जनावरांना उन्हाळ्यात द्या ऊर्जायुक्त आहार...

उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा जनावरांचे आरोग्य, उत्पादन आणि प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो. हा परिणाम टाळण्यासाठी आपल्याला जनावरांच्या आहार व्यवस्थापनात योग्य ते बदल करणे गरजेचे आहे.
provide nutrious diet to animals in summer season
provide nutrious diet to animals in summer season

उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा जनावरांचे आरोग्य, उत्पादन आणि प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो. हा परिणाम टाळण्यासाठी आपल्याला जनावरांच्या आहार व्यवस्थापनात योग्य ते बदल करणे गरजेचे आहे. गायी- म्हशींच्या शरीराचे तापमान सर्वसाधारणपणे १०१.५० फॅरानाईट १०२.६० फॅरानाईट पर्यंत असते. उन्हाळ्यामध्ये वातावरणातील तापमान वाढू लागताच या वाढत्या तापमानाचे दुष्परिणाम, लक्षणे जनावरांमध्ये दिसू लागतात. जनावर जीभ बाहेर काढून श्वसन करते, श्वसनाचा दर वाढतो (८०/ मिनीट), जनावरांची हालचाल मंदावते. चारा खाण्याच्या कमी प्रमाणामुळे गरजेनुसार पोषणतत्त्वे शरीरास पुरवठा होत नाहीत यामुळे पोषणतत्त्वांच्या अभावामुळे उत्पन्न होणारे आजार जनावरांमध्ये आढळतात.

  • पोषणतत्त्वांच्या अभावामुळे जनावर माजावर न येणे, माज व्यवस्थित न दाखवणे, गर्भधारणा न होणे, वारंवार उलटणे अशा समस्या उद्भवतात.अति उष्णतेने उष्माघात होऊन जनावरे दगावतात.
  • सर्वसाधारणपणे वातावरणातील तापमान वाढल्यानंतर २ ते ३ दिवसांनी त्याचा दुष्परिणाम जनावरांच्या उत्पादनावर व आरोग्यावर होतो. 
  • वाढत्या उष्णतेमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जनावरांना थंड वातावरणात ठेवणे, शेड छप्पराचे करणे, शेडमध्ये फॅन, कुलर बसवणे, शेडची उंची चांगली ठेवणे, जनावरांना बसण्यासाठी योग्य प्रमाणात जागा उपलब्ध करून देणे, शेडभोवती सावलीसाठी झाडे लावणे, मुक्त संचार गोठा पध्दत, छतावर वारंवार पाणी मारणे, छतावर गवत, पालापाचोळा टाकून पाणी मारणे, फॉगर्सचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. 
  • आहार व्यवस्थापन

  •   जनावरांच्या शरीरास मिळणारी ऊर्जा ही जनावरांचे शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाण यावर अवलंबून असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जनावरांचे शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाण उत्तम राहण्यासाठी वारंवार थोडा-थोडा चारा खाण्यास द्यावा.
  •   उच्च प्रतीच्या चारापिकांचा आहारात समावेश करावा. आहारात सर्व घटक योग्य प्रमाणात आहेत का? हे पहावे. चारा खाण्याचे प्रमाण कमी असल्यास आहारातील पोषणतत्वांची घनता वाढवावी. आहारातील पोषणतत्वांची घनता वाढल्यामुळे  कमी चाऱ्यातून जनावरांना त्यांच्या शारीरिक गरजेनुसार पोषणतत्त्वे उपलब्ध होतील. जनावरांना दिवसाच्या थंड वेळी चारा खाण्यास द्यावा. चारा कुट्टी करून द्यावी. हिरवा, वाळलेला चारा मिसळून द्यावा. जनावरांच्या आहारात केवळ वाळलेल्या चाऱ्याचा वापर करू नये.
  • आहारात वाढवा ऊर्जेचे प्रमाण  

  •   उन्हाळ्यात आहारातील चाऱ्याचे प्रमाण कमी ठेवून पशुखाद्य/ खुराक  वाढवून देणे हा सर्वसाधारण पर्याय आहे. यामुळे आहारातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असल्यामुळे शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाणात वाढ होईल. परंतु कधी कधी असे केल्यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण घटण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आहारातील ऊर्जेची घनता वाढवण्यासाठी स्निग्ध पदार्थाचा किंवा बायपास फॅटचा वापर करावा. असा बदल केल्यामुळे १ ते १.५ लिटरपर्यंत दूध उत्पादन वाढल्याचे दिसून येते. जनावरांच्या शरीरावरील उष्णतेचा ताणही कमी होण्यास मदत होते.
  •   रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारात स्निग्ध पदार्थाचा अतिवापर झाल्यास त्याचे दुष्परिणामही जाणवतात. यामध्ये तंतुमय  पदार्थांची पचनक्रिया कमी होणे, कोटीपोटातील जीवजंतूना विषबाधा होणे, पचलेले अन्न शोषण्यात अडथळा येणे असे दुष्परिणाम दिसून येतात. म्हणून बायपास फॅटचा वापर अतिशय उपयोगी पडतो. 
  •   जनावरांच्या आहारात ५-७% पेक्षा जास्त स्निग्ध पदार्थाचा (फॅट) वापर करू नये. जनावरांना ३० ते ४० टक्यांपेक्षा जास्त आहारातील फॅट हे तेलबियामधून देवू नये, तसेच ४० ते ४५ टक्यांपर्यंत फॅटची पूर्तता ही धान्य व इतर घटकातून पूर्ण करावी. त्याबरोबरच १५ ते ३० टक्के फॅटची गरज बायपास फॅटचा वापर आहारात करून पूर्ण करावी.
  • प्रथिनांचा वापर 

  •   जनावरांच्या आहारातील प्रथिनांचे कमी किंवा अतिप्रमाणही घातक असते. यामुळे दूध उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.  त्याबरोबरच गर्भधारणेवरही विपरीत परिणाम होतो. 
  •   अति प्रथिनांचा वापर केल्यामुळे रक्तातील नत्राचे, अमोनियाचे प्रमाण वाढते. त्यामुळे गर्भधारणेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जास्त प्रमाणात प्रथिनांचा आहारात वापर करताना प्रत चांगली असावी. 
  •   कोटीपोटात जास्त प्रमाणात विघटन होणाऱ्या प्रथिनांचा जास्त वापर न करता बायपास/ संरक्षित प्रथिनांचा पशुआहारात वापर करावा. यामुळे रक्तातील युरिया, नत्र, अमोनिया यांचे प्रमाण वाढत नाही. जनावरांचे आरोग्य दूध उत्पादन व प्रजोत्पादन उत्तम राहते.
  • क्षारांचा पुरवठा  

  •   उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या शरीरातून घामाद्वारे पोटॅशियमचा जास्त ऱ्हास होत असतो त्याकरिता पशुआहारात पोटॅशिअमची गरज वाढते.
  •   पशुआहारात पोटॅशिअमची गरज वाढल्यामुळे अर्थातच सोडियम व मॅग्नेशियमची गरजही वाढते. याबरोबरच इतर क्षारांचा पुरवठा करण्यासाठी देशी गाई, म्हशींच्या आहारात ३०-४० ग्रॅम क्षार मिश्रणाचा वापर करावा. संकरित गायी व मुऱ्हा म्हशी यांच्या आहारात ७०-१०० ग्रॅम (दूध उत्पादनानुसार) क्षार मिश्रणाचा वापर करावा. तसेच गाई, म्हशींना खडे मीठ/ मोठे मीठ ४०-५० ग्रॅम खुराकातून द्यावे.
  •   उन्हाळ्यामध्ये खाण्याच्या सोडयाचा पशुआहारात ३० ते ५० ग्रॅम वापर केल्यामुळे दुधातील फॅटमध्ये वाढ होते. शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. खाण्याच्या सोड्याचा वापर मुरघास सोबत केल्यास कोटीपोटातील सामू व्यवस्थित राहून पचनक्रिया सुरळीत पार पडते. उन्हाळ्यामध्ये प्रोबायोटीक्सचा वापर पशुआहारात केल्यास कोटीपोटातील उपयुक्त जिवाणूंची कार्यशिलता उत्तम राहून पचनक्रिया चांगली राहते.
  •   प्रोबायोटिक्सच्या पशुआहारातील वापरामुळे तंतुमय पदार्थाचे पचन व्यवस्थित होते, व्होलाटाईल स्निग्ध आम्लांचे प्रमाण वाढते, शरीरात उष्णता कमी प्रमाणात तयार होते आणि याचा परिणाम म्हणून उन्हाळ्यात दूध उत्पादनात वाढ होते.
  •   उन्हाळ्यात जनावरांच्या आहारात केवळ कोरडा चारा असेल तर अशा चाऱ्यामध्ये अर्धा किलोपर्यंत गूळ दिल्यास कोटीपोटातील जीवजंतूही क्रियाशीलता चांगली राहून पचनक्रिया सुरळीत चालते. तसेच ‘अ’  जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा.
  • या गोष्टी महत्त्वाच्या 

  • गव्हाणीमध्ये चारा शिल्लक आहे/ संपला आहे? जनावरांचे शेड खूप मोठे आहे का? त्यामुळे जनावरे गव्हाणीपासून जास्त दूर राहतात का? सर्व जनावरांना चारा मिळतो का? हे तपासावे.
  • मुरघासामध्ये / खाद्यामध्ये बुरशी आहे का? चारा/ खाद्याचा वास येतोय का? जनावरांच्या आहारात सर्व घटकांचा समावेश आहे का? योग्य प्रमाणात मिसळले आहे का?  जनावरांची खाद्य चारा खाण्याची पध्दत बदलली आहे का? चाऱ्याची कुट्टी व्यवस्थित आहे का? जनावर काही चाऱ्याचा भाग शिल्लक ठेवतात का किंवा बाजूला काढतात का? चारा एकदम कोरडा आहे का? त्यामध्ये पाणी फवारून मऊ करून चारा खाण्याचे प्रमाण वाढवता येईल का? या बाबी पाहाव्यात.
  • जनावरांच्या आहारात स्वच्छ, थंड, मुबलक पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे. तसेच जनावरांच्या समोर पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध असावे. पिण्याचे पाणी सावलीत ठेवावे.
  • गोठ्यात जनावरांच्या संख्येनुसार पाणी पिण्याची जागा उपलब्ध आहे का? पाण्याचा हौद/ भांडे वेळोवेळी स्वच्छ केले जाते का? जनावरांच्या जवळ पाणी उपलब्ध आहे का? का पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागते का? पाण्याचा वास येतो का? या बाबीकडे लक्ष ठेवावे जेणेकरून जनावर जास्तीत जास्त पाणी पिते. 
  • उन्हाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण हे शरीर तापमान नियंत्रणासाठी वाढते.  जर जनावर कमी पाणी प्यायले तर त्याचा दुष्परिणाम चारा खाण्याच्या प्रमाणावर, पचनावर होतो आणि जनावराचे शरीर तापमानही नियंत्रित करता येत नाही.
  • जनावरांनी आहार घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात उष्णता तयार होत असते. ही उष्णता शरीर तापमान वाढण्यास कारणीभूत ठरते. त्याचबरोबर जनावरांच्या शरीरातील ऊर्जा ही उष्णतेच्या स्वरूपात वाया जाते. याचा उत्पादनावर व प्रजोत्पादनावर परिणाम होतो. 
  • आहारात जर तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त असेल व सदर तंतुमय पदार्थ पचनास जड असतील तर जास्त ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. त्याचे चांगल्या प्रतीच्या तंतुमय पदार्थाचा, स्निग्ध पदार्थाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास जास्त उष्णता शरीरात तयार होत नाही व ऊर्जेचा वापर उत्पादनाकरिता होतो. त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • - डॉ. प्रफुल्लकुमार  पाटील,  ८३२९७३५३१४ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com