रांगडा, रब्बी कांदा रोपवाटिका, पुनर्लागवड व्यवस्थापन

रांगडा कांद्याची पुनर्लागवड सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान, तर रब्बी कांद्याची पुनर्लागवड नोव्हेंबर -डिसेंबर दरम्यान केली जाते. अधिक उत्पादनासाठी योग्य वाण व खात्रीशीर बियाण्याची निवड, रोपवाटिका व्यवस्थापनाला खूप महत्त्व असते.
रोपवाटिकेत गरजेनुसार तणाची निंदणी २ वेळा करावी
रोपवाटिकेत गरजेनुसार तणाची निंदणी २ वेळा करावी

रांगडा कांद्याची पुनर्लागवड सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान, तर रब्बी कांद्याची पुनर्लागवड नोव्हेंबर -डिसेंबर दरम्यान केली जाते. अधिक उत्पादनासाठी योग्य वाण व खात्रीशीर बियाण्याची निवड, रोपवाटिका व्यवस्थापनाला खूप महत्त्व असते.  भारतात कांद्याचे उत्पादन खरीप, रांगडा व रब्बी या तीनही हंगामांत घेतले जाते. सन २०१८-१९ मध्ये कांद्याचे एकूण २२८.१९ लाख टन उत्पादन मिळाले. एकूण कांदा उत्पादना पैकी खरीप उत्पादन सुमारे ४८.४१ लाख टन, रांगडा २१.५० लाख टन आणि रब्बी १५८.२८ लाख टन होते.  कांदा रोपवाटिका व्यवस्थापन 

  • रांगडा तसेच रब्बी हंगामासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे तसेच कृषी विद्यापीठ किंवा बागवानी संशोधन संस्थानी विकसित केलेल्या जातींची निवड करू शकतो. 
  • रांगडा कांद्यासाठी ः बसवंत ७८०, फुले समर्थ, एन, २-४-१ इ.  
  • रब्बी कांद्यासाठी ः भीमा रेड, ॲग्रिफाउंड लाइट रेड, एन.एच.आर.डी.एफ लाल-३, एन.एच.आर.डी.एफ लाल-४, एन, २-४-१ इ. 
  • रोपवाटिका व्यवस्थापन

  • रोपवाटिकेच्या जागेची फेरपालट करावी. 
  • सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध, वालुकामय चिकणमातीयुक्त, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागवडीस योग्य असते. जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा. 
  • खोल नांगरणी आणि गरजेनुसार वखरणी करून जमीन स्वच्छ व भुसभुशीत करावी.  
  • रोपवाटिकेसाठी वाफे बनवण्याची पद्धत ही हंगामानुसार ठरवावी. 
  • जास्त पावसाच्या भागात किंवा खरिपात गादीवाफ्यावर रोपवाटिका फायद्याची ठरते. वाफ्याची लांबी २-३ मी., रुंदी १-१.५ मी. आणि जमिनीपासून १५ ते २० सें.मी. उंची असावी. गादीवाफ्यावरील सिंचनासाठी स्प्रिंकलर, ठिबक किंवा पाइपने व्यवस्था करावी. 
  • जमीन योग्य उतार, योग्य निचरा क्षमतेची असल्यास वरील पद्धतीऐवजी सपाट वाफ्याचा अवलंब करता येतो. प्रति वाफ्यानुसार ८-१० किलो चांगले कुजलेले शेणखत, १५० ग्रॅम १९:१९:१९ (एन.पी.के.) आणि ५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड वाफे बनवताना मातीत एकसमान मिसळून द्यावे. 
  • ट्रायकोडर्मा हर्जियानम ३० ग्रॅम प्रति वाफे सेंद्रिय खतात मिसळून मातीत द्यावे किंवा बियाणे टाकल्यानंतर ३-४ दिवसांनी ट्रायकोडर्मा १ किलो प्रति एकर पाटपाण्याद्वारे ड्रेंचिंग (आळवणी) करावी. 
  • एक हेक्टर कांदा पुनर्लागवडीसाठी ८-१० किलो बियाणे शिफारस आहे. काही शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार १.५ ते १.७५ किलो बियाणे एक एकर किंवा (३.७५ ते ४.३७५ किलो. प्रति हेक्टर बियाणे पुनर्लागवडीसाठी पुरेसे ठरते. 
  • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास २-३ ग्रॅम कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. पॅकेटबंद उपचार केलेल्या बियाण्यास पुन्हा उपचार करण्याची आवश्यक नसते. 
  • कांदा रोपवाटिकेतील तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २-३ खुरपण्या प्रभावी ठरतात. तणनाशकाचा वापर करणार असाल, पेरणीनंतर परंतु उगवणपूर्व वाफ्यावर पेंडीमिथॅलीन २ मि.लि. प्रति लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. बियाणे टाकल्यानंतर २०-२५ दिवसांनी हाताने खुरपणी करावी.
  • रोग व किडीचे व्यवस्थापन  रोपवाटिका व पुढे तसेच पुनर्लागवड करताना १५ दिवस अगोदर चारही बाजूंनी मका बियाण्याची टोकण करावी. मक्याच्या सजीव कुंपणामुळे रसशोषक किडींचा उपद्रव कमी होतो. 

  • फुलकीड नियंत्रणासाठी फिप्रोनिल (५ ई.सी.) १ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.लि. किंवा कार्बोसल्फान २ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. 
  • अतिरिक्त पाण्याचा निचरा न होणे, ढगाळ हवामान आणि दव स्थिती बुरशीजन्य रोगास अनुकूल असते. करपा रोगनियंत्रणासाठी, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. 
  • करपा आणि फुलकीड यांचा एकत्रित प्रादुर्भाव असल्यास, गरजेनुसार १५ दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मि.लि. किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १ मि.लि. यापैकी एक फवारणी करावी. 
  • अतिरिक्त पाण्याचा निचरा न होणे, जमिनीत सतत ओलसरपणा, दव पडणे इ. कारणांमुळे रोपांची मुळसड आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. मूळसड नियंत्रणासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे द्रावणाची रोपांच्या ओळीत आळवणी करावी. मर रोगाच्या नियंत्रणासाठी, मेटॅलॅक्झिल (४ %) अधिक मॅन्कोझेब (६४ %) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे द्रावण करून रोपांच्या ओळीत ड्रेचिंग करावे.  
  • अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • पावसामुळे झालेल्या पाण्याच्या निचऱ्यासोबत अन्नद्रव्यांचाही ऱ्हास होतो. रोपे पिवळी पडतात. बियाणे टाकल्यानंतर २० दिवसांनी १९:१९:१९ (एन.पी.के.) २ ग्रॅम प्रति लिटर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (जस्त ३ %, लोह २.५ %, मंगल १ %, तांबे १ % आणि बोरॉन ०.५ %) ची १ ते २ ग्रॅम प्रति लिटर फवारणी प्रमाण करावी. 
  • अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना माती परीक्षण, पिकांचा प्रतिसाद आणि पिकातील अन्नद्रव्यांच्या कमतरतेचे लक्षणे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. 
  • पुनर्लागवडपूर्व तयारी 

  • पुनर्लागवडीसाठी तयार झालेल्या रोपांना साधारणतः ५-६ दिवस आधी पाणी देणे बंद करावे. रोपे काढण्यापूर्वी १ किंवा २ दिवस आधी हलके पाणी द्यावे. 
  • पुनर्लागवड करताना वाढलेल्या रोपांचा शेंड्यांकडील एक तृतीयांश भाग कापून टाकावा. या रोपांची मुळे कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक व कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणात बुडवून नंतर लागवड करावी. यामुळे बुरशीजन्य रोग व सुरुवातीच्या अवस्थेतील किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. 
  • कांद्याची पुनर्लागवड 

  • रांगडा हंगामाची रोपे साधारणतः ४५-५० दिवसांत आणि रब्बी हंगामाची रोपे पुनर्लागवडसाठी ५०-५५ दिवसांत तयार होतात. 
  • दोन्ही हंगामांतील पुनर्लागवड ही सपाट वाफ्यावर १५ सें.मी. × १० सें.मी. अंतरावर करतात. 
  • ठिबक सिंचनाचा वापर करण्याच्या हेतूने अनेक शेतकरी गादीवाफ्यावरही कांद्याची पुनर्लागवड करतात. 
  • अन्नद्रव्य व्यवस्थापन 

  • दर्जेदार उत्पादनासाठी हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत द्यावे. 
  • हेक्टरी ट्रायकोडर्मा १.२५- २.५ किलो, ॲझेटोबॅक्टर आणि पी.एस.बी. प्रत्येकी ५ किलो शेणखतात मिसळून दिल्यास फायदा होतो. जैविक घटक हे रासायनिक घटकांबरोबर देऊ नये. जर ट्रायकोडर्मा, अॅझेटोबॅक्टर आणि पी.एस.बी. हे जैविक घटक द्रव स्वरूपात उपलब्ध असतील तर साधारणतः पायाभूत रासायनिक खताची मात्रा दिल्यानंतर आठवड्याने ठिबक संचाद्वारे देता येतात.
  • रासायनिक खताची शिफारस  कांद्यासाठी नत्र १०० किलो (युरिया २१७ किलो), स्फुरद ५० किलो (सिंगल सुपर फॉस्फेट ३१३ किलो) आणि पालाश ५० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो) प्रति हेक्टर देण्याची शिफारस आहे. अर्धे नत्र ५० किलो (युरिया १०९ किलो), पूर्ण स्फुरद आणि पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावे. उर्वरित नत्र ५० किलो (युरिया १०९ किलो) पुनर्लागवडीनंतर १ आणि १.५ महिन्याने सामान हप्त्याने द्यावे.  रब्बी कांदा पुनर्लागवडीपूर्वी हेक्टरी ४५ किलो गंधक (सल्फर) मातीत मिसळून द्यावे. माती परीक्षणातून मिळालेल्या निष्कर्षनुसार वरील शिफारस मात्रेत योग्य ते बदल करावेत. उदा.

  • जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य (किलो/ हे.) प्रमाण मध्यम असेल तर शिफारशीत खतमात्रा द्यावी. 
  •  उपलब्ध अन्नद्रव्य प्रमाण अत्यंत कमी असल्यास शिफारशीत खतमात्रेपेक्षा ५० टक्के अधिक खतमात्रा द्यावी. 
  • जर प्रमाण कमी असल्यास शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ टक्के जास्त मात्रा द्यावी.
  •  जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य (किलो/ हे.) प्रमाण जास्त असल्यास शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ टक्के खतमात्रा कमी द्यावी. प्रमाण अत्यंत जास्त असल्यास शिफारशीत मात्रेपेक्षा ५० टक्के कमी खतमात्रा द्यावी. 
  • ( टीप :  लेखातील कीटकनाशके, बुरशीनाशकांना कांदा व लसूण संशोधन संचनालय, राजगुरूनगर जि. पुणे यांची शिफारस आहे.) - डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२ (सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, के.व्ही.के., सरदार कृषीनगर दांतीवाडा  कृषी विद्यापीठ, साबरकांठा, गुजरात)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com