agricultural news in marathi Strategies and Objectives of cow production | Agrowon

गोपैदाशीचे धोरण अन् उद्दिष्टे...

डॉ सचिन रहाणे, डॉ.गोपाल गोवणे 
मंगळवार, 11 जानेवारी 2022

उच्च आनुवंशिकता आणि दुग्धोत्पादन क्षमता असलेली गाय आणि वळूच्या पोटीच उत्तम कालवड जन्माला येवू शकते. यासाठी गाईची व वळूची निवड अभ्यासपूर्वक केली पाहिजे. 
 

उच्च आनुवंशिकता आणि दुग्धोत्पादन क्षमता असलेली गाय आणि वळूच्या पोटीच उत्तम कालवड जन्माला येवू शकते. यासाठी गाईची व वळूची निवड अभ्यासपूर्वक केली पाहिजे. 

कालवड संगोपनाचा विचार आपण नेहमी कालवड जन्माला आल्यानंतर सुरू करतो. खरे तर कालवड जन्माला येतानाच ती सुदृढ, उच्च आनुवंशिकता आणि अधिक दुग्धोत्पादन देणारी असली पाहिजे. यासाठी पैदासीचे धोरण ठरवून त्यानुसार ठराविक कालमर्यादेत विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उत्तम गाई व वळू निवडून पुढील पिढी तयार करावी लागते.

धोरण  
आपल्या गोठ्यावर आता कोणत्या प्रकारच्या गाई आहेत आणि भविष्यात कोणते  गुण वैशिष्ट्ये असलेल्या गाई हव्या आहेत, याचा विचार करून गोपैदासीचे धोरण ठरवावे. यात सध्या गाईंचे असलेले गुणवैशिष्ट्ये नमूद करून भविष्यात मिळवायची गुणवैशिष्ट्ये यांचा योग्य समतोल साधणे आवश्यक असते. असे धोरण ठरवल्यास आपल्या गोठ्यावर प्रजनन कार्यक्रमाची दिशा निर्धारित करता 
येते. 

उद्दिष्टे 

 • गोपैदासीचे धोरण योग्य पद्धतीने राबविण्यासाठी उद्दिष्टांची मांडणी करावी लागते. गोपैदाशीची उद्दिष्ट्ये हे कोणते गुण, वैशिष्ट्ये किती फायदेशीर आहेत आणि कशी साध्य करता येईल हे स्पष्ट करते.  
 • गाय, म्हशीमध्ये सर्वच गुणवैशिष्ट्ये एकत्रच पुढील पिढीत निर्माण करणे शक्य नसते. त्यासाठी कालबद्ध प्रजनन कार्यक्रम राबवावा लागतो. 
 • आपल्या गोठ्यावर सुद्धा गोपैदास करत असताना तत्काळ साध्य करावयाची, मध्यम मुदतीत साध्य करायची आणि दीर्घ मुदतीत साध्य करायची उद्दिष्टे अशी वर्गवारी करून उद्दिष्टे ठरवली  पाहिजेत. 

तत्काळ साध्य करावयाची उद्दिष्ट्ये 

 • आपल्या सर्वांचे गोपालन हे प्रामुख्याने दूध उत्पादनावर अवलंबून आहे. सर्वात प्रथम उद्दिष्ट्य हे पुढील पिढीत जनावरांचे प्रती वेताचे दूध उत्पादन वाढवणे असले पाहिजे. परंतु हे दूध उत्पादन किती वाढवायचे हे त्या गोठ्यावरील नियोजनावर ठरवावे. 
 •  उत्तम प्रतीचा चारा, यांत्रिकीकरण आणि मनुष्यबळ उपलब्ध असेल तर अधिक दूध उत्पादन वाढीचा विचार करावा. 

मध्यम मुदतीत साध्य करायची उद्दिष्ट्ये 

 • अधिक दूध उत्पादन वाढीबरोबर गाईमध्ये काही समस्या जाणवू लागतात, त्यामुळे अधिक दूध उत्पादन साध्य केल्यावर मध्यम मुदतीमध्ये पुढील उद्दिष्टांवर काम करावे. 
 • दुधातील स्निग्धांश (फॅट), एसएनएफ आणि प्रथिने वाढली पाहिजे. दुधातील सोमॅटिक सेल काउंट कमी झाला पाहिजे. कासदाह आणि इतर आजार यांचे प्रमाण कमी झाले पाहिजे. गाईंची प्रजननक्षमता सुद्धा वाढली पाहिजे.
 • ही उद्दिष्टे तीन ते चार पिढ्यांमध्ये साध्य करता आली पाहिजेत.  त्याच बरोबर पैदास करत असताना उत्पादन वाढीबरोबरच त्या जनावराच्या जातीची गुणधर्म जास्तीत जास्त त्यात येतील याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले पाहिजेत.

दीर्घ मुदतीत साध्य करायची उद्दिष्टे 
दीर्घ मुदतीमध्ये म्हणजे पुढील सात ते आठ पिढ्यांमध्ये काही उद्दिष्टे आपण साध्य केली पाहिजे.  दूध उत्पादन टिकवून ठेवतानाच गाईचे आरोग्य सुधारत नेऊन, एक शुद्ध प्रजातीची गाय आपल्या गोठ्यात तयार झाली पाहिजे,  त्यासाठी पुढील प्रमाणे उद्दिष्टे ठरवावीत.

 • गाईची शारीरिक ठेवण शुद्ध प्रजातीच्या शारीरिक ठेवणीनुसार व्हावी. गाईचे शरीर मध्यम आकाराचे असावे, परंतु चाऱ्याचे दुधात परिवर्तन करण्याची क्षमता वाढली पाहिजे. 
 •  गाई प्रजनन सुलभ असले पाहिजे,  जेणेकरून जन्माला येताना  
 • वासरांची मरतूक कमी होईल. गाईचे आयुष्यमान अधिक असले पाहिजे, जेणेकरून तिच्यापासून जास्तीत जास्त वेत घेता येतील. 
 • वरील प्रमाणे उद्दिष्टे ठरवून घेऊन वेळोवेळी त्याचा आढावा घेऊन पैदास योग्य दिशेने होत आहे याची खात्री करावी. उच्च आनुवंशिकता आणि दुग्धोत्पादन क्षमता असलेल्या गाईच्या व वळूच्या पोटीच उत्तम कालवड जन्माला येवू शकते. यासाठी गाईची व वळूची निवड अभ्यासपूर्वक केली पाहिजे. 

पैदाशीसाठी गाईची निवड 

 • पैदाशीसाठी गाय निवडताना फक्त दुग्धोत्पादन न पाहता, जातीचे गुणधर्म, तिची शरीराची ठेवण, तिचे आरोग्य, प्रजनन क्षमता इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे. 
 • गाईचा रंग, शारीरिक वैशिष्ट्ये हे तिच्या जातीचेच असले पाहिजे. गाईची त्वचा चमकदार व तुकतुकीत असावी. मान पातळ असावी, पुढील दोन्ही पायात अंतर भरपूर असावे. पाय सरळ व मजबूत असावेत. 
 • कास आकाराने मोठी असावी. त्यावरील त्वचा मऊ असावी. रक्तवाहिन्यांचे जाळे भरपूर असावे. पुढील बाजूला कास शरीराबरोबर सरळ जोडलेली असावी. कास लोंबणारी नसावी, सडे एकसारखी असावीत.  त्याचबरोबर कमी आजारी पडणारी, कासदाह न होणारी, वेळेत माजावर येणारी, सहज गाभण राहणारी आणि शांत व सहज दूध काढू देणारी गाय निवडावी.
 • आपल्या गोठ्यावर चांगले गुणधर्म व उच्च उत्पादक गाई नसतील तर सध्या उपलब्ध असलेल्या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान, लिंग निर्धारित वीर्य मात्रा (सेक्स सोर्टेड सीमेन) इत्यादी तंत्रज्ञान वापरून प्रजनन कार्यक्रम राबवावा लागतो.

पैदाशीसाठी वळूची निवड  

 • सर्वोत्तम वळू तयार करणे हे अवघड, खर्चिक व खूप वेळ लागणारे काम आहे. त्यामुळे हा उपक्रम शासकीय, निमशासकीय संस्था व खासगी कंपन्या करू शकतात. परंतु त्यांच्याकडे असलेल्या कोणत्या वळूची निवड आपण करायची? हे पशुपालकांनी गोपैदासीचे धोरणानुसार  ठरवावे. 
 • आपल्या गोठ्यावरील आहे त्याच गाई पुढील पिढी तयार करण्यासाठी वापराव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक गाईला कोणता वळू वापरून कृत्रिम रेतन करायचे हे आपण ठरवले पाहिजे. 
 • वळूची निवड करताना गाय ज्या जातीची आहे त्याच जातीच्या वळूची निवड करावी. वळूच्या दुग्धोत्पादन क्षमतेबद्दलचे पैदास गुणांकन (ब्रीडिंग व्हॅल्यू)  ही गाई पेक्षा अधिक आहे हे निश्चित करावे. 
 • वळूतील दुग्धोत्पादन वाढवणारे जे गुण आहेत ते पुढील पिढीत पाठवण्याचे प्रमाण किती आहे याचा अभ्यास झालेला असला पाहिजे, यासाठी जनुकीय चाचणी केलेला (जेनोमिक) किंवा सिद्ध (प्रोजेनी टेस्टेड) वळूचा वापर करावा. 
 • वळू वापरताना वळूमातेचे, त्याच्यापासून जन्मलेल्या कालवडीचे दूध उत्पादन, शारीरिक ठेवण, कासेची ठेवण, कासदाहाचे प्रमाण इत्यादी बाबींची माहिती करून घ्यावी. सर्वोत्तम वळू आपल्या गोठ्यावर वापरावा. 
 • वळू निवडताना फक्त त्याचे दूध उत्पादनच बघू नये, त्याचे इतर आनुवंशिक गुण सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ, समजा गाईच्या सडांची लांबी कमी आहे आणि तिला कृत्रिम रेतनासाठी वापरत असलेल्या वळूची आनुवंशिकता सुद्धा सडांची लांबी कमी असलेली असेल तर जन्माला येणाऱ्या कालवडीचे सड खूपच छोटे होतील आणि भविष्यात दूध काढणे अवघड होऊन बसेल. जर गाईचे पाय खूप वाकडे असतील आणि वळूची आनुवंशिकता सरळ पायांची असेल तर होणाऱ्या कालवडीचे पाय सरळ होण्यास मदत होते. 
 • योग्य वळूची निवड केल्यास गाईमधील नको असलेले गुणधर्म कमी होऊन चांगले गुण कालवडीमध्ये आपोआप येतील. फायदेशीर दुग्धव्यवसायासाठी आवश्यक कालवडी गोठ्यात जन्माला येतील.

-डॉ सचिन रहाणे,  ९९७५१७५२०५
(डॉ.रहाणे हे डिंगोरे, ता.जुन्नर, जि.पुणे येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी आहेत. डॉ.गोवणे हे राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)


इतर कृषिपूरक
गाईचे गाभण काळातील व्यवस्थापनव्यायल्यानंतर वार अडकणे, कासदाह आणि गर्भाशय दाह...
कॉमन कार्प माशाचे प्रजनन तंत्रकॉमन कार्प माशाच्या बिजाची मागणी वाढत आहे. योग्य...
अंड्यात खरंच भेसळ असते का?अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच...
कुक्कुटपालनात रोगनियंत्रण महत्वाचे माणसांप्रमाणे जनावरांमध्ये तसेच पशु-पक्ष्यांनाही...
जनावरांची वार का अडकते?जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
शेळ्यांना द्या सुबाभुळचा चारा शेळ्यांच्या आहारात ४०% सुबाभळीचा वापर करावा....
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
खायला कोणती अंडी चांगली?तुम्ही अंडी खाल्लीत का ? कोणती खायची? गावरान अंडी...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
हिरव्या चाऱ्यासाठी नेपिअर लागवड तंत्रसंकरित नेपिअर या चारा पिकाच्या फुले जयवंत, यशवंत...
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन...आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....
बहुवार्षिक नेपियर गवत पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार...
गाय निगेटीव्ह एनर्जीमध्ये का जाते?आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन करत असताना...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
गायी-म्हशीमध्ये गर्भपाताची समस्यासंसर्गिक गर्भपात हा एक जीवाणूजन्य रोग असून त्याचा...