Vikram Salunkhe with his tomato crop
Vikram Salunkhe with his tomato crop

नगदी पिकांच्या जोडीला काकडी, टोमॅटोचे बसवले चक्र

नागठाणे (ता. जि. सातारा) येथील विक्रम साळुंखे यांनी ऊस, आले या वार्षिक नगदी पिकांच्या जोडीला काकडी आणि टोमॅटो अशा हंगामी पिकांचे गणित बसवले आहे. त्यामुळे वर्षभर आवश्यक गरजांसाठी खेळता पैसा हाती राहतो. खंडाने जमीन घेत उत्पन्नाचे स्रोत आणखी वाढवले आहेत.

नागठाणे (ता. जि. सातारा) येथील विक्रम साळुंखे यांनी ऊस, आले या वार्षिक नगदी पिकांच्या जोडीला काकडी आणि टोमॅटो अशा हंगामी पिकांचे गणित बसवले आहे. त्यामुळे वर्षभर आवश्यक गरजांसाठी खेळता पैसा हाती राहतो. खंडाने जमीन घेत उत्पन्नाचे स्रोत आणखी वाढवले आहेत. एखाद्या पगारदारापेक्षा चांगले उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. घरी शेती असतानाही पडीक ठेवून अनेक जण नोकरी शोधत बसतात. शेतीमध्ये कष्ट असले तरी कोणाची बांधिलकी नाही. कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपली शेतीच बरी, या उद्देशाने नागठाणे (ता. जि. सातारा) येथील विक्रम काशिनाथ साळुंखे यांनी पदवीचे शिक्षण घेत असतानाच शेतीमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी वडिलांसह पाच भावांची एकत्रित ३० एकर शेती होती. विहिरीला पाणी कमी असल्याने बागायतीचे क्षेत्र कमी होते. विक्रमने पाच किलोमीटर अंतरावरील उरमोडी नदीवरून पाइपलाइन करून पाण्याची सोय प्रथम केली. घरातील बहुतांश शेतीही हळूहळू खर्च करत वहिवाटीखाली आणली. परिसरामध्ये आले हे प्रमुख पीक आहे. विक्रमनेही आले शेतीला प्राधान्य दिले. एकत्रित कुटुंबाच्या शेतीमध्ये आल्यासोबतच ऊस आणि पेरू ही पिके घेतली जात. या शेतीसाठी चुलते यशवंत साळुंखे यांचे चांगले मार्गदर्शन मिळाल्याचे विक्रम यांनी  सांगितले.   कुटुंब विभक्त झाल्यावर विक्रम यांच्या वाट्याला सहा एकर बागायत शेती आली. तसेच त्यांनी चार एकर खंडाने शेती घेतली आहे. बागायतीमध्ये तीन एकर पेरू बागही होती. पण हंगामी पिकांकडे वळण्याच्या उद्देशाने त्याच वर्षी पेरू बाग काढली. गेल्या सात- आठ वर्षांपासून २० ते ३० टक्के क्षेत्रावर आले, ऊस ही वार्षिक पिके घेतात. त्यातून वार्षिक एकरकमी उत्पन्न हाती येते. त्यासोबत काकडी आणि टोमॅटो या तीन महिने कालावधीच्या हंगामी पिकांचे प्रामुख्याने नियोजन केले जाते. यामुळे दर तीन महिन्यांनी प्रत्येक तोड्यागणिक रक्कम हाती येत राहते. हाती खेळता पैसा राहतो. सोबत घरगुती उपयोगासाठी गहू, हरभरा, ज्वारी अशी पिके घेतात.  वर्षातून तीन वेळा काकडी पीक  वर्षभर मागणी आणि कमी उत्पादन खर्च यांचा विचार करता २०१४-१५ मध्ये प्रथम एक एकर क्षेत्रात काकडी पीक घेण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक पद्धतीऐवजी सुतळी, तार, काठी, मल्चिंगचा वापर केला. थोडासा दर कमी मिळाला तरी चांगले उत्पादन मिळाल्याने आत्मविश्‍वास वाढला.  काकडी 

  • क्षेत्र - प्रत्येक हंगामात २ एकर
  • उत्पादन खर्च :  एकरी एक लाख रुपये. यात मल्चिंग, ठिबक, खते, बियाणे, तार, काठी, सुतळी, मजुरी यांचा समावेश.
  • सरासरी उत्पादन: एकरी ३० टन. 
  • सरासरी दर :   ७ रुपये प्रति किलो. 
  • उत्पन्न :  एकरी २.१० लाख रुपये. 
  • खर्च वजा जाता निव्वळ उत्पन्न :  १.१० ते १.७५ लाख रुपये. 
  • वर्षातून जून, ऑक्टोबर व जानेवारीमध्ये काकडीची लागवड करून तीन पिके घेत असल्याने ३.३ ते ५.२५ लाख रुपये हाती येतात. वर्षभर काकडीपासून उत्पन्न सुरू राहते.
  • वर्षातून दोन वेळा टोमॅटो  विक्रम हे ऑगस्ट व जानेवारीत टोमॅटोची लागवड करून वर्षात दोन वेळा पीक घेतात. टोमॅटो एकरी दीड ते पावणेदोन लाख रुपये उत्पादन खर्च होतो. एकरी सरासरी ४० टन उत्पादन मिळते. सरासरी सात रुपये दराप्रमाणे २.८० लाख रुपये मिळतात. खर्च वजा जाता एकरी ८० हजार ते एक लाख रुपये उत्पन्न मिळते. दोन एकरांतून वार्षिक १.६० लाख ते दोन लाख उत्पन्न  मिळते.  वार्षिक पिके 

  • आले दरामध्येही सातत्याने चढ उतार होते. यंदा आले पिकासाठी  दीड लाखापर्यंत खर्च करूनही केवळ २१ हजार रुपये उत्पन्न हाती आले. मात्र या पिकाचे एक चक्र ठरलेले आहे. एक-दोन वर्षे कमी उत्पन्न मिळाले तरी तिसऱ्या चौथ्या वर्षी त्याची सारी कसर भरून निघते. साधारण पाच वर्षांची सरासरी काढल्या, एकरी दीड ते दोन लाख रुपये नक्की हाती येतात. यात विक्रम घरचे बियाणे जपणे सर्वांत महत्त्वाचे मानतात. एक ते दोन एकर इतकेच क्षेत्र आल्याखाली ठेवले जाते.
  • ऊस २ एकरांपर्यंत असतो. एकरी ७० टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्याला सुमारे २५०० रुपये प्रति टन असा दर मिळतो. हे पैसे उशिरा मिळत असले तरी मोठी कामे करणे शक्य होते. 
  • खर्चाचे नियोजन 

  • १३ वर्षांसाठी चार एकर क्षेत्र खंडाने घेतले आहे. खंडापोटी वार्षिक ८० हजार रुपये खर्च होतात.   
  • कुटुंबात विक्रम स्वतः, वडील काशिनाथ, पत्नी सोनाली व मुलगा अनुज (वय सहा वर्षे) चार सदस्य आहेत. प्रत्येक सदस्यांची आरोग्य पॉलिसी, विमा पॉलिसी घेतली आहे. त्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च होतात. मुलगा अद्याप लहान असला तरी त्याच्या शिक्षणासाठी आतापासूनच २० ते ३० हजार रुपये बाजूला काढण्याचे नियोजन केले आहे. 
  • शेतातील कामे वेळेवर होण्यासाठी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटर, फवारणी पंपासह आवश्यक यंत्रे खरेदी केली आहेत. 
  • भांडवली खर्चात बचत होण्यासाठी खते, बियाणे, औषधे एकाचवेळी खरेदी केली जातात.
  • कृषी उत्पन्नातून साळुंखे यांनी नुकताच २५ लाख रुपये खर्च करून बंगला बांधला आहे. एक चारचाकी, दोन दुचाकीही घेतल्या आहेत.
  • बचत हीच कमाई विक्रम हे पिकाच्या उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. काकडीच्या पहिल्या प्लॅाटवर दोन प्लॅाट घेतात. यामुळे मल्चिंग, तार, काठी, सुतळी, मशागत, ठिबक सिंचनाची यांची बचत होते. काकडी पिकाचा आता चांगला अनुभव झाला आहे. कीड-रोगाचा अंदाज घेऊन प्रतिबंधात्मक फवारण्यांचे नियोजन केले जात असल्याने नुकसान टळते, खर्चात बचत होते. या शेतीमुळे २० मजुरांना कायमस्वरूपी काम मिळत असल्याचे विक्रम सांगतात.   प्रगतीत कुटुंबाचा मोठा आधार  शेती हे एकट्याचे काम नाही. घरातील प्रत्येक सदस्याची मदत होते. वडील व चुलते यांचे मार्गदर्शन मिळते. प्रत्यक्ष शेतीमध्ये चुलत बंधू संजय साळुंखे यांचेही मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे विक्रमने सांगितले.  पुरस्कार  शेतीतील विविध प्रयोगांबद्दल एका खासगी खत कंपनीचा राष्ट्रीय पातळीवरील आदर्श शेतकऱ्याचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार विक्रम साळुंखे यांना मिळाला  आहे.  - विक्रम साळुंखे,   ९१५८०१९१११   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com