agricultural news in marathi success story of farmer from pune district taking brinjal production throughout the year | Page 2 ||| Agrowon

वर्षभर वांगी उत्पादनाचे गवसले तंत्र

गणेश कोरे
गुरुवार, 26 ऑगस्ट 2021

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील योगेश तोडकरी यांना वर्षभर भरीत वांगी उत्पादन घेण्याचे तंत्र गवसले आहे. एप्रिल व सप्टेंबर अशा दोन हंगामांत ते प्रत्येकी ३० गुंठ्यांत वांगी घेतात. एकरी १५ ते २० टन उत्पादन घेत आहेत.
 

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील योगेश तोडकरी यांना वर्षभर भरीत वांगी उत्पादन घेण्याचे तंत्र गवसले आहे. एप्रिल व सप्टेंबर अशा दोन हंगामांत ते प्रत्येकी ३० गुंठ्यांत वांगी घेतात. एकरी १५ ते २० टन उत्पादन घेत गुणवत्तापूर्ण वांग्यांची ८० टक्के बाजारपेठ त्यांनी खासगी कंपन्यांच्या मॉलद्वारे मिळवली आहे.

अलीकडील काळात खासगी कंपन्या मॉलच्या माध्यमातून शेतीमाल विक्रीत कार्यरत आहेत. त्याचा फायदा होऊन शेतकऱ्यांना आपल्या परिसरातील संकलन केंद्रात माल पुरवणे शक्य झाले आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव हा पट्टा भाजीपाला व फळपिकांसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात विविध कंपन्यांची संकलन केंद्रेही सुरू झाली आहेत. याच नारायणगावातील योगेश तोडकरी यांनी कंपन्यांना वर्षभर वांगीपुरवठा करण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. त्यांची साडेतीन एकर शेती आहे. वांगी हे त्यांचे मुख्य पीक आहे. फ्लॉवर, कांदा, ऊस यांसह विविध भाजीपाला ते घेतात.

संकलन केंद्रांवर जाऊन अभ्यास केला. तेथील माल पुणे, मुंबई, कल्याण, बंगलोर आदी ठिकाणच्या विविध मॉल्सला पाठविला जातो व वांग्याला नियमित मागणी असल्याचे त्यातून समजले.

वांग्याचे व्यवस्थापन

 • योगेश एप्रिल व सप्टेंबर असे प्रत्येकी सहा महिन्यांचे दोन हंगाम निवडतात. प्रत्येक प्लॉट साधारण सहा महिने सुरू राहतो. म्हणजेच वर्षभर वांगे पुरवणे शक्य होते. प्रत्येक हंगामात २५ ते ३० गुंठे क्षेत्र असते.
 • बाजारात मागणी असलेल्या वाणाची निवड ते करतात. योगेश सांगतात की कंपन्यांच्या चर्चासत्रे, मॉल्सची मागणी यातून वाणाची गरज लक्षात आली.
 • वाणाचे वैशिष्ट्य- टिकवणक्षमता अधिक, फळाचा काळसर रंग व लंबवर्तुळाकार आकार, ३०० ते ३५० ग्रॅम वजन.
 • नर्सरीतील सुमारे ३५ दिवसांच्या रोपांची लागवड होते.
 • ठिबक सिंचनासह गादीवाफा, मल्चिंग पेपरचा वापर होतो. त्यामुळे रसशोषक किडींचा व तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. दोन गादीवाफ्यातील अंतर पाच फूट तर दोन रोपांमधील अंतर अडीच फूट असते. लागवड करण्यापूर्वी गादीवाफ्यावर सूक्ष्म अन्नद्रव्ये, निंबोळी पेंड यांचा वापर होतो. अर्थात, दर दोन वर्षांनी माती परीक्षण होते. त्यानुसार अन्नद्रव्यांचे नियोजन होते.
 • शेणखताचा दरवर्षी पाच टन प्रति ३० गुंठे याप्रमाणात वापर होतो. सुरुवातीच्या काळात अनुभव कमी असल्याने वजनाने झाडे वाकून वांगी जमिनीला टेकली. त्यांचा दर्जा खालावला होता. मूळकुजीचा प्रादुर्भाव झाला होता. पुढील वर्षी ही बाब टाळण्यासाठी मांडवाची उंची वाढविण्यात आली.
 • रसशोषक किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रंगीत चिकट सापळ्यांचा वापर होतो. फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचा वापर महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी सौर पॅनेल व बल्बची व्यवस्था केली आहे.
 • योगेश सांगतात की शेतकऱ्यांसोबत चर्चा, बैठका याद्वारे अन्नद्रव्यांची गरज समजावून घेतो. त्यानुसार वापर करतो. लागवडीनंतर ७ ते १० दिवसांनी १९-१९-१९ या खताचा डोस देण्यास सुरुवात होते.
 • त्याचा वापर दोनवेळा होतो. प्रति ३० गुंठ्यांना तीन किलो ड्रीपद्वारे व सोबत मॅग्नेशिअम सल्फेट २ किलो दिले जाते. फुल्व्हिक ॲसिडचाही वापर होतो.
 • लागवडीनंतर ८ दिवसांनी कार्बेन्डाझिमसारख्या बुरशीनाशकाचे, तर १५ दिवसांनी सूत्रकृमी नियंत्रणासाठी रसायनाचे ड्रेंचिग केले जाते.
 • पुढील काळात ५-४५-५ अधिक झिंक या खताचे चार किलोप्रमाणे गरजेनुसार डोस दिले जातात.

उत्पादन व विक्री व्यवस्था
योगेश सांगतात, की एप्रिल हंगामातील वांग्याचे उत्पादन १० ते १५ टनांपर्यंत तर सप्टेंबर हंगामात हेच उत्पादन पाच टनांपेक्षा अधिक मिळते. एप्रिल हंगामातील वांग्यांना दर अधिक म्हणजे किलोला ३० रुपयांपर्यंत मिळतो. तर पुढील हंगामात तो १५ ते २० रुपये मिळतो. लागवडीपासून ते काढणी, विक्रीपर्यंतचा उत्पादन खर्च सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत होतो. प्रति तोडणीस २०० ते २५० किलो, तर आठवड्याला ९०० किलो ते एक टनांपर्यंत तोडणीचे नियोजन कंपन्यांच्या मागणीनुसार होते. केवळ दोन मजुरांमध्ये टप्प्याटप्प्याने तोडणीचे तंत्र योगेश यांनी कुशलतेने बसवले आहे. प्रतवारी करून क्रेटमध्ये माल भरला जातो. स्वतःच्या चारचाकी वाहनातून योगेश स्वतः माल नियोजित स्थळी पोहोचता करतात.

भाडेतत्त्वावरील वाहनाचा उपयोग न केल्याने प्रति खेप २०० ते २५० रुपये खर्च वाचवल्याचे ते सांगतात. सुमारे ८० टक्के माल कंपन्यांना, तर उर्वरित २० टक्के माल स्थानिक व्यापाऱ्यांना दिला जातो. ऊस व कांदा यांच्यासोबत वांगे पिकाने माझे अर्थकारण सुधारले आहे. वर्षभर रतिबासारखा त्याचा पुरवठा करतो असेही ते सांगतात.

कोरोना काळात विक्री
योगेश शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आहेत. कोरोना काळात बाजारपेठा बंद असल्याने विक्रीची मोठी समस्या उभी राहिली. अशावेळी कंपनीच्या माध्यमातून भाजीपाला बास्केट थेट विक्रीचा उपक्रम पुणे, मुंबई परिसरात राबविण्यात आला. त्या वेळी दररोज ५० ते ६० किलो वांग्यांचा पुरवठा करणे व त्यास बाजारपेठ मिळणे शक्य झाले. त्या काळात प्रति किलोला १० ते १५ रुपये दर मिळाल्याचे योगेश यांनी सांगितले.

संपर्क ः योगेश तोडकरी, ८८८८९२८१८१


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
रोपवाटिका व्यवसायासाठी ‘मॅट पॉट’...प्रगत देशामध्ये पर्यावरणपूरक पेपरपॉट निर्मितीसाठी...
जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी...तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील...
गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक ठरतेय...कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली...
तीस वर्षांपासून फळपिकांमध्ये सातत्य...भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ...
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...