द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे आकलन महत्वाचे

गत हंगामात निर्यात वाढूनही तुलनेत आर्थिक उलाढाल वाढलेली नाही. तर शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन खर्चाला अनुसरून अपेक्षित उत्पन्न आलेच नाही. त्यामुळे द्राक्ष हंगामाचे नियोजन व बाजारपेठेचे आकलन या दोन्ही बाजू विचारत घेत आगामी काळात काम करावे लागणारा आहे. 
Planning and market assessment is important during the grape season
Planning and market assessment is important during the grape season

अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते कोरोनाची पार्श्वभूमी असताना गत द्राक्ष हंगामात गोडी बहर छाटण्यांचे कामकाज टप्प्याटप्प्याने न झाल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला. त्यामुळे द्राक्षाला आंतरराष्ट्रीय व स्थानिक बाजारातही उठाव नसल्याने अपेक्षित दर मिळाले नाहीत. त्यामुळे गत हंगामात निर्यात वाढूनही तुलनेत आर्थिक उलाढाल वाढलेली नाही. तर शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन खर्चाला अनुसरून अपेक्षित उत्पन्न आलेच नाही. त्यामुळे द्राक्ष हंगामाचे नियोजन व बाजारपेठेचे आकलन  या दोन्ही बाजू विचारत घेत आगामी काळात काम करावे लागणारा आहे.  राज्यात गेल्या हंगामात नाशिक, सांगली, सातारा, लातूर, नगर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर व बीड येथून अपेडाच्या ‘ग्रेपनेट’प्रणाली अंतर्गत निर्यात झाली. त्यात जवळपास ९० टक्के निर्यात हि नाशिक जिल्ह्यातून होते. द्राक्ष उत्पादकांचे वैयक्तिक पातळीवर आगाप व नियमित असे हंगामी छाटणीचे नियोजन असते. मात्र एकदाच छाटण्या झाल्यास मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढून गोड द्राक्षे दराच्या अंगाने आंबट ठरतात. गत हंगामात याचाच फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे द्राक्षांची मागणी-पुरवठा साखळी विस्कळीत झाली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष शेतकऱ्यांचे ऐन हंगामात १६०० कोटींवर नुकसान झाले. यावर पुढील हंगामात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी ९० टक्के बागांमध्ये २० ऑक्टोबरपर्यंत छाटण्या पूर्ण केल्या. तर नोव्हेंबरमधील छाटण्या ५ ते १० टक्केच झाल्या. त्यामुळे फेब्रुवारी व मार्च महिन्यात बाजारात मागणीच्या तुलनेत अधिक माल बाजारात एकदाच आला. परिणामी दरात मोठी घसरण झाली. त्यासाठी उत्पादन ते काढणी नियोजन याशिवाय बाजारपेठेच्या अंगाने सर्व बाबी समजून घेणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक ३५,७८७ प्लॉटची नोंदणी अपेडाच्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीवर करण्यात आली आहे. त्यापैकी १९,३९३ प्लॉटची निर्यातीसाठी शिफारस करण्यात आली होती. युरोपमध्ये एकूण झालेल्या निर्यातीत नाशिकचा वाटा ९६०२८.३२ टन इतका आहे. त्यात निर्यातवाढ दिसून आली. त्यामुळे नुसतीच निर्यातवाढ नको तर संतुलित पुरवठ्यातून दर मिळविण्यासाठी छाटणीचे नियोजन महत्वाचे आहे. र आहे.   अशी झाली द्राक्ष हंगामात कोंडी फलोत्पादन क्षेत्रात मुळात सांख्यिकी चुकीची असल्याने उत्पादन निश्चित करणे अडचणीचे ठरते. अनेकदा लागवड  क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता याची वास्तविक माहिती नसल्याने गोंधळ असतो. गत हंगामात २५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२०पर्यंत २५ दिवसांच्या कालखंडात अधिक प्रमाणावर छाटण्या पूर्ण झाल्या. नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत होणाऱ्या छाटण्या कमी राहिल्या. पुढे  काढणी हंगाम सुरु झाल्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यापासून  ते मार्चअखेर पुरवठा वाढल्याने दरात सुधारणा नव्हती. त्यातच पुढे अवकाळी, गारपीट यासह तापमान वाढ यामुळे नुकसान अधिक झाले. एप्रिलच्या सुरुवातीपासून ९० टक्के माल संपल्यानंतर मागणी वाढत गेली अन् पुरवठा कमी झाला. त्या नंतर दरात सुधारणा दिसून आली. मात्र अखेरच्या टप्प्यात १० टक्के बागांमध्ये मिळालेले वाढीव दरही उत्पादकांच्या पथ्यावर पडणारे नव्हते. वाढलेला पिक संरक्षण खर्च, अवकाळी व गारपिटीच्या तडाख्यात बिघडलेली मालाची प्रतवारी ही जटिल समस्या ठरली. व्यापाऱ्यांनी प्रतवारी पाहून माल काढला तर राहिलेला माल स्थानिक बाजारात पडत्या दराने विकण्याची वेळ आली. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक नुकसान वाढत गेले. उत्पादन व मजुरी खर्च वाढल्याने काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही मिळालेल्या दरात निघालेला नाही.   मार्च महिन्यात निच्चांकी दराने खरेदी झाली. गेल्या अनेक वर्षानंतर द्राक्ष उद्योगावर आलेले मोठे संकट ठरले. त्यातच निर्यात होताना मार्गात सुएझ कालव्यात २३ मार्चला अडकलेल्या जहाजामुळे निर्यात सुरळीत होण्यासाठी आठवड्याहून अधिक कालावधी लागला. हा हि फटका निर्यात कामकाजात बसला. निर्यात वाढली मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाले नाही. अधिक मालाची उपलब्धता झाल्यानंतर पुरवठ्यात अडचणी वाढल्या. शास्त्रीय पद्धतीने उत्तरे शोधण्याची गरज अनेक शेतकऱ्यांची एकपीक पद्धत असल्याने हंगाम वाया गेल्यास मोठा धोका असतो. अपेक्षित उत्पन्न न आल्यास आर्थिक कोंडी होते. त्याचा परिणाम आगामी हंगामावर होतो. त्यामुळे एक तर पर्यायी पिक किंवा असलेल्या द्राक्ष बागेत उत्पादनाचे नियोजन होणे गरजेचे आहे. पूर्वी ‘सेलर्स मार्केट’ होते आता ‘बायर्स मार्केट’ आहे. निर्यातीचे कामकाज सुपर मार्केटवर अवलंबून आहे. कोविडपूर्वी होलसेल मार्केट सुरु असल्याने सुपर मार्केटमधून मालाचे रिजेक्शन झाल्यास येथे हा माल विकला जायचा. मात्र या पार्श्वभूमीवर मर्यादा आल्या. युरोपच्या सुपर मार्केटची दर आठवड्याला ५०० कंटेनर मागणी असतांना पुरवठा वाढल्याने दर कोसळले. त्यामुळे पुरवठ्यापेक्षा अतिरिक्त माल असल्यास साठवणूक, शीतसाखळी, संलग्न पुरवठा साखळी हा महत्वाचा भाग आहे. याशिवाय अनेक भागात बेदाणा निर्मिती हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे मूल्यवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अशी राहिली मागणी ‘अपेडा’च्या माहितीनुसार २०२०-२१ च्या हंगामात द्राक्ष निर्यात हि नेदरलॅंडमध्ये एकूण निर्यातीच्या 33 टक्के झाली. तर युक्रेमध्ये ११ टक्के, बांगलादेशमध्ये १० टक्के, रशियामध्ये १० टक्के व युनायटेड अरब अमिरेत्समध्ये ६ टक्के राहिली. या पाच एकूण निर्यातीच्या तुलनेत सर्वाधिक कामकाज झाले. मात्र गेल्या दोन वर्षांत उत्पन्नात अपेक्षित वाढ न होता आलेख घसरताना दिसून आला. गेल्या तीन वर्षातील एकूण निर्यात स्थिती  

हंगाम     निर्यात (टनांत)  उलाढाल (कोटींत)
२०२०-२१  २४६१०१.३७    २२९८.४५
२०१९-२०   १९३६९०.५१     २१६७.८६
२०१८-१९   २४६१३३.७६ २३३५.४५

     राज्यातून ‘ग्रेपनेट’ प्रणालीतून झालेली निर्यात (टनांत)  

राज्य     निर्यात     कंटेनर संख्या
२०२०-२१  १०६८०९.४६३  ७९६४
२०१९-२०   ९२३४२.४०३     ६८४२

     दराची स्थिती (प्रति किलो)

बाजार     फेब्रुवारी     मार्च     एप्रिल
स्थानिक बाजार १५ ते २५  १५ ते ३० ३० ते ५०
निर्यातक्षम     ३५  ते ५५  ३० ते ६० ५५ ते ७५

  या मुद्द्यावर लक्ष देणे गरजेचे

  • उत्पादन घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी टप्प्या टप्प्याने अंदाज घेऊन बहर छाटण्या घेणे गरजेचे
  • वेगवेगळ्या बाजारपेठ क्षमता ओळखून मागणीनुसार पुरवठा करावा
  • मार्केटचा कन्झम्शन पॅटर्न समजून त्याप्रमाणेच मागणीनुसार निर्यात अपेक्षित
  • नियोजन हे पुरवठा करणाऱ्याच्या बाजूनेच  होण्यासाठी विशेष काळजी
  • नव्या संधी, ग्राहकांची मागणी यानुसार उत्पादन घेण्यावर भर महत्वाचा 
  • विक्री व्यवस्था वैयक्तिक पातळीवरील शक्य नसल्याने संघटित संरचना आवश्यक
  • प्रतिक्रिया पहिल्या टप्प्यापासून बाजारपेठ समजून घेण्यावर भर महत्वाचा असायला हवा. हंगामाच्या शेवटपर्यंत पुरवठा राहील असे उत्पादन घेण्याचे नियोजन केले पाहिजे. कुठल्याही अफवांना बळी न पडू नये. बाजारपेठेतील मागणी व उत्पादकांकडून होणारा पुरवठा यावर दर अवलंबून असतो. त्यामुळे हंगामाच्या व्यवस्थापनाबरोबर शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करणे काळाची गरज आहे. त्याप्रमाणे निर्यातदारांशी संवाद साधून वेळोवेळी आढावा घेणे गरजेचे आहे. -रविंद्र बोराडे ( विभागीय अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.) राज्यातील तसेच प्रामुख्याने नाशिक जिल्ह्याचा हवामानाच्या दृष्टीने विचार केल्यास द्राक्ष हे पिक दोन ते तीन महिने असे आहे. १५ सप्टेंबरपासून छाटणी सुरु होऊन पुढील एक ते दीड महिना कामकाज चालते. त्यामुळे काढणीच्या दरम्यान दोन महिण्यांत जास्त माल येतो. हे उत्पादकांच्या दृष्टीने ठीक आहे. मात्र ग्राहकांच्या दृष्टीने विचार व्हायला हवा. ८ ते १२ महिने द्राक्ष खाण्यास ग्राहक तयार आहेत. त्यामुळे दोन ते तीन महिने बाजारात आणण्यापेक्षा १२ महिने स्थानिक माल बाजारात कसा आणता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे, याकडे लक्ष देऊन नियोजन केल्यास उत्पादकाच्या दृष्टीने फायद्याचे राहील. नियोजन केल्यास गुंते सुटतील. त्यानुसार बाजारपेठेत विक्रीचे नियोजन करता येणे सोपे होईल. -विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ऑक्टोबरमध्ये  मागणीनुसार १ जानेवारीपासून संतुलित पुरवठा व्हायला हवा, तो होत नाही. तो फेब्रुवारीमध्ये अधिक होतो. त्यामुळे कामकाजावर ताण पडतो. सप्टेंबरमध्ये शेतकरी छाटणी घेत नाहीत. परतीचा मान्सून , अवकाळी पाऊस  या भीतीने शेतकरी कामकाज करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन घेण्याची दिशा त्यांच्या वैयक्तिक पातळीवर नियोजन करून स्पष्ट केली पाहिजे. त्यामुळे अतिरिक्त पुरवठा थांबवून संतुलित पुरवठा करणे शक्य होईल. त्याचा फायदा उत्पादक व निर्यातदार या दोन्ही घटकांना होईल. त्यानुसार सप्टेंबर मधील बागांना क्रॉपकव्हर सारखे पयोग हने गरजेचे आहे. याशिवाय प्रतिकूल परिस्थिती तग धरणाऱ्या वाणाचा देखील विचार करावा लागणार आहे. -  मधुकर क्षीरसागर, द्राक्ष निर्यातदार, संचालक- विजयश्री एक्स्पोर्ट

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com