दर्जेदार गांडूळ खतनिर्मिती

गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरक, उपयुक्त जिवाणू असतात. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मात सुधारणा होते.
गांडूळ खत निर्मितीसाठी वाफे
गांडूळ खत निर्मितीसाठी वाफे

गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरक, उपयुक्त जिवाणू असतात. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मात सुधारणा होते. गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरक असणारे दाणेदार सेंद्रिय खत असून जमिनीचे जैविक गुणधर्म वाढविते. गांडुळाचे प्रकार  एपिजिक  ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. आपल्या अन्नापैकी ८० टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात. २० टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. त्यांचा आकार लहान असतो. अॅनेसिक  ही गांडुळे साधारणत: जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात. ते सेंद्रिय पदार्थ आणि माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो. एण्डोजिक    ही गांडुळे जमिनीत तीन मीटर किंवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असतो, रंग फिकट असतो. ते बहुधा माती खातात. प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. गांडुळांची वैशिष्ट्ये आणि गुणधर्म पाहता एपिजिक आणि अॅनेसिक गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. आयसेनिया फेटीडा, पेरिऑनिक्स, युड्रीलस व लॅम्पिटो या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. हे गांडूळ स्वत:च्या वजनाइतके अन्न रोज खातात.

गांडुळांच्या योग्य जाती  गांडुळांच्या ३०० हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने आयसेनिया फेटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेट्‌स, फेरीटीमा इलोंगेटा या गांडुळांच्या महत्त्वाच्या जाती आहेत. या जातीतील गांडुळांची वाढ चांगली होऊन त्यांच्यामुळे खत तयार करण्याची प्रक्रिया ४० ते ४५ दिवसांत होते.

जीवनक्रम

  • गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्यावस्था आणि पूर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थांसाठी ओलसर जमीन आवश्यक असते.
  • पूर्ण वाढ झालेल्या गांडुळामध्ये स्त्री आणि पुरुष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडूळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाच्या अनुकूलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते.
  •  गांडुळांची अपूर्णावस्था दोन ते तीन महिन्यांची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो, तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडुळाचे लक्षण होय.
  • सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षांचे असते. आयसेनिया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते.
  • शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांडूळ खत तयार करतात.
  • गांडूळ संवर्धन आणि गांडूळ खतनिर्मिती  जागेची निवड व बांधणी 

  • गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडूळ खतामधील पोषक घटक शोषून घेतात.
  • गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता आहे. यासाठी छप्पर तयार करून घ्यावे. छप्पर तयार करताना रुंदी साडेपाच मीटर, मधील उंची ३ मीटर, बाजूची उंची १ मीटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे- उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार ५ ते २५ मीटरपर्यंत असावी.
  • छपरामध्ये १ मीटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत.
  • गांडूळ खत करण्याच्या पद्धती 

  • गांडूळ खत ढीग आणि खड्डा पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे.
  • सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छप्पराची शेड तयार करावी. या शेडची लांबी दोन ढिगांसाठी ४.२५ मीटर, तर चार ढिगांसाठी ७.५० मीटर असावी.
  • निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची १.२५ ते १.५० मीटर आणि मधल्या खांबांची उंची २.२५ ते २.५० मीटर ठेवावी. छपरासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट किंवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा. गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडुळांची योग्य जात निवडावी.
  • ढीग पद्धत 

  • या पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी साधारणत: २.५ ते ३.० मीटर लांब आणि ९० सें.मी. रुंदीचे ढीग तयार करावेत.
  • प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यांसारख्या लवकर न कुजणा­ऱ्या पदार्थांचा ३ ते ५ सेंमी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरसे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर ३ ते ५ सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेले शेण, कंपेास्ट किंवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत. साधारणत: १०० किलो सेंद्रिय पदार्थांपासून गांडूळखत तयार करण्यासाठी ७००० प्रौढ गांडुळे सोडावीत.
  • दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरिपुष्प, शेवरी या द्विदलवर्गीय हिरवळीच्या पिकांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा.
  • सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्राचे गुणोत्तर ३० ते ४० च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची ६० सेंमीपेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये ४० ते ५० टक्के पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे.
  • ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.
  • खड्डा पद्धत 

  • या पद्धतीमध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी ३ मीटर, रुंदी २ मीटर आणि खोली ६० सेंमी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा ३ ते ५ सेंमी. जाडीचा अर्धवट कुजलेले शेण, कंपोस्ट खत किंवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणत: १०० किलो सेंद्रिय पदार्थांपासून गांडूळ खत तयार करण्यासाठी ७००० प्रौढ गांडुळे सोडावीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त ५० सेंमी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे.
  • गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील.
  • तयार झालेल्या गांडूळ खताच्या शंकू आकृती ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांची पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा.
  • गांडुळाचा वापर करून गांडूळ खत तयार होण्यास साधारणत: ३५ ते ५० दिवसांचा कालावधी लागतो.
  • गांडूळ खतनिर्मितीच्या महत्त्वाच्या बाबी 

  •  प्रकल्प सावलीत व दमट हवेशीर ठिकाणी असावा.
  •  शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पाला यांचे ३:१ प्रमाण असावे. गांडुळे सोडण्यापूर्वी हे सर्व १५ ते २० दिवस कुजवावे.
  •  खड्ड्याच्या तळाशी प्रथमत: १५ ते २० सें. मी. बारीक केलेला वाळलेला पालापाचोळा टाकावा.
  •  वाफ्यावर गांडुळे सोडण्याअगोदर १ दिवस पाणी मारावे. वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे.
  •  व्हर्मिवॉश जमा करण्यासाठी गांडूळ बेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असावी, तेथे खड्डा करून व्हर्मिवॉश जमा करण्याचे नियोजन करावे.
  • गांडूळ खत वेगळे करणे 

  •  रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछान्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळांसोबत बाहेर काढावे.
  •  गांडूळ खत आणि गांडुळे वेगळी करताना उन्हामध्ये ताडपत्री किंवा गोणपाट अंथरून त्यावर गांडूळ खताचे ढीग करावेत म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील आणि गांडुळे, गांडूळ खत वेगळे करता येईल. ढिगाच्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे. ३-४ तासात सर्व गांडुळे परत खत तयार करण्यासाठी बिछान्यात/खड्ड्यात सोडावीत.अशाच पद्धतीने खड्डा, कुंडी किंवा टाकी पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते.
  •  खत वेगळे करताना टिकाव, खुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडुळांना इजा पोहोचणार नाही.
  •  दुस­ऱ्या पद्धतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळखताचा थर हलक्या हाताने गोळा करून घ्यावा. वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या खतामध्ये गांडुळांची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते.
  •  गांडुळाचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रति वर्ष या प्रमाणात जमिनीत मिसळावे.
  • गांडूळ खताचे फायदे 

  •  जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. धूप कमी होते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
  •  जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.
  •  गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश, इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात.
  • संपर्क : डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२ (सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com