भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’

जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व प्रयोगशीलता हे गुण संजय ताटे (पोखरभोसी, जि..नांदेड) यांनी आत्मसात केले. त्याबळावर नियंत्रित शेती व संकरित भाजीपाला बीजोत्पादनात ते ‘मास्टर’ झाले आहेत.
Sanjay Tate taking producing hybrid tomatoes  quality seeds
Sanjay Tate taking producing hybrid tomatoes quality seeds

जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व प्रयोगशीलता हे गुण संजय ताटे (पोखरभोसी, जि..नांदेड) यांनी आत्मसात केले. त्याबळावर नियंत्रित शेती व संकरित भाजीपाला बीजोत्पादनात ते ‘मास्टर’ झाले आहेत. शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचे कसबही त्यांनी मिळवले आहे.  बेभरवशाचा मॉन्सून, अस्थिर हवामान यामुळे पारंपरिक शेतीचे गणित दरवर्षी बिघडत चालले आहे. मात्र विविध प्रयोगांच्या आधारे नियंत्रित शेती व बीजोत्पादन यातून प्रतिकूलतेला उत्तर शोधण्याचे काम संजय ताटे (पोखरभोसी, ता. लोहा, जि. नांदेड) यांनी केले आहे. संजयराव यांचे चार भावांचे एकूण १८९ सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. ते सर्वांत धाकटे आहेत. त्यांची २२ एकर जमीन आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, हळद, हरभरा, मका अशी हंगामी पिके आहेत. संकरित भाजीपाला बीजोत्पादन हा त्यांच्या परिवाराचा प्रमुख व्यवसाय आहे. बहुतांश सर्व सदस्य शेतीत राबतात.  जिद्दीचा प्रवास   सन २००७ मध्ये समस्याग्रस्त शेतीला वैतागून ताटे देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) येथे आले. तेथे संकरित भाजीपाला बीजोत्पादनाची माहिती मिळाली. बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आदी ठिकाणी भेटी देऊन १५ दिवसांचे बीजोत्पादन प्रशिक्षण घेतले. खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून २००९ मध्ये मिरचीचा पहिला प्लॉट घेतला. ज्ञान, तळमळ, जिद्द, हिंमत, मेहनत व सातत्य या गुणांच्या आधारे व ११ वर्षांच्या अनुभवाद्वारे आज संकरित भाजीपाला बीजोत्पादनात ताटे यांनी प्रावीण्य प्राप्त केले आहे. असे आहे बीजोत्पादन

  • सुमारे तीन एकर त्यासाठी क्षेत्र. एक एकरावर शेडनेट. त्यात मिरची व टोमॅटो.  
  • खुल्या शेतात प्रत्येकी १० गुंठ्यात कारले, भेंडी, दुधीभोपळा, दोडका, वांगी. अर्ध्या एकरात कपाशी बीजोत्पादन. 
  • परागीकरण कला जुलै-ऑगस्टमध्ये मिरची, टोमॅटोतील परागीभवनासाठी हंगामात ३० ते ४० कुशल मजुरांची दररोज गरज भासते.  ताटे त्यात पारंगत झालेच पण स्थानिक महिला व मजुरांना हे तंत्र शिकवले. आज बीजोत्पादनातील सर्व कामे करण्यात मजूर पारंगत झाले आहेत. त्यांना वर्षभर मजुरी उपलब्ध झाली आहे. वर्षभरात दोन- तीन लाख रुपये त्यावरच खर्च होतात.  बीजोत्पादनातील महत्त्वाच्या बाबी 

  • ताटे म्हणतात, ‘बीजोत्पादनातून हमी पैसे मिळतात. पारंपरिक पिकांत मशागत, मजुरी खर्च वाढून नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे.’ 
  • तीन आघाडीच्या कंपन्यांसाठी बीजोत्पादन.
  • उत्पादन खर्च- किमान ६० ते ७० हजार रु.
  • उत्पादित टोमॅटो, मिरची, झुकिनी या बियाण्याची कंपनीच्या माध्यमातून अन्य देशांत निर्यात होते.
  • झुकिनीत तर थंडीच्या हंगामात रात्री एकपासून ते पहाटे चार वाजेपर्यंत कुटुंबातील चार सदस्य सलग आठ दिवस परागीकरण करण्याचे कष्ट उचलतात.   
  • खर्च कमी करण्यावर भर
  • यांत्रिकीकरण, मल्चिंग, ठिबक, नवे तंत्र वापर यातून आंतरमशागत, सिंचन आदींवरील तर शेणखताच्या वापरातून रासायनिक खतांवरील खर्च कमी केला.
  • जमिनीला सेंद्रिय खतांचा पुरवठा व्हावा यासाठी बैलजोडी, गाई-म्हशींचे पालन.
  • बीजोत्पादनासाठी आवश्यक यंत्रे उदा. बिया वेगळे करणारे यंत्र, ड्रायर, बियाणे धुण्यासाठी एचटीपी मोटर टप्प्याटप्प्याने घेतली. 
  • पूर्वी बाभळीच्या काट्यांचा वापर कळी फोडण्यासाठी व्हायचा. आता सुधारित चिमटे वापरून ‘क्रॉसिंग’ केले जाते. त्यातून मजुरांची बचत केली. 
  • कीड नियंत्रणासाठी कडुनिंब व अन्य वनस्पतिजन्य अर्काची फवारणी
  • बीजोत्पादनासाठी पीकनिहाय आवश्यक यंत्रांचा संच.   आवश्यक यंत्रांची उपलब्धता ताटे अन्य शेतकऱ्यांनाही करून देतात.  
  • शेतीतील खर्चाच्या नोंदी नियमित ठेवतात. त्यामुळे ताळेबंद कळून कामाचे प्रभावी नियोजन करता येते. 
  • बीजोत्पादन- (प्रति १० गुंठ्यांत)   दर (रु.) प्रति किलो 
    मिरची : १०० किलो  १५ हजार ते ३० हजार (वाणनिहाय) 
    वांगे : ८५ किलो  ८५ हजार  
    भेंडी : दीड ते दोन क्विंटल    ४० हजार   
    टोमॅटो १० ते २५ किलो    १० हजार ते २० हजार

              मानसन्मानाचे दिवस आले अंगणी नवे विचार व कृती यातून प्रगतिशील होऊन ताटे यांच्या कुटुंबात आर्थिक सुबत्ता आली आहे. त्यांच्या शेतीला लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांनी भेट देऊन सपत्नीक सत्कार केला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (नांदेड) रविशंकर चलवदे यांचे मार्गदर्शन लाभते. शेतकरी, विविध कंपन्यांचे अधिकारी, तज्ज्ञ, नेते शेताला भेटी देतात. यश दारी आले असले तरी नवे ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा कायम आहे. जे जे चांगले त्याचा स्वीकार ताटे नम्रपणे करतात. कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्राशी त्यांचा नियमित संपर्क असतो.  कुशल संघटक 

  •  ताटे आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत पोहोचले आहेत. 
  •  त्यांच्या प्रेरणेतून गावात १२ ते १४ शेतकऱ्यांनी उभारले शेडनेट. कंपन्यांसाठी बीजोत्पादन.
  • ताटे यांना तीस गुंठे शेडनेटसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत साडेसात लाख रुपये अनुदान.
  • सुमारे २५ जणांचा ताटे यांनी गट तयार केला. शेडनेट असलेले १०० पेक्षा अधिक तर खुल्या प्लॉटमध्ये उत्पादन करणारे एक हजारांपेक्षा जास्त शेतकरी त्यांच्याशी जोडले आहेत.
  • - संजय बापूराव ताटे  ९७६३६३९३२१ सोहेल सय्यद  ९७६६८३४४०५ (लेखक लोहा, जि. नांदेड  येथे तालुका कृषी अधिकारी  कार्यालयांतर्गत सहायक तंत्रज्ञान  व्यवस्थापक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com