय तिलापिया माशाचे संवर्धन, खाऱ्या पाण्यातील जिताडा संवर्धनासाठी संधी आहे. तसेच खाडी भागामध्ये पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धन, खेकडा पुष्ठीकरण व्यवसाय वाढत आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी उपलब्ध जलसंसाधनांचा उपयोग करून मत्स्यशेतीद्वारे अधिकाधिक मत्स्योत्पादन घेणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी गरज आहे ती शाश्‍वत मत्स्यसंवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची.
यासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून पर्यावरणपूरक सातत्यपूर्ण मत्स्योत्पादन घेणे आवश्यक आहे.

शाश्‍वत मत्स्यसंवर्धनाचे फायदे 

 • अन्नधान्य, विशेषतः प्राणिजन्य प्रथिनांचे उत्पादन वाढविणे. त्याबाबतीत सुरक्षितता निश्‍चित करणे.
 • सर्वसामान्य लोकांच्या आहारातील प्रथिनयुक्त अन्नाची गरज भागविण्यासाठी मत्स्यसंवर्धन कार्यक्रम सर्वदूर, विशेषतः ग्रामीण भागात राबविणे.
 • मासेमारीद्वारे मिळणाऱ्या मत्स्योत्पादनावरील ताण कमी करणे, जेणेकरून अमर्याद मासेमारीला आळा बसेल.
 •  ग्रामीण भागातील होतकरू तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या, पूरक व्यवसायाच्या संधी निर्माण करणे. त्याद्वारे शहरी भागाकडे होणारे स्थलांतर थांबविणे.
 • एकात्मिक पीक पद्धतीस चालना. त्याद्वारे शेतीवरील अवलंबिता कमी करणे.
 • किमती परकीय चलन मिळविणे.
 • कृषी-संलग्न व्यवसायांची उदा. शीतगृह साठवणूक व साखळी निर्माण करणे.
 • प्रक्रिया उद्योगांचा विकास, विपणन व्यवस्थेतून विकास प्रक्रिया राबविणे.

शाश्‍वत मत्स्यसंवर्धनाची सूत्रे 

 • मत्स्य संवर्धनाबाबतचे सर्व मानदंड (शास्त्रीय, कायदेशीर, व्यापारविषयक इ ) काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.
 •  शाश्‍वत मत्स्य संवर्धनाबाबतची शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि माहिती घेऊन मत्स्योत्पादन घेणे.
 • केवळ खाऱ्या पाण्यातील कोळंबी आणि गोड्या पाण्यातील भारतीय प्रमुख कार्प या माशांच्या तलावातील मत्स्यशेतीवरच अवलंबून न राहता इतर संवर्धन योग्य माशांची उदा. गोड्या पाण्यातील पॅँगॅशिअस फिश, एक लिंगीय तिलापिया माशाचे संवर्धन, खाऱ्या पाण्यातील जिताडा, काकई, शेवाळ इत्यादी विविध जातींबरोबरच जलाशयीन आणि खाडी भागामध्ये पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धन, खेकडा पुष्ठीकरण, अधिक उत्पादन देणाऱ्या मत्स्य जाती आणि पीक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.
 • केवळ मत्स्यशेती न करता इतर कृषी व कृषी-पूरक व्यवसायांबरोबर उदा. शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन, भातशेतीमधील मत्स्यसंवर्धन आणि मत्स्यसंवर्धनाचे एकात्मिकीकरण करणे किफायतशीर ठरणार आहे.
 • जलसंधारणासाठी शासकीय योजनांद्वारे निर्माण झालेली शेततळी; त्यांची मोठ्या प्रमाणात व सर्वदूर झालेली निर्मिती, व्यवस्थापन योग्य तलावांचा आकार, प्लॅस्टिक आच्छादनामुळे पाण्याची दीर्घकाळ उपलब्धता, शेतकऱ्यांकडील शेततळ्यांची उपलब्धता या बाबी शाश्‍वत मत्स्यसंवर्धनासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहेत.
 • क्षारपड जमिनीत शास्त्रीयदृष्ट्या योग्य व्यवस्थापन केल्यास शेतीसाठी निरुपयोगी ठरलेल्या जमिनी, विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रातील, गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनाखाली आणून उत्पादनक्षम करणे शक्य आहे.
 • आपल्या देशामध्ये ४ ते १० महिने पाणी साठवणूक असलेले जवळपास २ दशलक्ष हेक्टर हंगामी तळी, पाझर तलाव आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे तलाव मत्स्य बोटुकली तयार करण्यासाठी तसेच काही प्रमाणात मत्स्य संवर्धनासाठी उपयुक्त आहेत. अशा तलांवामधून निर्माण करण्यात आलेल्या मत्स्य बोटुकली (१०० ते १५० मिमी आकार) मोठमोठ्या जलाशयात साठवणूक केल्यास या जलाशयांची उत्पादकता कमीत कमी एक टन प्रति हेक्टरी मिळू शकेल.
 • शाश्‍वत मत्स्य संवर्धनासाठी सद्यःस्थितीतील गोडे पाणी आणि निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ आणि निधीची आवश्यकता आहे.
 • बीजोत्पादन प्रकल्पाची व्याप्ती वाढवून जिल्हा पातळीवर मत्स्य बीजोत्पादन केंद्र विकसित होणे आवश्यक आहे, जेणेकरून शाश्‍वत मत्स्य बीजपुरवठा होईल.
 •  मत्स्य संवर्धनासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे दर्जेदार बीजाची. सद्यःस्थितीत संवर्धक मत्स्य जिऱ्यांची (५० मिमी आकार) साठवणूक करतात; त्याऐवजी त्यांचे लहान तलावात संगोपन करून किमान बोटुकली आकाराच्या (१०० ते १५० मिमी आकार) बीजाची उपलब्धता होणे अत्यावश्यक आहे. सदरहू नर्सरी संगोपनासाठी आवश्यक मनुष्यबळ, सोयीसुविधांची निर्मिती केल्यास बीज साठवणुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
 •  मत्स्य संवर्धनामध्ये किमान ६० टक्के खर्च खाद्यावर होतो. मत्स्यसंवर्धनाचे संपूर्ण यश हे खाद्य व्यवस्थापनावर अवलंबून असते. यासाठी दर्जेदार खाद्य किफायतशीर किमतीत मत्स्यसंवर्धकाला उपलब्ध करून दिले तरच प्रति हेक्टरी अधिकाधिक उत्पादन शाश्‍वतरीत्या मिळेल.
 •  शीतगृहांच्या साखळीबरोबरच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मत्स्योत्पादन विक्रीसाठी विशेष सोयीसुविधा निर्माण करणे किंवा याच धर्तीवर मत्स्योत्पादन बाजार समिती किमान जिल्हा पातळीवर निर्माण करून शाश्‍वत बाजारपेठ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. स्थानिकरीत्या मत्स्य-प्रक्रियादारांना प्रोत्साहन देता येईल.
 •  मत्स्य संवर्धकाला शाश्‍वत मत्स्यसंवर्धनाबाबत प्रशिक्षण द्यावे लागेल. मत्स्यसंवर्धन हा तसा नवीन विषय असून यातील तांत्रिक बाबींची, विशेषतः मत्स्यसंवर्धनातील हव्यासापोटी कमी दर्जाचे अधिक बीज साठवणूक केल्याने उद्‍भवणारे धोके व त्यांचे परिणाम, अशास्त्रीय किंवा पैसे वाचविण्यासाठी केलेल्या व्यवस्थापनामुळे होणारे नुकसान, अशा व्यवस्थापनातून निसर्गाची होणारी हानी इत्यादी विविध बाबतींत मत्स्यसंवर्धकांना प्रशिक्षित करणे अत्यावश्यक आहे.

शेतीसोबत शाश्‍वत मत्स्यसंवर्धन 

 • शाश्‍वत मत्स्यसंवर्धन हे अनेक प्रकारे शेतीशी निगडित आहे. मुख्यतः मत्स्यसंवर्धन हा पूरक व्यवसाय आहे.
 • मत्स्य संवर्धनात वापरण्यात येणारे खाद्य घटक हे कृषी उत्पादने आहेत. संवर्धनाच्या पूर्व तयारीसाठी लागणारे शेण, खते इत्यादी इतर कृषिपूरक व्यवसायांची उप उत्पादने आहेत.
 • मत्स्यसंवर्धन शेततळ्यातील पाणी शेतीला वापरल्यास पीक उत्पादनवाढीला फायदा होतो.
 • पीक लागवडीसाठी निरुपयोगी असलेल्या (उदा. क्षारपड जमिनी) मत्स्य संवर्धनासाठी वापरता येतात.

संपर्क : रवींद्र बोंद्रे ,९४२३०४९५२०
(तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, बांद्रा, मुंबई)


इतर कृषिपूरक
गाईचे गाभण काळातील व्यवस्थापनव्यायल्यानंतर वार अडकणे, कासदाह आणि गर्भाशय दाह...
कॉमन कार्प माशाचे प्रजनन तंत्रकॉमन कार्प माशाच्या बिजाची मागणी वाढत आहे. योग्य...
अंड्यात खरंच भेसळ असते का?अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच...
कुक्कुटपालनात रोगनियंत्रण महत्वाचे माणसांप्रमाणे जनावरांमध्ये तसेच पशु-पक्ष्यांनाही...
जनावरांची वार का अडकते?जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
शेळ्यांना द्या सुबाभुळचा चारा शेळ्यांच्या आहारात ४०% सुबाभळीचा वापर करावा....
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
खायला कोणती अंडी चांगली?तुम्ही अंडी खाल्लीत का ? कोणती खायची? गावरान अंडी...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
हिरव्या चाऱ्यासाठी नेपिअर लागवड तंत्रसंकरित नेपिअर या चारा पिकाच्या फुले जयवंत, यशवंत...
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन...आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....
बहुवार्षिक नेपियर गवत पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार...
गाय निगेटीव्ह एनर्जीमध्ये का जाते?आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन करत असताना...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
गायी-म्हशीमध्ये गर्भपाताची समस्यासंसर्गिक गर्भपात हा एक जीवाणूजन्य रोग असून त्याचा...