शेतीमध्येही रंगवितो प्रयोगशीलतेचे धडे

परभणी येथील गांधी विद्यालयामध्ये कला शिक्षक असलेले भूपेंद्र भानुदासराव सुतार हे शिक्षकी पेशा सांभाळत चांगल्या प्रकारे शेती करतात. शेतीमध्ये प्रयोगशीलता जपत ऊस, केळी याचबरोबरीने भाजीपाल्याच्या आंतरपिकातूनही चांगला नफा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
Bhupendra sutar showing quality cauliflower in his farm
Bhupendra sutar showing quality cauliflower in his farm

परभणी येथील गांधी विद्यालयामध्ये कला शिक्षक असलेले भूपेंद्र भानुदासराव सुतार हे शिक्षकी पेशा सांभाळत चांगल्या प्रकारे शेती करतात. शेतीमध्ये प्रयोगशीलता जपत ऊस, केळी याचबरोबरीने भाजीपाल्याच्या आंतरपिकातूनही चांगला नफा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याचबरोबरीने जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यावर भर दिला आहे. करजोद (ता. रावेर, जि. जळगाव) हे भानुदासराव सुतार यांचे मूळ गाव. परंतु शिक्षकीपेशामुळे ते १९७० मध्ये परभणी येथील नूतन विद्या मंदिर या शिक्षण संस्थेमध्ये रुजू झाले. त्यामुळे ते परभणी येथे स्थायिक झाले. भानुदासराव सुतार यांना पहिल्यापासून शेतीची आवड. त्यामुळे त्यांनी ३० वर्षांपूर्वी परभणी शहरापासून १५ किलोमीटरवरील आमडापूर शिवारात पाच एकर मध्यम प्रकारची जमीन खरेदी केली. जेव्हा जमीन खरेदी केली त्या वेळी तेथे झाडेझुडपे वाढलेली होती. सलग पाच एकर क्षेत्र असल्यामुळे अति पावसाच्या काळात सुपीक माती वाहून गेल्याने दगडगोटे उघडे पडले होते. जमिनीची धूप थांबविण्यासाठी शेतामध्ये विशिष्ट अंतरावर सुतार यांनी बांध टाकले. त्यामुळे माती वाहून जाणे बंद झाले, जमिनीत पाणी मुरले. सुपीक माती टिकून राहिली. त्याचा पीक उत्पादनवाढीसाठी फायदा होऊ लागला. सुतार यांच्या शेताजवळून जायकवाडी धरणाचा डावा कालवा जातो. सुरुवातीच्या काळात भानुदासराव शेती करत असताना कोरडवाहू शेतीमध्ये मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी आदी पिकांची लागवड करत होते. या पीकपद्धतीतून जेमतेम उत्पन्न मिळायचे. काही वेळा सालगडी, मजुरी तसेच पीक व्यवस्थापनावर केलेला खर्चदेखील निघायचा नाही. आंतरमशागतीची कामे, पीक काढणीची कामे यासाठी मजुरांची मोठी समस्या होती. जायकवाडी धरण दरवर्षी भरत नव्हते. त्यामुळे कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी मिळण्याची खात्री नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन शेतामध्ये शाश्‍वत सिंचन स्रोत असावा यासाठी सुतार यांनी २०१० मध्ये विहीर आणि २०१४ मध्ये कूपनलिका खोदली. शेतीमध्ये पुरेशी सिंचनाची सुविधा तयार झाल्यामुळे सुतार यांनी २०११ मध्ये अडीच एकर ऊस लागवड केली. पिकाचे चांगले व्यवस्थापन ठेवले. पहिल्या वर्षी १२५ टन ऊस उत्पादन मिळाले. साखर कारखाना त्यांच्या शेतापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे सुतार हे नियमित अडीच ते तीन एकरांवर ऊस लागवड करतात.   पीक बदलाला चालना भानुदासराव सुतार हे मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा भूपेंद्र हे पदव्युत्तर पदवीधर असून, परभणी येथील गांधी विद्यालयातील माध्यमिक विभागात कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनाही वडिलांप्रमाणेच शेती करण्याची आवड आहे. रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी पूर्णवेळ ते शेती नियोजनामध्ये असतात. पीक उत्पादन आणि आर्थिक मिळकत वाढविण्यासाठी शेतीमध्ये त्यांनी प्रयोगशीलता जपली. दोन वर्षांपूर्वी त्यांनी दोन एकरांवर डाळिंबाची लागवड केली. परंतु कीड, रोगांच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक खर्च वाढू लागला आणि नोकरीमुळे त्यांना फळबागेकडे पुरेसे लक्ष देणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे डाळिंब बाग काढून टाकावी लागली. परंतु ऊस, केळी पिकांमध्ये त्यांनी चांगले लक्ष दिले आहे. उसामध्ये भाजीपाल्याचे आंतरपीक सुतार यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दोन एकरांवर तीन फूट अंतरावर सरी ओढून उसाच्या को-८६०३२ या जातीची लागवड केली. त्यातील १० गुंठे क्षेत्रावर फ्लॉवर आणि कोबीच्या रोपांची लागवड केली. तसेच १२ सऱ्यांमध्ये कोथिंबिरीची लागवड केली. उसासोबतच सर्व पिकांना विद्राव्य खते आणि पुरेसे पाणी मिळाले. योग्य व्यवस्थापनामुळे फ्लॉवर आणि कोबीचे चांगले उत्पादन मिळाले. परभणी येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये फ्लॉवरला १० रुपये आणि कोबीला ७ रुपये किलो दर मिळाला. तसेच कोथिंबिरीलाही त्या काळात चांगला दर मिळाला. या आंतर पिकातून खर्च वजा जाता साठ हजाराचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले. यातून ऊस व्यवस्थापनाचा बराचसा खर्च निघाला. त्यांना उसाचे एकरी ४० ते ४५ टन उत्पादन मिळते. खोडवा उसामध्ये पाचटाचे आच्छादन केल्याने पाण्याची बचत होते. केळी लागवडीचे नियोजन  भूपेंद्र यांचे आजोळ जळगाव जिल्ह्यातील आहे. त्यांचे मामा विठ्ठल दांडेकर हे केळीचे चांगले उत्पादन घेतात. मामांच्या मार्गदर्शनाखाली भूपेंद्र यांनी गतवर्षी मे महिन्यात दोन एकरांवर केळी लागवड केली. लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळून सहा फुटांवर सऱ्या पाडल्या. ठिबक सिंचन संचाद्वारे पाणी देत त्यांनी सऱ्यावर सहा फूट अंतरावर उतिसंवर्धित रोपांची लागवड केली. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या. योग्य नियोजनामुळे त्यांना केळीचे चांगले उत्पादन मिळू लागले आहे. परभणी मार्केटमध्ये प्रति क्विंटल ५५० ते ७०० रुपये दर मिळाला. केळीच्या कडेने त्यांनी गजराज गवताची लागवड केल्याने उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण झाले. तसेच जनावरांसाठी चाऱ्याची सोय झाली. सुतार हे शिक्षक असल्यामुळे दैनंदिन शेती व्यवस्थापनासाठी एक सालगडी कायम स्वरूपी ठेवला आहे. शेतीकामासाठी बैलजोडी आहे. बैलजोडीसाठी त्यांनी शेतामध्ये मका, कडवळ चारा पिकांची लागवड केली आहे. येत्या काळात दीड एकरावर हळद लागवडीचे नियोजन केले आहे. शेणखत, ठिबक सिंचनाचा वापर  सुतार यांची जमीन मध्यम प्रतीची असल्याने सुपीकतेसाठी शेणखताचा वापर करण्यावर त्यांचा भर आहे. परिसरातील साखर कारखानाच्याजवळ गोपालकांचा तळ असतो. या ठिकाणी गाईंचे शेणखत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. या तळापासून शेती जवळच असल्याने शेणखताच्या वाहतुकीचा खर्च कमी लागतो. त्यामुळे सुतार ऊस, केळी तसेच अन्य पिकांसाठी शेणखताचा वापर आवर्जून करतात. यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आहे. पिकांना ठरावीक दिवसांनंतर जिवामृताचा वापर केला जातो.  प्रवाही पद्धतीने पाण्याचा अति वापर होतो. उताराच्या जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते. त्यामुळे सुतार यांनी ऊस, केळी, भाजीपाला पिकासाठी ठिबक सिंचन पद्धत आणि विद्राव्य खताचा अवलंब केला आहे. वर्षभराच्या शेती व्यवस्थापनाचा जमा खर्च त्यांनी ठेवला आहे. त्यानुसार पुढील वर्षीचे आर्थिक नियोजन केले जाते. लाल कंधारी गाईचे संगोपन  सुतार यांचे परभणीमध्ये २० सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. कुटुंबासाठी पुरेसे दूध उपलब्ध होण्यासाठी परभणी येथील घराजवळ त्यांनी दोन लाल कंधारी गाईंचे संगोपन केले आहे. एक गाय पाच लिटर दूध उत्पादन देते. दूर असलेले शेत आणि शहरातील घराजवळ चारा साठवणुकीची सोय नसल्याने त्यांना सध्या चारा विकत घ्यावा लागतो.  - भूपेंद्र सुतार,  ९८९०५४०५३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com