पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथ

औरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने पारंपरिक पिकांपेक्षा नगदी पिकांवर भर देत पाच एकरांत सीताफळ, पेरू, मोसंबी आदींची फळबाग विकसित करीत पीकबदल साधला. जोडीला शेळीपालन व दोन गायींच्या दुग्धव्यवसायाची जोड देत कुटुंबाचं अर्थकारण उंचावले आहे.
Bhosale's guava Garden.
Bhosale's guava Garden.

औरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने पारंपरिक पिकांपेक्षा नगदी पिकांवर भर देत पाच एकरांत सीताफळ, पेरू, मोसंबी आदींची फळबाग विकसित करीत पीकबदल साधला. जोडीला शेळीपालन व दोन गायींच्या दुग्धव्यवसायाची जोड देत कुटुंबाचं अर्थकारण उंचावले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील डाळिंबाचे आगार म्हणून करमाड परिसराची ओळख आहे. त्यातील जडगाव हे तर डाळिंबाचेच गाव. या गावशिवारातील दुसरं पीक म्हणाल तर मोसंबी. परंतु पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत याच गावातील संजय बापूराव भोसले यांनी सीताफळ, पेरू या पिकांतून बदल साधला. मोसंबी पीक कायम ठेवलं. साधारण पाच एकर क्षेत्र त्यांनी फळपिकांना देताना सीताफळ व पेरू प्रत्येकी दोन एकर व मोसंबी एक एकर असे नियोजन केले आहे. नव्या फळबागांमध्ये आंतरपिकांचे प्रयोग करीत शेळीपालन व छोट्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाची जोडही दिली आहे. जनावरांसाठी कायम एक एकरांत चारा व्यवस्थापन असतं. हे सारे प्रयत्न कुटुंबाचा रहाटगाडा समर्थपणे चालविण्यात महत्त्वाची भूमिका निभावित आहेत. पक्‍कं घर याच बदललेल्या अर्थकारणातून उभे राहिले आहे. कुटुंबातील प्रत्येकाचे योगदान संजयराव पूर्वी कारखान्यात नोकरी करणारे असल्याने बांधावरचे शेतकरी म्हणून ओळखले जायचे. त्यांचे वडील बापूराव जडगावचे माजी सरपंच. त्यांच्या काळात लोकसहभागातून गावशिवारातील ओढ्यावर जवळपास ८ सिमेंट बंधारे झाले. त्यातून शिवारातील सिंचनाला हातभार लागला. हे संस्कार संजयरावांना वडिलांकडून मिळालेच होते. शेतीत उतरल्यावर त्यांनी दुभत्या गायींच्या संगोपनापासून सुरवात केली. कारखान्यातील नोकरी सोडून अलीकडील वर्षांत डाळिंबाच्या पट्ट्यात सीताफळ व पेरूची लागवड करणारा पूर्णवेळ प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे. या प्रयोगांत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्ष नोकरी व त्यानंतर शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेणारा त्यांचा मुलगा वैभव याचेही योगदान आहे. पूरक उद्योगात संजयरावांची पत्नी सौ. मीराबाई यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. सून सौ. अर्चना देखील कुटुंबात व शेतीकामांत एकरूप झाल्या आहेत. कुटुंबाला समाधानी ठेवण्यासाठी जेवढी आर्थिक स्थिरता हवी असते ती मिळत असल्याचं समाधान यातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतं. नव्या फळपिकांचा विचार

  • सन २०१६ मध्ये एनएमके गोल्डन सीताफळ लागवड केली. आज ६०० पर्यंत झाडे
  • आहेत. दोन एकरांत सुमारे ४५० क्रेटस (प्रति क्रेट २० किलो) उत्पादन घेण्यापर्यंत ते पोचले आहेत. यंदा सीताफळाची बाग साडेतीन लाख रुपयांना बागवानाला दिली. त्यापूर्वी दोन वेळा विक्रीतून ६० रुपयांपासून ते १२० रुपये प्रति किलो दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
  • दोन एकर पेरू बागेतून दोनशे ते तीनशे क्रेट पर्यंत उत्पादन व किलोला ४० ते ५० रुपयांपर्यंत दर त्यांना मिळतो आहे. मोसंबीचे यंदाच उत्पादन सुरू झाले आहे. दोन टन विक्री लगतच्या करमाड उपबाजारात करून १५ ते २५ रुपये प्रति किलोपर्यंतचा दर त्यांना मिळाला.
  • व्यवस्थापन व आंतरपिके

  • खड्‌डे करून वा ठिबकद्वारे रासायनिक खते दिली जातात. सिंचनाच्या सोयीसाठी विहीर आहे. सुखना धरणावरून पाइपलाइन केली असून ३० बाय ३- मीटर आकाराचे शेततळे घेतले आहे.
  • संपूर्ण शेती ठिबकवर आहे. सुमारे ५० केशर आंबा झाडांची लागवड केली असून फळपिकांचा एकच बहार घेण्यावर भर असतो. सात एकर बागायती शेती असलेल्या संजयरावांनी पेरूबागेत कांदा, भोपळा, मोसंबीत मेथी, भेंडी, सीताफळात कपाशी, कांदा अशी आंतरपिके घेतली. वर्षाला किमान ३० हजार ते ७० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न देणारी हे तंत्र आजवरच्या शेतीखर्च भागविण्यात मोठा हातभार लावून गेली आहेत. आजघडीला सुरू असलेल्या पेरूतील भोपळ्याचे एक दिवसाआड आठ ते १० क्रेट (प्रति क्रेट २० किलो) उत्पादन व प्रति क्रेट २५० रुपये दर मिळतो आहे.
  • पूरक उद्योग

  • अडल्या नडल्या वेळी आर्थिक आधार देण्यासाठी शेळीपालन हा चांगला पूरक उद्योग असल्याचं संजयराव सांगतात. मीराबाईंनी यासाठी पुढाकार घेत २०१७ मध्ये साडेतीनहजार रुपये गुंतवून एक शेळी घेतली. एकीच्या दोन, दोनच्या चार असा विस्तार सुरू झाला. पिल्ले झाली की पाट ठेवायची व बोकड तयार करून विकायचे या उद्देशाने तीन वर्षांत १५ शेळ्या व पाच पिल्लांपर्यंत उद्योगाचा
  • विस्तार केला केला आहे. वर्षाला चार ते पाच बोकड विक्रीसाठी मिळतात. सहा ते ९ हजार रुपयांना प्रति बोकडाची विक्री होते. त्यातून ३० हजार ते ४० हजार रुपयांचा हातभार लागतो.
  • शिवाय गायींपासून दिवसाला दोन वेळा मिळून प्रत्येकी १० लिटरपर्यंत दूध उपलब्ध होते.
  • घरी गरजेपुरते ठेऊन डेअरीला दिले जाते. त्यातून वर्षाकाठी ६० हजार ते ७० हजार रुपये मिळतात. या पूरक उद्योगातून अर्थकारणाला हातभार लागतो. शिवाय जनावरांपासून लेंडीखत व शेणखतही उपलब्ध होते.
  • संपर्क- वैभव भोसले-९६८९५०७६३१ संजय भोसले-९९२१९२५५०९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com