बोन्साय नव्हे, शेतकऱ्यांचा बोनस

शेती आणि पूरक व्यवसायामध्ये गुरफटून गेलेल्या शेतकऱ्याला विरंगुळ्याच्या ज्या काही बाबी आहेत, त्यामध्ये बोन्साय या कलेचा नक्कीच समावेश केला पाहिजे. यामध्ये शास्त्र, कला, सौदर्य यांचा संगम आहेच, पण जपानी संस्कृतीही सामावलेली आहे.
बोन्साय साठी योग्य त्या सदाहरीत झाडांची निवड करावी. कुंडी योग्य प्रकारे भरून पुढील व्यवस्थापन करावे
बोन्साय साठी योग्य त्या सदाहरीत झाडांची निवड करावी. कुंडी योग्य प्रकारे भरून पुढील व्यवस्थापन करावे

शेती आणि पूरक व्यवसायामध्ये गुरफटून गेलेल्या शेतकऱ्याला विरंगुळ्याच्या ज्या काही बाबी आहेत, त्यामध्ये बोन्साय या कलेचा नक्कीच समावेश केला पाहिजे. यामध्ये शास्त्र, कला, सौदर्य यांचा संगम आहेच, पण जपानी संस्कृतीही सामावलेली आहे.  शेती कसणारा शेतकरी पिकासोबत ही कला नक्कीच जपू शकतो. या कलेतून त्याला उत्पन्नाची साधनेही उपलब्ध होऊ शकतात. वाढत्या शहरीकरणासोबतच सुशोभीकरणाचा व्यवसायही वेगाने वाढत आहे. घरांचा आकार कमी होत आहे. फ्लॅट संस्कृतीमुळे परसबागही नाहीशी झाली असून, झाडांची आवड गच्ची किंवा बाल्कनीपुरती मर्यादित करावी लागत आहे. अशा वेळी शहरी ग्राहकांचा व दर्दी बागकाम करणाऱ्यांचा विचार करून बोन्साय कलेसंदर्भात विविध व्यवसाय शेतकऱ्यांना नक्कीच करता येणार आहेत. त्यातून आपण चांगला आर्थिक फायदा मिळवू शकतो. जपानी शेतकरी आणि बोन्साय कलाकार वेगवेगळ्या झाडाच्या बोन्सायनिर्मिती आणि निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतात. बोन्साय या जपानी कलेला मराठीमध्ये ‘वामनवृक्ष कला’ असे म्हणतात. बोन म्हणजे लहान, साय म्हणजे झाड. छोट्या कुंडीत झाडाची आकर्षक पद्धतीने वाढ करताना, त्याची मुळे, फांद्या छाटून छोट्या कुंडीला शोभेल असा वेगवेगळा आकार देणे म्हणजेच बोन्साय होय. यामागे झाडांची निवड, लागवड, वाढवणे, छाटणी, वळण देणे अशा अनेक बाबी असतात. त्यामध्ये एक शास्त्र तयार झाले आहे.  झाडांची निवड  यात सदाहरित प्रकारच्या झाडांची निवड करावी लागते. उदा. डाळिंब, आंबा, पेरू, संत्री, वड, पिंपळ, बोगनवेल, जास्वंद इ.  कुंडीची निवड 

  •  बोन्सायच्या आकारानुसार योग्य त्या सामान्य कुंडीपेक्षा उथळ, पसरट अशा कुंड्यांची आवश्यकता असते. 
  •  कुंडीच्या तळभागात पाण्याचा निचरा होण्यासाठी, आधारासाठी तार बांधण्यासाठी छिद्रे पाडावीत.
  •  छिद्रामधून माती व मुळे बाहेर पडू नयेत, यासाठी जाळी लावून घ्यावी.
  •   रोप हलू नये व रोपास आकार देण्यासाठी तारेचा वापर करावा.
  •  या कुंडीच्या तळाशी जाड माती व विटांचे बारीक तुकडे, मध्यम भागात खतमिश्रित मध्यम माती, वरील भागात खतमिश्रित बारीक माती टाकून कुंडी तयार करावी.
  • कुंडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य 

  •  उथळ कुंडी, तांब्याची तार, प्लॅस्टिकची जाळी, चाळण्या, पकड, कटर, कात्री.
  •  विटांचा चुरा – मोठा, मध्यम, बारीक, त्यापेक्षा बारीक.
  •  जाड, मध्यम आणि बारीक पोयटा माती.
  • चाळलेले शेणखत. तार :  तांब्याचीच तार कुंडी भरताना वापरावी. लोखंडाच्या तारा स्वस्त असल्या तरी काही काळाने गंजतात. तांब्याची तार व्यवस्थित वाकते, पाहिजे तेवढी ताठ किंवा कडक राहते. ही तार तुटत नसल्यामुळे पुन्हा पुन्हा वापरू शकतो. कुंडी भरण्याची पद्धत  कुंडी स्वच्छ धुऊन घ्यावी तिला आतून चिमूटभर मुंग्याची पावडर शिंपडावी. त्यानंतर तिला तांब्याची तार दोन्ही छिद्रातून ओवून त्याच्या दोन्ही टोकावर छोटे प्लॅस्टिकच्या जाळीचे तुकडे ओवावे. ती तार बुडाशी पक्कडने घट्ट बांधून घ्यावी. तारेचे एक टोक वरपर्यंत ठेवावे. तार साधारण १० ते १२ इंच लांब घ्यावी. प्रथम कुंडीत जाड मिश्रणाचा पातळ थर द्यावा. त्यानंतर मध्यम मिश्रण चांगले दाबून भरावे. बोन्सायसाठी जे झाड घ्यायचे ते पिशवीतून काढून त्याच्या मुळ्या चांगल्या झटकून माती काढून घ्यावी. अतिरिक्त तंतुमुळे किंवा लांब मूळ कापून घ्यावीत. उरलेली मुळे कुंडीतील मिश्रणावर किंवा एखाद्या छोट्या दगडावर नीट बसवून घ्यावीत. त्यावर पुन्हा मध्यम मिश्रण दाबावे. त्यावर पातळसा थर बारीक गाळलेले खत माती मिश्रणाचा थर टाकावा. कुंडीत पाणी घेऊन त्यात बुडवून ठेवावी. मिश्रण बुडेल एवढे पाणी घेऊ नये. केशाकर्षणाने पाणी हळूहळू खालून वरपर्यंत कुंडीत येईल. कुंडी पूर्ण ओली झाली की मग ती कमी उन्हाच्या जागेत ठेवावी. साधारण आठ दिवसांत झाड लागल्याचे कळून येते. दर दोन-तीन वर्षांनी कुंडीतील माती बदलून त्याच्या मुळांचीही काटछाट करणे बोन्सायसाठी आवश्यक असते. रोपाच्या मुख्य मुळांच्या आसपासची उपमुळेही कापावी लागतात. मुख्य मूळ बरेच टोकदार असेल तर त्याचा टोकदार भागही छाटून टाकावा. रोपाच्या फांद्याही मधून मधून छाटाव्यात. भरपूर उपफांद्या फुटू शकतात. उघड्या राहणाऱ्या माती मिश्रणावर स्पॅग्नम मॉस ठेवल्यास कुंडी चांगली तर दिसतेच पण थंडही राहते. रोप ताजे व टवटवीत राहते. लागवड व व्यवस्थापन  बोन्सायसाठी रोप निवडल्यानंतर प्रथम रोपाची, फांद्यांची उंची आपल्याला हवी तेवढी कमी केली जाते. नको असलेल्या जादा फांद्या मुख्य खोडापासून काढून टाकाव्यात. राहिलेल्या फांद्यांवरील पाने काढून टाकावीत.  रोपाला दोन प्रकारची मुळे असतात. सोटमूळ जाड असून, सरळ खालच्या दिशेने वाढते. तंतुमुळे धाग्यांप्रमाणे असून, ती जमिनीला समांतर पसरतात. सोटमूळ कापून टाकले जाते. त्यामुळे तंतुमुळे जास्त प्रमाणात वाढण्यास मदत होते. रोप मातीच्या कुंडीमध्ये लावले जाते. त्यासाठी चांगल्या प्रतीची माती, वाळू आणि चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत समप्रमाणात एकत्र करतात. कुंडीच्या तळाशी विटांचे तुकडे टाकतात. त्यावरती दोन-तीन इंच जाडसर वाळूचा थर घालतात. रोप लावताना तंतुमुळे रोपाच्या बाजूने पसरतील, हे पाहून रोप कुंडीमध्ये लावतात. बागेतील इतर रोपांप्रमाणेच या रोपाची काळजी घ्यावी लागते. वेळच्या वेळी पाणी, खते, कीड-रोग नियंत्रणाचे उपाय इ. बाबींकडे लक्ष द्यावे. आपल्याला हव्या त्या जाडीच्या फांद्या, हव्या त्या आकाराचे, रचनेचे झाड तयार होईपर्यंत झाड कुंडीतच वाढवतात. त्यासाठी वेळोवेळी जादा फूट छाटणे, शेंडे कापणे, नवीन वाढणाऱ्या फांद्या काढणे, जादा पाने कापून टाकणे, फांद्याने वळण देणे अशी कामे करावी लागतात. झाडाचे आकारमान वाढल्यास पावसाळ्यामध्ये जाड मुळे छाटून झाड पूर्वीपेक्षा मोठ्या कुंडीत लावावे.  झाडाची योग्य ती रचना प्रत्यक्षात येण्यासाठी, आकार देण्यासाठी तांबे किंवा ॲल्युमिनिअमची तार गुंडाळली जाते. त्याला वायरिंग असे म्हणतात. तार गुंडाळताना बुंध्याच्या खालच्या भागाकडून सुरुवात करून फांदीच्या वरच्या टोकापर्यंत तिरकस पीळ पडेल, या पद्धतीने सर्व फांद्यांना तार गुंडाळतात. तार गुंडाळताना मध्ये येणारी पाने काढून टाकली जातात. रचनेप्रमाणे फांद्या वर, खाली, तिरकस करून घेतल्या जातात. हव्या त्या रचनेप्रमाणे झाड तयार झाले की बोन्साय ट्रेमध्ये लावले  जाते.  खत  सामान्यपणे रोपांच्या वाढीसाठी आवश्यक खत आणि पाणी हे बोन्सायसाठीही आवश्यक असते. बोन्सायला खते द्यावी लागत नाही, असा एक गैरसमज आहे. मात्र योग्य व तजेलदार वाढीसाठी सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल राखावा. कंपोस्ट खते, सेंद्रिय खते यासोबत रासायनिक खतांचाही वापर करावा. विद्राव्य खतांचाही फवारणीद्वारे वापर करता येतो. यामुळे झाडे टवटवीत, ताजी  दिसतात.  सिंचन  कुंडीतील मातीचा पृष्ठभाग सुकल्याप्रमाणे दिसल्यास किंवा मातीवर वापरलेले शेवाळ सुकल्याप्रमाणे दिसल्यास बोन्सायला पाणी द्यावे. पाणी देताना वृक्षाच्या पानावर झारीने पाणी द्यावे. यामुळे पानावरील धूळही साफ होते. पानांना तजेला येतो. कुंडीत पाणी देताना झाडाच्या सर्व बाजूंनी पाणी द्यावे. कुंडीतील माती पूर्णपणे ओली होऊन कुंडीच्या तळ भागातील छिद्रांमधून पाणी बाहेर झिरपू लागेल इतपतच पाणी द्यावे. बोन्सायची काळजी

  •  बोन्साय दिवसातून काही काळ उन्हात ठेवावे. यामुळे रोपाची वाढ चांगली होते. दिवसातून दोन ते तीन तास घरात ऊन येत असेल अशा जागी बाल्कनीत, खिडकीत, घराजवळील जागेत याची कुंडी ठेवावी. 
  •  रोग किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्यावे. शक्यतो प्रतिबंधात्मक फवारणी करावी. 
  •  एकदा छोट्या कुंडीत बोन्साय केले की योग्य काळजी घेतल्यास १५-२० वर्षांपर्यंतही चांगले राहते. आपल्या घराचे सौदर्य वाढण्यास मदत करते. 
  • बोन्सायचे फायदे 

  •  बोन्साय निर्मिती व विक्रीतून चांगला फायदा होऊ शकतो. साध्या रोपांची किंमत आणि बोन्सायची विक्री किंमत यात प्रचंड फरक आहे. बोन्सायचे वय, सौंदर्य यानुसार त्याच्या किमती काही हजारांच्या पुढे जातात. अलीकडे विविध प्रकारच्या देशीपरदेशी वास्तुशास्त्रामुळे वेगवेगळ्या झाडांना मागणी येत आहे. अशा वेळी त्याचा फायदा नक्कीच घेता येईल. 
  •  कमी जागेमध्ये वनस्पतींची वाढ शक्य होते.
  •  घर, कार्यालये व सभोवतीच्या बागांच्या सुशोभीकरणासाठी बोन्साय उपयुक्त ठरतात.
  •  वामनवृक्षाच्या एकत्रित परिणामातून एक आकर्षक, मनमोहक दृश्य निर्माण करता येते. 
  •  उत्कृष्ट कलाकृती तयार करण्याच्या आनंदासोबतच आर्थिक प्राप्तीही शक्य होते.
  • - बी. जी. म्हस्के (सहायक प्राध्यापक), ९०९६९६१८०१ डॉ. एन. एम. मस्के (प्राचार्य),  ९४२३४७१२९४ (एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com