नियोजन कागदी लिंबू हस्त बहराचे...

हस्त बहराची फुले ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आणि फळे एप्रिल-मे मध्ये काढणीस येतात. बाजारात या बहाराच्या फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे चांगला दर मिळतो.
Planning of Key lime cultivation
Planning of Key lime cultivation

हस्त बहराची फुले ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आणि फळे एप्रिल-मे मध्ये काढणीस येतात. बाजारात या बहाराच्या फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे चांगला दर मिळतो. त्यामुळे योग्य पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे. कागदी लिंबाच्या झाडाला वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र, उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या लिंबाला अधिक भाव मिळतो. त्यामुळे या काळात लिंबू फळे येण्यासाठी हस्त बहाराचे योग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्‍यक आहे. लिंबूवर्गीय झाडांना बहर येण्याकरिता झाडाची वाढ करणाऱ्या अन्नद्रव्यांचा संचय होणे गरजेचे आहे. अन्नद्रव्यांचा संचय झाडांच्या फांद्यामध्ये झाल्यानंतर पोषक हवामान मिळताच बहराची फुले नवतीसोबत दिसू लागतात. कागदी लिंबातील बहर  आंबिया बहर  फुलधारणा जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान होऊन फळांचे उत्पादन जून ते ऑगस्ट या महिन्यात मिळते. उत्पादन भरपूर प्रमाणात मिळते. परंतु या काळात बाजारात फळांना फार कमी दर असतो. मृग बहर  फुलधारणा जून-जुलै महिन्यात होऊन फळांचे उत्पादन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मिळते. फळांवर चकाकी आणि प्रत ही उत्तम असते. मात्र, या फळांनादेखील बाजारात कमी दर मिळतो. हस्त बहर 

  • फुलधारणा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होते. आणि फळे मार्च-मे महिन्यामध्ये काढणीस येतात. या काळात फळांना मागणी आणि दर चांगला असतो.
  • बागायतदारांचा कल हस्त बहाराकडे असतो. परंतु हा बहर सहज घेता येत नाही. कारण लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये साधारणतः आंबिया बहर ६० टक्के, मृग बहर ३० टक्के तर हस्त बहर १० टक्के येतो. त्यामुळे हस्त बहर घेण्याकरिता शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून मशागत, खत व्यवस्थापन आणि संजीवकांचा उपयोग करावा लागतो.
  • हस्त बहर घेण्यासाठी आवश्‍यक असलेला पाण्याचा ताण देणे पावसाळ्यात (ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये) शक्य होत नाही. त्यामुळे हा बहर घेण्यास अडचणी येतात. त्यासाठी योग्य उपाययोजनांचा अवलंब करावा.
  • कागदी लिंबामध्ये येणारे बहर  

    बहर फुले येण्याची वेळ फळे उपलब्ध होण्याची वेळ बाजारभाव
    आंबिया जानेवारी-फेब्रुवारी- जून-जुलै मागणी कमी असल्याने भाव कमी
    मृग  जून-जुलै नोव्हेंबर-डिसेंबर मागणी व भाव बऱ्यापैकी
    हस्त ऑक्टोबर-नोव्हेंबर एप्रिल-मे जास्त.

      हस्त बहर घेण्याकरिता उपाययोजना 

  • हस्त बहार घेण्याकरिता लिंबू झाडांवर मृग बहाराची फळे नसावीत. याकरिता लिंबू झाडावर मृग बहर न येण्याची सवय लावणे जरुरी आहे. त्यामुळे हस्त बहर नियमित येत राहील. तसेच मृग बहराची फळधारणा होणार नाही किंवा कमी प्रमाणात येईल. सुरवातीच्या काळात मृग बहराची फुले झाडावर आल्यास, नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एनएए) (३०० पीपीएम ) ३०० ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात संजीवकाची फवारणी करावी.
  • हस्त बहर घेण्याकरिता अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे घेण्यात आलेल्या प्रयोगानुसार खालील प्रमाणे शिफारशी करण्यात आल्या आहेत.
  • जून महिन्यात जिबरेलिक ॲसिड (५० पीपीएम) ५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात संजीवकाची फवारणी करावी.
  • पाण्याचा ताण १ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबर या कालावधीत द्यावा.
  • झाडे ताणावर सोडताना सायकोसील क्लोरमेक्वाट क्लोराईड (१००० पीपीएम) १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात संजीवकाची फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पंधरा दिवसांनी पुन्हा हीच फवारणी करावी.
  • ऑक्टोबर महिन्यात ताण तोडताना पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्के) १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • नत्र खताची अर्धी तसेच पालाश व स्फुरद खताची पूर्ण मात्रा (३००:३००:३०० ग्रॅम प्रति झाड) द्यावी.
  • उरलेली अर्धी नत्राचा मात्रा एका महिन्याने किंवा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावे.
  • अशा प्रकारे नियोजन केल्यास नोव्हेंबरमध्ये फुले येऊन एप्रिल-मे महिन्यात फळे तोडणीस येतात. एका झाडापासून साधारणपणे १००० ते २०००० फळांचे उत्पादन मिळते. कागदी लिंबाच्या हस्त बहराकरिता खतांचे नियोजन करताना शिफारसीत खतांच्या मात्रेच्या ८० टक्के खते (नत्र, स्फुरद, पालाश अनुक्रमे ४८०:२४०:२४० ग्रॅम) सोबत बाष्पोपर्णोत्सर्जनाच्या ९० टक्के पाणी (दररोज) ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास भरीव वाढ होते. तसेच पाण्याची व खतांची बचत होते.   सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन 

  • बहराकरिता ताण तोडताना सर्वसमावेशक (मिश्र) चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये ०.१ टक्का (१ ग्रॅम प्रति लिटर) ची फवारणी करावी.
  • फळधारणा झालेल्या झाडाकरिता झिंक सल्फेट २५० ग्रॅम, मॅग्नेशिअम सल्फेट २०० ग्रॅम, फेरस सल्फेट २०० ग्रॅम व बोरॉन १०० ग्रॅम प्रति झाड जमिनीतून द्यावे.
  • रोग व्यवस्थापन  खैऱ्या रोग 

  • पानांवर, फांद्यावर व फळांवर तांबूस किंवा तपकिरी रंगाचे उंच आणि मध्यभागी खडगे असलेले खडबडीत चट्टे/ ठिपके आढळतात.
  • ठिपके किंवा चट्ट्याभोवती पिवळे वलय आढळते. प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने गळतात. फांद्या वाळतात. फळे कुरूप दिसतात.
  • उपाययोजना  झाडांवरील रोगट व वाळलेल्या फांद्या (सल) पावसाळ्यापूर्वी काढून जाळाव्यात. स्ट्रेप्टोमायसीन* (१०० पीपीएम) १ ग्रॅम + कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड (०.३ टक्के) ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावणाच्या जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये एका महिन्याच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. चौथी फवारणी फेब्रुवारी महिन्यात करावी. पाय कूज आणि मूळकूज 

  • प्रादुर्भाव व प्रसार जमिनीतून होतो.
  • झाडाचा कलम युतीचा भाग जमिनीजवळ किंवा जमिनीत गाडला गेल्यास तेथे रोगाचा प्रादुर्भाव होऊन तो खोडावर व मुळांवर पसरतो.
  • जमिनीलगतच्या बुंध्याची साल कुजते. पाने मलूल होऊन मुख्य शिरा पिवळ्या पडतात. पुढे पूर्ण पाने पिवळी पडून गळतात तसेच फळेही गळतात.
  • उपाययोजना 

  • झाडाची कुजलेली मुळे काढून त्यावर मेटॅलॅक्झील अधिक मॅंकोझेब या संयुक्त बुरशीनाशकाचे (०.२ टक्के) २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्याचे द्रावण टाकावे. मुळ्या मातीने झाकून झाडाला हलके ओलित करावे.
  • खोडाला १ मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी.
  • कीड व्यवस्थापन :  (फवारणी ःप्रतिलिटर पाणी) पाने पोखरणारी अळी  अळी कोवळी पाने पोखरून आतील हरितद्रव्य खाते. त्यामुळे प्रादुर्भावित पानांवर पांढरे चकाकणारे नागमोडी आकाराचे मार्ग दिसतात. नियंत्रण  निंबोळी तेल १ मिलि + स्टिकर १ ग्रॅम. पाने खाणारी अळी 

  • अळ्या प्रथम अवस्थेत काळ्या आणि चौथ्या अवस्थेत हिरव्या रंगाच्या दिसतात.
  • अळ्या अधाशीपणे पाने खाऊन शेवटी फक्त फांद्या शिल्लक ठेवतात.
  • नियंत्रण  क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मिलि (टीप ः ॲग्रेस्को शिफारशी आहेत.) - डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७३५३५३ (प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com