तांत्रिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय, मुरघास निर्मिती

सोनगाव (जि. नगर) येथील राजेश व गणेश अंत्रे या दोघा भावंडांनी अठरा वर्षांपूर्वी तीन गायींपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय आज तीस गायींपर्यंत नेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान व तांत्रिक बाबी आत्मसात करून त्यानुसार गोठा उभारणी, मुरघास निर्मिती केली. शेतीतही यांत्रिकीकरण केले आहे.
तांत्रिक पद्धतीचा गोठा आणि विक्रीसाठी तयार केलेला मुरघास.
तांत्रिक पद्धतीचा गोठा आणि विक्रीसाठी तयार केलेला मुरघास.

सोनगाव (जि. नगर) येथील राजेश व गणेश अंत्रे या दोघा भावंडांनी अठरा वर्षांपूर्वी तीन गायींपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय आज तीस गायींपर्यंत नेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान व तांत्रिक बाबी आत्मसात करून त्यानुसार गोठा उभारणी, मुरघास निर्मिती केली. शेतीतही यांत्रिकीकरण केले आहे. नगर जिल्ह्यात सोनगाव (ता. राहुरी) येथील राजेश बाळकृष्ण अंत्रे व बंधू गणेश या दोघांनी चिकाटीने दुग्ध व्यवसाय सुरू ठेवत त्यात यश मिळवले आहे. राजेश यांचे पदव्युत्तर तर गणेश यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. आई लता यांचे पाठबळ मिळाले आहे. वडिलोपार्जित पाच एकर बागायती शेती आहे. वडिलांचा पारंपरिक दुग्ध व्यवसाय होता. अठरा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्या वेळी तीन गायी होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघा भावंडांनी शेती व दुग्ध व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. अपयशानंतर मिळाली दिशा दरम्यान, १०० देशी कोंबड्यांचा, त्यानंतर ब्रॉयलर कोंबडीपालनाचा एक वर्ष प्रयोग केला. दोन्हीत अपयश आले. सहा महिने ससेपालन केले. त्यातही तोटा झाला. गांडूळ खत प्रकल्प उभारून महिन्याला चार टन खत तयार केले. मात्र त्या काळात फारशी मागणी राहिली नाही. कुटुंबातील सदस्य नाराज झाले. त्या काळात ठिबक सिंचनाची मोहीम सुरू होती. दहा तरुणांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांकडे ठिबक संच जोडणीचे कामे सुरू केले. पारंपरिक दुग्ध व्यवसायही सुरू होता. मात्र यश काही हाती लागत नव्हते. अशावेळी बाभळेश्‍वर येथील कृषी विज्ञान केंद्राचे तत्कालीन प्रमख डॉ. भास्कर गायकवाड यांनी किफायतशीर व्यवसायाबाबत मार्गदर्शन देत उभारी, दिशा दिली. डॉ. संभाजीराव नालकर यांनीही मार्गदर्शन केले. त्यानंतर सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आज व्यवसायाला बळकटी आली आहे. आजचा आधुनिक दुग्ध व्यवसाय

  • एकूण गायी (एचएफ)- २८ ते ३०. दररोजचे दूध संकलन- २०० लिटरपर्यंत.
  • पूर्वी शेडची उंची आठ फूट होती. उन्हाळ्यात त्रास व्हायचा. हवा खेळती राहावी म्हणून १२ फूट उंची घेतली.
  • प्रत्येक गायीला २०० चौरस फूट जागा लागेल या पद्धतीने ८० बाय ६० फूट आकाराचे दोन गोठे.
  • चारा वाया जाणार नाही यासाठी तांत्रिक पद्धतीने दीड फूट उंची, दोन फूट रुंदी व शंभर फूट लांबीची गव्हाण.
  • गाय चारा खाण्यासाठी व दूध काढणीवेळी शेण व मूत्र सोडते. सतत पाय हलवते. त्यामुळे खड्डे तयार होतात. ते टाळण्यासाठी १०० बाय १४ फूट आकाराचा सिमेंट कोबा.
  • गोचीड निर्मूलन व पाण्याच्या टाकीत शेवाळ साचू नये म्हणून आठवड्यातून एकदा पाणी व महिन्यातून एकदा गव्हाणीला चुन्याचा वापर.
  • दूध उत्पादन क्षमतेनुसार खुराक. दर दिवशी प्रति लिटर पाच ग्रॅम मिनरल मिक्शर.
  • हत्ती गवत, मेथी घास, मुरघास व गव्हाचा भुसा यांचे मिश्रण वजनानुसार.
  • पाचशे किलो वजनाच्या व दोन्ही वेळेस वीस लिटर दूध देणाऱ्या गाईला दिवसभरात पंचवीस किलो हिरवा व चार किलो वाळलेला चारा
  • गाभण काळात सकाळी -संध्याकाळी प्रत्येकी एक किलो खुराक.
  • गाईच्या प्रसूतीसाठी स्वतंत्र वॉर्ड. वासराला एका तासाच्या आत बाटलीने गाईचे दूध पाजले जाते.
  • कालवडींसाठी दोन महिने स्वतंत्र व्यवस्था.
  • वासरांचे जन्म, लसीकरण व अन्य सर्व नोंदी. वर्षातून एकदा रक्ताची तपासणी.
  • चार ते पाच महिने वयाच्या कालवडीसाठी ब्रुसेलाचे लसीकरण.
  • दोन ते तीन कंपन्या वा संस्थांकडील सिमेन वापरून सध्या सहा कालवडी.
  • व्हॉट्‌सॲपद्वारे मार्गदर्शन नगर जिल्ह्यातील दूध व्यावसायिक रवी नवले यांचा हिरकणी नावाचा ‘व्हॉट्‌सॲप ग्रुप आहे. त्यात राज्यातील दुग्ध उत्पादकांसह पशुवैद्यकीय आहेत. त्याद्वारे वेळोवेळी ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येते. त्यातून अंत्रे यांना दर्जेदार सिमेनबाबत माहिती मिळाली. ते वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी स्वखर्चाने नायट्रोजन कॅन खरेदी केला. मुरघासनिर्मिती

  • कुट्टी यंत्राद्वारे मुरघासनिर्मिती सुरू केली. शेतकरी सहभाग वाढीसाठी सहा वर्षांपूर्वी परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र केले. ‘सोशल मीडिया’वर ग्रुप तयार केला. मुरघास तयार करणाऱ्यांनाच त्यात
  • राहता येईल अशी अट घातली. पुढे अंत्रे यांनी इतरांनाही मुरघास तयार करून देण्यास सुरुवात केली.
  • दिवसभरात ७० ते ८० टन चाऱ्याची कुट्टी करणारे यंत्र, ट्रॅक्टरची खरेदी केली.
  • मुरघासाची मागणी वाढू लागली. आजमितीस वर्षभरात चारशे ते सहाशे टनांपर्यंत विक्री होते.
  • यंत्र व अन्य कामांसाठी वीस जणांना रोजगार दिला आहे. मका शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो.
  • शेतीतील वैशिष्ट्ये

  • पाच एकरांपैकी मुरघासासाठी मका, दोन एकरांत मेथी, एक एकर संकरित ज्वारी
  • ठिबक व तुषार सिंचनाद्वारे चारा उत्पादन.
  • मजूरटंचाई कमी करण्यासाठी ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, नांगर, पेरणीयंत्राचा वापर.
  • वर्षभरात चाळीस टन शेणखताची उपलब्धता. स्वतःच्या शेतीत वापरानंतर उर्वरित वीस टन विक्री.
  • जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचा आदर्श गोपालक, बाभळेश्‍वर ‘केव्हीके’तर्फे आदर्श दूध उत्पादक शेतकरी पुरस्काराने गौरव.
  • संपर्क - गणेश अंत्रे, ९७६३०४२४७०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com