रब्बी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

रब्बी ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून, बहुतांश पर्जन्याधारित असते. पारंपरिक पद्धतीने पिकाचे नियोजन केले जात असल्यामुळे जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित वाण न पेरणे, पेरणीपूर्व व नंतरचे व्यवस्थापन, कीडनियंत्रण, खतांचा अत्यल्प वापर अशा बाबींमुळे ज्वारी धान्य व कडबा उत्पादनात अनियमितता विशेषतः घट येत आहे.
फुले पंचमी, फुले मधुर, मूलस्थानी पाणी व्यवस्थापनासाठी केलेले वाफे.
फुले पंचमी, फुले मधुर, मूलस्थानी पाणी व्यवस्थापनासाठी केलेले वाफे.

रब्बी ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून, बहुतांश पर्जन्याधारित असते. पारंपरिक पद्धतीने पिकाचे नियोजन केले जात असल्यामुळे जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित वाण न पेरणे, पेरणीपूर्व व नंतरचे व्यवस्थापन, कीडनियंत्रण, खतांचा अत्यल्प वापर अशा बाबींमुळे ज्वारी धान्य व कडबा उत्पादनात अनियमितता विशेषतः घट येत आहे. जमिनीची निवड  ओल जास्त काळ टिकणाऱ्या मध्यम ते भारी व सर्वसाधारणपणे ५.५ ते ८.५ सामू असलेल्या जमिनीत रब्बी ज्वारीची पेरणी करावी. जिरायती क्षेत्रावर जास्त उत्पादन येण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणांची निवड करावी. पूर्वमशागत  पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी मशागतीची कामे उतारास आडवी करावीत. नांगरट झाल्यानंतर हेक्टरी ५ टन (१० ते १२ गाड्या) शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. त्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील काडीकचरा धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे. मूलस्थानी पाणी व्यवस्थापन पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीच्या उतारावर (३.६० × ३.६० चौ. मी. आकाराचे) वाफे तयार करावेत. सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये बळिराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात. ट्रॅक्टरचलित सारा यंत्राने एकावेळी (६ × २ चौ.मी.) आकाराचे वाफे तयार करता येतात. सदर वाफे रब्बी ज्वारीच्या पेरणीपूर्वी ४५ दिवस अगोदर करण्याची शिफारस केली जाते. ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात करण्याची शिफारस आहे, हे लक्षात ठेवून नियोजन करावे. पेरणीपूर्वी पडणारा शक्य तितका पाऊस शेतात जिरवावा. पेरणीच्या वेळी वाफे मोडून पेरणी करावी. पुन्हा सारा यंत्राच्या साह्याने गहू, हरभरा पिकासारखे वाफे पाडून आडवे दंड पाडावेत. म्हणजे पेरणीनंतर पाऊस पडल्यास तोही अडवून जिरेल. अशा प्रकारे मूलस्थानी जल व्यवस्थापन केल्यास रब्बी ज्वारी उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ होते. सुधारित वाण  कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेले सुधारित किंवा संकरित वाण जमिनीच्या प्रकारानुसार वापरावेत. जमिनीच्या प्रकारानुसार शिफारशीत वाण हलकी जमीन (खोली ३० सें.मी. पर्यंत) : फुले अनुराधा, फुले माऊली मध्यम जमीन (खोली ६० सें.मी. पर्यंत) : फुले सुचित्रा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती, मालदांडी -३५-१ भारी जमीन (खोली ६० सें.मी. पेक्षा जास्त) सुधारित वाण: फुले वसुधा, फुले यशोदा, सी. एस. व्ही. २२, पी.के.व्ही. क्रांती, परभणी मोती. संकरित वाण : सी. एस.एच.१५ आणि सी. एस.एच.१९ बागायतीसाठी :  फुले रेवती, फुले वसुधा, सी. एस. व्हीं.१८, सी. एस.एच १५, सी. एस.एच १९ हुरड्यासाठी :  फुले उत्तरा, फुले मधुर लाह्यांसाठी वाण :  फुले पंचमी पापडासाठी वाण :  फुले रोहिणी पेरणीची वेळ, अंतर व बियाणे प्रमाण 

  • पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या ओलीवर ५ सें.मी. खोलीपर्यंत करावी.
  • अपेक्षित उत्पादनासाठी हेक्‍टरी १.४८ लाख रोपे ठेवावीत. त्यासाठी ज्वारी पेरणी ४५ × १५ सें.मी. अंतरावर करावी.
  • बागायत ज्वारी पेरणी ४५ × १२ सें.मी. अंतरावर करावी.
  • पेरणीसाठी प्रति हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.
  • पेरणीसाठी दोन चाड्यांची पाभर वापरून एकाच वेळी खत व बियाणे पेरावे.
  • बीज प्रक्रिया काणी रोगनियंत्रणासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास गंधक (३०० मेश पोताचे) ४ ग्रॅम चोळावे. तसेच प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर व पी.एस.बी. जिवाणूसंवर्धक कल्चर चोळावेत. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • सेंद्रिय खत: पूर्वमशागतीच्या वेळी नांगरट झाल्यानंतर हेक्टरी ५ टन (१० ते १२ गाड्या शेणखत) जमिनीत मिसळून द्यावे.
  • रासायनिक खते : जमिनीच्या प्रकारानुसार पुढीलप्रमाणे रासायनिक खतांची शिफारस केलेली आहे.
  • रब्बी ज्वारीसाठी रासायनिक खतांची मात्रा  

    जमिनीचा प्रकार रासायनिक खतांचे हेक्टरी प्रमाण (किलो/ हेक्टर)
    कोरडवाहू बागायती
    नत्र स्फुरद पालाश नत्र स्फुरद पालाश
    हलकी २५ 00 00 00 00 00
    मध्यम ४० २० 00 ८० *  ४० ४०
    भारी ६० ३० 00 १०० * ५० 00
  • * बागायती जमिनीत नत्र दोन हप्त्यात (पेरणीच्या वेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्धे), संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळीच द्यावे.
  • कोरडवाहू जमिनीस संपूर्ण नत्र आणि स्फुरद दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.
  • रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जाती नत्र खताचा चांगला प्रतिसाद देतात.
  • कोरडवाहू ज्वारीस दिलेल्या प्रति एक किलो नत्रामागे दहा ते पंधरा किलो धान्य उत्पादन वाढत असल्याचे प्रयोगाअंती आढळले आहे.
  • पीक फेरपालट खरिपात मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीन ही पिके घेऊन नंतर रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी केल्यास २० ते ३० किलो नत्राची बचत होते. तथापि, सोयाबीन-रब्बी ज्वारी हा पीक क्रम विशेषतः बागायतीसाठी अधिक उत्पादनक्षम व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दिसून आला आहे. आंतरमशागत पिकाच्या सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसांत तण व पिकामध्ये जमिनीतून अन्नद्रव्य शोषणासाठी तीव्र स्पर्धा असते. सुरुवातीस ३५ ते ४० दिवसात पीक तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर आवश्‍यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी आणि तीन वेळा कोळपणी करावी. पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी. दुसरी कोळपणी पेरणीनंतर ५ आठवड्यांनी पासेच्या कोळप्याने करावी. तिसरी कोळपणी ८ आठवड्यांनी दातेरी कोळप्याने करावी. शेवटच्या कोळपणीच्या वेळी कोळप्याला दोरी बांधून कोळपणी केल्यास पिकांच्या मुळांना मातीची भर दिली जाईल. शेतात सऱ्या पडल्यामुळे पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत होईल. ही. - डॉ. शरद जाधव, ९९७०९९६८९० (विषय विशेषज्ञ -कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com