कॉमन कार्प माशाचे प्रजनन तंत्र

कॉमन कार्प माशाच्या बिजाची मागणी वाढत आहे. योग्य आकाराचे व गुणवत्तेचे बीज असल्यास चांगली किंमत मिळते. त्यामुळे या माशाचे प्रजनन तंत्र अवगत केल्यास चांगला व्यवसाय म्हणून सुरुवात करता येते.
Reproductive system of common carp fish
Reproductive system of common carp fish

कॉमन कार्प माशाच्या बिजाची मागणी वाढत आहे. योग्य आकाराचे व गुणवत्तेचे बीज असल्यास चांगली किंमत मिळते. त्यामुळे या माशाचे प्रजनन तंत्र अवगत केल्यास चांगला व्यवसाय म्हणून सुरुवात करता येते. कॉमन कार्प (सायप्रिनस कार्पिओ) मासा हा चायनीज कार्प प्रकारातील प्रमुख मासा आहे. कॉमन कार्प मासा हा मूळचा चीन देशातील आहे. उच्च दर्जाचे मांस, उत्तम विक्रीदर आणि जलद वाढीमुळे कॉमन कार्प माशाला जगभरात मागणी आहे.

  • हा मासा तलावाच्या तळाला राहतो. सर्वभक्षी प्रवर्गात मोडतो. नैसर्गिक अन्नासह कृत्रीम खाद्यदेखील याला चालते.
  • भारतीय प्रमुख कार्प आणि चायनीज कार्प माशाचे एकत्रित संवर्धन केले जाते.
  • माशाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. हे मासे वातावरणातील अनियमित बदल सहन करू शकतात.
  • नैसर्गिक प्रजनन 

  • हा मासा प्रत्येक सहा महिन्यांत प्रजननास प्रौढ होतो. उष्णकटिबंधीय प्रदेशात डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यांत प्रजनन हंगाम आढळून येतो. उपोष्णकटिबंधीय प्रदेशात माशाचा एका वर्षात २ ते ३ वेळा प्रजनन हंगाम दिसतो.
  • माशाची अंडी चिकट असतात. यामुळे दाट पान वनस्पती किंवा चिकटण्यासाठी माध्यम असलेल्या ठिकाणी हा मासा प्रजनन करतो. योग्य तापमानात फलित अंड्यापासून ३ ते ४ दिवसांत नवीन जिवाची उत्पत्ती होते. यास मत्स्यजिरे म्हणतात.
  • मत्स्यजिरे हे नाजूक असतात. वातावरणातील साधारण बदलामुळे देखील त्यांची मरतूक होते. मत्स्य जिऱ्यापासून मत्स्य बोटुकली तयार होण्याचे प्रमाण फार कमी असते.
  • फक्त नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेवर अवलंबून राहिल्यास बीजाची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे मानवनिर्मित पद्धतींचा वापर करून प्रजनन घडवून मत्स्यबीजाची निर्मिती केल्यास चांगले उत्पादन घेणे शक्य आहे.
  • मानवनिर्मित प्रजनन पद्धती 

  • कॉमन कार्प माशाचे प्रजनन घडवून मत्स्यबीज निर्मिती करण्यासाठी हॅचेरी माध्यमाचा वापर करतात. बीजनिर्मितीसाठी सुदंनीस पद्धत, डबिश पद्धतीचा वापर केला जातो.
  • हॅचरी पद्धतीमध्ये प्रजनक माशांना हार्मोन इंजेक्शन देऊन बीजनिर्मिती केली जाते. या पद्धतीने प्रजनन केल्यास जिऱ्यांची संख्या अधिक असते.
  • या पद्धतीकरिता विशिष्ट आकाराच्या पक्क्या बांधकामाची आवश्यकता असते.
  • हापा प्रजनन प्रणालीचा वापर  बहुतांश ठिकाणी सोप्या व स्वस्त खर्चात मत्स्यबीजनिर्मिती करण्यासाठी हापा प्रजनन प्रणालीचा वापर केला जातो. आवश्यक सामग्री 

  •  हापा नेट - (१.५ × २ × १ मिटर आकाराचे चौकोनी मेश असलेला हापा)
  • बांबू- ४ (२ मिटर लांब)
  • हॅन्ड नेट,
  • पोटॅशिअम परमॅंगनेट (२०ग्रॅम),
  • प्लॅस्टिक माध्यम किंवा पाण वनस्पती (हायड्रिला, नाजास, इकॉर्निया इ.)
  • प्रजनकांची ओळख  प्रजनक माशाचे नर व मादी ओळखणे अतिशय सोपी आहे. खालील बाबींनुसार नर व मादी ओळखणे शक्य आहे.  

    ओळखीची बाब नर मादी
    छातीवरील फिन (बोट फिरवल्यास) खरतर असल्याचा भास होतो सौम्य असल्याचा भास होतो.
    पोटाचा आकार सपाट असते. फुगलले असते- अंड्यामुळे
    प्रजनन हंगामात गुदद्वारावर भार दिल्यास पांढरे द्रव्य बाहेर येते (मिल्ट) अंडी बाहेर येतात.  

    प्रजनकांची पूर्वतयारी 

  • उत्तम बीजनिर्मितीसाठी प्रजनकांची योग्य पूर्वतयारी करणे महत्त्वाचे ठरते. यामुळे शाश्‍वत बीजनिर्मिती करता येते. प्रजनक माशावरील ताणदेखील कमी होतो.
  • प्रजननाच्या किमान एक महिन्यापूर्वी नर व मादी माशांना विभाजित करून १५०० ते २००० किलो ग्रॅम प्रति हेक्टर या घनतेने वेग-वेगळ्या तलावात संचयन करावे.
  • प्रौढ नर व मादी माशांच्या वजनाच्या २ टक्के प्रमाणे त्यांना मेद जास्ती असलेले खाद्य पुरवठा करावा.
  • प्रजनकाला कोणताही रोग न झाल्याची खात्री करावी. नियमित पाहणी करावी.
  • प्रक्रिया  पाण्यात हापा बांधणे  चौकोनी मेष जाळी १.५ × २ × १ मीटर आकाराचे हापा नेट योग्य खोली असलेल्या ठिकाणी बांबूच्या साह्याने बांधून घ्यावे. बांधताना लक्षात ठेवावे की, किमान ०.३ मीटर हापा हा पाण्याच्या वरती असावा. प्रजनकाची निवड  पूर्णता प्रौढ नर व मादी माशांची निवड करावी. नर मासा किमान १ किलो ग्रॅमपेक्षा मोठा असावा. मादी मासा हा किमान १-१.५ किलो ग्रॅम वजनाचा असावा. नर-मादी गुणोत्तर  एका मादी मागे दोन सम वजनाचे नर या प्रमाणात प्रजनक सायंकाळच्या वेळी हाप्यामध्ये सोडावेत. पाण वनस्पती पाण्यात सोडणे 

  • कॉमन कार्प माशाची अंडी चिकट असतात. त्यामुळे प्रजनन पद्धतीमध्ये त्याला चिकटवण्यासाठी दाट पान वनस्पती किंवा प्लॅस्टिक स्ट्रिप वापरतात.
  • पाण वनस्पती, प्रामुख्याने हायड्रिला, नाजास, इकॉर्निया यांचा वापर केला जातो. मादी या माध्यमांवर अंडी सोडते. याकरिता मादीच्या वजनाच्या दुप्पट वजनाच्या पाणवनस्पती वापरतात.
  • पाण वनस्पती पाण्यात सोडण्याआधी, त्याला योग्यरीत्या शुद्ध पाण्याने धुवावे. पोटॅशिअम परमॅंगनेटचा वापर करून निर्जंतुक करावे.
  • प्रजनन 

  • नर आणि मादी हाप्यात सोडल्याच्या ६ ते ८ तासांनंतर प्रजनन करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यात नारगी रंगाची लहान चमकदार फलित अंडी पाणवनस्पतींना चिकटून असल्याचे दिसते.
  •  एक किलो ग्रॅम वजनाची मादी साधारणपणे १,५०,००० इतकी अंडी सोडते. चांगल्या दर्जाची अंडी चमकदार व पारदर्शक असतात. खराब अंडी पांढुरकी पडलेली दिसतात.
  •  प्रजनन पूर्ण झाल्यावर प्रजनकांना पोटॅशिअम परमॅंगनेट द्रावणात १ मिनिट ठेवावे. त्यानंतर त्यांना तलावात सोडावे.
  • अंड्यांची काळजी 

  • प्रजनन पूर्ण झाल्यावर नर व मादी माशांना हाप्यामधून बाहेर काढावे. अंडी फलित होण्याचे प्रमाण तपासावे. अंड्यांना ५०,००० नग प्रति हापा या प्रमाणे ३ ते ४ नवीन हाप्यामध्ये विभाजित करावे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे अंडी खराब होण्याचे प्रमाण कमी होते.
  • फलित अंडी तापमानानुसार २ ते ४ दिवसांत (४० ते ७२ तास) नवीन जिवाची उत्पत्ती करतात. थंड वातावरण असल्यास वेळ जास्त लागतो. उत्पत्ती झालेले सूक्ष्म मत्स्यजिरे हापा नेटच्या खालच्या बाजूला ‍फिरताना दिसतात.
  • उत्पत्ती झाल्यावर ३ ते ४ दिवसांपर्यंत मत्स्यजिऱ्यांना बलक कोषाद्वारे आवश्यक पोषण तत्त्व प्राप्त होतो. कोष संपताच मत्स्य जिऱ्यांना नैसर्गिक अन्नाची गरज भासते. योग्य ते अन्न न मिळाल्यास मत्स्यजिऱ्यांची मरतुक होते.
  • नर्सरी व्यवस्थापन 

  • बलक कोष संपल्यावर मत्स्यजिऱ्यांना गमच्याच्या साह्याने नर्सरी तलावात सोडले जाते.
  • नर्सरी तलावात नैसर्गिक अन्नाचे (प्राणिप्लवंग व वनस्पती प्लवंग) प्रमाण अधिक ठेवले जाते. मत्स्यजिऱ्यांना योग्य प्रमाणात अन्न प्राप्त झाल्यास ते १४ ते १५ दिवसांत मत्स्यबीज (फ्राय) स्वरूपाचे होतात. त्यांनतर बीज संवर्धन तलावात सोडल्यावर ५० ते ६० दिवसांत त्याचे रूपांतर मत्स्य बोटुकलीमध्ये होते.
  • संपर्क ः शुभम कोमरेवार, ९४०४२७१५२८ (सहा.मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, गडचिरोली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com