जुन्या बोर बागांचे पुनरुज्जीवन करण्याचे तंत्र

जुन्या बोर झाडांची जमिनीपासून सुमारे एक मीटर अंतरावर छाटणी करावी. त्यातून येणारे जोमदार दोन किंवा तीन फुटवे ठेवावेत. अन्य फुटवे वेळोवेळी काढून टाकावेत.
जुन्या बोर झाडांची जमिनीपासून सुमारे एक मीटर अंतरावर छाटणी करावी. त्यातून येणारे जोमदार दोन किंवा तीन फुटवे ठेवावेत. अन्य फुटवे वेळोवेळी काढून टाकावेत.

जुन्या बोर फळबागांची उत्पादकता कमी होत जाते. अशा वेळी या बागा सांभाळणे परवडत नाही. नव्याने बाग लावल्यानंतर उत्पादन घेण्यास सुमारे तीन वर्षे लागतात. अशा वेळी बागेचे पुनरुज्जीवन करण्याचा उत्तम पर्याय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरतो. त्याचे तंत्र जाणून घेऊ. कोरडवाहू फळपिकामध्ये बोर हे अत्यंत महत्त्वाचे फळपीक आहे. बहुवार्षिक असल्याने एकदा लागवड केल्यानंतर अनेक वर्षे उत्पादन देत राहते. मात्र, जुन्या होत गेलेल्या बागांची उत्पादकता कमी होत जाते. प्रामुख्याने पर्णक्षेत्र विस्तार, प्रकाशसंश्‍लेषण क्रिया, प्रकाश भेदकता, छाटणी व वळण या गोष्टींवर फळधारणा व फळाचा विकास अवलंबून असतो. या गोष्टी सुधारल्यास उत्पादकता वाढवणे शक्‍य होते.

बागेचे पुनरुज्जीवन बोर फळपिकाच्या जुन्या बागांची (३० ते ३५ वर्षे वय) उत्पादकता घटत जाते. ती वाढवण्यासाठी झाडांवर जमिनीपासून योग्य अंतरावर मुख्य खोडाला काप घेतला जातो. कापलेल्या खोडापासून वाढलेल्या नवीन पालवीतील उत्तम शेंडे निवडून त्यांची वाढ केली जाते. अशा शेंड्यावर गुणवत्ताधारक व अधिक उत्पादनक्षम बोराच्या वृक्षांचा डोळा भरला जातो. त्यानंतर योग्य काळजी घेतल्यास उत्पादनही वाढते व फळांचा दर्जाही वाढतो. या प्रक्रियेला पुनरुज्जीवन (पूर्ण जोम/रिज्युवेनेशन) असे म्हणतात. मध्यवर्ती कोरडवाहू विभाग संशोधन संस्था, जोधपूर (राजस्थान) यांनी याबाबत संशोधन करुन जुन्या बागेत पुनरुज्जीवन तंत्राने चांगल्या वाणांचे डोळे भरण्याचे तंत्र विकसित केले आहे. पुनरुज्जीवित बागेपासून ७०-८० टक्के ‘अ’दर्जाची फळे मिळाल्याचे दिसून आले आहे.

पुनरुज्जीवन करण्याची पद्धत :

  • ज्या बागांची उत्पादकता घटली आहे, अशा जुन्या बागेची निवड करावी.  
  • मे महिन्यात फळझाड जमिनीपासून साधारणतः १ मीटर अंतरावर (मुख्य खोडापासून) कट करावे.
  • कट केलेल्या खोडाच्या भागावर त्वरीत कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड या बुरशीनाशकाची पेस्ट लावावी. त्यामुळे जखम झालेल्या भागामध्ये रोगकारक घटकांचा प्रवेश रोखणे शक्‍य होईल.
  • पेस्ट तयार करण्याची पद्धत : एक लिटर पाण्यात ४ किलो गेरू रात्रभर भिजत घालावा. या द्रावणात २५ ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड मिसळावे. खोडावर ही पेस्ट ब्रशने लावावी.
  • साधारणतः १२-१५ दिवसांनंतर नवीन पालवी फुटून शेंडा वाढ होते. योग्य वाढ असलेले २-३ शेंडे वाढू द्यावेत. अन्य शेंडे वेळोवेळी काढून टाकावेत.
  • नवीन शेंड्यावर रस शोषक किडीचा (मावा, पांढरी माशी, फुलकिडी इ.) प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव आढळताच, फवारणी करावी.
  • प्रमाण : प्रति लिटर पाणी. इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के ईसी) ०.५ मि.लि.
  • वेळोवेळी फवारणी करुन शेंड्याचे बुरशीजन्य रोगांंपासून संरक्षण करावे.  प्रमाण : प्रति लिटर पाणी  कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २ ग्रॅम. फवारणीत १० दिवसांचे अंतर असावे.
  • डोळाभरणीसाठी चांगली गुणवत्ता व उत्पादकता अधिक असलेल्या जातींची निवड करावी. पावसाळा योग्य रीतीने सुरू झाल्यानंतर (जुलै महिन्यात) अशा फळझाडांपासून डोळा काढून घेऊन जुन्या बागेत वाढवलेल्या शेंड्यावर डोळा भरणी करावी. या काळात वातावरण उत्तम असल्याने डोळा कलम यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त असते.
  • डोळाभरणीनंतर साधारणतः १०-१५ दिवसांत फुटवे फुटू लागतात. बरोबरीने बाजूचे फुटवेही फुटतात. असे फुटवे नियमित काढून डोळा कलमांपासून सुरू झालेली वाढ कायम ठेवावी.
  • पुढे शिफारशीनुसार योग्य ती काळजी घेऊन बागेची नव्याने जोपासना
  • करावी.
  • निष्कर्ष : पुनरुज्जीवन केलेल्या बागेचे उत्पादन पहिल्या वर्षी जुन्या बागेपेक्षा कमी असले तरी दुसऱ्या वर्षापासून वाढ होत जाते. १० ते १५ वर्ष बागा चांगले उत्पादन देतात. संपर्क : डॉ. प्रतीक साबळे, ८४०८०३५७७२ (शास्त्रज्ञ, उद्यान विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र, खेडब्रह्मा, सरदार कृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com