तेलकट डाग रोग व्यवस्थापनाच्या सहा पायऱ्या

डाळिंबामध्ये मृग बहर आणि उशिरा मृग बहर पीक घेणाऱ्या आणि ज्यांच्या बागेत तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या परिसरातील सर्व बागांमध्ये शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या एकाच वेळी सहा उपाययोजनांचे वेळापत्रक पाळल्यास जिवाणूजन्य रोगाचे निर्मूलन करणे शक्य आहे. शेतकरी पावसाळ्यात मृग बहराचे पीक यशस्वीपणे घेऊ शकतात.
pomegranate advisory
pomegranate advisory

तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाइट किंवा बीबीडी)  हा एक जिवाणूजन्य रोग आहे.  रोगकारक जिवाणू : झॅन्थोमोनास ऑक्सोनोपोडीस पीव्ही पुनिकी. डाळिंबामध्ये मृग बहर आणि उशिरा मृग बहर पीक घेणाऱ्या आणि ज्यांच्या बागेत तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या परिसरातील सर्व बागांमध्ये शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या एकाच वेळी सहा उपाययोजनांचे वेळापत्रक पाळल्यास जिवाणूजन्य रोगाचे निर्मूलन करणे शक्य आहे. शेतकरी पावसाळ्यात मृग बहराचे पीक यशस्वीपणे घेऊ शकतात.  मुख्य छाटणी  मागील मृग बहरातील फळांची काढणी डिसेंबर अखरे ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत केल्यानंतर त्वरित मुख्य छाटणी करावी. मुख्य छाटणी वेळी गर्दीतील फांद्या, खराब आणि सुकलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. यामुळे पूर्ण झाडाला हवा आणि योग्य प्रकाश मिळेल. तेलकट डाग रोग बाधित द्वितीय व तृतीय फांद्या जखमेच्या २-४ इंच खालून कापाव्यात. कापलेल्या जागी १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी. त्याचप्रमाणे ही पेस्ट झाडांच्या खोडावर जमिनीपासून १.५ ते २ फुटांपर्यंत लावावी. जिवाणूंचा प्रसार टाळण्यासाठी सर्व रोगग्रस्त फांद्या व फळे नष्ट करावीत किंवा कुजण्यासाठी मातीमध्ये पुरावीत. विश्रांती काळातील खत  व्यवस्थापन व पीक संरक्षण  फळतोडणी झाल्यानंतर लगेचच मुख्य छाटणी करून झाडाच्या (बागेच्या) वयानुसार पुढील प्रमाणे खत व्यवस्थापन करावे. (दोन वर्षे व त्यापुढील बागांसाठी.)  सेंद्रिय खत व्यवस्थापन प्रति झाड २० किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा १५ किलो शेणखत अधिक २ किलो गांडूळ खत अधिक २ किलो निंबोळी पेंड किंवा ७ किलो कुजलेल्या कोंबडी खतासोबत अधिक २ किलो निंबोळी पेंड. रासायनिक खत व्यवस्थापन (प्रति झाड)  नत्र २०५ ग्रॅम (४४६ ग्रॅम कडुलिंब लेपित युरिया), स्फुरद ५० ग्रॅम (३१५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) आणि पालाश १५२ ग्रॅम प्रति (२५४ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ३०४ ग्रॅम).  खते दिल्यानंतर हलके पाणी द्यावे. रासायनिक खते दिल्यानंतर २० ते ३० दिवसांनी जैविक खतांचे मिश्रण (फॉर्म्यूलेशन) कुजलेल्या शेणखतासोबत द्यावीत. जैविक फॉरर्म्यूलेशन्स उदा. ॲस्परजिलस नायजर (Aspergillus niger AN २७; नवीन नाव IRAG०७), मायकोरायझा (Rhizophagus irregularis/Glomus irregularis) आणि पेनिसिलियम पिनोफिलम (Penicillium pinophilum) १ किलो प्रति एकर, किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी किंवा ट्रायकोडर्मा हर्जिनियम, स्युडोमोनास फ्लुरोसन्स, पॅसिलोमायसिस लिलासिनस यांचा १ किलो प्रति एकर पर्यायी वापर करावा.  जैविक फॉर्म्यूलेशन्स आपल्या शेतात वाढविण्यासाठी १ किलो जैविक फॉर्म्यूलेशन १ टन चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळावे. मायकोरायझा व्यतिरिक्त प्रत्येकासाठी वेगवेगळे मिश्रण करून सावलीत १ फूट उंचीचे बेड तयार करावेत. त्यात ५० ते ६० टक्के ओलावा ठेवून गोणपाटाने झाकावे. दर २-३ दिवसांनी ते बेड उलथापालथ करावी. साधारणपणे १०-१५ दिवसांत त्यात जिवाणूंची चांगली वाढ होते. शेतात टाकण्यापूर्वी त्यात आर्बस्क्युलर मायकोरायझा बुरशी (ए एम एफ) (राईझोफॅगस इर्रेगुल्यारीस/ ग्लोमस इंट्राडॅलिसिस) मिसळावे. अशा जैविक फॉर्म्यूलेशनचा (१ किलो जैविक फॉर्म्यूलेशन प्रति एकर प्रमाणे) वापर वर्षातून दोन वेळा करावा. असा वापर एकदा बाग ताणावर सोडताना, दुसऱ्यांदा बहर धरतेवेळी केल्यास अन्नद्रव्यांची उपलब्धता झाल्याने झाडाची वाढ होते. त्यांची विविध रोगांशी लढण्यासाठी जैवरासायनिक प्रतिकारक्षमता सुधारते. मररोगालाही आळा घालता येतो.  खत व्यवस्थापनानंतर हलके पाणी सुरू करावे. त्यासाठी १५ ते २० लिटर पाणी प्रति झाड (हलक्या जमिनीमध्ये आठवड्यातून दोन वेळा आणि काळी माती असलेल्या जमिनीकरिता एक वेळा) पाणी द्यावे. कमीत कमी २ ते ४ महिने हलके पाणी देऊन बागेस विश्रांती द्यावी. मातीतील खते लागू होण्याइतकेच पाणी द्यावे. यामुळे झाडांमध्ये अन्नघटक साठवले जातील. पीक संरक्षण विश्रांती काळामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी. त्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रोक्साइड २ ग्रॅम प्रति लिटर किंवा १ टक्का ताजे बनवलेले बोर्डो मिश्रण यांचा आलटून पालटून वापर करावा. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव अधिक आढळून आल्यास, मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर किंवा रोग निदानानंतर संस्थेच्या एडहोक सूचीमधील बुरशीनाशकांचा वापर करावा.  बागेत किडींचा रसशोषक किडींच्या उदा. फुलकिडे, मावा, पिठ्या ढेकूण यांना प्रतिबंध करण्यासाठी, ॲझाडिरेक्टिन १ टक्का (१००० पीपीएम) ३ मि.लि. प्रति लिटर - महिन्यातून एकदा फवारणी. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी, लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ टक्के ईसी) ०.५ ते ०.७५ मि.लि. किंवा सायअँट्रानिलीप्रोल ०.७५ मि.लि. किंवा थायामेथॉक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम किंवा इंडोक्साकार्ब (१४.५ टक्के एससी) ०.७५ मि.लि. शॉट होल बोरर किंवा खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास थायामेथॉक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावणाची ड्रेंचिंग करावी. बागेमध्ये मर रोग आणि सूत्रकृमींचा प्रादुर्भावाकडे लक्ष ठेवावे. वेळीच उपाययोजना कराव्यात. बाग ताणावर सोडणे  विश्रांतीनंतर जमिनीचा पोत लक्षात घेऊन मध्ये मार्च किंवा मार्चअखेर बागेचे पाणी बंद करावे. बाग ताणावर येऊन झाडाची १०० टक्के नैसर्गिक पानगळ होईल. पूर्ण पानगळ झाल्यानंतर फांदीवरचे तेलकट डाग रोगाचे ठिपके (जखमा/कॅन्कर) दिसू लागतील. सिकेटर्सचा वापर करून कॅन्कर/जखमेच्या २ ते ४ इंच खालून रोग प्रादुर्भावीत फांदी कापून घ्यावी. बागेबाहेर जाळून टाकावेत. पानगळ झालेली झाडे चांगल्या उन्हामध्ये तापवणे  पूर्ण पानगळ झाल्यानंतर पानविरहित झाडे तीव्र उन्हामध्ये (एप्रिलच्या शेवटी ते मे महिना) १५ ते २० दिवस तापू द्यावीत. यामुळे काही नोड (फांदीचे डोळे) मध्ये राहिलेल्या तेलकट डाग रोग जिवाणूंचा संपूर्ण नायनाट होईल. ही सर्वांत नवीन सुधारणा आणि एक महत्त्वाची पायरी आहे. या वेळी झाडांचे बारकाईने निरीक्षण करावे. ज्या वेळी फांद्यांची टोके वरून १ ते २ सेंटिमीटर वाळून जातील, त्या वेळी २० दिवसांची वाट न पाहता पहिले पाणी द्यावे.  बहर छाटणी व खत व्यवस्थापन   बहर छाटणी करताना शेंड्याकडून ८ ते १० इंच फांद्या काढून टाकाव्यात. जर तेलकट डागाचे कॅन्कर्स असतील, तर ते वर सांगितल्याप्रमाणे काढून टाकावेत. पहिल्या पायरीप्रमाणे १० टक्के बोर्डो मिश्रणाचा लेप लावावा. बहर खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड नियंत्रण (IPM) फवारणी वेळापत्रक 

  • बहर धरताना शिफाशीप्रमाणे खते वापरावीत. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने तयार केलेल्या एकात्मिक कीडनियंत्रण फवारणी वेळापत्रकाचा वापर करा. 
  • बहर धरतेवेळी शिफारस केलेल्या खतासोबत ह्युमिक ॲसिड आणि सल्फर (८० टक्के) २० ते ३० ग्रॅम प्रति झाड जमिनीच्या सामूप्रमाणे वापरावे. (सामू ८ पेक्षा अधिक असल्यास सल्फर ३० ग्रॅम प्रति झाड वापरावे.)
  • रासायनिक खते दिल्यानंतर २० ते ३० दिवसांनी जैविक फॉर्म्यूलेशन्सवर पायरी २ (क) मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकरी एक किलो प्रमाणात द्यावीत. 
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये २ ग्रॅम प्रति लिटर पाणी व सॅलिसिलिक ॲसिड ३०० पीपीएम (३० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी) याप्रमाणे ४ फवारण्या फुलधारणापूर्वीपासून एका महिन्याच्या अंतराने घ्याव्यात.
  • शिफारशीप्रमाणे पीकसंरक्षणासाठी गरजेनुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने फवारण्या घ्याव्यात.
  • जर बागेमध्ये मुळावर गाठी बनवणाऱ्या सूत्रकृमीचा (रूट नॉट निमॅटोड) प्रादुर्भाव असल्यास विश्रांती कालावधीमध्ये किंवा बहर व्यवस्थापनाच्या सुरुवातीला फ्लूओपायरम (३४.४८ टक्के एससी) २ मि.लि. प्रति दोन लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणे ड्रेंचिंग करावे. ड्रेंचिंग करण्यापूर्वी झाडांना पुरेसे पाणी द्यावे. किंवा फ्लूएनसल्फॉन (२ टक्के जीआर) १० ग्रॅम प्रत्येक ड्रीपरखाली ५-१० सें.मी. खोल टाकून, मातीने झाकून घ्यावे. फ्लूएनसल्फोनची मात्रा जास्तीत जास्त ४० ग्रॅम प्रति झाड इतकीच द्यावी. हलके पाणी द्यावे.
  •  पूर्ण वाढ झालेली आणि परिपक्व झाल्यानंतर फळ तोडणी करावी.
  • - ०२१७-२३५००७४,  (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com