भात पिकात वाढतेय भाततणांची समस्या

राज्यात भात पिकाच्या लागवडीमध्ये नाशिक जिल्ह्याचा सहावा क्रमांक आहे. या पिकाखाली ८८००० हेक्टर इतके क्षेत्र आणि उत्पादकता १७४९ किलो इतकी आहे. जिल्ह्याची उत्पादकता देश व राज्याच्या तुलनेत कमी आहे.
उभ्या शेतातील तणभाताचे अस्तित्त्व पीक फुलोऱ्यावर आल्यानंतरच लक्षात येते.
उभ्या शेतातील तणभाताचे अस्तित्त्व पीक फुलोऱ्यावर आल्यानंतरच लक्षात येते.

राज्यात भात पिकाच्या लागवडीमध्ये नाशिक जिल्ह्याचा सहावा क्रमांक आहे. या पिकाखाली ८८००० हेक्टर इतके क्षेत्र आणि उत्पादकता १७४९ किलो इतकी आहे. जिल्ह्याची उत्पादकता देश व राज्याच्या तुलनेत कमी आहे. भाताची कमी उत्पन्न असण्याची प्रमुख कारणे : सह्याद्री पर्वतालगत हलक्या व उथळ जमिनी, सुधारित तंत्रज्ञानाचा कमी अवलंब, भाताच्या सुधारित जातीचा वापर कमी, भातातील किडी, रोग नियंत्रणाकडे लक्ष नसणे, याबरोबरच आता नव्या भात सदृश तणांच्या समस्येची भर पडली आहे. भारतात भात सदृश तणांच्या समस्येची सुरुवात २००५ पासून झाल्याचे दिसते. केरळ राज्यात सरळ बियाणे पेरणी पद्धतीमुळे या समस्येने जोर धरला. ३० ते ६० टक्के नुकसान झाल्याचे दाखले आहेत. मागील सहा-सात वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी, कांचनगाव, घोटी, तळेगाव, अडसरे, नांदगांव, मुंडेगाव, पाडळी देशमुख, वाघेरे, व बारशिंगवे इ. गावात तर त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील त्र्यंबकेश्‍वर, हरसूल, सावरपाडा इ. गावातील भातशेतात भात सदृश तणांची समस्या आढळून येत आहे. यामुळे भात उत्पादनात घट झाल्याचे आढळले आहे. भात तणांची ओळख भातसदृश तणाला इंग्रजीत ‘विडी राइस’ असे म्हणतात. याची उत्पत्ती लागवडीखालील भात वाण व जंगली भाताच्या वाणाच्या नैसर्गिक संकरातून झालेली आहे. म्हणजेच तण भात ही लागवड भाताच्या वंशाची प्रजाती आहे. त्यामुळे तण भात व लागवडीतील भात यामध्ये त्यांच्या बाह्य गुणधर्मावरून भेद करणे अवघड आहे.

  • तण भात हा लागवड भातापेक्षा जलद गतीने वाढतो. याच्यामध्ये अधिक फुटवे आढळतात तर तंतुमय व बायोमास देखील अधिक आढळतो.
  • याची जमिनीतील निष्क्रिय प्रमाणता, उपलब्ध नत्र घेण्याची क्षमता, प्रतिकूल परिस्थितीवर मात देण्याची क्षमता ही लागवड भातापेक्षा जास्त आहे.
  • काटकता व जलद होणाऱ्या वाढीमुळे तण भात हा लागवड भातापेक्षा लवकर पक्व होतो व झडू लागतो.
  • प्रमुख भाताच्या प्रजाती

  • लाल रंगाचे फोलफट असलेला भात (लाल भात)
  • जंगली भात
  • भात सदृश जंगली वाण. यांनाच आपल्याकडे काळ्या कुसळ्याचा भात किंवा रात असे म्हणतात.
  • प्रसार 

  • या संकर तणांचा प्रसार हा पूर्व व दक्षिण भारतात नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या भाताच्या जंगली वाणामुळे होऊ लागला आहे.
  • पश्‍चिम घाट विभागात भाताच्या जंगली वाणाच्या चार ते पाच प्रजाती नैसर्गिकरीत्या उपलब्ध असल्याने त्यांचा प्रादुर्भाव वाढतच आहे.
  • तण भात हा लागवड भातापेक्षा लवकर पक्व होतो व झडू लागतो. हे झडलेले बियाणे जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात वाहत्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर इतर शेतात जाते. हंगामात होणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे, रोपवाटिकेच्या जागेत पूर्वीचे तण भाताचे बियाणे असल्यास याचा प्रसार होतो.
  • बीजोत्पादन क्षेत्रात योग्य काळजी घेतलेली नसल्यास या तणांचा प्रसार होतो.
  • पाणी व मजूर यांच्या कमतरतेमुळे अनेक लोक पुनर्लागवड पद्धतीकडून सरळ बियाणे पेरणी पद्धतीकडे वळत आहेत. या पद्धतीमुळे भाततणाचा प्रसार झाल्याचे शास्रीय अभ्यासात दिसून आले आहे.
  • टॅक्टर, काढणी यंत्र किंवा अन्य यंत्राचा एका शेतातून दुसऱ्या शेतात वापर झाल्यामुळे चाकासोबत चिकटून भाततणांचा प्रसार होतो.
  • उत्परिवर्तन, दीर्घायुष्य व निष्क्रियता ही देखील तण भात प्रसाराची कारणे होत.
  • भात पीक एकल पद्धती ही देखील तण भात प्रसाराचे एक कारण होय.
  • परिणाम

  • -लागवड भात पिकाची तण भाताशी अन्नद्रव्यासाठी स्पर्धा होते.
  • -लागवड भात पिकाची विक्रीयोग्य गुणवत्ता कमी होऊन दरही कमी मिळतो.
  • -भात पीक फुलोऱ्यावर येईपर्यंत तण भात व लागवड भात यामध्ये त्यांच्या बाह्य गुणधर्मावरून त्यामधील भेद करणे अवघड आहे.
  • -तण भात नियंत्रणासाठी कोणतेही तणनाशक बाजारात उपलब्ध नाही, त्यामुळे शेतातून माणसांच्या साह्याने काढावे लागते. परिणामी अधिक खर्चिक ठरते.
  • -तण भात लवकर व मोठ्या प्रमाणावर गळतो. परिणामी, चालू आणि पुढील हंगामातही नुकसानकारक ठरतो.
  • -एकंदरीत उत्पादनात ६० ते ७० टक्के घट, तण भात काढून टाकण्यासाठी मजुरीचा खर्च, उत्पादनास मिळणारा कमी भाव यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
  • उपाययोजना  तण भात नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही एका पद्धतीवर अवलंबून राहून चालणार नाही. समूळ उच्चाटनासाठी प्रतिबंधात्मक उपाय, पारंपरिक पद्धत, यांत्रिक पद्धत व रासायनिक पद्धत यांचा एकत्रित वापर करण्याची आवश्यकता आहे.  प्रतिबंधात्मक उपाय 

  • तणविरहित व प्रमाणित बियाणे वापरावे.
  • विकत घेतलेले बियाणे किंवा घरगुती बियाणे पेरणीपूर्वी तपासून घ्यावे. मूळ बियाण्यात काळे, लाल रंगाचे बियाणे मिश्रित बियाणे दिसल्यास ते पेरू नये.
  • भात पेरणीसाठी शक्यतो रोपवाटिका पद्धत अवलंबावी.
  • भात मळणी यंत्र व जागा पेरणीपूर्वी तपासून घ्याव्यात.
  • आपल्या आसपासच्या परिसरात यापूर्वी इतरांच्या शेतात तण भाताची समस्या आढळून आलेला असल्यास पाण्यातून (अति पावसामुळे) आपल्या शेतापर्यंत प्रसार होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
  • तण भात व लागवड भात यातील भेसळयुक्त बियाणे ओळखून फुलोरा अवस्थेतच त्याचे निर्मुलन करावे.
  • प्रादुर्भावग्रस्त भागात धूळपेरणी करू नये.
  • पारंपरिक पद्धती व यांत्रिक पद्धतीचे उपाय

  • भात काढणीनंतर उरलेल्या भात पिकाचे अवशेष व गळालेल्या भाताचे बियाणे राबासारखे जाळून भस्म करावे.
  • शेत पलटी नांगराने चांगले नांगरून घ्यावे.
  • पिकांची फेरपालट करावी. यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका यासारखी पिके घ्यावीत.
  • कोनोविडरचा वापर करून पेरणी करावी.
  • संपर्क क्रमांक : ०२५५३-२४४०१३ डॉ. कैलास भोईटे, ९४०४६९५९१९ (विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com