श्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल स्वयंपूर्ण

स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत सुविधांसह जलसंधारणाची विविध कामे चुंब (जि. सोलापूर) गावाने लोकसहभागातून यशस्वी पार पाडली. त्यातून तब्बल ५८ कोटी लिटर क्षमतेची पाणी साठवणक्षमता श्रमदानातून तयार केली. शेतीसह पिण्याच्या पाण्याबाबत आज गाव स्वयंपूर्ण झाले आहे.
Student participation in tree plantation.
Student participation in tree plantation.

स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत सुविधांसह जलसंधारणाची विविध कामे चुंब (जि. सोलापूर) गावाने लोकसहभागातून यशस्वी पार पाडली. त्यातून तब्बल ५८ कोटी लिटर क्षमतेची पाणी साठवणक्षमता श्रमदानातून तयार केली. शेतीसह पिण्याच्या पाण्याबाबत आज गाव स्वयंपूर्ण झाले आहे.   सोलापूर जिल्ह्यात बार्शीपासून सुमारे २२ किलोमीटरवर उत्तरेला चुंब हे दोन हजार लोकसंख्येचं गाव आहे. बालाघाटच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या या गावात पायथा ते माथ्यापर्यंत हिरव्या वनराईची शाल पांघरलेली पाहण्यास मिळते. गावात प्रवेशतानाच या नयनरम्य डोंगररांगा आपल्या स्वागतासाठी उभ्या असल्याचा भास होतो.  गावाविषयी थोडक्यात 

  • भौगोलिक क्षेत्र साडेनऊशे हेक्टरपर्यंत. पैकी अडीचशे हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारित. उर्वरित सातशे हेक्टर क्षेत्रात शेती.
  • सोयाबीनचे क्षेत्र अधिक. सोबत उडीद, ज्वारी.
  • पायाभूत सुविधांवर भर  मुख्यमंत्री पेयजल योजनेतून यमाई तलावातून आणलेल्या जुन्या पाइपलाइनची दुरुस्ती करून पूर्ण नवी लोखंडी पाइपलाइन तयार केली. मुख्य रस्त्यांसह दलित वस्तीत सिमेंटचे १६ रस्ते तयार केले. मुख्य चौकात सात हायमास्ट व गल्लीबोळात सौरऊर्जेवरील सुमारे शंभर दिवे लावले. त्यामुळे वीज उपलब्धता व वीजबिलाचा प्रश्‍न सुटला. ५० घरकुलांना मंजुरी मिळून ४० पूर्ण झाली. जिल्हा परिषद आणि अंगणवाडी शाळेच्या दुरुस्तीसह नूतनीकरण आणि परिसरात पेव्हरब्लॅाक झाले. दलितवस्ती समाज मंदिराचे व विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे लोकवर्गणीतून नूतनीकरण झाले.  सलून सेवा मोफत  ग्रामपंचायतीने पुढील वर्षभराचा आगाऊ कर भरणाऱ्यांना वर्षभर दाढी आणि केस कर्तनाची सेवा मोफत देण्याचा उपक्रम आखला आहे. त्यातून कर भरणाऱ्यांची ५ ते १० संख्या आज शंभराहून अधिक आहे.  वृक्षलागवड चळवळ  गावात व डोंगरमाथ्यावर आंबा, करंज, लिंब, चिंच, जांभूळ अशी सुमारे दोन हजारांहून अधिक झाडे लावण्यात आली. वृक्षलागवड ही चळवळ म्हणूनच गावकऱ्यांनी स्वीकारली. या कामात विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. गावातील ठळक उपक्रम 

  •  दलित समाजातील कुटुंबांना गृहोपयोगी भांडीवाटप.  
  • वर्षातून एकदा गावातील पुरुष-महिलांची कृषिविषयक सहल.  
  • शेतकऱ्यांसाठी माती- पाणी परीक्षण सेवा. 
  •  ग्रामपंचायतीत महिलांसाठी सॅनिटरी पॅडसची सोय 
  • दररोज मुरते ५० हजार लिटर पाणी  भूमिगत गटारींचे काम सुरू केले. दोनशे कुटुंबांकडे शोषखड्डे घेण्यात आले. यामागे स्वच्छतेबरोबरच पाण्याची बचत व स्त्रोतवाढही आहे. प्रति खड्ड्यात प्रति कुटुंबाचे २५० लिटर पाणी या दराने दररोज किमान ५० हजार लिटर पाणी, अर्थात दररोज पाच टँकर पाणी या माध्यमातून मुरवले जात आहे.   जलसंधारण  चांदणी नदीचे खोली-रुंदीकरण करण्यात आले. नदीवर बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून मजबुतीकरण करण्यात आले. एरवी वाहून जाणारे पाणी आता साठून राहू लागले आहे. गावपरिसरात दोन पाझर तलाव आहेत. सुमारे २० लाख रुपये खर्चून त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले.  मनं आणि मतं बदलली डोंगरदऱ्यात वसल्यानं पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत गावाला नव्हता. गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या चांदणी नदीलाही जेमतेम पाणी होतं. गावाने २०१८ मध्ये पाणी फाउंडेशन स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचं ठरवलं. सुरुवातीला त्रास झाला. पण पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं होतं. सुरुवातीला पाच-सहा लोक प्रशिक्षणासाठी तयार केले. हळूहळू संख्या ४०-५० पर्यंत पोहोचली. सर्वांचीच मनं आणि मतं बदलू लागली. संपूर्ण गाव सहभागी झालं. लोकनियुक्त सरपंच म्हणून सौ. सुषमा अशोक जाधवर आणि त्यांच्या पथकाने विकासकामे मोठ्या जोमानं सुरू करताना सर्वाधिक प्राधान्य पाणीप्रश्‍नाला दिलं. उपसरपंच नवनाथ जाधवर, अशोक जाधवर, अतुल जाधवर, बाबासाहेब कदम, संतोष मुंडे, रामहरी जाधवर, हबीब शेख, बंडू ढाकणे, मधुकर जाधवर, सालम पठाण, वसिष्ठ जाधवर, ग्रामसेवक जी. वाय. जाधव, कृषी सहायक प्रसेनजित जानराव यांनीही परिश्रम घेतले. माजी आमदार दिलीप सोपल, तत्कालीन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विभागीय सहनिबंधक संतोष पाटील, सहकार आयुक्तालयातील सहनिबंधक राजेश जाधवर यांनीही भेट देऊन मार्गदर्शन केले. ५८ कोटी लिटर साठवणक्षमता गावापासून दी़ड-दोन किलोमीटरवर डोंगर माथ्यावर कामांना सुरुवात करताना गावाच्या पाण्याचा ताळेबंद आखण्यात आला. त्यानुसार ठिकाणं निश्‍चित केली. शेततलाव, सीसीटी, डीप सीसीटी, दगडी बांध, मातीनाला अशी कामे यंत्रे आणि गावच्या श्रमदानातून झाली. त्यातून तब्बल ५८ कोटी लिटर पाणीसाठवण क्षमता तयार झाली. गावात पाणीटंचाई उरलेली नाही.  श्रमाचे चीज  पाणी फाउंडेशनच्या या कामामुळे गावात एकी निर्माण झाली. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत चुंबला तालुका स्तरावरील १५ लाख रुपयांचे पहिले बक्षीस मिळालं. खऱ्या अर्थाने गावकऱ्यांच्या श्रमाचं चीज झाल्याचं समाधान मिळालं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे प्रमुख व अभिनेते आमीर खान यांच्या हस्ते हा पुरस्कार गावाने स्वीकारला - सौ. सुषमा जाधवर (सरपंच)  ९५०७९१९१९१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com