दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
महिला
टार्गेट ठेवूनच करतेय शेती
पतीची बॅंकेत नोकरी असल्याने बदली ठरलेली. त्यामुळे कुठेतरी स्थिरस्थावर होण्याची धडपड. कुटुंबाची शेती स्वतः कसायची या ध्येयाने आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. भाग्यश्री भालचंद्र जोशी यांनी बारा वर्षांपूर्वी जबाबदारी घेतली.
पतीची बॅंकेत नोकरी असल्याने बदली ठरलेली. त्यामुळे कुठेतरी स्थिरस्थावर होण्याची धडपड. कुटुंबाची शेती स्वतः कसायची या ध्येयाने आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. भाग्यश्री भालचंद्र जोशी यांनी बारा वर्षांपूर्वी जबाबदारी घेतली. प्रयोगशील शेतकरी, कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने ऊस उत्पादनाचे एकरी शंभर टनांचे लक्ष त्यांनी गाठले. आंतरपीक, पीक फेरपालट आणि जमीन सुपीकतेवरही त्यांनी भर दिला आहे.
सांगली-इस्लामपूर राज्यमार्गावर वसलेले आष्टा (ता. वाळवा) हे ऊस आणि हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध शेतीप्रधान गाव. या गावातील प्रयोगशील महिला शेतकरी सौ. भाग्यश्री जोशी. त्यांचे माहेर मिरज तालुक्यातील म्हैसाळ. माहेरी देखील चांगली शेती. परंतु त्या वेळी शेती नियोजनात फारसा सहभाग नव्हता. त्यांनी एम.ए. (इंग्रजी)पर्यंत शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतर त्या सासरी म्हणजेच आष्टा येथे आल्या. सासरीदेखील मोठी शेती होती. परंतु पती भालचंद्र आणि दीर मनोहर हे बँकेत नोकरीला असल्याने शेती वाट्याने (करार पद्धतीने) कसण्यासाठी दिली होती. कराराने शेती दिल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. पती आणि दीर यांच्या नोकरीमुळे शेतीमध्ये फारसे लक्ष देणे जमत नव्हते. याच दरम्यान त्यांच्या पतीची मराठवाड्यात बदली झाली. त्यामुळे कुटुंबासह तेथे जाणे भाग पडले. परंतु तेथील वातावरणात सासऱ्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला आणि मुलांच्या शिक्षणाच्या सोईसाठी भाग्यश्रीताई परत आष्टा गावी परतल्या.
शेतीची घेतली जबाबदारी
आष्टा गावी आल्यानंतर कौटुंबिक शेतीची जबाबदारी भाग्यश्रीताईंनी स्वतःकडे घेतली. परंतु यामध्येही मोठे अडथळे होते. याबाबत त्या म्हणाल्या, की अडचणीचे दिवस होते, पण घरची शेती चांगल्या पद्धतीने करू शकतो असा आत्मविश्वास होता. जमिनीची सुपीकताही कमी झाली होती. काही क्षेत्र पडीक होते. अशी एकूण १६ एकर शेती आमच्या ताब्यात आली. तोपर्यंत शेती वाटेकऱ्याकडे होती. अपेक्षित उत्पन्न येत नसल्याने शेती विकून झालेले कर्ज फेडायचे असा कुटुंबात विचार सुरू झाला. पण शेती विकायची नाही तर कसायची, या मतावर मी ठाम राहिली. घरच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला. शेती करायची झाली तर पुरेसे भांडवल नव्हते. तरीदेखील शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीचे प्राथमिक धडे वडिलांच्याकडून घेण्यास सुरुवात केली. आमच्या शेतीमध्ये ऊस हेच महत्त्वाचे पीक. त्यामुळे ऊस पीक उत्पादनवाढीसाठी मी पहिल्यांदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे प्रशिक्षण घेतले. परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांकडून लागवड, जातीची निवड, खत व्यवस्थापन, उत्पादन वाढीबाबत माहिती घेतली. कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्रामधील ऊस, हळद पिकाच्या शेती शाळेच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाची ओळख होत गेली.
एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे ध्येय
ऊस उत्पादनवाढीबाबत भाग्यश्रीताई म्हणाल्या, की कृषी विद्यापीठ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊ लागले. मी २०११ पासून सुधारित तंत्राने ऊस लागवडीकडे वळाले. यासाठी आष्टा गावातील प्रयोगशील शेतकरी दीपक कुकडे यांचे मार्गदर्शन मिळू लागले. पूर्वी साडेतीन फूट सरीमध्ये ऊस लागवड होती. परंतु त्यातून अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने उसाच्या को- ८६०३२ जातीची पाच फूट सरीमध्ये लागवड सुरू केली. त्यामुळे आंतरमशागत करणे सोपे झाले. आडसाली उसामध्ये सोयाबीन आणि भुईमुगाचे आंतरपीक घेऊ लागले. त्याचाही उत्पन्नवाढीसाठी फायदा झाला. ऊस पीक व्यवस्थापनासाठी मी सुरेश कबाडे, अमोल पाटील, अंकुश चोरमुले यांच्याकडून मार्गदर्शन घेते. सध्या माझ्या १६ एकर शेतीमध्ये नवीन लागवड ५ एकर, कारखान्याला जाणारा ऊस ५ एकर आणि खोडवा ऊस ६ एकरांवर आहे. आज मी उसाचे एकरी ६० टनांवरून १०० टन आणि खोडव्याचे एकरी ६५ टन उत्पादनामध्ये सातत्य ठेवले आहे.
गेल्या वर्षी मी उसामध्ये भुईमुगाच्या फुले प्रगती, धनलक्ष्मी जातीचे आंतरपीक घेतले होते. मला एकरी १० क्विंटल उत्पादन मिळाले. ओल्या शेंगांची सांगली येथील शिवाजी मंडईत विक्री केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळाले. खोडवा ऊस गेल्यानंतर पिकाची फेरपालट तितकीच महत्त्वाची असते. या क्षेत्रात हरभऱ्याच्या विजय जातीची लागवड करते. हरभऱ्याचा बेवड हा ऊस पिकासाठी फायदेशीर ठरतो. गेल्या वर्षी कोरडवाहू हरभऱ्याचे एकरी सहा क्विंटल उत्पादन मिळाले. दोन वर्षांपूर्वी हळद लागवड केली होती. मला वाळवलेल्या हळदीचे एकरी ४५ क्विंटल उत्पादन मिळाले.
शेती व्यवस्थापनाची सूत्रे
- सुधारित तंत्र, जमीन सुपीकतेवर भर.
- सातत्याने प्रयोगशील शेतकरी, कृषी संशोधन केंद्रांना भेटी.
- मजूरटंचाईवर मात करण्यासाठी यंत्रांचा वापर.
- आंतरपीक पद्धत, पीक फेरपालटीसाठी हरभरा, भुईमूग लागवड.
- उसामध्ये पाचटाचे आच्छादन.
- नवीन तंत्रज्ञानातून पीक उत्पादनवाढीचे धोरण.
जमीन सुपीकतेवर भर
मी जमीन सुपीकेतवर भर दिला आहे. शेतीमध्ये ५० टक्के सेंद्रिय खतांचा वापर करते. यासाठी साखर कारखान्यातील मळीचे कंपोस्ट खत, शेणखत आणि पेंडी खताचा वापर केला जातो. माती परीक्षण आणि पीक गरजेनुसारच रासायनिक खतांची मात्रा देते. शेतामध्ये विहीर आहे. परंतु पाणी कमी पडते. त्यामुळे वसंतदादा साखर कारखान्याच्या पाणीपुरवठा योजनेतून शेतीमध्ये पाणी घेतले आहे. त्यामुळे ठिबक सिंचन करणे शक्य झालेले नाही. पुढील वर्षी ऊसतोडणी यंत्राचा वापर करण्याच्या दृष्टीने लागवडीचे अंतर बदलणार आहे.
‘अॅग्रोवन’मुळे मिळाली दिशा...
शेती नियोजनाबाबत भाग्यश्रीताई म्हणाल्या, की पहिल्यापासूनच वडिलांकडून शेती नियोजनाची दिशा मिळाली. काही वर्षांपूर्वी अॅग्रोवनमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्रातील तज्ज्ञ डॉ. कल्याण देवळाणकर यांचा गहू लागवडीचा लेख वाचनात आला होता. त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बियाणे बदल, खतमात्रेबाबत चांगले मार्गदर्शन केले. त्यानुसार बदल केला आणि उत्पादन वाढ मिळाली. याच पद्धतीने विविध तज्ज्ञांकडून ऊस, भुईमूग, हरभरा, हळद पिकामध्येही बदल केल्याने सरासरी उत्पादन वाढले. त्यामुळे ॲग्रोवन माझा मार्गदर्शक बनला. शेती नियोजनात मला पती, सासरे आणि मुलांची चांगली साथ मिळाली. शेतीच्या उत्पन्नावरच माझी मुलगी आणि मुलगा इंजिनिअर होत आहेत. आज आष्टा गावाच्या बरोबरीने पंचक्रोशीतील शेतकरी आमची शेती पाहण्यासाठी येतात.
- सौ. भाग्यश्री भालचंद्र जोशी,
८२७५२४९८५८(वेळ : सकाळी १० ते ६ पर्यंत)
फोटो गॅलरी
- 1 of 14
- ››