द्राक्ष बागेत पावसाळी स्थितीमुळे उद्भवलेल्या समस्या

गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी तो अद्याप सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे द्राक्ष बागेत मुळांच्या कक्षेमध्ये पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी बोद पूर्णपणे पाण्यात भिजलेला आहे.
Disease control is easier if the canopy is free.
Disease control is easier if the canopy is free.

गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी तो अद्याप सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे द्राक्ष बागेत मुळांच्या कक्षेमध्ये पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी बोद पूर्णपणे पाण्यात भिजलेला आहे.

  • ज्या बागेत जास्त प्रमाणात पाऊस झाला, अशा ठिकाणी पाणी सुकत असताना जमीन पूर्ण पांढरी झाल्याचे दिसून आले. जास्त पावसाच्या स्थितीत जमिनीतून वर आलेल्या क्षारामुळे हे घडले. हे क्षार पुढील काळात वेलीच्या वाढीवर विपरीत परिणाम करू शकतात.
  • अनेक ठिकाणी जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण अधिक दिसून येईल. चुनखडी आणि क्षार दोन्ही एकाच वेळी असल्यास उपाययोजना म्हणून सल्फरचा वापर अधिक करता येईल.
  • जमिनीत फक्त क्षार असल्यास जिप्समचा वापर फायद्याचा ठरेल.
  • घट्ट जमिनीची समस्या  नुकत्याच झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन घट्ट झाल्याचे दिसून येते. जमिनीमध्ये अजूनपर्यंत वापसा आलेला नाही. छाटणी वेळेवर करण्याच्या उद्देशाने आपण सुरवात केली. त्यानंतर शिफारस केलेल्या अन्नद्रव्यांचा पूर्तता करण्यासाठी ओल्या जमिनीतच खते देण्याचाही आपला प्रयत्न असतो. मात्र जमिनीत खते टाकण्यासाठी चारी घेतली जाते. अशा घट्ट झालेल्या जमिनीमध्ये चारी घेतेवेळी माती घट्ट गोळा तयार होईल. माती सुकल्यानंतर जमिनीमध्ये भेगा तयार होतील. ही परिस्थिती टाळणे गरजेचे असेल. जोपर्यंत वापसा येत नाही, तोपर्यंत कोणतेही खत देण्याचे टाळावे. जास्त झालेल्या पावसामुळे अन्नद्रव्यांचे वहनही जास्त प्रमाणात झालेले असेल. त्यामुळे पाने पिवळी किंवा निस्तेज झाल्याचे चित्र असेल. वापसा परिस्थितीनंतर नवीन निघालेल्या फुटींवर, पाच ते सहा पाने अवस्थेत सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी व जमिनीतून उपलब्धता गरजेची असेल. रोग नियंत्रणासाठी... फुटी निघाल्यानंतर प्री ब्लूम अवस्थेतील घडांवर कुजेची समस्या किंवा डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव दिसून येईल. छाटणीनंतर आपण प्रत्येक काडीवर जवळपास चार पाच डोळ्यांवर हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग करतो. म्हणजेच हे पूर्ण डोळे कुजतील. घड प्री ब्लूम अवस्थेत असल्यास प्रत्येक फूट सहा ते सात पानांची असेल. याच अवस्थेत जर पाऊस झाल्यास या छोट्याशा कॅनोपीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त (६० टक्क्यांपेक्षा अधिक) वाढेल. यामुळे या काडी किंवा ओलांड्यावरील डाऊनी मिल्ड्यूचे बिजाणू पुन्हा कार्यान्वित होऊन रोगाचा प्रसार जलद होईल. घडांवर पावसाच्या हलक्या सरी पडल्यास प्री ब्लूम अवस्थेतील नाजूक देठावर थोडा वेळ पाणी साचले तरी कूज होईल. रोग आणि कूज या दोन्हीचा संबंध थेट कॅनोपीशी असल्यामुळे द्राक्ष घड व्यवस्थित दिसल्यानंतर १४ ते १७ दिवसात अनावश्यक असलेल्या फेलफुटी काढून टाकणे महत्त्वाचे असेल. असे केल्यामुळे तयार होत असलेली कॅनोपी मोकळी राहील. आर्द्रतेचे प्रमाण कमी होईल. फवारणीसाठी शिफारशीत बुरशीनाशकांच्या फवारणीचे कव्हरेज चांगले झाल्यामुळे रोग नियंत्रण सोपे होईल. परिणामी उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. यावेळी पालाशची उपलब्धता फवारणीद्वारे करून घ्यावी. पानांची लवचिकता कमी होईल, पानांमध्ये प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. फेलफूटी काढाव्यात  पावसाळी परिस्थितीत फेलफूटी काढण्यावर विशेष लक्ष द्यावे. यावेळी फेलफूट काढल्यामुळे काडीमध्ये उपलब्ध साठा व फुटींची संख्या मोजकीच राहते. एकूणच सोर्स सिंक गुणोत्तर चांगल्या प्रकारे काम करेल. प्रत्येक पान प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्ये तयार करून घडाच्या विकासात मदत करू शकेल. काही बागांमध्ये छाटणी नुकतीच झालेली आहे. त्यानंतर पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे बागेत वाफसा स्थिती आलेली नाही. अशा बागेत वेलीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण वाढून सायटोकायनीनची पातळी वाढेल. यामुळे घड जिरण्याची समस्या किंवा गोळीघड तयार होण्याची परिस्थिती उद्भवेल. जोपर्यंत बाग वाफसा परिस्थितीत येत नाही, तोपर्यंत फारसे काही करता येणार नाही. परंतु वेलीमध्ये सायटोकायनीनची पातळी फवारणीद्वारे वाढवता येईल. त्यासाठी सायटोकायनीनयुक्त संजीवकांचा वापर शिफारशी प्रमाणे करावा. छाटणीपूर्वी तपासा काडीची परिपक्वता सोलापूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याचे दिसते. या भागात जवळपास ५० टक्के छाटण्या झाल्या असून, बाकी छाटण्यांना वेग आलेला दिसतो. ज्या बागेमध्ये शेंडा वाढ जास्त दिसून येते, अशा ठिकाणी काडीची परिपक्वता झालेली आहे की नाही, हे पडताळून पाहावे. आपण काडीच्या ज्या डोळ्यावर छाटणी घेणार, त्याच्या दोन डोळे पुढे काडी छाटणी त्यामधील पीथ पूर्ण तपकिरी झाल्याची खात्री करावी. अन्यथा आणखी ८ ते १० दिवस छाटणी पुढे ढकलावी. त्यानंतर पालाशयुक्त खतांची फवारणी किंवा ठिबकद्वारे वापर करावा. वेलीस पाण्याचा ताण देणे, शेंडा पिचिंग करणे, बगलफूटी काढणे इ. उपाययोजना काडी परिपक्वतेकरिता महत्त्वाच्या ठरतील. अन्यथा छाटणीनंतर फुटी लवकर निघतील, मात्र त्यातून निघणारा घड एकतर गोळी घडामध्ये रूपांतर होईल किंवा जिरून जाईल. तेव्हा आता घेतलेला निर्णय पुढील काळासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पावसामुळे बऱ्याच बागांत रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. यावेळी छाटणी झालेल्या बागेत नवीन फुटीवर डाऊनी मिल्ड्यू आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल. अशा बागेत आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर फायद्याचा ठरेल, त्याच सोबत जैविक नियंत्रणावर जोर देता येईल. मात्र फळछाटणीपूर्व स्थितीतील बागेत बोर्डो मिश्रणाची फवारणी व त्यानंतर ट्रायकोडर्माचा वापर रोग नियंत्रणासाठी मदत करेल. -  डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com