agricultural news in marathi success story of farmer from pune district doing profitable farming | Agrowon

शेणस्लरी निर्मिती झाली आता अधिक सोपी

संदीप नवले
बुधवार, 28 एप्रिल 2021

पुणे जिल्ह्यातील व्याहाळी येथील प्रगतिशील अतुल शिंगाडे यांची ४० एकर डाळिंब, १५ एकर द्राक्ष व १० एकर पेरू अशी फळबाग आहे. त्यास शेण- गोमूत्र स्लरी देण्यासाठी यांत्रिक पध्दतीचा कौशल्यपूर्ण वापर केला आहे.

पुणे जिल्ह्यातील व्याहाळी (ता. इंदापूर) येथील प्रगतिशील, अभ्यासू शेतकरी अतुल शिंगाडे यांची सुमारे ४० एकर डाळिंब, १५ एकर द्राक्ष व १० एकर पेरू अशी फळबाग आहे. त्यास शेण- गोमूत्र स्लरी देण्यासाठी यांत्रिक पध्दतीचा कौशल्यपूर्ण वापर केला आहे. दहाहजार लिटरची टाकी, गीअरबॉक्स, मोटर आदींचा वापर करून स्लरी योग्य रीतीने ढवळण्याचे काम होते. त्यातून मनुष्यबळ, वेळ व श्रम यांची बचत होण्यास मदत झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका पूर्वी काही प्रमाणात दुष्काळी होता. अलीकडील काळात शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवलंब आणि पीक बदल साधला. त्यातून आर्थिक स्तर उंचावला. तालुक्यातील व्याहाळी गावातील शिवाजी दामू शिंगाडे यांची प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख आहे. सुधारित तंत्राचा वापर करीत त्यांनी शेतीत अनेक प्रयोगही केले आहेत. मुलगा अतुल पूर्णवेळ शेती पाहतात. तर शरद पुण्यात त्वचारोग तज्ञ आहेत.

शेतीचे नियोजन
अतुल यांची एकूण ६० एकर शेती आहे. पूर्वी पाटपाण्यावर ऊस हे मुख्य पीक घेतले जायचे. वडील शिवाजी यांचा बारामती येथील पद्मश्री अप्पासाहेब पवार यांच्याशी संपर्क आला. त्यानंतर शेतीत बदल सुरू झाले. माळरानाचे सपाटीकरण करून १९८७ मध्ये डाळिंब लागवडीस सुरवात झाली. ठिबकचा अवलंब सुरू झाला. उत्पादन व उत्पन्नात वाढ झाली. टप्प्याटप्प्याने संत्री, बोर, पपई, उर्वरित भुसार पिके घेण्यास सुरवात केली. सध्या डाळिंब मुख्य पीक असून ते ३५ ते ४० एकरांत आहे. द्राक्षे १५ एकर, ॲपल बोर २ एकर, पेरू नवी लागवड १० एकर व उर्वरित क्षेत्रावर ऊस, चारा पिके आहेत.

स्लरी निर्मिती तंत्राचा पर्याय
रासायनिक खतांचा असंतुलित वापर असल्याने जमिनीचा पोत खालावत चालला होता. बदलत्या वातावरणामुळे तेलकट डाग रोगाचा डाळिंबाला फटका बसला. तीन- चार वर्षे समस्यांशी झुंजताना उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत खाली आले. हताश न होता अतुल त्यावर मार्ग शोधत होते. एकदा शेतकऱ्याकडील भेटीत खिलार गाय व शेण- गोमुत्राच्या स्लरीचा डाळिंब पिकासाठीचा वापर असा प्रयोग पाहण्यात आला. त्याचे महत्त्व जाणून सविस्तर अभ्यासही केला. कमी मनुष्यबळ व श्रमात स्लरीनिर्मिती कशी करता येईल याचा विचार व शोध सुरू झाला. अनेक अडचणी आल्या. मात्र चिकाटीने सर्व माहिती संकलित करून व स्वतःमधील कौशल्यगुण वापरून अतुल यंत्र व तंत्रनिर्मिती करण्यात यशस्वी झाले.

असे आहे स्लरी निर्मिती तंत्र
टाकीनिर्मिती

 • जमिनीत दहा फूट खोल, दहा फूट व्यासाची गोलाकार सिमेंट क्राँक्रिटची टाकी बसवली. त्याची क्षमता १० हजार लिटर आहे. प्लास्टर करून ती ‘वॉटरप्रूफ’ केली.
 • त्यानंतर गोठ्याचे बांधकाम केले. त्यासाठी जवळपास दोन महिने लागले. गव्हाणी बसविल्या.
 • मुक्त संचार गोठा बाहेरील बाजूला बनविला. शुद्ध पाण्याची सोय केली.
 • फलटणच्या गोशाळेतून पंधरा खिलार (देशी) गायी आणल्या.
 • शेण व गोमूत्र या टाकीत संकलित केले जाते.
 • टाकीत बेसनपीठ २५ किलो, गूळ २५ किलो, बांधावरची माती ५० किलो असेही मिश्रण तयार केले जाते.

ढवळण्याचे तंत्र
स्लरी सतत ढवळण्यासाठी मनुष्यबळ व श्रम कमी करणारी यंत्रणा वापरणे गरजेचे होते. एका दूध संकलन केंद्रात तशी पाहणी केली होती. त्यापासून प्रेरणा घेत तसे यंत्र तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यात असंख्य अडचणी आल्या. ढवळण्यासाठी चार पाती, तीन एचपी क्षमतेची मोटर बसवली. पण त्याचे ‘आरपीएम’ योग्य नसल्याने दाबाने ती जळाली. आणखी सुधारणा करत मोटार सायकलीची चेन व गियर बसवले. तरीही मोटर ‘ओव्हरलोड’ होऊन बंद पडली होती. अभ्यासातून गियरबॉक्स व ‘आरपीएम’ लक्षात घेतले. लोखंडी चॅनलची फ्रेम तयार करून पुणे येथून जुन्या बाजारातून दोन गियरबॉक्स आणले. चाचण्या घेऊन १५ ‘आरपीएम’ चा निश्‍चित केला. तरीही मोटर गरम होऊ लागली. याचे कारण म्हणजे १२ हजार लिटर स्लरी ढवळण्यासाठी दाब येत असल्याचे लक्षात आले. मग टाकाऊ वस्तूंमधून जुन्या ट्रॅक्टरचा क्राऊन व पिनीयन आणला. त्यानंतर प्रयत्नांना यश आले.

स्लरी वापरण्याचे तंत्र
स्लरी टाकीतून उचलण्यासाठी मडपंप बसवला. स्लरी पिकांना देण्यासाठी नाशिक येथून एक हजार लिटर क्षमतेची ट्रॅक्टरचलित फवारणी टाकी घेतली. दोन मजूर व चालक यांच्या साह्याने डाळिंब, द्राक्षात प्रत्येक ड्रीपरखाली एक लिटर (प्रति झाड दोन लिटर) स्लरी दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला दिली जाते.या पद्धतीने एका दिवसात सुमारे ८ ते १० एकरांपर्यंतचे क्षेत्र ‘कव्हर’ होते. संपूर्ण यंत्रणा तयार करण्यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च आला.

स्लरीचे झाले फायदे

 • स्लरी वापर, पिकांचे अवशेष यांचा सातत्याने वापर केल्याने जमिनीचा पोत सुधारला
 • एकूण व्यवस्थापनातून फळांना चकाकी, गुणवत्ता आली.
 • सेंद्रिय पद्धतीने अन्नद्रव्ये देणे शक्य झाले.
 • माती परिक्षणात सेंद्रिय कर्ब वाढल्याचे आढळले.
 • डाळिंबाचे एकरी ५ ते सात टन, द्राक्षाचे ८० ते १० टन उत्पादन मिळते.

संपर्क- अतुल शिंगाडे- ९९२३६०९९३९


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...