मत्स्यसंवर्धन तलावासाठी योग्य जागेची निवड

तलावामध्ये माशांची चांगली वाढ होण्यासाठी तलाव खोदण्याच्या जागेतील मातीचे परीक्षण महत्त्वाचे आहे. मातीमध्ये गाळ व चिकणमातीचे प्रमाण जास्त असल्यास ती जमीन मत्स्य तलावासाठी चांगली असते.
मत्स्यसंवर्धन तलावासाठी योग्य जागेची निवड

तलावामध्ये माशांची चांगली वाढ होण्यासाठी तलाव खोदण्याच्या जागेतील मातीचे परीक्षण महत्त्वाचे आहे. मातीमध्ये गाळ व चिकणमातीचे प्रमाण जास्त असल्यास ती जमीन मत्स्य तलावासाठी चांगली असते. आपल्याकडे तलावामध्ये मत्स्य संवर्धन करण्याच्या विविध पद्धती विकसित झाल्या आहेत, जसे की मातीचे तलाव, प्लॅस्टिकचे अच्छादन वापरून तयार केलेले तलाव ( पी लाईन) आणि सिमेंटच्या टाक्या/तलाव  किंवा प्लॅस्टीकच्या टाक्या. मत्स्य संवर्धन करण्यासाठी सर्वप्रथम आपणास योग्य जागेची निवड करणे अत्यंत आवश्यक असते. माशांची चांगली वाढ होण्यासाठी तलाव खोदण्याच्या जागेतील मातीचे परीक्षण महत्त्वाचे आहे. ज्या प्रकारे आपण शेती करताना चांगल्या सुपीक जमिनीची निवड करतो त्याचप्रमाणे मत्स्यपालनासाठी योग्य जमिनीची निवड करणे महत्त्वाचे आहे. जर आपण चांगल्या सुपीक जमिनीची निवड केली, तर पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी होते किंवा त्याप्रकारे नियोजन करता येते. तसेच माशाची वाढ ही चांगल्या प्रकारे होते. याचा दुसरा फायदा असा आहे की, तलावामध्ये नैसर्गिक खाद्य निर्माण होण्यासाठी मदत होते. नैसर्गिक खाद्य तयार झाल्यामुळे खाद्यावरील खर्च कमी प्रमाणात होतो. आपण जर जमिनीची निवड चांगल्या प्रकारे केली तर मत्स्यसंवर्धन तलावातील माशांची वाढ  संतुलित राहते. चांगले मत्स्योत्पादन मिळू शिकते.  मत्स्य संवर्धनाकरिता योग्य जागेची निवड बारमाही पाण्याचा स्रोत

  • मत्स्यपालनासाठी सर्वप्रथम आपणास मुबलक चांगल्या पाण्याची आवश्यकता असते.  यासाठी पाण्याचा पुरवठा करणारा खात्रीशीर स्रोत असणे आवश्यक आहे. 
  • राज्याच्या काही भागामध्ये पाण्याची कमतरता मार्च ते जून महिन्यामध्ये भासते, अशा वेळी आपल्याकडे  किमान दोन पाण्याचे स्रोत असल्यास उन्हाळ्यामध्ये किमान एका तरी जलस्त्रोताद्वारे पाण्याचा पुरवठा करणे शक्य होईल. 
  • पाण्याची उपलब्धता नदी, कालवा, झरा, विहीर, कूपनलिका किंवा पावसाचे साठणारे पाणी याद्वारे होऊ शकतो. पाण्याचा स्रोत वर्षभर पाणीपुरवठा करणारे असावे, जेणेकरून मत्स्य संवर्धन करण्यासाठी पाण्याची कमतरता भासणार नाही.
  • तलाव खोदाईच्या जागेतील मातीचे गुणधर्म  

  • मत्स्य तलाव बांधणी करते वेळेस तेथील माती पाण्याला धरून ठेवणारी असावी. जर मातीमधून पाणी पाझरत असेल तर मत्स्यसंवर्धन तळी करणे फायदेशीर ठरणार नाही. मातीमध्ये गाळ व चिकणमातीचे प्रमाण जास्त असल्यास ती जमीन मत्स्य पालनासाठी सर्वोत्कृष्ट मानली जाते.
  • चिकण माती, गाळ-चिकण माती, वाळू- चिकण माती या प्रकारची माती देखील मत्स्यपालनासाठी समाधानकारक आहे.
  • मत्स्यपालनासाठी वरीलपैकी मातीचे गुणधर्म असल्यास मत्स्य तलावातील पाणी झिरपणार नाही. मासे वाढीसाठी फायदेशीर ठरू शकते. 
  • मत्स्य तलावाच्या जागेची रचना 

  • मत्स्यसंवर्धन तळी खोदण्यासाठी जमिनीचा पृष्ठभाग हा सपाट असावा. 
  • मत्स्यसंवर्धन तळी तयार करते वेळी काही गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या जागेमध्ये यापूर्वी पूर आला होता का ? जर आला असेल तर पूर पातळीपेक्षा उंचीवर असलेल्या जागेवर मस्त्यतळ्याचे खोद काम करावे, जर तुम्हाला याबद्दलची माहिती नसेल तर जवळच्या हवामान विभागाच्या कार्यालयात याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध असते. त्या कार्यालयातून माहिती गोळा करावी. त्याचा अभ्यास करुन मत्स्य तलावाचे खोद काम करावे. 
  • तळी खोदण्याचा जागेजवळील हवामानासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे जसे की ५ ते १० वर्षांपूर्वीचा हवामानाची नोंदणी (पर्जन्य अंदाज, वारे वाहण्याची दिशा, तापमान इत्यादी).  या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण जेव्हा पूर येईल तेव्हा मत्स्य तलावाचे नुकसान होणार नाही.
  • पर्जन्य अंदाजावर पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करणे, वारे वाहण्याच्या दिशेवर तळ्याची रचना करावी. जेणेकरून पाण्यात प्राण वायूविजन सुलभरीत्या होईल. 
  • तापमानानुसार पाण्याचा बाष्पीभवनाचा दर व तसेच मत्स्य प्रजातींची निवड करण्याचे  नियोजन चांगल्या प्रकारे करता येईल.
  • मत्स्य शेततळ्याचे खोद काम  करण्यापूर्वी महत्त्वाच्या बाबी

  • मत्स्यसंवर्धन तळी दुर्गम ठिकाणी बांधू नयेत. मत्स्य तळे चांगल्या कार्यक्षमतेने चालवण्यासाठी शहराजवळ असलेल्या जागेची निवड करावी.
  • मत्स्यसंवर्धन तळी बांधण्यापूर्वी वार्षिक पावसाचा अंदाज, पाणलोट क्षेत्रांची माहिती आवश्यक आहे. ज्याच्यावर पाण्याची सुविधा अवलंबून असते.
  • मत्स्यसंवर्धन तळी बांधकामाची जागा प्रदूषणमुक्त असावी.भविष्यात देखील सदर ठिकाणी प्रदूषणाची संभाव्यता नसावी.
  • माती व पाण्याचे भौतिक रासायनिक जैविक परिमाण प्रयोगशाळेच्या विश्लेषणाद्वारे मोजून त्याची मत्स्य पालनाच्या उत्पादकतेची खात्री करावी. 
  • शेतीमधील कुठल्या क्षेत्रातील जमिनीवर शेततळे करावयाचे आहे त्या संदर्भात स्पष्ट माहिती असणे आवश्यक आहे. 
  • माशांच्या जातीच्या सोयीनुसार मत्स्यशेती करावी. त्याचे संवर्धन शास्त्रीय पद्धतीने करावे.
  • मत्स्य संवर्धन तलावामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी व पाणी भरण्यासाठी योग्य व्यवस्था असावी. 
  • मातीमध्ये आठ ते नऊ दरम्यान पाण्याचा सामू राखण्यासाठी पुरेशी क्षमता असणे आवश्यक आहे.
  • मत्स्य तळी बांधण्याच्या जागी दळणवळणाची वाहनांसाठी रस्त्याची सुविधा असावी जेणेकरून मत्स्यबीज, मत्स्यखाद्य, जाळे तसेच पकडलेले मासे इत्यादी वाहतुकीसाठी सोयीचे होईल.
  • विविध प्रकारची यंत्र चालवणे, रात्रीच्या वेळी प्रकाशाची उपलब्धता, सुरक्षेच्या कारणास्तव २४ तास वीजपुरवठा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  • मत्स्यतळ्याजवळ जाळे व खाद्य ठेवण्यासाठी तसेच प्रयोगशाळा व कार्यालयाकरिता एखादी लहानशी खोली असावी.
  • मासे विकण्यासाठी मासळी बाजार जवळ असावा.
  • मत्स्यसंवर्धन तळे बांधकामाच्या जागेची निवड करते वेळी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
  • - अभिनव वायचळकर,   ९९२३३३९३१७   (सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, धारणी, जि. अमरावती) - रामेश्वर भोसले,  (संशोधन विद्यार्थी, मत्स्य महाविद्यालय व संशोधन संस्था, थुतुकुडी, तमिळनाडू)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com