agricultural news in marathi success story Dr. shashiknat shinde from bhose nagar district Consistency in fruit crops for thirty years | Agrowon

तीस वर्षांपासून फळपिकांमध्ये सातत्य...

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021

भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ. शशिकांत भरतराव शिंदे यांनी पाच वर्ष नोकरी केली. मात्र नोकरीत मन रमत नसल्याने त्यांनी घरच्या फळबागेकडे लक्ष देण्यास सुरवात केली. पंधरा एकरावरील डाळिंब, सीताफळ, संत्रा फळबाग काटेकोर व्यवस्थापनातून चांगली जोपासली आहे.
 

भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ. शशिकांत भरतराव शिंदे यांनी पाच वर्ष नोकरी केली. मात्र नोकरीत मन रमत नसल्याने त्यांनी घरच्या फळबागेकडे लक्ष देण्यास सुरवात केली. पंधरा एकरावरील डाळिंब, सीताफळ, संत्रा फळबाग काटेकोर व्यवस्थापनातून चांगली जोपासली आहे.

सिंचनाची शाश्वत हमी नसलेल्या पाथर्डी तालुक्यातील करंजी पट्टा तसा दुष्काळी. त्यामुळे गेल्या चाळीस वर्षांपासून या भागात डाळिंब, संत्रा, मोसंबी, सीताफळ फळबागेला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. भोसे (ता.पाथर्डी,जि.नगर) येथील भरतराव शिंदे यांची १६ एकर जमीन. त्यांनी कृषी विभागात २५ वर्ष कृषी सहाय्यक पदावर नोकरी करून २००७ साली स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांना रमाकांत आणि शशिकांत ही दोन मुले. रमाकांत यांचे एलएलएमचे शिक्षण झाले असून ते पुण्यात वकील आहेत. शशिकांत यांनी २०१४ साली महात्मा फुले कृषी विद्यापीठातून वनस्पती रोगशास्त्र विषयात पीएचडी पूर्ण केली. डॉ.शशिकांत यांनी २०१३ ते २०१५ या काळात नाशिक येथील के.के.वाघ कृषी महाविद्यालयात दोन वर्ष अध्यापन आणि त्यानंतर कृषी आयुक्तालयात संशोधन सहयोगी पदावर २०१५ ते २०१७ पर्यंत काम केले. डॉ. शशिकांत यांचा ओढा शेतीकडे असल्यामुळे २०१७ साली नोकरीचा राजीनामा देऊन शेती नियोजनात लक्ष देण्यास सुरवात केली. सध्या त्यांच्याकडे पंधरा एकरावर फळपिकांची लागवड आहे.

फळपिकात सातत्य  

 • शिंदे कुटुंबाची वडिलोपार्जित ४ एकर शेती होती. फळपिकांच्या उत्पन्नावरच टप्प्याने जमीन क्षेत्रात वाढ करून सोळा एकर क्षेत्र झाले. सध्या पंधरा एकरावर फळ पिकांची लागवड आणि एक एकरावर शेततळे आहे. शिंदे कुटुंब गेल्या तीस वर्षांपासून वेगवेगळ्या फळपिकांचे उत्पादन घेतात.  
 • १९९० साली २ एकर मोसंबी, १ एकर चिकू लागवड. १९९७ व २००० साली ११ एकर नवीन शेत जमीन घेतल्यावर २००७ साली संत्रा पाच एकर, २०१४ साली डाळिंब पाच एकर आणि यंदा अडीच एकरावर लागवड.
 • २०१४ साली एनएमके गोल्डन सीताफळाची २ एकरावर ८०० झाडे आणि  २०१९ मध्ये तीन एकरावर सीताफळाच्या १४०० झाडाची लागवड.
 • भोसे शिवारात २००३ साली तीव्र दुष्काळ होता. त्या वर्षीच्या दुष्काळाचा मोठा फटका शिंदे कुटुंबाला सोसावा लागला. तेरा वर्ष जोपासलेली मोसंबीची फळबाग पाण्याअभावी काढून टाकावी लागली. त्यात मोठे नुकसान झाले. २००७ पर्यंत त्यांनी भुसार पिकांची लागवड केली. परंतु फळपिकांचा ओढा थांबत नव्हता. २००७ साली शिंदे यांनी पुन्हा ५ एकरावर संत्रा लागवड केली.   गेल्या दहा वर्षात तीन वेळा दुष्काळाचा मोठा फटका बसला मात्र कुटुंबाने टॅंकरच्या पाण्यावर बाग जगवली आहे. 

कुटुंबाचा सहभाग 

 • आंतरमशागत सहजतेने करता यावी, तसेच पावसामुळे दमटपणा वाढून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिंदे यांनी फळझाड लागवड अंतरात बदल केला आहे. पूर्वी डाळिंब आणि इतर फळझाडांची लागवड १२ बाय ८ फूट होती. आता नव्याने १४ बाय ९ फूट अंतरावर लागवड केलेली आहे.
 • फळपिकांचे उत्पादन घेताना कुटुंबातील सहा सदस्यांसह गरजेनुसार मजूर घेतले जातात. शेती मशागतीसाठी विविध यंत्रांचा वापर केला जातो. त्यामुळे मजूर बचत झाली आहे.
 • पाणी बचतीतून यशस्वी फळपिके घेण्यासाठी वीस वर्षापासून ठिबक सिंचनाचा वापर. फळबागेमध्ये सेंद्रिय आच्छादनाचा वापर केल्याने पाण्याची चांगली बचत होते. जमिनीची सुपिकता टिकून राहिली आहे.

शेततळे, सोलर युनिट  

 •  दुष्काळी परिस्थितीत फळबाग जोपासावी लागत असल्याने शिंदे यांचा पाणी पुरवठ्यावर मोठा खर्च होत होता. त्यामुळे शिंदे यांनी स्वखर्चाने २०१४ साली एक एकरावर एक कोटी लिटर क्षमतेचे  शेततळे केले. मात्र कृषी विभागाकडून अजून अनुदान मिळालेले नाही.
 • शेती व्यवस्थापनात विजेचाही प्रश्न सतत भेडसावतो. त्यामुळे गेल्या वर्षी मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतून दोन ठिकाणी आणि यंदा स्वखर्चाने दोन लाख रुपये  खर्च करून एक अशा पद्धतीने तीन सोलर संयंत्र शिंदे यांनी बसविलेली आहेत. त्यामुळे वेळेत वीज उपलब्ध होते. महत्त्वाचे म्हणजे  वर्षभराच्या वीज बिलामध्ये पन्नास हजार रुपयांची बचत झाली.

व्यवस्थापनात वेगळे प्रयोग  
फळपिकांचे व्यवस्थापन करताना डॉ. शशिंकात यांना कृषी शिक्षणाचा चांगला फायदा होत आहे. बहर धरताना ते वेगवेगळे प्रयोग करत आर्थिक उत्पन्न वाढवितात. 

डाळिंब व्यवस्थापन 

 •   बहुतांश शेतकरी जानेवारी महिन्यात बहर धरतात. या बहरातील फळे साधारण ऑगस्टमध्ये विक्रीला येतात. शिंदे मात्र दरवर्षी १५ मार्च नंतरचा लेट अंबिया बहर धरतात.
 •   पाणी सोडण्याआधी आठ दिवस पानगळ केली जाते. त्या आठ दिवसात प्रति झाड ४० किलो शेणखत, अर्धा किलो रासायनिक खताची मात्रा दिली जाते. त्यानंतर पुढे साधारण आठ दिवसाला गरजेनुसार फळ निघेपर्यंत बुरशीनाशक, कीटकनाशकांची फवारणी होते.
 • देशी गाईचे शेण, गोमूत्र, बेसनपीठ आणि गूळ यापासून तयार केलेली शेणस्लरी प्रती महिना एका झाडाला एक लिटर या प्रमाणात दिली जाते. त्यामुळे फळांची चांगली वाढ होते, फळाला चकाकी येते.
 • झाड कमकुवत झाले, की तेलकट डाग आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे झाड सशक्त ठेवण्यासाठी काटेकोर उपाययोजना केली जाते.
 • शेतकऱ्यांच्यापेक्षा एक महिन्याने डाळिंब काढणीला सुरवात होते.तोपर्यंत बाजारातील डाळिंब बऱ्यापैकी संपलेली असतात तसेच मागणी अधिक असते, दरही चांगला मिळतो. यंदा शिंदे यांना प्रती किलोस सरासरी १०० रुपये दर मिळाला.
 • कावेमध्ये कीडनाशक मिसळून डाळिंब, संत्रा, सीताफळाच्या खोडाला पेस्टिंग केले जाते. त्यामुळे खोडकिड्यापासून झाडाचे संरक्षण होतो.

सीताफळ व्यवस्थापन

 • डिसेंबरला पाणी देण्याचे थांबल्यानंतर मार्च ते एप्रिल या काळात प्रती झाड ४० किलो शेणखत दिले जाते. 
 • बहुतांश शेतकरी मे महिन्यात छाटणी करतात. शिंदे मात्र जुलैमध्ये छाटणी करून महिना अखेर बहर धरतात. त्यामुळे सीताफळ इतरांपेक्षा दीड महिना उशिरा बाजारात येते. त्यामुळे बाजारात नेहमीपेक्षा दर अधिक असतो.
 • गेल्यावर्षी सीताफळाला सर्वसाधारण ६० रुपये प्रति किलो दर होता. उशिरा बहरामुळे शिंदे यांना १३० रुपये प्रती किलो दर मिळाला. सीताफळाची जागेवर तसेच वाशी (मुंबई) बाजारात विक्री होते.

संत्रा व्यवस्थापन 
  सुरवातीला संत्रा फळांची जागेवर विक्री केली जाते. यंदा पुणे, वाशी बाजारात विक्री केली जाते.

- शशिकांत शिंदे,  ९८३४९३६९५४


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
योग्य व्यवस्थापनातून वाढविला १९०...गोठा, म्हशींचे संगोपन व दूध विक्री या स्तरांवर...
दुग्धव्यवसायातून संयुक्त फोलाने...नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
दुग्ध व्यवसायातून बसविली आर्थिक घडीसातारा जिल्ह्यात कोपर्डे (हवेली) येथील कैलास...
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात देशमुख...सुलतानपूर (जि. नगर) येथील विजय देशमुख यांनी नऊ...
डाळ निर्मिती उद्योगातील ‘अनुजय' ब्रॅण्डढवळी (ता.वाळवा,जि.सांगली) येथील सौ.चारुलता उत्तम...
महिला गटाने दिली कृषी,ग्राम पर्यटनाला...पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने मार्गासनी (ता....
वांगे भरीत पार्टीद्वारे व्यवसाय...डांभुर्णी (ता. यावल, जि. जळगाव) येथील राणे...
लाकडी घाण्याद्वारे दर्जेदार तेल, खाद्य...अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी...
भिडी गावाने उभारल्या अवजारे बॅंका,...काळाची पावले ओळखत विदर्भातील अनेक गावांनी...