agricultural news in marathi success story of adinath kinikar from kolhapur district | Agrowon

मर्यादित क्षेत्रात बहुविध पिकांचे उत्कृष्ट नियोजन

राजकुमार चौगुले
शनिवार, 24 एप्रिल 2021

अल्पक्षेत्र असले तरी जागेचा व हंगामाचा योग्य वापर केल्यास शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करता येते हे कोगील बुद्रुक (जि. कोल्हापूर) येथील आदिनाथ किणीकर यांनी सिद्ध केले आहे. ऊस, भाजीपाला, अर्धा एकरांत विविध फळबागा अशी बहुविध पद्धतीची ताजे उत्पन्न देणारी त्यांची शेती आदर्श व्यवस्थापनाचा नमुना ठरली आहे.
 

अल्पक्षेत्र असले तरी जागेचा व हंगामाचा योग्य वापर केल्यास शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करता येते हे कोगील बुद्रुक (जि. कोल्हापूर) येथील आदिनाथ किणीकर यांनी सिद्ध केले आहे. ऊस, भाजीपाला, अर्धा एकरांत विविध फळबागा अशी बहुविध पद्धतीची ताजे उत्पन्न देणारी त्यांची शेती आदर्श व्यवस्थापनाचा नमुना ठरली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोगील बुद्रुक (ता. करवीर) येथे आदिनाथ किणीकर यांची सहा एकर शेती आहे. यापैकी दीड एकर डोंगराळ, तर उर्वरित काळसर जमिनीतील आहे. किणीकर यांचे वैशिष्ट्य म्हणजे सहा एकरांचा पुरेपूर व योग्य वापर करून शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कशी करता येईल याचे उत्तम व्यवस्थापन त्यांनी केले आहे. 

बारमाही पीक पद्धती 
पाच वर्षांपूर्वीपर्यंत किणीकर यांना सातत्याने नुकसान सोसावे लागे. एकच पीक जादा क्षेत्रावर घेतल्याने मनासारखा दर मिळाला नाही तर तो हंगाम वाया जात असे. कोगील गाव जिल्ह्यातील प्रसिद्ध कण्हेरी मठापासून जवळ आहे. तेथील सेंद्रिय शेती व कमी जागेत अधिक पिके घेण्याचे मॉडेल त्यांनी अभ्यासले. एकच पीक घेण्याऐवजी बहुविध पीक पद्धती अंगीकारल्यास जोखीम कमी होऊ शकते हे जाणले. त्यानुसार पीक पद्धतीची रचना केली. 

बारमाही शेती पद्धती 
 दरवर्षी दोन एकरांत उसाचे पीक, त्या व्यतिरिक्त भात, सोयाबीन, भाजीपाला आदी हंगामी पिके असतातच. काही आंतरपिके तर काही स्वतंत्र पद्धतीने घेतली जातात. ऊस वगळता कोणतेही पीक एक एकरांपेक्षा जादा क्षेत्रावर नसते. दहा, पंधरा गुंठ्यांपासून ते एक एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र असते. त्यामुळे वर्षभरात कोणतेही क्षेत्र मोकळे न राहता खरीप, रब्बीसह उन्हाळी हंगामही त्यांचा सक्रिय असतो. त्यातून वर्षभर ताजे उत्पन्न सुरू राहते. 

व्यवस्थापनातील बाबी 
फळबागा 

  • अर्ध्या एकरांत फळझाडे. दोन झाडांमध्ये पाच ते सात फूट अंतर. चिकू, लिंबू, आंबा, देशी केळी, नारळ, पपई, सीताफळ, पेरू, शेवगा आदींचा समावेश. काहींची १८, २५, ५० अशी झाडांची संख्या आहे. सरीत झेंडू. 
  • पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन. 
  • पाटपाण्याने पाणी. 
  • पाण्याची बचत व्हावी म्हणून भाताच्या पिंजाराचे आच्छादन. सर्वच पीक अवशेषांचा पुनर्वापर.  
  • वर्षभर कोणते न कोणते झाड फळ देत राहते. 
  • प्रति झाड दरवर्षी २५ ते ३० किलो गांडूळ खताचा वापर. गोमूत्राचाही वापर. सुमारे सहा जनावरे. 
  • दीड गुंठ्यात गांडूळ खत प्रकल्प.  
  • निंबोळी अर्काची फवारणी, चिकट व गंध सापळे यांचाही गरजेनुसार वापर.

ग्राहकांकडून मागणी 
सेंद्रिय निविष्ठांचा वापर केल्याने फळांचा दर्जा चांगला राहतो. त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी असते. काही व्यापारी, आजूबाजूच्या गावांतील ग्राहक घरी येऊन फळे घेऊन जातात. गरजेनुसार आठवडी बाजारातही विक्री होते. वर्षभरात सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न फळबाग देऊन जाते.  

बारमाही भाजीपाला  
एक वर्षाच्या कालावधीत मिरची, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, कोथिंबीर आदी भाजीपाला पिके घेतली जातात. किणीकर किंवा त्यांचा मुलगा आठवडी बाजारात जाऊन स्वतः थेट विक्री करतात. त्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढते. गेल्या वर्षभरात सर्व प्रकारच्या भाजीपाल्याच्या विक्रीतून ७५ हजार रुपयांपर्यंत नफा मिळविला आहे. प्रत्येक पिकाचे क्षेत्र मर्यादित ठेवल्याने दहा ते वीस किलो या प्रमाणातच भाजीपाला उपलब्ध होतो. यामुळे विक्रीचे अतिरिक्त दडपण राहत नाही.  खोडवा ऊस निघाल्यानंतर शाळू (गहू), त्यानंतर आवक कमी असलेल्या मात्र दर चांगला मिळणाऱ्या काळात गौरी -गणपती काळात कोथिंबीर, उन्हाळ्यात वरणा अशी पिके घेतात. कोथिंबिरीने त्यांना ५० हजारांपुढेही उत्पादन काही वेळा मिळवून दिले आहे. 

कृषी विज्ञान केंद्राची मदत
कण्हेरीच्या कृषी विज्ञान केंद्राकडून किणीकर यांना सोयाबीनचे सुधारित वाण, गंध व चिकट सापळे आदींच्या पुरवठ्याबरोबर फळबागांबाबतही मदत झाली. केंद्राच्या वतीने चौधरी चरणसिंह नावीन्यपूर्ण शेतीचा पुरस्कारही देण्यात आला आहे.

अर्ध्या एकरामुळे ठरले लग्न 
अर्ध्या एकरातील फळबागेच्या नियोजनामुळे चक्क लग्न ठरले हा किस्सा सांगताना किणीकर व पत्नी शालन यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. त्यांना दोन मुले आहेत. अमोल हा सैन्य दलात आहे. तर अमर शेती कामात मदत करतो. कण्हेरी येथील कृषी विज्ञान केंद्राने किणीकर यांच्या बागेचा व्हिडिओ यू- ट्यूबवर अपलोड केला होता. अमर यांचे लग्न करायचेही घरच्यांचे नियोजन सुरू होते. वधूवर सूचक मंडळात बायोडाटाही देण्यात आला होता. दरम्यान, इंगळी (ता. हातकणंगले) येथील राजेंद्र बुगटे यांच्या पाहण्यात हा व्हिडिओ आला. त्यांची मुलगी ऐश्‍वर्या यांचे देखील लग्न करण्याच्या तयारीत ते होते. बुगटे किणीकर यांच्या घरी आले. सहा एकरांपैकी अर्ध्या एकरातील फळबागेचे किफायतशीर पद्धतीने केलेले नियोजन पाहून ते खूष झाले. एक-दोन तासांतच त्यांनी लग्नाला होकार कळविला. त्या वेळी कोरोना संकटाचा काळ सुरू होता. त्यामुळे संध्याकाळीच लग्न उरकून घेण्याचेही ठरले. अत्यंत निवडक व मोजक्या लोकांमध्ये लग्न आनंदात पार देखील पडले. अलीकडील काळात शेतकऱ्यांना मुली देण्यात नापसंती असताना  अर्ध्या एकराची शेती पाहून मिळालेला होकार हे यश असल्याचे किणीकर सांगतात. 

- आदिनाथ किणीकर  ९६७३९४६५१९


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...