शास्त्रोक्त पद्धतीने हळद बियाण्याची साठवणूक

निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रिया, बियाणे साठवणूक करण्यापर्यंत हळद पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. कच्च्या मालाची योग्य पद्धतीने प्रतवारी करून त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी.
Halkunde and Bagalgadda
Halkunde and Bagalgadda

निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रिया, बियाणे साठवणूक करण्यापर्यंत हळद पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. कच्च्या मालाची योग्य पद्धतीने प्रतवारी करून त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. हळद हे भारतातील महत्त्वाचे तसेच बहुउपयोगी मसाला पीक म्हणून प्रचलित आहे. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता हळद पिकासाठी उत्तम आहे. सध्या हळद काढणीचा हंगाम सुरू आहे. खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत. कंद तापल्यामुळे कंदांना पाणी सुटते. परिणामी, कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते. त्यानंतर २ दिवसांनी हळदीच्या कंदाची मोडणी करावी. हळद कंदाचा गड्डा हळूच आपटला असता गड्ड्याला चिकटलेली माती वेगळी होण्यास मदत होते. कच्च्या मालाची प्रतवारी करताना जेठागड्डे (मातृगड्डे), बगल गड्डे, सोरागड्डे, हळकुंडे आणि रोग-कीडग्रस्त हळकुंडे अशी करावी. त्यानुसार त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. बेणे निवड करताना रोग व कीडग्रस्त अथवा अर्धवट कुजलेले गड्डे साठवणीमध्ये येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. यापैकी जेठागड्डे, बगलगड्डे आणि हळकुंडे हे लागवडीसाठी बियाणे म्हणून वापरावेत. बेणे निवड  बियाणे निवडताना शास्त्रीयदृष्ट्या काळजी घेणे फार गरजेचे असते. निवडलेले बियाणे जातीवंत, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, सुप्तावस्था संपलेले, निरोगी, रसरशीत व चांगले असेल तर उत्पादन देखील चांगले मिळते. जेठागड्डा 

  • मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठागड्डा किंवा मातृकंद असे म्हणतात. 
  • प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी बियाणे (बेणे) हे मातृकंदाचेच ठेवावेत. हळदकंदापासून मातृकंद वेगळे करावेत. 
  • सशक्त, निरोगी, जाड मातृकंद (गड्डे) बियाणे म्हणून निवडून काढावेत. 
  • बियाणासाठी निवडलेल्या मातृकंदाचे वजन ५० ग्रॅम पेक्षा जास्त आणि आकाराने त्रिकोणाकृती असावे. काढणीनंतर हे गड्डे ताबडतोब सावलीमध्ये ठेवावेत. 
  • बगल गड्डे 

  • जेठे गड्ड्याला आलेल्या फुटव्यांच्या खाली येणाऱ्या गड्ड्यांना ‘बगल गड्डे’ (अंगठा गड्डे) असे म्हणतात. 
  • साधारणपणे ४० ग्रॅम पेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बियाणे म्हणून करतात.
  • हळकुंडे 

  • बगल गड्ड्यांना आलेल्या कंदास ‘हळकुंडे’ असे म्हणतात. 
  • हळकुंडे देखील बियाणासाठी वापरली जातात. मातृकंद कमी पडत असतील तर हळकुंडे बियाणे म्हणून वापरावे. 
  • बियाणासाठी निवडलेल्या हळकुंडाचे वजन ३० ग्रॅम पेक्षा जास्त असावे. निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराची, भेसळमुक्त असावीत.
  • सोरागड्डा 

  • लागवडीच्या वेळी वापरलेले जेठागड्डे (मातृकंद) हळद पिकाच्या ९ महिने वाढीच्या कालावधीत ५० ते ६० टक्के कुजून जातात. राहिलेल्या ४० ते ५० टक्के कंदांना सोरागड्डे असे म्हणतात. 
  • सोरागड्डे हे दिसायला काळपट रंगाचे आणि मुळ्या विरहित असतात. 
  • सोरागड्डे बियाणे म्हणून वापरता येत नाहीत.
  • बेण्याची साठवणूक 

  • निवडलेले हळद बेणे त्वरित झाडाखाली सावली असलेल्या थंड ठिकाणी ढीग करून साठवावेत. 
  • बेण्याचा ढीग करताना हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. अन्यथा बेण्याच्या उगवणीवर परिणाम होऊ शकतो. 
  • बेण्याचा ढीग करताना थोडासा उंचवटा करून कोन पद्धतीने ढीग करून रचावेत. बेण्याच्या ढीगावर हळदीच्या वाळलेल्या पानांचा १० ते १५ सेंमी जाडीचा थर द्यावा. 
  • जास्त तापमान असलेल्या ठिकाणी हळदीच्या वाळलेल्या पाल्यावर गोणपाट टाकावे. केवळ गोणपाट भिजेल एवढेच पाणी गोणपाटावर मारावे. 
  • साधारणतः २ ते अडीच महिन्यांच्या कालावधीपर्यंत बेणे सुप्तावस्थेत जाते. या कालावधीत केवळ बेण्याच्या अंतर्गत बदल किंवा शरीरक्रिया घडून येत असतात. कोणत्याही स्वरूपात बाह्य बदल दिसून येत नाहीत. 
  • सुप्तावस्था संपेपर्यंत बेण्यावर पाणी शिंपडू नये. 
  • दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीत सर्व बेण्यांची सुप्तावस्था पूर्ण होते. 
  • सुप्तावस्था संपल्यानंतर बेण्यामध्ये बदल दिसायला सुरवात होते. यावेळी बेण्यावरील डोळे फुगीर होतात. डोळे फुटण्यास प्रारंभ होतो. 
  •  सुप्तावस्था संपल्यानंतर बेणे परत निवडावे. बेण्यावरील मुळ्या, पानांचे शिल्लक राहिलेले अवशेष काढावेत. आणि मुळ्याविरहीत रसरशीत निरोगी बेणे लागवडीसाठी वापरावेत. 
  • निवडलेल्या बेण्यात कंदकुज रोगाचे किंवा कंदमाशीचे कोणतेही अवशेष राहणार नाहीत, याची पूर्णतः खात्री करावी. जेणेकरून रोगाचा वा किडीचा प्रादुर्भाव शेतात होणार नाही. 
  • लागवड करण्यास थो़डाफार अवधी असेल तर दिवसातून २ वेळेस बेण्याच्या ढीगावर पाणी शिंपडावे. पाणी शिंपडल्यामुळे बेण्यांची एकसारखी उगवण होण्यास मदत होते. 
  • उष्ण सूर्यप्रकाश, वारा यांचा बेण्याशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. बेणे दर्जेदार असेल तर उत्पादन वाढीस निश्‍चितच हातभार लागतो.
  • - डॉ. मनोज माळी,  ९४०३७ ७३६१४ (प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना,  कसबे डिग्रज जि. सांगली)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com