सोयाबीन उत्पादकता वाढविण्यासाठी सूत्रे

सोयाबीनची पेरणी खरीप हंगामात पावसाला सुरुवात झाल्यानंतर १५ जून ते १५ जुलैपर्यंत व ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.
सोयाबीन लागवडीमध्ये रुंद वरंबा सरी पद्धती फायदेशीर ठरते.
सोयाबीन लागवडीमध्ये रुंद वरंबा सरी पद्धती फायदेशीर ठरते.

सोयाबीनची पेरणी खरीप हंगामात पावसाला सुरुवात झाल्यानंतर १५ जून ते १५ जुलैपर्यंत व ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. जमिनीची २ ते ३ वर्षांत किमान एकदा उन्हाळ्यामध्ये एक खोल (३० ते ४५ सें.मी.) नांगरणी करून नांगरणीच्या विरुद्ध दिशेने वखराच्या २-३ पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० गाड्या (५ टन) शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे.  शेणखतामुळे जमीन चांगली भुसभुशीत राहते. पिकाच्या मुळ्या खोलवर जाऊन पिकाची जोमदार वाढ होण्यास मदत होते. बीजप्रक्रिया 

  •   सोयाबीनवर येणाऱ्या विविध रोगांसाठी रोग आल्यानंतर बुरशीनाशकांची फवारणी घेण्यापेक्षा पेरणीपूर्वीच बीजप्रक्रिया केल्यास सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रोगांचे व्यवस्थापन उत्तम होते. 
  •   पेरणीपूर्वी कार्बोक्झीन (३७.५%) अधिक थायरम (३७.५%) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम प्रति किलो बीजप्रक्रिया केल्यास कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील अन्य रोगांपासून संरक्षण होते.
  •   या प्रक्रियेनंतर ब्रेडी रायझोबिअम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत (पीएसबी) २५ ग्रॅम प्रत्येकी प्रति किलो बियाणे अशी प्रक्रिया करावी. किंवा बीजप्रक्रियेसाठी वनामकृवि, परभणी निर्मित द्रवरूप जैविक खत रायझोफॉस १० मि.लि. प्रति किलो बियाणे याप्रमाणे वापर करावा.
  • बियाणे प्रक्रियेनंतर सावलीमध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी. 
  • ब्रेडी रायझोबियम या जिवाणू संवर्धनाची पेरणीच्यावेळी बीजप्रक्रिया केल्यास सहजीवी जिवाणूंच्या गाठींची संख्या वाढते. हे जिवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीमध्ये नत्राचे स्थिरीकरण करतात. हे नत्र पिकास उपलब्ध होते. स्फुरद विरघळणारे जिवाणू ‘स्फुरद’ हे अन्नद्रव्य पिकास वाढीच्या काळात उपलब्ध करून देतात.
  • पेरणी  सोयाबीनची पेरणी खरीप हंगामात पावसाला सुरुवात झाल्यानंतर १५ जून ते १५ जुलै पर्यंत व ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. लागवडीचे अंतर व पद्धत

  • सोयाबीनची पेरणी ४५ × ५ सें.मी. अंतरावर व ३ ते ४ सें.मी. खोलीवर करावी. पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोल पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही.
  •   हंगामात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी सोयाबीनची पेरणी बीबीएफ यंत्राने करावी किंवा दर चार ते पाच ओळीनंतर चर काढावेत.
  • बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीचे फायदे

  • बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीमुळे पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते, त्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकांस लाभ होतो. विशेषत: पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो.
  • अधिक पावसाच्या स्थितीत बीबीएफ पद्धतीमधील रुंद वरंब्यासोबतच्या दोन्ही बाजूकडील सऱ्यांमुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. 
  • गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. परिणामी, बियाण्याची उगवण चांगली होते.  
  • बीबीएफ पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीच्या (सपाट वाफे पद्धत) तुलनेत सरासरी २० ते २५ टक्के पर्यंत अधिक जलसंधारण होते तर २० ते २५ टक्के पर्यंत उत्पादनात वाढ शक्य होऊ शकते.
  • बियाण्याचे प्रमाण     पेरणीसाठी हेक्टरी ६५ किलो बियाणे वापरावे. हेक्टरी झाडांची संख्या ४.४ ते ४.५ लाख ठेवावी. बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असावी. आंतरमशागत  

  • सोयाबीन पिकामध्ये येणाऱ्या तणांचे योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्के पर्यंत घट येवू शकते. त्यामुळे पीक १५ ते २० दिवसांचे असताना पहिली कोळपणी व पीक २५ ते ३० दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. एक खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे. 
  • एकदा सोयाबीनला फुले लागली की कोळपणी करू नये, अन्यथा सोयाबीनच्या मुळ्या तुटून नुकसान होते. 
  • पावसामुळे किंवा मजुरांच्या कमतरतेमुळे निंदणी/कोळपणी करणे शक्य नसल्यास तण नाशकाचा वापर करावा. यामध्ये पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी पेंडीमिथॅलीन (३०% ईसी) २.५ ते ३.३ लिटर प्रति हेक्टर) किंवा मेटाक्लोर (५०% ईसी) किंवा क्लोमाझोन (५० % ईसी) २ लिटर/हे.) प्रति ६०० ते ७०० लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी फवारावे. 
  •  पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी व तणे २ ते ४ पानांच्या अवस्थेत असताना क्लोरीम्युरॉन इथाईल (२५% डब्ल्यूपी) ३६ ग्रॅम प्रति हेक्टर किंवा इमॅझेथापायर (१०% एसएल) किंवा क्विझालोफॉप इथाईल (५% ईसी) १ लिटर प्रति हेक्टर यांचे ६००-७०० लिटर पाण्यामध्ये मिसळून हेक्टरी फवारणी करावी. 
  • तणनाशकाची फवारणी फ्लॅट पॅन किंवा फ्लड जेट नोझल लावून ओलावा असलेल्या जमिनीवरच केली पाहिजे. तणे वाढल्यानंतर तणनाशके फवारल्यास त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही.
  • आंतरपीक/ दुबार पीक पद्धती  

  • सोयाबीन पिकासोबत आंतरपीक म्हणून इतर पिके घेतल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच, परंतु त्याचबरोबर एखादे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे गेल्यास आंतरपिकापासून खात्रीशीर उत्पादनाची हमी राहते. 
  • संशोधनाद्वारे काही उपयुक्त व फायदेशीर सोयाबीन आंतरपीक पद्धती आढळून आल्या आहेत. उदा. कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन + तूर (२:१ किंवा ४:२) ही तर ओलिताखाली सोयाबीन + कापूस (१:१ किंवा २:१) ही आंतरपीक पद्धती फायदेशीर आढळून आली आहे. 
  • सोयाबीन आधारित दुबार पीक पद्धतीत रब्बी ज्वारी, हरभरा, करडई ही पीक पद्धती ओलिताखाली फायदेशीर आढळून आली आहे.
  • खते  

  • हेक्टरी २० गाड्या (५ टन) शेणखत किंवा कंपोस्ट खत. 
  • हेक्टरी ३० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ३० किलो पालाश, २० किलो गंधक पेरणी वेळी द्यावे. पेरणी करतेवेळी खते ही बियाण्याच्या खालीच पडतील व त्यांचा बियाण्याशी सरळ संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हेक्टरी २५ किलो झिंक सल्फेट आणि १० कि.ग्रॅ. बोरॅक्स द्यावे. 
  • या पिकास नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम, गंधक, कॅल्शिअम, मॉलिब्डेनम, बोरॉन, लोह, जस्त व मॅंगेनीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी, फुलधारणेसाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात. 
  • खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्यास पोटॅशिअम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे ३५ व्या (१ टक्का- म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी) आणि ५५ व्या दिवशी (२ टक्के म्हणजे २० ग्रॅम प्रति लिटर पाणी) देण्याची शिफारस केलेली आहे. 
  • पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. 
  • माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी. 
  • सोयाबीनला रासायनिक खते देण्यासाठी विविध पर्याय (कोणताही एक वापरावा.) (खते प्रति हेक्टरी)    

  • युरिया (४० किलो) + मिश्र खते १०:२६:२६ (११५ किलो) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ किलो)    किंवा
  • युरिया (१६.३० किलो) + मिश्र खते १२:३२:१६ (१८७.५ किलो) + गंधक (२० किलो)       किंवा
  • युरिया (६५ कि.ग्रॅ)+ सिंगल सुपर फॉस्फेट (३७५ किलो) + म्युरेट ऑफ पोटॅश (५० किलो)       किंवा
  • युरिया (१४.३४ किलो) + डाय अमोनिअम फॉस्फेट (१३०.४ किलो) + म्युरेट ऑफ पोटॅश (५० किलो) + गंधक (२० किलो) किंवा       
  • मिश्र खते १५:१५:१५ (२०० किलो) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ किलो)       किंवा
  • मिश्र खते १८:१८:१० (१६६ किलो) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ किलो) + म्युरेट ऑफ पोटॅश (२२.३३ किलो) .     
  • - ०२४५२ २४८९२९ डॉ. एस. पी. म्हेत्रे,   ०९४२१४६२२८२ (अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com