उन्हाळ्यातील फळबाग व्यवस्थापनाकडे द्या लक्ष

उन्हाळ्यामध्ये शक्यतो ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन पद्धतीने थेट फळझाडांच्या मुळांजवळ गरजेनुसार पाणी द्यावे. या पद्धतीमुळे झाडांच्या गरजेनुसार पाणी पुरविले जाते. फळबागेस सकाळी किंवा रात्री पाणी द्यावे. पाणी देताना जमिनीचा मगदूर, तापमान आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घ्यावी.
use the drip irrigation and mulching for fruit orchards.
use the drip irrigation and mulching for fruit orchards.

उन्हाळ्यामध्ये शक्यतो ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन पद्धतीने थेट फळझाडांच्या मुळांजवळ गरजेनुसार पाणी द्यावे. या पद्धतीमुळे झाडांच्या गरजेनुसार पाणी पुरविले जाते. फळबागेस सकाळी किंवा रात्री पाणी द्यावे. पाणी देताना जमिनीचा मगदूर, तापमान आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घ्यावी. उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवनाचा वेग वाढतो. त्यामुळे झाडाच्या पानांद्वारे झपाट्याने पाणी बाहेर पडते. परिणामी झाड वाळण्यास सुरुवात होते. तापमानात वाढ झाल्यामुळे पाने करपतात, नवीन पाने येण्यास अडथळा निर्माण होतो, झाडाची वाढ खुंटते, फळे काळी पडतात. याचा एकूण परिणाम उत्पादनावर होतो. पाण्याचा जास्त ताण पडला तर नवीन लावलेली झाडे दगावण्याची शक्यता असते. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून फळबागेस पुरवणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन 

  • पाणी शक्यतो सकाळी व रात्री दिल्यास जास्त फायदेशीर ठरते. 
  • फळझाडांच्या मुळाजवळ पिकांच्या गरजेनुसार ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. या पद्धतीमुळे मुळांजवळील भाग कायम ओलसर राहतो. 
  • पाण्याची कमतरता असलेल्या भागात ही पद्धत फायदेशीर ठरते. 
  • या पद्धतीत ६० ते ६५ टक्के पाण्याची बचत होते. तसेच पाण्यासोबत उत्पादन खर्चातही बचत होते. 
  • मटका सिंचन पद्धत

  • कमी क्षेत्रातील जास्त अंतरावरील फळझाडांच्या लागवडीत मटका सिंचन पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. 
  • झाडांच्या वाढीनुसार ५ ते ७ लिटर पाणी बसेल एवढी लहान मडकी पहिल्या २ ते ३ वर्षांकरिता वापरावीत. या पुढील जास्त वयाच्या झाडांकरिता १० ते १५ लिटरची मडकी निवडावीत. 
  • मडकी शक्‍यतो जास्त छिद्रे असलेली किंवा आडीत कमी भाजलेली असावीत. म्हणजे त्यातून पाणी झिरपत राहील. 
  • प्रत्येक झाडास २ मडकी बसवावीत. 
  • मडके बसविताना प्रथम मडक्‍याच्या आकाराचा खड्डा खोदून तेथे मडके गळ्याबरोबर जमिनीत पुरावे. त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरून ठेवावे. हे पाणी मडक्‍यावाटे झिरपत राहते. 
  • मडके पाण्याने भरल्यानंतर त्यावर झाकण ठेवावे. त्यामुळे मडक्‍यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही.
  • ही पद्धत मोठ्या बागेत वापरता येत नाही. कारण मडके भरण्यासाठी मजुरांचा खर्च वाढत राहतो.
  • आच्छादनाचा वापर 

  • बाष्पीभवन रोखण्यासाठी, जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकवण्यासाठी आणि जमिनीची धूप कमी करण्यास आच्छादनाचा वापर फायदेशीर ठरतो. 
  • आच्छादनाचा वापर करण्यासाठी वाळलेले गवत, उसाचे पाचट, लाकडाचा भुस्सा, गव्हाचे काड इत्यादींचा वापर करता येतो. सेंद्रिय आच्छादनाची जाडी १२ ते १५ सेंमी असावी. सेंद्रिय स्वरूपाचे आच्छादन वापरल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
  • पॉलिथिन फिल्मच्या आच्छादनामुळे तणांची वाढ होत नाही. जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते.
  • आच्छादनामुळे उन्हाळ्यात पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर वाढविता येतो. आच्छादनामुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनातही वाढ होते. जमीन भेगाळण्याची तीव्रता कमी होते. 
  • बाष्परोधकांचा वापर 

  • उन्हाळ्यात पानांतून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. पानांवाटे सुमारे ६० टक्के बाष्पीभवन होते. 
  • हे बाष्पीभवन रोखण्यासाठी महिन्यातून २ वेळा केओलिन (८ टक्के) ८० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. ही फवारणी मार्च, एप्रिल व मे महिन्यात पानांवर करावी. 
  • यामुळे सूर्यप्रकाश पानावरून परावर्तित होऊन पिकातून बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. तसेच पाण्याची बचत होते.
  • महत्त्वाचे...

  • फळबागेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार बहराचे नियोजन करावे. 
  • जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. म्हणजे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.
  • नवीन लागवड केलेल्या कलमी रोपांचे वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी काठीचा आधार द्यावा. 
  • जमिनीतील कमी ओलाव्यामुळे आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे फळझाडांच्या खोडाला इजा होण्याची शक्यता असते. त्यासाठी खोडाला १ टक्का बोर्डो पेस्टचा लेप लावावा.
  • - डॉ. एन. एम. मस्के,  ९४२३४७१२९४ - बी. जी. म्हस्के,  ९०९६९६१८०१ (एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, जि. औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com