शिवकालीन जल व्यवस्थापन तंत्र

दगड खाणी खणताना काही वेळेस वेडेवाकडे मोठे खड्डे तयार झाले आहेत. अशा ठिकाणी बांध घालून तसेच व्यवस्थित आकार देऊन यांचे अल्प खर्चात चांगल्या तलावात रूपांतर करणे शक्य आहे. यासाठी शिवकालीन जल व्यवस्थापन तंत्राचा अवलंब फायदेशीर ठरतो.
Water stored in stone quarries.
Water stored in stone quarries.

दगड खाणी खणताना काही वेळेस वेडेवाकडे मोठे खड्डे तयार झाले आहेत. अशा ठिकाणी बांध घालून तसेच व्यवस्थित आकार देऊन यांचे अल्प खर्चात चांगल्या तलावात रूपांतर करणे शक्य आहे. यासाठी शिवकालीन जल व्यवस्थापन तंत्राचा अवलंब फायदेशीर ठरतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि किल्ले सदैव प्रेरणा देतात. दुर्गम भागात बांधलेल्या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अश्‍वदळ, सैनिकांचे वास्तव्य असायचे. त्यांची पाण्याची गरज लक्षात घेता किल्ल्यावर दगडामध्ये खोदकाम करून तलाव निर्माण केले जात असत. किल्ला बांधताना “आधी खडक फोडुनी तळी बांधावी” असे आज्ञापत्र शिवाजी महाराज यांनी दिले होते. तळ्यासाठी खोदकाम केलेला दगड किल्यातील बांधकामासाठी वापरलेला आहे. रायगड किल्यामधील गंगासागर तलाव, हत्ती तलाव हे याचेच उदाहरण म्हणता येईल. शिवाजी महाराज यांनी किल्ला बांधताना कमी वेळेत तयार होणारी दगडी हौदाची नवीन पद्धत सुरू केली. डोंगर उतारावरील कातळामध्ये एकाखाली एक अशा पद्धतीने दगडी टाके खणले जायचे. एक टाके भरल्यावर खालच्या टाक्यात गुरुत्वाकर्षणाने पाणी भरायचे. याचबरोबरीने किल्यामध्ये इंग्रजी यू (U) आकाराचे तलाव खणण्यात आले. तलावाच्या पुढील बाजूस दगडी भिंत बांधली जायची. जास्तीचे पाणी वाहून जाण्यासाठी सांडवा दिलेला असे. अशा प्रकारे शिवाजी महाराज यांनी बांधलेले तलाव रांगणा, राजगड (पद्मावती तलाव) सुधागड इत्यादी किल्ल्यांवर पाहावयास मिळतात. काही किल्ल्यांवरील तलावातील पाणी पायथ्याच्या गावामध्ये सायफन पद्धतीने पुरविण्यात येते. उदा. राजमाची, विसापूर. हे शिवकालीन जलसंचय व्यवस्थापनाचे तंत्र आजही दगडखाणी खणताना व्यापक स्वरूपात प्रत्यक्ष वापरात आणले पाहिजे. यामुळे शिवकालीन जलसंस्कृतीचा वारसा देखील जतन करता येईल. दगड खाणीमध्ये टाक्या, तलावनिर्मिती  महाराष्ट्राच्या ८२ टक्के भूभागात बेसॉल्ट प्रकारचा काळा कठीण दगड आढळतो. बेसॉल्टची पाणी सामावण्याची क्षमता पाच टक्यांपेक्षा कमी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. यामुळे असंख्य कूपनलिकांना पाणी लागत नाही. फारसे पाणी न मुरणे या वैशिष्ट्यांचा सकारात्मक विचार करता हा दगड तलाव, टाकी खणण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे पाण्याचा साठा करणे सहज शक्य आहे. रस्ते तसेच विविध बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात दगड लागतो. जागोजागी डोंगर किंवा टेकडीचा एक कोपरा फोडून दगड काढण्यात येतो. मात्र सगळ्याच ठिकाणी पाणी साठवता येत नाही. म्हणजेच केलेला खर्च, ऊर्जेचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. दगड खाणी खणताना काही वेळेस वेडेवाकडे मोठे खड्डे तयार झाले आहेत. अशा ठिकाणी बांध घालून तसेच व्यवस्थित आकार देऊन यांचे अल्प खर्चात चांगल्या तलावात रूपांतर करणे शक्य आहे. दगडखाणीमध्ये अल्पखर्ची तलावनिर्मिती  जागेची निवड  ज्या बाजूला उतार आहे, अशी थोडीशी खोलगट जागा दगडखाणीसाठी निवडावी. जेणेकरून पावसाचे काही पाणी सहजरीत्या तलावात येऊ शकेल. दगडखाणीची सहा मीटर खोली  डोंगर किंवा टेकडीचा केवळ एक कोपरा फोडून दगड काढू नये. दगड खाण ही खोल असणे आवश्यक आहे. सहा मीटर खोल पाषाण तलावातील पाणी हाताने काढता येईल किंवा वरच्या भागास पंपाने पुरवठा करता येईल. बाह्य ऊर्जेशिवाय पाणीपुरवठा  तलावाची जागा शक्यतो त्या भागातील जमिनीपेक्षा काहीशा उंचावर असावी. म्हणजे कोणत्याही प्रकारची ऊर्जा न वापरता गुरुत्वाकर्षण शक्ती, सायफन तंत्राने सुलभपणे पाणीपुरवठा होऊ शकेल. टंचाईग्रस्त गावासाठी पाणीपुरवठा  ग्रामस्थांना सुरुंगाच्या स्फोटाचा त्रास होऊ नये म्हणून वस्तीपासून काही अंतरावर दगड खाण खणावी. टंचाईग्रस्त गावाच्या परिसरात लोकवस्तीपासून ठराविक अंतरावर (५०० मिटर पेक्षा जास्त) परंतु शक्यतो थोड्याशा उंचावर दगड खाण खणावी. जेणेकरून, पिण्याचे पाणी व अन्य गरजांसाठी हे पाणी सायफन तंत्राने सहज वापरता येईल. सायफन तंत्र  सायफनद्वारे पाणी तलावातून बांधावरून खाली कमी पातळीवरील जमिनीपर्यंत नेता येते. सायफनने ओलांडाव्या लागणाऱ्या बांधाची उंची ६ ते ८ मीटरपर्यंत असावी. राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे महाविद्यालयाने सायफन प्रणाली विकसित केली आहे. चांगला आकार, अंतर्गत उतार  दगड खाणी अस्ताव्यस्त पद्धतीने खणल्या जातात. त्या ऐवजी लांब चौकोन किंवा लंबगोलाकार पद्धतीने खाण खोदावी. त्याच्या आत एका बाजूला उतार असावा. हा उतार ४५ अंशांपेक्षा कमी असावा किंवा योग्य पायऱ्या असाव्यात. म्हणजे दगड वाहून नेणे, तलाव स्वच्छता, दुरुस्ती करण्यासाठी उपयोग होईल. सुरक्षितता  दगड खाणी वेड्यावाकड्या खणू नयेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने धारदार दगड काढून तळभाग व भिंती सपाट कराव्यात.कुंपण करावे. पाणी पातळी दर्शक  कातळ तलावात पाण्याची पातळी समजावी यासाठी ऑईलपेंटने तीन,चार ठिकाणी खोली लिहावी. पाणी बाहेर जाण्याचा मार्ग  काही वेळा दगडखाणीचे काम दोन-तीन वर्षे चालते. त्यात पाणी साठल्यास सुरुंग लावण्यास अडचण निर्माण होते. अशावेळी साठलेले पाणी निघून जाण्यासाठी एक बाजू फोडून मोकळी केली जाते. ती बाजू आवश्यक तेवढीच फोडावी. तसेच तलावात रूपांतर करताना पाणी बाहेर जाण्याच्या मार्गात एक पाइप ठेवून बांधकाम करावे. पाझर तलाव : दगडामधून पाझर होत असल्यास याचा पाझर तलाव म्हणून वापर होतो. पाणी वापरायचे असल्यास पाझर असणाऱ्या जागा सिमेंटने योग्य रीतीने भराव्यात. चिरा, दगड खाणीचे तलाव  रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जांभा दगड आढळतो. हा सच्छिद्र आहे. त्यामुळे चिरा खाणींचा उपयोग पाझर तलाव म्हणून होऊ शकतो. यामध्ये सिमेंटने गिलावा केल्यास याचा तलाव म्हणून वापर करता येईल. नियमावली  महाराष्ट्र शासनातर्फे खाण व खनिज अधिनियम व नियमाद्वारे दगड खाणींना परवानगी देण्यात येते. दगडखाणींना परवानगी देताना, ६ मीटर खोलीची खोदकामाची मर्यादा {नियम ६६- (१)}, वेडेवाकडे धारदार दगड काढणे (नियम क्र. ४३), कुंपण करणे, अंतर्गत उतार ४५ अंशांपेक्षा कमी {भाग ६-३(ब)} असावा. परिसरात वृक्षारोपण करणे खाणधारकावर बंधनकारक आहे. संपर्क ः प्रमोद जाधव, ९४२३३७५२९२ (उपायुक्त, समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्ग)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com