जाणून घ्या उसाला तुरा येण्याची कारणे

रात्रीचे आणि दिवसाचे तापमान, हवेतील आद्रता, सातत्याने पडणारा पाऊस, जमिनीत साचून राहणारे पाणी, पीक वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध नत्राची कमतरता, चुकीचा लागणीचा हंगाम यामुळे उसाला तुरा येण्यास उत्तेजन मिळते.
Flowering of sugarcane due to adverse changes in natural environment.
Flowering of sugarcane due to adverse changes in natural environment.

रात्रीचे आणि दिवसाचे तापमान, हवेतील आद्रता, सातत्याने पडणारा पाऊस, जमिनीत साचून राहणारे पाणी, पीक वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध नत्राची कमतरता, चुकीचा लागणीचा हंगाम यामुळे उसाला तुरा येण्यास उत्तेजन मिळते. अलीकडच्या काही वर्षांच्या हंगामात नैसर्गिक वातावरणातील प्रतिकूल बदलामुळे उसाला फुलोरा येण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ऊस पक्व होण्याच्या कालावधीपूर्वीच अकाली फुलोरा येत असल्याचे दिसत आहे. फुलोरा आल्यामुळे वाढ पूर्णपणे खुंटते. कांडीमध्ये पोकळी निर्माण होऊन वजनात घट येते. प्रत खराब होऊन साखरेचे प्रमाण कमी होते. 

  •    २०१७-१८ पासून राज्यात जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत सातत्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत आहे. याच अनुकूल हवामानामुळे उसाला तुरा येत आहे. नैसर्गिकरीत्या उसाला १० ते १२ महिन्यांत तुरा येतो. साधारणपणे ६ महिने वयाच्या उसाला आणि तीन कांड्यांवर ऊस असताना तुरा आल्याचे दिसून आले आहे. पूर्णपणे तुरा उमलण्यास कमीत कमी सात दिवसांचा कालावधी लागतो जास्तीत जास्त जातीनुसार एक महिना लागतो. 
  •  ऊस आणि साखर उत्पादनाच्यादृष्टीने तुरा येणे नुकसानकारक ठरत आहे.  लागवड सुरु, पूर्वहंगामी किंवा आडसालीमध्ये केली तरी तुरा येतो. हवामानातील बदलाबरोबरच दिवस लहान व रात्र मोठी होत असताना तुरा बाहेर पडतो. 
  •  तुऱ्याचे प्रमाण ८० टक्के असल्यास उत्पादनात २० टक्के घट येते. तुरा आल्यानंतर दोन महिन्यांनी साखर व ऊस उत्पादनावर परिणाम होतो. तुरा येण्याचा कालावधी हवामान विभागाप्रमाणे बदल असतो. फुलोरा तयार होणे व बाहेर पडणे प्रक्रियेचे अवलोकन केले असता कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यात तुरा ऑक्टोबर महिन्यात येतो. तर उर्वरित महाराष्ट्रात नोव्हेंबर पासून तुरा दिसू लागतो. 
  • जातींनुसार तुऱ्याचे प्रमाण 

  •  उसाच्या जातीनुसार  कमी अधिक प्रमाणात तुरा येतो. काही जातींमध्ये लवकर तर काहींमध्ये उशिरा येतो. को ४१९, को ७२१९, को ९४०१२, कोसी ६७१, व्हीएसआय ८००५ आणि एमएस १०००१ या जातींना लवकर तुरा येतो.
  •   को ७४०, कोएम ७१२५, कोएम ८८१२१, को ८०१४, को ७५२७, को ८६०३२, फुले २६५ आणि फुले ०९०५७ या जातींमध्ये तुरा उशिरा येतो. 
  •   लवकर साखर तयार होणाऱ्या जातींमध्ये लवकर तुरा येतो. काही जातींमध्ये दरवर्षी तुरा येतो. काही जातींना अनियमितपणे तुरा येतो. 
  • तुरा फुलकळी प्रक्रिया प्रारंभ 

  • ऊस वाढ्यातील गाभ्यात अग्रकोंब असतो. त्याचे रूपांतर फुलकळीत होते. म्हणजेच याच ठिकाणी फुलोरा येण्याची प्रक्रिया प्रारंभ होतो. उत्तर भारताकडे फुलोरा उशिरा येतो.
  • फुलोरा येण्यामागे प्रमुख शास्त्रीय कारण म्हणजे वाढ्यातील पानांमध्ये फ्लोरीजीन हार्मोन निर्माण होऊन फुलोरा येण्यास कारणीभूत ठरते. या अवधीत फुलोरा येऊ नये किंवा त्याचे प्रमाण कमी असावे यासाठी काही उपाययोजना अवलंबणे अनिवार्य आहे. 
  • कालावधी 

  •   फुले येण्याच्या चार अवस्था असून पहिल्यांदा फूल कळीस सुरुवात, त्यानंतर फुलोरा लागणे, फुलांची परिपक्वता आणि तुरा बाहेर पडण्याची अवस्था या क्रमाने फुलोरा बाहेर पडतो. या सर्वांमध्ये फुलकळीची सुरवात ही सर्वांत महत्त्वाची अवस्था असून, ही नियंत्रित करणे गरजेचे आहे.
  •   फूल कळी तयार होण्याची प्रक्रिया १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत होते. हा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढू शकतो. त्यानंतर ८ ते १२ आठवड्यांनी जातीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात तुरा दिसण्यास सुरुवात होते. काही जातींमध्ये सहा आठवड्यात तर काही जातींमध्ये १५ आठवडे लागतात. काही वेळेला तुरा येण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. परंतु तुरा बाहेर  पडत नाही, असेही आढळून आले आहे. 
  • तुरा येण्यामागील कारणे  तापमान आणि प्रकाश संश्‍लेषण क्रियेचा परिणाम 

  •   १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत कमी अवधीचा प्रकाश, सातत्याने दिवसभर ढगाळ हवामान, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ६५ ते ९० टक्के असल्यास प्रकाश संश्‍लेषण क्रियेवर परिणाम होतो. दिवसाचे तापमान २८ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान २३ अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचते. अशा वेळी दोन्ही तापमानातील फरक सातत्याने कमी राहतो.रात्रीचे जास्त आणि दिवसाचे कमी तापमानामुळे उसाच्या कायिक वाढीचे रूपांतर प्रजनन अवस्थेत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. अशा प्रकारचे हवामान सतत १० दिवसांपेक्षा जास्त दिवस मिळाल्यास तुऱ्याच्या फुलकळीस सुरुवात होण्यास हवामान अनुकूल ठरते. फुलकळीच्या वेळी तापमान आणि सूर्यप्रकाश कमी असताना तुरा जास्त येतो. १८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाचा कालावधी सतत १० दिवस राहिला, तर तुरा क्वचित किंवा दिसतच नाही. १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास तुरा येत नाही.
  •   पूरस्थिती असलेल्या नदीच्या काठावरील उसाच्या क्षेत्राला हमखास तुरा येतो. 
  •  दिवस आणि रात्रीचा कालावधी  या कालावधीत १२.३० तासांचा दिवस आणि ११.३० तासांची रात्र असते. ११.३० तासांची रात्र तुरा येण्यासाठी अनुकूल ठरते.सरासरी १२ तासांपेक्षा जास्त तास प्रकाश मिळाल्यास फुलकळी लागण्यास अनुकूल वातावरण तयार होते. प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेचा पानावर परिणाम होऊन तो फुलकळी लागण्यास प्रवृत्त करतो.  पावसाचा परिणाम 

  • १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढते. नत्राची कमतरता होऊन उसाची वाढ खुंटते, फुटव्याची वाढ होत नाही. नत्रयुक्त खतांचा पुरवठा कमी पडतो, मुख्य वाढीच्या वेगावर परिणाम होता. 
  • हवेतील आद्रतेचे प्रमाण व जमिनीतील पाण्याचे किंवा ओलाव्याचे प्रमाण दीर्घकाळ कायम राहिल्यास तुऱ्याचे प्रमाण ६० ते ८० टक्के आढळते. निचरा होत नसेल तर उसाला तुरा जास्त येतो. कालव्याला लागून असलेल्या क्षेत्रात ६० ते ८० टक्के तुरा येतो. पाण्याचा ताण असलेल्या क्षेत्रात तुरा कमी येतो.
  •  फुलकळीच्या वेळी तापमान वाढ आणि जमिनीतील ओलीचे प्रमाण कमी झाल्यास तुरा कमी येतो. 
  • अन्नद्रव्यांची कमतरता 

  • नत्राचा पुरवठा कमी झाल्याने वाढ थांबते. पाणीपातळी वाढल्याने नत्राची मात्रा कमी होते. नत्राचे शोषण मुळाद्वारे योग्य प्रमाणात होत नाही.  पोटॅशचा अधिक वापर केल्यास अशा ठिकाणी जास्त प्रमाणात आणि लवकर तुरा येतो. नत्र कमी झाल्याने उपलब्ध अन्नद्रव्यांचा वापर फुलकळी येण्याकडे आणि तुरा वाढीसाठी होतो. स्फुरदयुक्त खतांचा वापर वाढवावा. नत्रयुक्त खते पुरेशी असल्यास तुरा कमी येतो.
  • नत्र खताचे प्रमाण वाढल्यास तुरा येण्याचे प्रमाण कमी होते. युरिया ऐवजी अमोनिअम सल्फेट किंवा अमोनिअम नायट्रेट वापरावे. युरियामुळे तुरा प्रमाण वाढते. पाचट जाळून युरियाच्या वापर केल्यास ६१ टक्क्यांपेक्षा तुरा जास्त येतो. 
  • लागणीचा हंगाम 

  • सुरू लागवड अनुक्रमे १५ डिसेंबर ते फेब्रुवारी, पूर्वहंगामी १५ ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि आडसाली १५ जुलै ते १५ ऑगस्ट मध्ये करण्याची शिफारस आहे. तथापि, एप्रिल ते जून महिन्यात ऊस लागवडीकडे कल वाढला आहे. हंगाम सोडून लागवड केलेल्या उसाला ३ ते ४ कांडी लागल्याबरोबर तुरा आल्याचे आढळून आले आहे. सहा महिन्यांच्या उसालाही तुरा येतो. १ जूनला बेण्यासाठी तोडलेल्या उसाच्या खोडव्यालाही तुरा आल्याचे दिसून आले आहे. 
  • ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जर उगवण किंवा फुटवा येण्याच्या अवस्थेमध्ये असेल, तर त्या वर्षीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात तुरा येत नाही. 
  • पिकाचे वय 

  • नैसर्गिकरीत्या उसाला १० ते १२ महिन्यांत तुरा येतो. वाढीच्या अवस्थेतून प्रजनन अवस्थेत बदल होत असताना उसाच्या वाढ्यातील पानांमध्ये फ्लोरिजीन हार्मोन निर्माण होऊन फुलोरा येतो.
  • नत्रयुक्त खतांचा पुरवठा असल्यास वाढ चालू राहते आणि फुलोरा तयार होणाऱ्या हार्मोनला प्रतिबंध निर्माण होतो. वाढीच्या होर्मोन्समुळे ऊस वाढीची प्रक्रिया चालू राहते. 
  • पाचट व्यवस्थापन 

  • खोडव्यापेक्षा लागवडीच्या उसाला तुरा जास्त येतो. खोडवा घेताना किंवा ऊस लागवड करताना हंगामा अगोदर पाचट जाळल्यास तुरा जास्त येतो.
  • खोडव्यापेक्षा लागवडीच्या उसात तुरा जास्त येतो. पाचटाचा वापर केलेल्या क्षेत्रात तुरा कमी येतो. पाचट कंपोस्टिंगसाठी अमोनिअम नायट्रेट खतांचा वापर करावा.
  • - डॉ. भरत रासकर,  ९९६०८०२०२८ (ऊस विशेषज्ञ आणि प्रमुख मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com