द्राक्ष बागेत पाऊस, ढगाळ वातावरणामुळे उद्‍भवणाऱ्या अडचणी, उपाययोजना

काडी परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यातील द्राक्ष बागेत किंवा नुकतीच फळछाटणी झालेल्या बागेत ढगाळ आणि पावसामुळेकाही अडचणी उद्‍भवू शकतील. त्यासाठी संभाव्य उपाययोजना या लेखात पाहू.
पावसामुळे शेंडा वाढ जोमात होऊन काडीची परिपक्वता लांबणीवर पडते.
पावसामुळे शेंडा वाढ जोमात होऊन काडीची परिपक्वता लांबणीवर पडते.

गेल्या आठवड्यात द्राक्ष लागवडीखाली असलेल्या बागेत बऱ्यापैकी पाऊस झालेला दिसतोय. पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला असला, तरी त्या ठिकाणी ढगाळ वातावरण होते. अशा परिस्थितीत काडी परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यातील द्राक्ष बागेत किंवा नुकतीच फळछाटणी झालेल्या बागेत काही अडचणी उद्‍भवू शकतील. त्यासाठी संभाव्य उपाययोजना या लेखात पाहू. काडी परिपक्वतेची समस्या  भारी जमीन व जास्त प्रमाणात पाऊस झालेल्या परिस्थितीतील बागेत काडी परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यातील बागेत कोवळ्या नवीन फुटींची वाढ जास्त प्रमाणात दिसून येईल. या वेलींवर बगल फुटींच्या वाढीचा जोमसुद्धा जास्त असतो. फुटींची वाढ जोमात झाल्यास का़डी परिपक्वता लांबणीवर जाईल. विशेष म्हणजे नवीन फुटींवर करपा रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होईल. अशा प्रकारच्या बागेत खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

  • कोवळ्या फुटी त्वरित काढाव्यात.
  • बगल फुटी काढून घ्याव्यात. प्रत्येक फूट तारेवर बांधली जाईल, याची काळजी घ्यावी.
  • बोर्डो मिश्रणाची एक टक्का तीव्रतेची फवारणी घ्यावी.
  • पालाशयुक्त खतांची फवारणी (उदा. ०ः९ः४६ हे खत २.५ ग्रॅम व ०ः०ः५० हे खत ४ ग्रॅम किंवा ०ः५२ः३४ हे खत ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे २ ते ३ फवारण्या घ्याव्यात.) तसेच जमिनीतून ०ः९ः४६ एकरी २ किलो याप्रमाणे ३ दिवसांच्या अंतराने २ वेळा द्यावे.
  • वातावरणात जास्त प्रमाणात आर्द्रता असल्यास, जैविक नियंत्रणावर जोर द्यावा. यामध्ये ट्रायकोडर्माचा प्रामुख्याने वापर करता येईल. मांजरी वाइनगार्ड २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे ४ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या घेता येतील. यासोबत बुरशीनाशके मिसळून फवारणी करणे टाळावे. त्यासोबत मांजरी ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकर प्रमाणे जमिनीतून ठिबकद्वारे देता येईल.
  • कॉपरयुक्त बुरशीनाशक २ ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाईल १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करून करपा रोगावर नियंत्रण मिळवता येईल.
  • फळछाटणीपूर्वी पाने पिवळी पडणे  बऱ्याचशा बागेत पाऊस झाल्यानंतर अचानक वेलींची पाने पिवळी पडतात, पानाच्या वाट्या होतात तर काही ठिकाणी पाने गळून पडायला सुरुवात होते. माती व देठ परीक्षण केल्यानंतर अशा बागेत अन्नद्रव्यांची कमतरता असल्याचे दिसून येते. देठ परीक्षणात प्रामुख्याने पालाश, फेरस, मॅग्नेशिअम यांचे प्रमाण फार कमी असल्याचे दिसून येते. याच बागेतील माती परीक्षणाचा अहवाल तपासल्यास मातीमध्ये चुनखडीच्या प्रमाण १० टक्क्यांच्या पुढे दिसून येते. ज्या बागेत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, अशा बागेत पण जमिनीतून जरी शिफारशीनुसार अन्नद्रव्यांची उपलब्धता केली तरी पालाश, फेरस आणि मॅग्नेशिअम या प्रमुख अन्नद्रव्यांची उपलब्धता होत नाही. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळेच शरीरशास्त्रीय हालचालींवर विपरीत परिणाम दिसून येतो. याकरिता पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील.

  • खरड छाटणीपूर्वी माती परिक्षण महत्त्वाचे समजावे. त्या वेळी शक्य झाले नसल्यास, सूक्ष्म घडनिर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात माती परीक्षण करून जमिनीची परिस्थिती जाणून घ्यावी.
  • बऱ्याचशा बागेत चुनखडीचे कमी-अधिक प्रमाण (५ ते २० टक्क्यांपर्यंत) आढळून येईल. जमिनीत उपलब्ध चुनखडीच्या प्रमाणानुसार ५ टक्क्यांपासून १५ टक्क्यांच्या पुढे सल्फरचा वापर करावा. सल्फर ४० किलो ते १२० किलो प्रति एकरापर्यंत वापरता येईल. कमी प्रमाणात चुनखडी असल्यास (३ टक्क्यांपर्यंत), सल्फर २५ ते ३० किलो प्रतिएकर याप्रमाणे द्यावे लागेल. ज्या बागेत समस्या नाही, अशा बागेत सुद्धा सल्फर ४० ते ५० किलो प्रतिएकर प्रति वर्ष याप्रमाणे जमिनीत मिसळल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.
  • ज्या बागेत जास्त प्रमाणात पाने पिवळी पडून वाट्या झालेल्या आहेत. अशा बागेत बोदामध्ये सल्फर शेणखतामध्ये मिसळून टाकावे. सल्फरची उपलब्धता दोन टप्प्यांत १ महिन्याच्या अंतराने केल्यास परिणाम चांगले मिळतील.
  • देठ परीक्षणाच्या अहवालामध्ये फेरस आणि मॅग्नेशिअम कमी असल्याचे आढळले असल्यास, फेरस सल्फेट ४ ग्रॅम व मॅग्नेशिअम सल्फेट ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे २ फवारण्या घेता येतील. तसेच जमिनीतून प्रत्येकी ५ किलो प्रति एकर याप्रमाणे ठिबकद्वारे उपलब्ध करता येईल.
  • कलम केलेल्या बागेतील अडचणी  सध्या कलम करण्याचा कालावधी आहे. नवीन बाग उभी करण्याकरिता द्राक्ष बागायतदार आपल्या निवडलेल्या द्राक्ष जातीचे कलम करून बाग यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. कलम यशस्वी होण्याकरिता फक्त द्राक्ष जात महत्त्वाची असते असे नाही, तर द्राक्ष जातीची का़डी कशी आहे, खुंट काडीची परिस्थिती कशी आहे व त्याचसोबत बागेतील वातावरण ही तितकेच महत्त्वाचे आहे. कलम यशस्वी होण्याकरिता बागेतील तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ८० टक्क्यांच्या पुढे असावी. खुंट रोपाची काडी रसरशीत असणे आवश्यक आहे. बऱ्याच दिवसांपासून पाऊस न पडलेल्या द्राक्ष बागेतील काडीमध्ये रसनिर्मिती कमी असेल. अशा परिस्थितीत बागेत कलम करण्याच्या ३ ते ४ दिवस आधी बोद पूर्णपणे भिजेल अशाप्रकारे पाणी द्यावे. यामुळे काडीत रसनिर्मिती होण्यास मदत होईल. सायन काडीची निवड करताना काडी पूर्णपणे परिपक्व, गोल आणि ठिसूळ असल्याची खात्री करून घ्यावी. काडी निवडतेवेळी सबकेनच्या पुढील फक्त ३ ते ४ डोळे निवडावेत. पुढील काडी पूर्णपणे परिपक्व राहत नसल्याने व त्याचसोबत अन्नद्रव्यांचा पुरेसा साठा नसल्यामुळे पुढील भाग टाळावा. बऱ्याच ठिकाणी नवीन द्राक्ष जातीच्या काड्यांना मागणी जास्त असते. आपल्याला उपलब्ध झालेली काडी तशीच वापरल्यास त्याचा फायदा होत नाही. कारण बऱ्याचदा बाहेरून परिपक्व दिसत असलेली काडी आतमधून कच्ची असते. अशा काड्यांचा वापर कलम करण्याकरिता केल्यास कलम केल्याच्या ८ दिवसांतच डोळे फुटतात. पुढील ४-५ दिवसांत निघालेली फूट सुकून जाते. कलम जोडामध्ये कॅलस तयार न झाल्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही. सायन काडी कच्ची असल्यामुळे त्यामध्ये पुरेसे अन्नद्रव्ये राहत नाही. रूटस्टॉक व सायन यामधील अन्नद्रव्यांच्या देवाणघेवाणीचा समतोल बिघडतो. परिणामी, कलम फेल जाऊ शकते. परिपक्व काडी ओळखण्यासाठी तिचा काप घेतल्यानंतर त्यातील पीथ तपकिरी रंगाचे असावा. अशा काडीमध्ये अन्नद्रव्यांचा पुरेसा साठा असतो. बागायतदारांनी कलम करण्यापूर्वी या परिस्थितीची खात्री करून घेतल्यास अडचणी येत नाहीत. कलम केल्याच्या ३-४ दिवसांपासून खुंट काडीवर फुटलेले डोळे काढून घ्यावेत. अन्यथा, सायन काडीवरील डोळा फुटण्यास अडचणी येतात. बऱ्याचदा बागायतदार दोन काडीवर कलम करून पुन्हा खुंटकाडीच्या १ ते २ काड्या पुन्हा तशाच ठेवतात. कलम केलेली काडी जर फेल गेली तर या काड्यांवर पुन्हा कलम करण्याचे त्यांचे नियोजन असते. परंतु कलम केल्यानंतर उरलेल्या खुंट काडीमध्ये रसनिर्मिती जास्त प्रमाणात होते. तो प्रवाह याच काडीमध्ये होतो. नेमके कलम केलेल्या काडीतून अन्नद्रव्ये शेंडा वाढत असलेल्या खुंटकाडीकडे जाण्याचा धोका असतो. अशावेळी कलम फेल जाण्याची जास्त शक्यता असते. तेव्हा कलम केलेल्या काडीशिवाय इतर फुटी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. - डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com