‘थ्री स्टार’ लिंबू वर्गीय रोपनिर्मिती

लिंबूवर्गीय पिकांच्या रोपनिर्मितीला लागणारा २० ते २२ महिन्यांचा कालावधी ‘मायक्रोबडिंग’ तंत्राद्वारे सुमारे एक वर्षावर आणण्यात केंद्रीय लिंबूवर्गीय पिके संशोधन संस्थेला यश आले आहे.
Primary and secondary stage nurseries
Primary and secondary stage nurseries

लिंबूवर्गीय पिकांच्या रोपनिर्मितीला लागणारा २० ते २२ महिन्यांचा कालावधी ‘मायक्रोबडिंग’ तंत्राद्वारे सुमारे एक वर्षावर आणण्यात केंद्रीय लिंबूवर्गीय पिके संशोधन संस्थेला यश आले आहे. संत्रा, मोसंबी, लिंबाच्या विविध दर्जेदार रोपनिर्मितीत हातखंडा असलेल्या या संस्थेच्या रोपांना देशभरातून मोठी मागणी राहते. संस्थेच्या रोपवाटिकेला थ्री स्टार दर्जा मिळाला आहे.   लिंबूवर्गीय पिकांच्या (संत्रा, मोसंबी, लिंबू आदी) संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था, बंगळूर अंतर्गत लिंबूवर्गीय संशोधन केंद्र नागपूर येथे पूर्वी कार्यरत होते. २८ जुलै १९८५ मध्ये राष्ट्रीय लिंबूवर्गीय केंद्राची पायाभरणी झाली. सन २०१४ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेने त्यास राष्ट्रीय संस्थेचा दर्जा दिला. केंद्रीय लिंबूवर्गीय पिके संशोधन संस्था असे त्याचे नामकरण झाले. सुमारे २५० एकरांचा संस्थेचा परिसर असून, सुमारे १८० एकरांवर संशोधनात्मक कार्यासाठी विविध लिंबूवर्गीय पिकांची लागवड झाली आहे अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी दिली.   रोगविरहित रोपांचा पुरवठा  रोपे निरोगी नसणे हेच डिंक्‍या व अन्य रोगांच्या प्रसारास मुख्य कारण ठरते. त्यादृष्टीने संस्थेने रोगविरहित दर्जेदार रोपांचा पुरवठा २००८ पासून सुरू केला. आजवर सुमारे ४० लाख रोपे देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत वितरित झाली आहेत. रोपे जमिनीत न लावता थेट प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये लावली जातात. जमिनीशी संपर्क येत नसल्याने ती किडी-रोगमुक्त राहतात असे संचालक डॉ. घोष सांगतात.  मायक्रोबडिंग तंत्रज्ञानाविषयी  प्रचलित रोपनिर्मिती पद्धतीत सुरुवातीला माती निर्जंतुकीकरण केले जाते. खुंट विकसित करण्यासाठी बियाणे टाकावे लागते. त्यादृष्टीने रंगपूर लाइम, जंबेरी (ईडलिंबू), ॲलेमो खुंटाचे बी ट्रेमध्ये टाकले जाते. प्राथमिक नर्सरीत ही प्रक्रिया पार पाडली जाते. सहा ते आठ महिन्यांनंतर झाड झाल्यानंतर (प्लॅस्टिक बॅगेतील) द्वितीय नर्सरीत ऑक्टोबर ते डिसेंबर काळात २० ते २२ सेंटिमीटरवर बडिंग केले जाते. या प्रक्रियेत २० ते २२ महिन्यांनी रोपे विक्रीसाठी उपलब्ध होतात. या पद्धतीला संस्थेने  सूक्ष्म डोळा बांधणी (मायक्रोबडिंग) तंत्राचा पर्याय उपलब्ध केला आहे. या तंत्रज्ञानात ट्रेमध्ये मातृवृक्षाचे बी टाकण्याऐवजी थेट प्लॅस्टिक पिशवीतच टाकले जाते. त्यामुळे ट्रेमध्ये संगोपन करण्याचा सहा महिन्यांचा कालावधी कमी होतो. थेट बियाणे पद्धत (डायरेक्ट सीडिंग) वापरली जाते.  सुमारे ११ ते १२ महिन्यांत रोप तयार होते. संस्थेतील वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ व टिश्युकल्चर रोपवाटिका विभाग प्रमुख डॉ. विजयाकुमारी नरकुल्ला यांचे हे संशोधन आहे. पूरक तंत्रज्ञानही त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झाले आहे. ‘आयसीएआर’ तर्फे उत्कृष्ट महिला संशोधक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.   थ्री स्टार रोपवाटिका  संस्थेच्या रोपवाटिकेला राष्ट्रीय फलोत्पादन विभागाकडून तीन तारांकित (थ्री स्टार) दर्जा मिळाला आहे. देशातील मोजक्‍याच संस्थांमध्ये त्यामुळे या संस्थेचा समावेश झाला आहे. संस्थेच्या  वतीने शेतकऱ्यांना रोपांचा पुरवठा करण्यासाठी पत्राद्वारे मागणी नोंदविली जाते. त्यासाठी दरवर्षी १४ ते १६ एप्रिलच्या दरम्यान शेतकऱ्यांना आवाहन केले जाते. वीस ते ३० एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारले जातात. त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर रोपे वितरित केली जातात. यामध्येही देशातील विविध राज्ये वा क्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा असे संतुलन ठेवले जाते. त्यासाठी अन्य राज्यांतील कृषी अधिकाऱ्यांकडूनही विचारणा केली जाते, अशी माहिती संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ (फलोत्पादन) डॉ. अभिजित मुरकुटे यांनी दिली.  साडेसात लाख रोपांची मागणी  देशभरातून सुमारे साडेसात लाख रोपांची मागणी दरवर्षी राहते. परंतु संस्थेला सद्यःस्थितीत तीन ते चार लाख रोपांचाच पुरवठा करणे शक्‍य होते. त्यामुळे संस्थेने पुरविलेल्या झाडांचे संवर्धन करून गरजेप्रमाणे त्यापासून रोपांची निर्मिती शेतकऱ्यांनी करावी अशी संस्थेला अपेक्षा आहे त्याशिवाय मागणी आणि पुरवठा यांचा ताळेबंद जुळविणे शक्‍य होणार नाही असे डॉ. घोष म्हणतात. दर्जेदार आणि रोगविरहित रोप उत्पादनाचे तंत्रज्ञान शेतकरी, विस्तार तज्ज्ञापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशिक्षण वर्गाचेही आयोजन होते. आजवर सुमारे ५० हजार व्यक्‍तींनी लाभ घेतला आहे.  नवे वाण व संग्रह  संस्थेच्या संग्रहालयात ६०० हून अधिक देशी, परदेशी वाणांचा संग्रह आहे. पैकी परदेशी वाणांची संख्या ५० च्या वर आहे. त्यातून नवे वाण विकसित करण्यात येत आहेत. सद्यःस्थितीत बीरहित नागपूरी संत्रा-४, एनआरसीसी लिंबू-७ व ८, एनआरसीसी पमोलो-५, एनआरसीसी ग्रेपफ्रूट-६ आदी वाण प्रसारित झाले आहेत. तर कटर व्हेलेंसिया, फ्लेम ग्रेपफ्रूट व एनआरसीसी पमेलो ०५ या  वाणांना राज्य सरकारकडून अद्याप प्रसारणासाठी संमती मिळणे बाकी आहे.   स्पेनमधील वाण  कटर व्हॅलेंसिया हे मोसंबीचे वाण मूळचे स्पेनमधील आहे. भारतीय वातावरणात त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. हे वाण नोव्हेंबर ते फेब्रुवारी अशा कालावधीत काढणीस येते. एकूण विद्राव्य घनपदार्थांचे (टोटल सॉल्यूबल सॉलिड) प्रमाण पारंपरिक मोसंबी वाणात ९ ते ११ टक्क्यांपर्यंत आहे. तेच प्रमाण या वाणात १२ ते १३ टक्‍के आहे. आम्लाचे प्रमाण पारंपरिक वाणात ०.३ टक्‍का, तर या वाणात ते ०.७ टक्क्यापर्यंत, तसेच ज्यूसचे प्रमाण पारंपरिक वाणात ४४ ते 45 टक्के, तर या वाणात ५२ ते ५३ टक्क्यांपर्यंत आहे.    - डॉ. आशुतोष मुरकुटे,  ८६००९९२१४१, डॉ. विनयाकुमारी नरकुल्ला,  ९४२३६८५७२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com