सोयाबीन उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान

तापमान आणि पाण्याची उपलब्धता, मुळांचा विकास, मातीमधील हवा-पाणी यांचे प्रमाण मुळांवरील गाठीचे प्रमाण या बाबी सोयाबीन उत्पादनात महत्त्वाच्या ठरतात.
If soybean crop is planted by BBF machine, the yield is increased.
If soybean crop is planted by BBF machine, the yield is increased.

सोयाबीन पिकाच्या अधिक उत्पादन व गुणवत्ता वाढीसाठी योग्य लागवड तंत्राचा अवलंब करणे गरजेचे आहे.  तापमान आणि पाण्याची उपलब्धता, मुळांचा विकास, मातीमधील हवा-पाणी यांचे प्रमाण मुळांवरील गाठीचे प्रमाण या बाबी सोयाबीन उत्पादनात महत्त्वाच्या ठरतात. मागील काही वर्षांमध्ये सतत एकाच सोयाबीन वाणाची लागवड केल्यामुळे कीड-रोगांचे प्रमाण वाढून उत्पादनात घट दिसून आली. यामुळे बियाणांमध्ये बदल करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार लागवडीसाठी शिफारशीत जातींचा अवलंब करणे गरजेचे आहे. बियाणांची उगवण आणि अधिक उत्पादनाकरिता लागवड पद्धतीची भूमिका महत्त्वाची असते. मध्यम ते भारी जमिनीमध्ये सोयाबीनची बेड लागवड अधिक योग्य मानली जाते. संशोधनानुसार सोयाबीन लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास उत्पादनात वाढ दिसून आली. सोयाबीन पिकाची वैशिष्ट्ये 

  • कमी खर्चात आणि कमी दिवसांत येणारे पीक (९० ते १०० दिवस).
  • जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यास फायदेशीर.
  • सोयाबीन पिकानंतर घेतल्या जाणाऱ्या बेवड पिकाचे उत्पादन चांगले येते.
  • खाद्य तेल म्हणून सोयाबीन तेल वापरले जाते.
  • उत्पादकता कमी असण्याची कारणे 

  • नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अत्यंत कमी वापर.
  • एकाच जातीखालील असलेले क्षेत्र.
  • पावसावर अवलंबित सोयाबीनची शेती (पेरणीनंतर ३०-४० दिवसांनी पावसाचा ताण).
  • मूलस्थानी जल संधारणाचा अभाव.
  • कोरडवाहू हलक्या ते मध्यम जमिनीची निवड.
  • अन्नद्रव्यांचा मर्यादित वापर (गंधक, जस्त/झिंक कमतरता).
  • कीड रोगांचा वाढता प्रादुर्भाव.
  • लागवड वाण  जेएस ९३०५, जेएस ९५६०, एम.ए.यू.एस-१५८, एम.ए.यू.एस. १६२, एम.ए.यू.एस ७१ (समृद्धी), एम.ए.यू.एस ८१ (शक्ती), ए.एम.एस १००१ (यलो गोल्ड), ए.एम.एस.एम.बी (सुवर्ण सोया), के.डी.एस (फुले संगम), के.डी.एस ७५३, के.एस १०३. बीजप्रक्रिया थायरम ३ ग्रॅम व रायझोबियम १५ ग्रॅम अधिक पीएसबी १५ ग्रॅम अधिक ट्रायकोडर्मा १० ग्रॅम प्रति किलो बियाणे. 

  • लागवडीसाठी एकरी २६ किलो बियाणे वापरावे.
  • घरचे बियाणे असेल तर बियाणांची उगवणक्षमता तपासून पेरणी करावी. उगवणक्षमता ७० टक्केच्या पुढे असणारे बियाणे पेरणीसाठी वापरावे.
  • पेरणीसाठी बीबीएफ पद्धतीचा अवलंब करावा. दोन ओळींत ४५ सेंमी व दोन रोपांत ५ सेंमी अंतर ठेवावे. तसेच ४ ओळींनंतर पट्टा सोडावा.
  • पेरणीनंतर ३०-४० दिवसांनी काही वेळा पावसाचा ताण पाहावयास मिळतो. हा ताण सहन करण्यासाठी बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते. 
  • ताण सहनशीलता वाढवण्यासाठी १३:०:४५ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 
  • बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीचे फायदे 

  • बियाणे दर आणि झाडांची संख्या योग्य प्रकारे राखली जाते. 
  • कार्यक्षम मुळांची वाढ आणि विकास होण्यास मदत मिळते.
  • अन्नद्रव्य स्थिरीकरण करणाऱ्या मुळांवरील गाठींमध्ये वाढ होते. 
  • अन्नद्रव्यांच्या उपलब्धता होण्यास मदत होते.
  • जमिनीत ओलावा टिकून राहतो.
  • पाण्याचा किंवा पावसाचा ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ.
  • जास्तीचा पावसामुळे शेतात जमा झालेले पाणी शेताबाहेर काढणे सोपे होते.
  • हवा पाणी यांचे संतुलन राखल्याने जमिनीमधून उद्भवणाऱ्या रोगाचे प्रमाण कमी होते. 
  • मातीची धूप व ऱ्हास कमी होतो.
  • सोयाबीन पिकात अन्नद्रव्यांचे महत्त्व   सोयाबीन पिकासाठी २० ते २५ किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ३० ते ४० किलो पोटॅश, ३० किलो गंधक तसेच ५ किलो झिंक प्रति हेक्टर याप्रमाणे शिफारस करण्यात आली आहे. नत्र 

  • पिकास गडद हिरवा रंग मिळवून देण्यास उपयोगी.
  • पाने, फांद्या व कायिक वाढीसाठी आवश्‍यक.
  • पोटॅशिअम आणि स्फुरदाची उपलब्धता करण्यास.
  • सोयाबीनच्या मुळांवरील गाठींद्वारे हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध करते.
  • नत्राची उपलब्धता वाढविण्यासाठी रायझोबियम बीजप्रक्रिया आवश्यक.
  • स्फुरद 

  •   मुळांची जडणघडण व वाढीसाठी महत्त्वाचा घटक.
  •   फुलांची संख्या व फळ धारणेसाठी आवश्यक.
  •   पेशींच्या जडणघडणीमध्ये आवश्यक.
  •   चयापचय आणि श्‍वसन प्रक्रियेमध्ये समावेश.
  •   स्फुरदाची उपलब्धता वाढवण्यासाठी पीएसबीची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • पोटॅश 

  • वाढ जोमाने होऊन पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोटॅश आवश्यक आहे.
  • श्‍वासोच्छ्वास आणि पर्ण बाष्पीभवन याद्वारे वनस्पतींमधील पाण्याचे नियमन, पिष्टमय पदार्थ आणि शर्करा निर्मितीसाठी उपयुक्त.
  • पोटॅशिअममुळे संप्रेरकांच्या क्रियेमध्ये वाढ होते.
  • शेंगांचा आकार, वजन आणि साठवणक्षमता वाढते.
  • गंधक 

  •   पानांमधील हरितद्रव्य निर्मिती आणि कायिक वाढीसाठी आवश्यक.
  •   मुळांची निर्मिती आणि वाढीस मदत करते.
  •   फूल व फळधारणेत महत्त्वाचा सहभाग.
  •   दाण्यांचे वजन आणि तेलाचा प्रमाण वाढवण्यास आवश्‍यक.
  •   साठवण कालावधी तसेच बुरशीजन्य रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आवश्यक.
  • मॅग्नेशिअम 

  •   प्रकाश संश्‍लेषण आणि हरितद्रव्य निर्मितीसाठी. 
  •   स्फुरद वहनासाठी आवश्यक.
  •   मूलद्रव्यांची उपलब्धतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूळ घटक असल्यामुळे सोयाबीन वाढीस अत्यावश्यक
  • कॅल्शिअम

  •   पेशीभित्तिकेचा महत्त्वाचा घटक.
  •   पेशीविभाजनासाठी आवश्यक.
  •   मुळांच्या टोकांची वाढ व शेंगा तयार करण्यासाठी आवश्यक.
  • झिंक  वनस्पतींच्या शरीरातील पाण्याचे नियमन, पीक पोषण संजीवके तयार करण्यासाठी आवश्यक. फवारणीद्वारे खतांचा अवलंब 

  • अन्नद्रव्यांची उपलब्धता मुळांद्वारे होत नसल्यास. 
  • जमिनीमधील कमी किंवा जास्तीच्या ओलाव्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत असल्यास. 
  • अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे पानांवर दिसून आल्यास.  
  • मुख्य वाढीच्या संवेदनशील अवस्थेत अन्नद्रव्यांची अनुपलब्धता 
  • कीड व रोगांचे प्रमाण वाढले असल्यास 
  • खतांचा वापर  (फवारणी : प्रति लिटर पाणी) 

  • कायिक वाढीच्या अवस्थेत :  १९:१९:१९ किंवा ११:३६:२४ अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये) ५ ते ७ ग्रॅम.
  •  शेंगा भरण्याच्या अवस्थेत :   ०:५२:३४ ५ ते ७ ग्रॅम.
  • - संजय बिरादार,  ८८८८८८२५९१ (लेखक आयसीएल  कंपनीमध्ये ‘सिनिअर ॲग्रोनॉमिस्ट’ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com