agricultural news in marathi Soybean-castor cultivation success story of ambarwadi village from parbhani | Agrowon

सोयाबीन- एरंड ठरली फायदेशीर पद्धती

माणिक रासवे
शनिवार, 3 जुलै 2021

परभणी जिल्ह्यातील अंबरवाडी (ता. जिंतूर) येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन- एरंडी या पीकपद्धतीचा अंगीकार केला आहे. या पद्धतीचे गावातील क्षेत्र १०० ते १५० एकरांच्या पुढे आहे. यात एरंडीचे बीजोत्पादन घेतले जाते.  
 

परभणी जिल्ह्यातील अंबरवाडी (ता. जिंतूर) येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन- एरंडी या पीकपद्धतीचा अंगीकार केला आहे. या पद्धतीचे गावातील क्षेत्र १०० ते १५० एकरांच्या पुढे आहे. यात एरंडीचे बीजोत्पादन घेतले जाते. व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर व जोखीम कमी करणारी ही पद्धत ठरल्याचे अनुभव शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहेत. 

परभणी जिल्ह्यात जिंतूर या तालुका ठिकाणापासून सुमारे १५ किलोमीटरवर अंबरवाडी हे डोंगररांगांमध्ये वसलेले प्रमुख गाव आहे. शिवारातील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. पैकी ८० टक्के माळरानाचे आहे. तीव्र उतारामुळे माळरानावरील माती वाहून जाते. ओढ्या- नाल्याकाठची जमीन मध्यम प्रकारची गाळाची आहे. गावाच्या उशाला पूर्णा नदीवरील येलदरी प्रकल्पाचा जलाशय आहे. त्यात मुबलक पाणीसाठा असल्यास शिवारातील ओढ्यानाल्यांमध्ये ‘बॅक वॉटर’ येते. त्याचा उपयोग सिंचनासाठी होतो. कोरडवाहू क्षेत्र अधिक आहे. 

सोयाबीन- एरंडी पद्धत
उत्पन्नाची जोखीम करण्यासाठी येथील शेतकरी तूर- सोयाबीन पद्धतीचा वापर करीत. सलग सोयाबीनचे क्षेत्रही जास्त आहे. रब्बीत हरभरा घेतला जातो. परंतु हलक्या जमिनीत त्याचे चांगले उत्पादन मिळत नाही. तर किडी-रोगांमुळे तुरीचे समाधानकारक उत्पादन हाती लागत नाही. अशावेळी गावातील शेतकऱ्यांना सोयाबीन- एरंडी पद्धतीचा हुकमी पर्याय सापडला. सुमारे आठ वर्षांत गावातील अधिक क्षेत्र या पद्धतीखाली आले.  

पीक पद्धतीविषयी  
अंबरवाडीचे सुरेश घुगे यांचे आजोळ असलेल्या सावरगाव मुंढे (जि. जालना) येथील शेतकरी एरंडीचे उत्पादन घेत असत. तेथून पीक व्यवस्थापन व विक्री व्यवस्थेची माहिती घेत घुगे यांनी २०१२ मध्ये दोन एकरांत सोयाबीन- एरंडी पद्धतीने लावण केली. आपले अनुभव सांगताना घुगे म्हणतात, की दरवर्षी तीन ते पाच एकरांत हे क्षेत्र असते. सात जूनच्या आसपास सोयाबीनची लावण प्रत्येकी चार फुटांवर होते. जुलैच्या दरम्यान मधल्या चार फुटी पट्ट्यात प्रत्येकी एक ओळ या पद्धतीने एरंडी लावतो. एका खासगी बियाणे कंपनीसाठी एरंडीचे बीजोत्पादन करतो. सोयाबीन काढणी झाल्यानंतर मग पुढे एरंडीचे झाड उंच वाढत राहते. एरंडीला पाण्याची मात्र शाश्‍वती लागते असे घुगे यांनी सांगितले. 

उत्पादन 
घुगे सांगतात, की या पद्धतीत सोयाबीनच्या वाढीस मोकळी, हवेशीर जागा मिळते. मशागतीची कामे करणे सोपे होते. त्याचे एकरी १० क्विंटलपर्यंत, तर एरंडीच्या नर व मादी झाडांचे प्रत्येकी सहा ते सात क्विंटल उत्पादन मिळते. कंपनी विकल्या जाणाऱ्या एरंडीला क्विंटलला ८५०० रुपये तर यंदा नऊ हजार रुपये दर मिळाले. बाजार समितीत एरंडी विकल्यास चार हजार ते पाच हजार रुपये दर मिळतो. या पीक पद्धतीतून एकरी किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. शिवाय उत्पादन खर्च खूप काही नसतो.  

गावातही पीक पद्धतीचा प्रसार 

 • कंपनीकडून खरेदीची हमी असल्यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांकडून या पद्धतीचा अंगीकार.
 • सन २०१७ मध्ये गावात १७५ एकरांवर तर २०२० मध्ये १७० एकरांवर एरंड लागवड.  
 • यंदा १२५ एकरांवर शेतकऱ्यांकडून नोंदणी.
 • जालना येथील कंपनीकडून बियाण्याचा पुरवठा. त्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी नोंदणी करावी लागते. 
 • एका पिशवीत दोन किलो मादी, तर ८०० ग्रॅम नर बियाणे असते. 
 • गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याचा अनुभव पाहून जिंतूर, शेजारील हिंगोली जिल्ह्यातील काही गावे एरंडी लागवडीकडे वळले आहेत.

व्यवस्थापनातील बाबी 

 • जमिनीच्या प्रकारानुसार हलक्या जमिनीत सोयाबीनच्या दोन ओळीतील अंतर चार फूट तर भारी जमिनीत पाच फूट.  
 • एरंडीच्या मादी बियाण्याच्या चार ओळीनंतर नर बियाण्याची एक ओळ.  
 • लागवडीसोबत एकरी २५ किलो १०-२६-२६ खताची मात्रा.  
 • सोयाबीन काढणीनंतर १०-२६-२६ , पोटॅश, सुपर फॉस्फेट या खतांच्या प्रत्येकी ५० किलो प्रति एकरी याप्रमाणे दहा दिवसाच्या अंतराने दोन मात्रा.  
 • ठिबक, तुषार सिंचन पद्धतीने पाणी. एरंडीचे पीक मार्च- एप्रिलपर्यंत चालते. जमिनीच्या प्रकारानुसार त्या कालावधीपर्यंत पाच ते सहा पाणीपाळ्या.   
 • ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये फुलोरा अवस्थेपूर्वी दर पंधरा दिवसांनी एरंडीच्या झाडाचे शेंडे खुडावे लागतात. त्यामुळे फळफांद्याची संख्या वाढते. शेंडे खुडतानाच अन्य वाणांची भेसळ आढळलेली झाडे काढून टाकली जातात.
 • वातावरणातील धुक्याचा उत्पादनावर परिणाम होतो. त्यावेळची फुले तोडून टाकल्यास नुकसानीची पातळी कमी होते.
 • सलग सोयाबीन पद्धतीपेक्षा ही पध्दत आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असल्याचे शेतकरी सांगतात. या पद्धतीत सोयाबीनच्या दोन ओळीतील अंतर प्रचलित पद्धतीपेक्षा जास्त असते. त्यामुळे बियाण्याचे प्रमाण कमी लागते. झाडे विस्तारतात. अधिक शेंगा लागतात. 

काढणी हंगाम 
काढणी हंगाम नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत चालतो. टप्प्याटप्प्याने परिपक्व घडांची काढणी होते. घड वाळवून साठवणूक तर एप्रिलमध्ये यंत्राद्वारे मळणी होते. सुरेश घुगे हे गावातील शेतकऱ्यांकडील एरंडीची काढणी ते विक्री तसेच ‘पेमेंट’चे काम करतात. व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती दिली जाते. एरंड साठवणीसाठी कंपनीकडून बारदानांचा पुरवठा होतो. 

विक्रीची व्यवस्था...
बियाणे कंपनीकडून मादी एरंडीची खरेदी होते. नर एरंडीची खरेदी गावातील व्यापारी करतात. सन २०१२ मध्ये मादी एरंडीस प्रति क्विंटल साडेसहा हजार रुपये तर नर एरंडीस तीन हजार रुपये दर मिळाले होते. २०२०-२१ मध्ये हेच दर अनुक्रमे साडेनऊ हजार व पाच हजार रुपये होते. ‘आरटीईजीएस’द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा होते. 

कृषी विभागातर्फे मार्गदर्शन...
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, तालुका कृषी अधिकारी एस. पी. काळे, तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी वेळोवेळी अंबरवाडीला भेटी दिल्या आहेत. कृषी सहायक गजानन राठोड पोकरा अंतर्गत शेतींशाळेद्वारे विविध पीकपधद्धतींची माहिती देतात. त्यामुळे गावात प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. शेततळे उभारणीतून संरक्षित पाण्याची व्यवस्था झाली आहे. सीताफळ, पेरू आंबा आदी फळपिकांचे क्षेत्र वाढले आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची लावण होते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होत आहे.

आमची १५ एकर जमीन आहे. दरवर्षी एक ते दीड एकरांत सोयाबीन- एरंडीची लागवड करतो. खर्च व उत्पन्नाची तुलना केली असता जास्त फायदा असल्याचे जाणवले आहे. 
- संभाजी घुगे,  अंबरवाडी 

- सुरेश घुगे  ९०११०१०३१० 
गजानन राठोड  ९४०४५९२१६१ 
(कृषी सहायक)


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...