शेतीआधीच भाकरी बनवण्याची क्रिया होती ज्ञात

शेतीआधीच भाकरी बनवण्याची क्रिया होती ज्ञात
शेतीआधीच भाकरी बनवण्याची क्रिया होती ज्ञात

ईशान्य जॉर्डन येथील उत्खननात सुमारे १४,४०० वर्षांपूर्वी शिकार आणि फळे गोळा करून खाणाऱ्या माणसांनी भाजलेल्या धान्य पिठांची भाकरीसदृश खाद्य पदार्थ सापडला आहे. भाजलेल्या भाकरीचा हा सर्वांत जुना पुरावा आहे. सुमारे १० हजार वर्षांपूर्वी शेतीला सुरवात झाल्याचे मानले जाते. त्याआधीच्या (शिकारी व फळे गोळा करण्याच्या) काळातील हा पुरावा असून, जंगली तृणधान्यापासूनही खाद्यपदार्थ बनवण्याचा हा महत्त्वाचा पुरावा ठरतो. कोपनहेगन विद्यापीठ, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, केंब्रिज विद्यापीठ येथील संशोधकांच्या गटाने ईशान्य जॉर्डन येथील ब्लॅक डेझर्ट भागातील शुबायका या उत्खननस्थळी आढळलेल्या भाकरीचे विश्लेषण केले आहे. त्याचे निष्कर्ष ‘जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ दी अॅकेडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित केले आहेत. हे पुरावे आतापर्यंत सर्वांत जुन्या खाद्यपदार्थाचे असल्याचे मानले जाते. कोपनहेगन विद्यापीठातील उत्खनन- वनस्पतिशास्त्रज्ञ अॅमिया अॅरांझ ओटायगुई यांनी सांगितले, की शुबायका येथे जळालेल्या खाद्यपदार्थांचे शेकडो नमुने आढळले असून, त्यातून १४ हजार वर्षांपूर्वीच्या खाद्यप्रक्रियेविषयी माहिती मिळते. त्यातील २४ भाकरी किंवा रोट्सदृश पदार्थांचे विश्लेषण केले असून, त्यात बार्ली, ईनकोर्न आणि ओट या गव्हाच्या प्राचीन जंगली तृणधान्यांचे पीठ चांगल्या प्रकारे चाळून वापरल्याचे दिसते. निओलिथिक, युरोप, तुर्की, रोमन शहरांमध्ये असे रोट खाल्ले जात असल्याचे पुरावे आहेत. थोडक्यात, शेतीचा विकास होण्यापूर्वीपासूनच रोट तयार केले जात असल्याचे यातून दिसले. उत्खनन तज्ज्ञ तोबियास रिश्च्टर यांनी सांगितले, की नॅटूफियान शिकारी- धान्य गोळा करणारी माणसे संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. कारण, त्यांच्यामुळे संक्रमणाच्या काळातील विशेषतः फिरत्या काळापासून एकाच जागी स्थिर होणाऱ्या माणसांच्या आहारातील बदलाविषयी माहिती मिळू शकते. लिवॅण्ट येथे चपटी धारदार हत्यारे, धान्य दळण्याची दगडी जाती आढळली. येथील माणसांनी अधिक चांगल्या प्रकारे विविध वनस्पतींचा खाद्यात वापरासही सुरवात केली. भाकरीचे पहिले पुरावे आढळल्याने आमच्या अनेक गृहितकांना आधार मिळाला. मात्र  ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ असावी, त्यामुळेच या जंगली वनस्पतींची वाढ करून त्यापासून धान्य मिळवण्याच्या कल्पनेला चालना मिळाली असावी. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील संशोधिका लारा गोन्झालेझ कॅराटेरो यांनी इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाखाली जळलेल्या खाद्यांचे विश्लेषण केले. कॅराटेरो म्हणाल्या, की उत्खननातील रोट किंवा अन्य तृणधान्य आधारित खाद्यपदार्थांची ओळख ही तशी सरळ नाही. त्याच्या विश्लेषणासाठी आम्ही नवीन निकष लावले आहेत. त्यात पातळ भाकरी, कणिक किंवा गोळा आणि खिरीसारखा पदार्थ यांचे विश्लेषण करता येते. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली त्यातील सूक्ष्म संरचना ओळखता येतात. रोट बनवण्यासाठी अधिक मनुष्यबळ लागत असे. त्यात धान्यावरील तूस काढून पीठ तयार करणे, मळणे, भाजणे आदी प्रक्रियांचा समावेश होतो. ही प्रक्रिया शेतीपूर्वी विकसित झाली, असे सुचवणे वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण त्यानंतर धान्योत्पादन सुरू झाले असे म्हणणे उलटे वाटू शकते. त्यामुळे काळजीपूर्वक निष्कर्ष काढण्याची गरज प्रो. डोरियन फुल्लर व्यक्त करतात. या निओथिलिक कालखंडातील उत्खनन आणि संशोधनासाठी कोपनहेगन विद्यापीठाला नुकतेच डॅनिश काैन्सिल फॉर इंडिपेन्डन्ट कडून अनुदान मिळाले आहे. पुढील संशोधनाला चालना मिळाल्याचे तोबियास रिश्च्टर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com