जुन्या आंबा बागेचे पुनरुज्जीवन

आंबा बागेचे पुनरुज्जीवन म्हणजे छाटणीकरून झाडाचा विस्तार आटोपशीर ठेवणे, पाने व फांद्या अधिक सशक्त व जोमदार बनविणे व सातत्याने आंबा बागेतून अधिक व दर्जेदार उत्पादन मिळवणे. या पद्धतीने कमी खर्चात आणि सहज झाडाची मशागत करता येते.
Revival of the old mango orchard
Revival of the old mango orchard

आंबा बागेचे पुनरुज्जीवन म्हणजे छाटणीकरून झाडाचा विस्तार आटोपशीर ठेवणे, पाने व फांद्या अधिक सशक्त व जोमदार बनविणे व सातत्याने आंबा बागेतून अधिक व दर्जेदार उत्पादन मिळवणे. या पद्धतीने कमी खर्चात आणि सहज झाडाची मशागत करता येते. सध्या अस्तित्वात असलेल्या बहुतेक आंबा बागा पारंपारिक पद्धतीने म्हणजेच १० मिटर × १० मिटर अंतरावर लावण्यात आलेल्या आहेत. उंच वाढलेल्या फांद्यांमुळे झाडांमध्ये सूर्यप्रकाश येत नाही. फळ उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अशा झाडांमध्ये रोग, किडींचा वर्षभर प्रादुर्भाव रहातो. जुनी झाडे उंच वाढली असून फळधारणा झाडाच्या शेंड्यालगत होते, फळांचा आकार लहान होतो. अशा बागांमध्ये फवारणी, फळांची काढणी व इतर आंतर मशागतीची कामे करणे अवघड, खर्चिक तसेच काहीवेळा अशक्य होते. अशा बागांमधील झाडे हवामान बदलास व वातावरणातील अनियमिततेला सहज बळी पडतात. पर्यायाने आंबा बागायतदारास मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागते. पुनरुज्जीवन योग्य झाडे 

  • दहा वर्षांपेक्षा अधिक वयाची पुरेसा विस्तार न झालेली झाडे किंवा उत्पादकता अत्यंत कमी झालेली झाडे (प्रती वर्षी ५० ते ६०पेक्षा कमी फळे)
  • अति दाट झालेली झाडे ज्यामध्ये सूर्यप्रकाश झाडाच्या आतील बाजूस पोहोचत नाही.
  • ज्या झाडांच्या फळांचा आकार २०० ग्रॅम पेक्षा कमी झालेला आहे.
  • छाटणीचा हंगाम  ऑक्टोबर 

  • छाटणीसाठीचा हा सर्वोत्तम हंगाम आहे. या हंगामामध्ये जमिनीत पुरेसा ओलावा असतो. छाटणी नंतर येणारी पालवी लवकर, निरोगी व सुदृढ असते.
  • उत्तम हवामानामुळे छाटणीनंतर झाडाची मर होण्याची शक्यता कमी असते. नवीन येणाऱ्या पालवीचे नियोजन तसेच या पालवीचे रोग, किडीपासून करावयाचे संरक्षण सहजपणे करता येते.
  • मार्च 

  • मार्च महिन्यामध्ये देखील छाटणी करता येते. फळधारणा न झालेल्या झाडांची छाटणी करण्यास शेतकरी त्वरित तयार होतात. मात्र मार्च महिन्यापर्यंत जमिनीमधील ओलावा कमी झालेला असतो. त्यामुळे छाटणी केलेल्या झाडांना पाणी देण्याची गरज असते.
  • छाटणीनंतर पालवी येईपर्यंत पावसाला सुरू होतो. त्यामुळे नवीन पालवीचे रोग व किडीपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेळच्या वेळी करावी.
  • छाटणी किती उंचीवर करावी?

  • पुनरुज्जीवन करावयाच्या झाडांची पुनरुज्जीवनानंतरची उंची ही १० ते १२ फूट (३.५ ते ४ मी) असावी. झाडांची छाटणी फांद्यांच्या विस्तारावर अवलंबून असते.
  • मुख्य खोडापासून तिसऱ्या फांदीवर झाडाची छाटणी करावी.
  • मुख्य खोड किंवा दुय्यम फांद्यांवर छाटणी केल्यास झाड मरण्याची शक्यता असते. अशा छाटणीमुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील बळावते.
  • अति उंच झाडांची छाटणी व पुनरुज्जीवन दोन ते तीन टप्प्यात करावे.
  • छाटणीची तीव्रता  छाटणीसाठी उंची  झाडांचे पुनरुज्जीवन करताना झाडांची मध्यफांदी पूर्णपणे काढावी म्हणजे विस्तार पुन्हा वाढल्यावर देखील झाडाचा मध्यभाग पूर्णपणे मोकळा राहून सूर्यप्रकाश झाडाच्या आतील भागापर्यंत पोहोचतो. त्यामुळे पालवी व फांद्या सशक्त होतात. रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. छाटणी कशी करावी?

  • पुनरुज्जीवनासाठी निवडलेल्या झाडांची योग्य उंचीवर चेन सॉ (यांत्रिक करवत) किंवा पोलप्रुनर (लांब दांडा असलेली यांत्रिक करवत) यांच्या साहाय्याने छाटणी करावी. त्यामुळे काप एक सारखा व फांदीत जास्त इजा न होता घेता येतो.
  • यांत्रिक करवती उपलब्ध नसतील तर पारंपरिक कोयता व कुऱ्हाडी सारखे पारंपरिक हत्यार वापरून देखील छाटणी करता येते. फांदी पिचणार नाही याची दक्षता घ्यावी.
  •  छाटणीनंतर घ्यावयाची काळजी

  • कापलेल्या फांद्या ताबडतोब गोळा करून बागे बाहेर काढून बाग स्वच्छ करावी.
  • छाटणी पूर्ण झाल्यावर कापलेल्या फांद्यावर तसेच पूर्ण खोडावर क्लोरपायरीफॉस ५ मिलि लिटर प्रती पाण्यात मिसळून फवारावे. (ॲग्रेस्को शिफारस)
  • कापलेल्या भागावर ब्रशच्या साहाय्याने कार्बेन्डाझिम (१० ग्रॅम/लिटर)लावावे. (ॲग्रेस्को शिफारस)
  • छाटणी केलेल्या झाडास १५० ते २०० लिटर पाणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा द्यावे.
  • फुटव्यांचे व्यवस्थापन 

  • छाटणीपासून सर्वसाधारणपणे ४० ते ६० दिवसांनी नवीन फुटवे येण्याची प्रक्रिया सुरू होते.
  • नवीन फुटवे येण्यासाठी लागणारा कालावधी झाडाचे वय व जमिनीमध्ये असलेला ओलावा यावर अवलंबून असतो.
  • खूप जुन्या झाडांची छाटणी केल्यास नवीन फुटवे येण्यासाठीचा कालावधी यापेक्षा जास्त असू शकतो.
  • नवीन येणाऱ्या‍ फुटव्यांची अशा पद्धतीने विरळणी केली जाते की, संपूर्ण खोडावर वर पासून खालपर्यंत आणि चारही बाजूस ठराविक अंतरावर एक - एक सशक्त फुटवा वाढू लागेल.
  • छाटणी केल्यानंतर सर्वात प्रथम ज्या ठिकाणी छाटणी केली आहे तेथून अर्धा ते पाऊण फुटामध्ये अत्यंत जोमदार असे असंख्य फुटवे येतात. असे फुटवे येण्याचे प्रमाण अत्यंत जास्त असते. असंख्य फुटव्यांपैकी सशक्त असलेले ३ ते ४ फुटवे फांदीच्या चारही बाजूस राखावेत, उर्वरित फुटव्यांची विरळणी करावी.
  • अशी विरळणी २० ते २५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा करावी लागते. त्यानंतर खोडावर खालील बाजूसही फुटवे येवू लागतात.
  • या फुटव्यांची देखील आवश्यकतेप्रमाणे विरळणी करावी. दर अर्धा फूट ते एक फुटावर फांदीच्या चारही बाजूस एक-एक जोमदार फुटवा राहील याची दक्षता घ्यावी.
  • फुटव्यावर दोनदा नवीन फूट आल्यावर दुसऱ्या नवीन फुटीचा डोळा खुडावा यामुळे ही फूट सशक्त व जाड होण्यास मदत होते.
  • खुडलेल्या डोळ्यापासून दोन ते तीन नवीन फांद्या फुटतात. झाडाचा विस्तार वाढण्यास मदत होते. आलेले फुटवे बळकट होतात.
  • पुनरुज्जीवनानंतर फळधारणा 

  • पुनरुज्जीवनासाठी आंब्याची छाटणी केल्यानंतर झाड मोहोर व फळे येण्या योग्य होण्यास सर्वसाधारणपणे दोन वर्षांचा कालावधी लागतो.
  • योग्य खत व्यवस्थापन, झाडाचे रोग, किडीपासून संरक्षण तसेच पॅक्लोब्युट्राझोलचा योग्य प्रमाणामध्ये वापर करणे आवश्यक असते. बागेची नियमित स्वच्छता ठेवावी.
  • छाटणीनंतर झाडाची योग्य काळजी न घेतल्यास, मोहोर येण्यास व उत्पादन सुरू होण्यास जास्त कालावधी लागू शकतो.
  • एकावेळी बागेमधील किती झाडांचे पुनरुज्जीवन करावे?

  • बागेमधील सर्व झाडांचे पुनरुज्जीवन एकाचवेळी करू नये.
  • सर्व झाडांचे पुनरुज्जीवन एकाच वेळी केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद होईल. हे टाळण्यासाठी बागायतदारांची आर्थिक परिस्थिती, उपलब्ध मनुष्यबळ यांचा विचार करून बागेतील किती झाडे एकावेळी पुनरुज्जीवनासाठी निवडावीत आणि पुनरुज्जीवन कधी करावे याबाबतचा निर्णय घ्यावा.
  • संपर्क :  प्रा.महेश कुलकर्णी ८२७५३९२३१५ डॉ. योगेश परुळेकर ८२७५४५४९७८ (डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली,जि. रत्नागिरी )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com