स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये ब्रह्मपुरीचा वेगळा ठसा

पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा पुरवण्यासह ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा. जि. सोलापूर) ग्रामपंचायतीने ग्रामविकासाच्या अनेक कामांमध्ये ठसा उमटवला आहे, ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव, ‘स्मार्टग्राम’सारख्या पुरस्कारांवर मोहोर उमटवत ‘आयएसओ’ मानांकन मिळवले आहे.
Gram Panchayat Brahmapuri Office.
Gram Panchayat Brahmapuri Office.

पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा पुरवण्यासह ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा. जि. सोलापूर) ग्रामपंचायतीने ग्रामविकासाच्या अनेक कामांमध्ये ठसा उमटवला आहे, ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव, ‘स्मार्टग्राम’सारख्या पुरस्कारांवर मोहोर उमटवत ‘आयएसओ’ मानांकन मिळवले आहे.   सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर मंगळवेढ्यापासून अवघ्या १३ किलोमीटरवर ब्रह्मपुरी हे ऐतिहासिक गाव आहे. भीमा नदीकाठ लाभलेल्या या गावातून १६६५ पासून ११ वर्षे औरंगजेब बादशहाने राजकीय सूत्रे हलवली. सलग चार वर्षे त्याचे गावात वास्तव्य होते. राजमाता जिजाबाई यांच्या बंधूंचे नातू जगदेवराव जाधव यांचा मृत्यू ब्रह्मपुरीत झाला. त्यांची समाधी भीमा नदीच्या तीरावर आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्राचा मृत्यूही ब्रह्मपुरीच्या छावणीत झाल्याची इतिहासात नोंद आहे. ब्रह्मपुरीच्या या छावणीतून बाहेर पडताना औरंगजेबाने नदीकाठी किल्ला बांधला. आज तो माचणूरचा किल्ला म्हणून ओळखला जातो. अशा ऐतिहासिक पाऊलखुणा जपत गावाने विकासातही लौकिक मिळवला आहे. लोकनियुक्त सरपंच मनोज पुजारी, उपसरपंच अण्णासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते विजयसिंह पाटील, ग्रामसेवक एस. बी. शिंदे यांच्या प्रयत्नांतून गावात नावीन्यपूर्ण बदल आणि उपक्रम राबवले जात आहेत.  उपक्रमशीलता  गाव महामार्गालगत असल्याने प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी वा अन्य व्यक्तींची येथे सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे गावातील विकासकामे लक्ष वेधून घेतात. गावातील मुख्य तसेच गल्लीबोळातही सिमेंट रस्ते दिसून येतात. जागा मिळेल त्या ठिकाणी वृक्षारोपण दिसते. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाच वर्षांपूर्वी ८० हजार लिटर क्षमतेची टाकी बांधली आहे. भीमा नदीकाठी विहीर बांधली आहे. कूपनलिका घेऊन पाणी एकत्रित करून गावाला पुरवठा केला जातो. पाणी शुद्धीकरणासाठी ‘आरओ प्लांट’ उभारला आहे. पाच रुपयांमध्ये वीस लिटर शुद्ध पाणी दिले जाते. आठ ठिकाणी हातपंप, प्रमुख चौकांत नऊ ठिकाणी हायमास्ट दिवे, तर महत्त्वाच्या १८ ठिकाणी सौरदिवे बसवले आहेत. स्वच्छतेत आघाडी स्वच्छ भारत मिशनमध्ये (निर्मलग्राम योजना) पाच वर्षांपूर्वी सहभाग घेत गावाने हागणदारीमुक्त म्हणून सन्मान मिळवला. गावात असलेल्या एकूण ५३८ कुटुंबांकडे शौचालये उभारली आहेत. भुयारी गटारामुळे खुल्या अवस्थेत वाहणारे पाणी वा अस्वच्छता कुठेही दिसत नाही. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून शौचालय तांत्रिक, पर्यावरणदृष्ट्या योग्य अंतरावर आहे. ओला आणि सुका कचरा वर्गीकरणानुसार संकलित करण्यात येतो. त्यापासून खत बनवण्याचे प्रशिक्षण काही कुटुंबांना दिले आहे. तीन वर्षांपासून गावात साथ किंवा पाण्यातून उद्‍भवणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव नसल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. ऊसशेती गावाचे भौगोलिक क्षेत्र सुमारे १६६३ हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक बागायती क्षेत्र आहे. भीमा नदीचा काठ लाभल्याने ऊस हे मुख्य पीक ठरले आहे. त्यामुळेच नदीच्या कडेला दीड एकर पडीक जमिनीवर दहा वर्षांपासून ऊसशेती करण्यात येत आहे. त्यातून वर्षाकाठी ग्रामपंचायतीला सरासरी ६० हजार रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न मिळते.  ‘ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत’ सहभाग ‘ॲग्रोवन’च्या सरपंच महापरिषदेत तीन वर्षांपूर्वी सरपंच मनोज पुजारी सहभागी झाले होते. त्यातून बरेच शिकायला मिळाले. शासकीय योजनांची माहिती मिळाली. गावविकासात सरपंचाची भूमिका किती महत्त्वाची ठरू शकते, सरपंच काय करू शकतो हे अनुभवायला मिळाले असे पुजारी यांनी आवर्जून सांगितले. विविध पुरस्कारांवर मोहोर

  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सातत्य. त्यातून जिल्हास्तरीय दुसऱ्या क्रमांकाचे तीन लाखांचे बक्षीस 
  • विभागीय स्तरावरील सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनांतर्गत ३० हजार रुपयांचे पहिले बक्षीस 
  • तंटामुक्त गाव अभियानातील पावणेचार लाख रुपयांचे विशेष व ‘स्मार्टग्राम’ स्पर्धेत तालुकास्तरावर दहा लाखांचे पहिले बक्षीस. 
  • शाळेसह ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’  गावात जिल्हा परिषद शाळा व चार अंगणवाड्या आहेत. जिल्हा परिषद शाळेतील काही वर्ग डिजिटल केले आहेत. त्यामुळे मुलांना संगणकीय शिक्षणाची गोडी लागली आहे. मुलांसाठी उपलब्ध साहित्य, संगणकीकरण व नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे शाळांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. ग्रामपंचायतीनेही आपले कामकाज संगणकीकृत केले आहे. कर्मचाऱ्यांना ‘ड्रेसकोड’ व उपस्थितीसाठी ‘पंचिंग’ची सुविधा दिली आहे. या सर्वांद्वारे ग्रामपंचायतीलाही ‘आयएसओ’ मिळाले आहे. गावात उद्यान, नाना नानी पार्क व तरुणांसाठी सुसज्ज व्यायामशाळा उभारण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. -मनोज पुजारी, ७५५८२३९५८५  (सरपंच, ब्रह्मपुरी) गावाला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत असला तरी चोवीस तास पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. घनकचरा व्यवस्थापनावरही लक्ष देणार आहोत. -एस. बी. शिंदे,  (ग्रामसेवक, ब्रह्मपुरी) गावचा विकास हा सक्रिय लोकसहभागाशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळेच एवढी कामे होऊ शकली. यापुढेही सर्वांचा असाच सहभाग राहील. -विजयसिंह पाटील (ज्येष्ठ नेते, ब्रह्मपुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com