वनशेतीमध्ये शिसव लागवडीला संधी

शिसवाच्या लाकडाला उच्च श्रेणीचे फर्निचर, प्लायवूड निर्मितीसाठी मागणी आहे. याच बरोबर जनावरांसाठी चारा, सावली, जळाऊ लाकूड, मृद्संधारण तसेच शहरांमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा शोभेसाठी याची लागवड करतात.
Shisav cultivation in forestry.
Shisav cultivation in forestry.

शिसवाच्या लाकडाला उच्च श्रेणीचे फर्निचर, प्लायवूड निर्मितीसाठी मागणी आहे. याच बरोबर जनावरांसाठी चारा, सावली, जळाऊ लाकूड, मृद्संधारण तसेच शहरांमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा शोभेसाठी याची लागवड करतात. दर्जेदार लाकडासाठी शिसव वृक्ष ओळखला जातो. यास शीसम किंवा शिसू  म्हणतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये शिसवाच्या लाकडाला “बॉंम्बे ब्लॅकवूड” किंवा “इंडियन रोसवूड” या नावाने ओळखले जाते. फर्निचरसाठी या लाकडाला मागणी आहे. महाराष्ट्रातील हवामान शिसव वृक्षाच्या वाढीस अनुकूल आहे. 

  •   ही प्रजाती फाबेसी कुटुंबातील आहे. मध्यम ते मोठ्या विस्तृत आकार, वेगाने वाढ, काटक, नत्र स्थिरीकरण करणारी, खडबडीत साल असते.
  •   अनुकूल परिस्थितीत ३० मीटर उंच आणि खोडाचा व्यास ८० सेंमी होतो.  लाकडाला उच्च श्रेणीचे फर्निचर, महागड्या दर्जाचे प्लायवुडसाठी मागणी आहे. जनावरांसाठी चारा, सावली, जळाऊ लाकूड, मृद संधारण तसेच बागांमध्ये किंवा शहरांमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा शोभेसाठी लागवड केली जाते.
  •   उत्तर भारतामध्ये गंगेच्या त्रिभुज प्रदेशात जास्त प्रमाणात शेताच्या बांधावर याची लागवड दिसते.
  •   महामार्ग, नदीपात्र, ओढे, पाणवठे, पाण्याचे कॅनॉल, रेल्वे ट्रॅक, गायरान, वनीकरण, पडीक जमिनी व रस्त्याच्या दुतर्फा याची लागवड केलेली आहे.
  • दुष्काळ सहन करण्याची क्षमता असल्याने कमी पावसाच्या प्रदेशामध्ये देखील जोमाने वाढतो. विशेषतः वालुकामय, खोल व चिकणमातीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीमध्ये जोमाने वाढते. काळ्या जमिनीमध्ये याची वाढ मंद आणि हळुवार होते. याच्या वाढीसाठी जमिनीचा सामू ५ ते ७ च्या दरम्यान असावा. मुरमाड व क्षारपड जमिनीमध्ये याची चांगली वाढ होते. उथळ, पाणी साचून राहणाऱ्या आणि क्षारतेचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी अयोग्य असतात.
  • दर्जेदार रोपनिर्मिती 

  • बी, क्लोनल पद्धत किंवा जड्यांपासून रोपनिर्मिती करण्यात येते. स्थानिक परिसरातून किंवा जंगलातून सरळ वाढलेला, वृक्षाचा मुकुट निमुळता, गाठमुक्त व दंडगोलाकार असलेला व मध्यम वयाचा वृक्ष निवडून बीज किंवा शाखा घ्याव्यात. याशिवाय काही वन संशोधन संस्थांकडून बीज किंवा मिनी नोडल पद्धतीने तयार केलेली रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत. 
  • निवडलेल्या मातृ वृक्षांपासून मार्च - एप्रिलमध्ये शेंगा गोळा कराव्यात. बियांची उगवण क्षमता ९० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे बीज उपचार करण्याची गरज भासत नाही. प्रति शेंग एकच बी असल्याने, शेंगेचा दोन्ही बाजूंचा भाग तोडून पॉलीबॅग किंवा गादी वाफ्यावर लागवड करावी. यासाठी खत,मातीचे मिश्रण २:१:१ (माती:वाळू:शेणखत) असावे.
  • मिनी नोडल (क्लोनल) पद्धतीमध्ये, निवडलेले दर्जेदार मातृवृक्षांच्या शाखाद्वारे मातृ बगीचा (मदर हेज गार्डन) तयार करावा. कोवळ्या नवीन वाढ झालेल्या फूटव्यांपासून (५ ते ७ सेंमी) ज्यावर एक किंवा दोन डोळे असलेले फुटवे घेऊन आयबीएमध्ये बुडवून आद्रता आणि तापमान नियंत्रित केलेल्या शीतगृहात रूट ट्रेनरमध्ये किंवा वाळू वाफ्यावरती लावावे. साधारणपणे १०-१५ दिवसांत मुळे सुटतात. ३० ते ३५ दिवसांमध्ये पाने फुटतात. नंतर हार्डनिंगसाठी ठेवून ४ ते ५ महिन्यात लागवडीस रोपे तयार होतात. स्टंप किंवा जड्या पद्धतीने म्हणजेच एक ते दोन वर्षांचे रोपटे घेऊन त्याच्या ३ ते ५ सेंमी शाखेचा (देठ)  भाग व २० ते २२ सेंमी सोटमुळाचा भाग घेऊन बाकी तीक्ष्ण चाकूने कापून टाकले जातात. वनांमध्ये लागवडीसाठी जड्यांची शिफारस केली जाते. पाभरीच्या साह्याने लागवड करतात.
  • लागवड तंत्र  

  • मे महिन्यामध्ये ४५ सेंमी × ४५ सेंमी × ४५ सेंमी आकाराचे खड्डे काढून घ्यावेत. लागवडीचे अंतर २ × २ मी,३ × ३ मी,४ × ४ मी, ६ × २ मी किंवा ८ × २ मी ठेवावे.
  • जूनच्या सुरवातीला खड्डे १० ते १५ किलो शेणखत, २५० ग्रॅम निंबोळी खत  आणि १०० ग्रॅम मिश्रखताने मिश्रणाने भरावेत.
  • जुलै महिन्यात लागवड पूर्ण करावी. यामुळे मरतुकीचे प्रमाण कमी होते. रोपाची लागवड केल्यानंतर आळ्यातील माती दोन्ही पायाने दाबून लगेच पाणी द्यावे. 
  • आंतरपीक घेत असल्यास पाणी आणि खतांची फारशी मात्रा द्यावी लागत नाही.  परंतु सघन पद्धतीमध्ये लागवड असल्यास प्रत्येक वर्षी १० किलो शेणखत, १०० ते १५० ग्रॅम मिश्र खत जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये रिंग पद्धतीने १५ ते २० सेंमी जमिनीमध्ये द्यावे.
  • पारंपरिकदृष्ट्या शिसव लागवड शेती बांधावर साधारणपणे १५ ते ३० फूट अंतरावर केली जाते. व्यापारीदृष्ट्या जातीत जास्त इमारती लाकडाचा पुरवठा व उत्पादन होण्यासाठी शिफारशीनुसार अंतर ठेऊन लागवड करावी . 
  • वनशेती पद्धती

  • शिसव लागवडीमध्ये कडधान्ये, गहू, हळद व तेलबिया पिके घेतली जातात.
  • वायूरोधक म्हणून फळबागा, चहा व कॉफी मळ्यांमध्ये करतात. शेताच्याकडेने किंवा बांधावर देखील लागवड केली जाते. 
  • गोठा, कोंबडी शेडच्या बाजूने सावलीसाठी वृक्षांची लागवड केली जाते. 
  • विविध प्रकारची चारापिके जसे की अंजन, मारवेल, पवना, ऱ्होड्स, गिनी, दीनानाथ, स्टायलो व दशरथ गवत आंतरपीक म्हणून कमी पावसाच्या ठिकाणी घेतले जाते.
  • उत्पादन आणि उपयोग 

  • नैसर्गिकरित्या वाढलेले शिसव ३० ते ३५ वर्षांमध्ये काढणीस तयार होतो. परंतु वनशेतीमध्ये योग्य व्यवस्थापनामुळे १२ ते २० वर्षांमध्ये काढणीस येते.
  • हे लाकूड भारतातील सर्वोत्तम लाकडापैकी एक असून विदेशात देखील उच्च प्रतीच्या फर्निचरसाठी जास्त मागणी आहे.
  • पारंपरिकरीत्या शिशवाचे लाकूड घराचे वासे, चौकट,खिडक्या व फर्निचर साठी वापरले जातात. तसेच सजावट, काष्ठ निर्मिती, हस्तकला, कोरीव काम, खेळणी, बैलगाडी, ढोलकी/वाद्ये, बंदुकीचा दांडा, टूल हँडल, कातकामाचे यंत्र, नक्षीदार तावदाने व जमिनीवरील पॅनेलसाठी वापरतात.
  • वनशेतीमधील व्यवस्थापन   

  • पहिल्या दोन वर्षांमध्ये रोपांच्या सभोवती तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भांगलण करावी.
  • दुसऱ्या वर्षांमध्ये, रोपाच्या गरज नसलेल्या फांद्या काढून, सरळ वाढणारा शेंडा ठेवावा. त्याच्या आधारासाठी बांबूच्या काठ्या लावाव्यात. 
  • सघन पद्धतीने लागवड केलेल्या बागेमध्ये कमीत कमी तीन वेळा तरी विरळणी करावी. यामध्ये विरळणी ही ५ व्या, १० व्या व १५ व्या वर्षी करून वृक्षांची संख्या निर्धारित करावी.  शेवटची विरळणी केल्यानंतर हेक्टरी २०० ते ३०० वृक्ष संख्या ठेवावी. दुसऱ्या विरळणी वेळी रोगट, कमी वाढ झालेली व दोन किंवा त्यापेक्षा जास्त खोड असलेली निकृष्ट दर्जाची झाडे काढून टाकावी. 
  • दर्जेदार, दंडगोलाकार आणि गाठमुक्त लाकूडनिर्मितीसाठी छाटणी करताना काळजी घ्यावी, जसे की मुख्य खोडावरती आलेल्या फांद्यांपैकी ३० ते ४०  टक्के खालच्या फांद्या धारदार करवतीने १०  सेंमी वरून तिरका काप देवून छाटाव्यात. वृक्षाची छाटणी केल्यावरती बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • - संग्राम चव्हाण,  ९८८९०३८८८७ (संग्राम चव्हाण हे राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती येथे आणि विजयसिंह काकडे, हर्षवर्धन देशमुख हे वनशास्त्र महाविद्यालय, अकोला  येथे कार्यरत आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com