गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी कोळंबीचा प्रयोग

गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे संवर्धन करण्याचे आव्हान रत्नागिरी येथील दर्शना व गौरव या तरूण उच्चशिक्षित दांपत्याने पेलले. शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थापन करून ‘स्टार्ट अप’ अवस्थेतील या व्यवसायातून दर्जेदार उत्पादन घेत निर्यातदार कंपन्यांना कोळंबी पुरवणे या दांपत्याला शक्य झाले आहे.
Venami Prawn Breeding Pond
Venami Prawn Breeding Pond

गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे संवर्धन करण्याचे आव्हान रत्नागिरी येथील दर्शना व गौरव या तरूण उच्चशिक्षित दांपत्याने पेलले. शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थापन करून ‘स्टार्ट अप’ अवस्थेतील या व्यवसायातून दर्जेदार उत्पादन घेत निर्यातदार कंपन्यांना कोळंबी पुरवणे या दांपत्याला शक्य झाले आहे. रत्नागिरीला निसर्ग व समुद्रकिनाऱ्याचे वरदान लाभले आहे. येथील गौरव कमलाकर भोई यांचा मच्छीमारी नौका व्यवसाय आहे. सन २०१३ मध्ये त्यांचा विवाह ‘फिशरीज’ विषयातील पदवी घेतलेल्या दर्शना यांच्याशी झाला. दर्शना यांनी रत्नागिरी येथील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण, अनुभव, कौशल्य व तांत्रिक पाठबळाच्या जोरावर दोघांनी मत्स्य व्यवसायात उल्लेखनीय काही करायचे ठरवले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ‘स्टार्टअप’ उद्योगाद्वारे गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रकल्प उभारण्याचे निश्‍चित केले. नौका व्यवसायातील उत्पन्न त्यात गुंतवले. दोघांनी आंध्र प्रदेश, गुजरात आदी ठिकाणी भेटी देऊन तेथील प्रकल्प अभ्यासले. कोळंबी बीज पुरवणाऱ्या एका कंपनीच्या सहकार्यातून कामास सुरूवात झाली. गोड्या पाण्यातील व्हेनामी प्रकल्प

  • खाऱ्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात रोगांचे प्रमाण कमी असल्याने तेथे कोळंबी संवर्धन करणे सोपे असते. व्हेनामी कोळंबीचे कल्चरही भारतात पुरेसे उपलब्ध असून त्याला निर्यातक्षम मूल्य आहे असे गौरव सांगतात.
  • रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे नदी शेजारील जागा भाडेतत्त्वावर घेतली.
  • २३ गुंठ्यांत प्रकल्प. त्यासाठी २२ लाखांपर्यंत गुंतवणूक. प्रति पाँड १०५० चौरस मीटर.
  • व्हेनामीबरोबर थिलापिया मत्स्य उत्पादनासाठी ६०० चौरस मीटरचा दुसरा पाँड विकसित केला.
  • व्हेनामी कोळंबीचे वर्षातून तीन वेळा उत्पादन.
  • पाण्यात सोडलेल्या एकूण बीजाच्या ८० टक्के बीजांचे संवर्धन झाले तर फायदा होतो.
  • कोरोना संकटात प्रकल्प सुरु. बीज तमिळनाडू येथून आणले जाते. गोव्यात विमानमार्गे व तेथून वाहनातून रत्नागिरीत येते. टाळेबंदीमुळे वाहतूक बंद होती. तरीही रीतसर परवानग्या घेऊन बीज आणण्यात यश मिळवले.
  • उत्पादन

  • चार महिन्यांची बॅच. आर्थिक गरज भासल्यास दोन महिन्यांनीही विक्री शक्य.
  • प्रति ४० हजार ‘सीड’ पाँडमध्ये सोडल्यास प्रति ३० ग्रॅम वजनाच्या कोळंबीचे एकूण उत्पादन १२०० किलो मिळते. सीडची संख्या व कोळंबीच्या वजनानुसार उत्पादन.
  • दोन महिन्यांनी १० ग्रॅम, तर चार महिन्यांत वजन ३० ग्रॅम होते.
  • आतापर्यंत चार बॅचमध्ये यशस्वी उत्पादन.
  • विक्री, बाजारपेठ व्हेनामी कोळंबीला स्थानिक बाजाराबरोबर हॉटेलमधून चांगली मागणी आहे. रत्नागिरीत कोळंबीवर प्रक्रिया करून निर्यात करणाऱ्या काही कंपन्या आहेत. त्यांना कोळंबी देण्यात येते. यंदा अनियमित पावसामुळे उत्पादन कमी होते. परिणामी, जागेवर दर चांगला मिळाला. स्थानिक बाजारपेठेत जीवंत कोळंबीला किलोला ५० रुपये दर अधिक मिळतो.

  • २५ मे २०२० पासून टप्प्याटप्प्याने ४० हजार, ८० हजार व एक लाख असे बीजचे प्रसारण केले.
  • पहिल्या वर्षी १० ग्रॅम वजनाच्या कोळंबीची २५० रुपये प्रति किलो दराने विक्री केली. जुलै २०२० मध्ये दुसरी बॅच घेतली.
  • १२० दिवसांच्या बॅचमध्ये ३० ते ३३ ग्रॅम वजनाची कोळंबी तयार होते. त्यास प्रति किलो ४२० ते ५२० रुपये दर मिळतो. त्यासाठी प्रति किलो २०० ते २५० रुपये खर्च येतो. १८० ते २०० रुपये प्रति किलो नफा होऊ शकतो.
  • तांत्रिक बाबी

  • शेजारील नदीचे पाणी विहिरीत आणले जाते. विहिरीतील पाणी पंपाच्या साह्याने पाँडमध्ये येते. त्यात १५ लाख लिटर पाणी असते.
  • जागा नदीकिनारी असल्यामुळे सुरवातीला पाँडमध्ये साप, खेकडे आदींचा त्रास झाला. मग चारही बाजूंनी ‘पिचींग’ केले. पावसाचे पाणी पाँडमधील पाण्यात मिसळू नये किंवा पक्षांच्या माध्यमातून पदार्थ पाँडच्या पाण्यात जाऊ नये यासाठी जाळीचे नेट बांधले. कमी खर्चात पॉंडबांधणीचे काम लिलया केले. पाणी साठून राहण्यासाठी ५०० मायक्रॉन जाडीचे प्लॅस्टीक कव्हर अंथरले आहे. प्राणी येऊन ते कुरतडणार नाही याचा बंदोबस्त केला आहे.
  • 'झूप्लॅंक्टन’ हे कोळंबीचे खाद्य असते. ते वाढण्यासाठी गुळ, कोंडा, तांदुळ पीठ, मीठ व माशाचे पाणी (कुटी) आदींपासून मिश्रण तयार केले जाते. पाण्याचा रंग हिरवा येतो. पाण्याची क्षारता, पीएच, नायट्रेट यांचे प्रमाण तपासण्यात येते.
  • बीज पाँडमध्ये सोडल्यानंतर दहा ते बारा दिवस पाण्यात उतरता येत नाही.
  • दिवसातून दोन तासांनी पाण्याची तपासणी. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण साडेतीन पीपीएमपेक्षा जास्त असावे लागते.
  • रात्रभर वीज आवश्यक. त्यासाठी १७. ५ केव्ही क्षमतेचा जनरेटर.
  • पाण्याचे ‘रिसायकलिंग’

  • कोळंबीच्या विष्ठेमुळे पाणी खराब होण्याची शक्यता असते. ही विष्ठा वा स्लरी दुसऱ्या पॉंडमध्ये सोडली जाते. तेथे सध्या प्रायोगीक तत्वावर चार टिलापीया माशांचे संवर्धन केले आहे. त्यांना या स्लरींचे खाद्य मिळून पाणी स्वच्छ होते. स्वच्छ केलेले पाणी पुन्हा कोळंबीच्या पाँडमध्ये सोडले जाते.
  • टिलापियावर जगणाऱ्या जिताडा माशांचेही उत्पादन लवकरच घेण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव परवानगीसाठी मत्स्य खात्याकडे पाठवला आहे. स्लरीचा खत म्हणूनही वापर होतो. शेतकऱ्यांकडून त्यास मागणी आहे.
  • दर्शना यांचा अनुभव मुंबई येथील ‘महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट’ कार्यालयात दर्शना यांनी काम केले आहे. तसेच रत्नागिरी- वाडामिरा येथील संशोधन केंद्रात कोळंबी संवर्धन व वृध्दी यावर त्यांनी संशोधन केले आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या जिल्हास्तरीय समितीवर शेतकरी म्हणून त्यांची निवड झाली आहे. संपर्क- गौरव भोई- ९८९०८५९४९५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com