agricultural news in marathi success story farmers from nashik district made their identity in carrot production | Agrowon

गाजराने शिंगवे गावाने आणली समृद्धीची लाली

मुकुंद पिंगळे
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

नाशिक जिल्ह्यातील शिंगवे (ता. निफाड) गावाने गाजर पिकात ओळख निर्माण केली आहे. सुधारित वाण, लागवड पद्धती, काढणीपश्‍चात व्यवस्थापन व विक्री व्यवस्था अशा सर्व आघाड्यांवर नेटके व्यवस्थापन गावातील शेतकऱ्यांनी राबवले. अर्थकारण उंचावण्यासह रोजगारनिर्मिती झाली.  

नाशिक जिल्ह्यातील शिंगवे (ता. निफाड) गावाने दोन दशकांपासून गाजर पिकात ओळख निर्माण केली आहे. सुधारित वाण, लागवड पद्धती, काढणीपश्‍चात व्यवस्थापन व विक्री व्यवस्था अशा सर्व आघाड्यांवर नेटके व्यवस्थापन गावातील शेतकऱ्यांनी राबवले. अर्थकारण उंचावण्यासह रोजगारनिर्मिती झाली. या पिकात गावाने ‘मास्टरी’ मिळवली असेच म्हणता येते.

नाशिक जिल्ह्यात शिंगवे (ता. निफाड) गावाने ऊस, द्राक्ष, गहू, सोयाबीन व भाजीपाला उत्पादनात प्रतिष्ठा व प्रयोगशीलता साधली आहे. सांस्कृतिक परंपरा, अध्यात्म या क्षेत्रातही गावाची ओळख आहे. पूर्वी टोमॅटो लागवडी मोठ्या प्रमाणावर होत्या. कालांतराने बदल झाले. गोदावरी काठी असल्याने काहीवेळा ७० टक्के गाव पुराच्या विळख्यात जाते. त्यामुळे अनेकदा खरीप हातून जाण्याची भीती असते. तरीही शेतकरी नवे पर्याय शोधून समस्यांवर मात करीत असतात. दोन दशकांपासून रब्बी हंगामातील गाजर हा शाश्‍वत पर्याय त्यांनी शोधला आहे.

वाण बदल व अभ्यासू शेती
सुमारे २० वर्षांपूर्वी शिंगवे गावात व्यावसायिक पद्धतीने गाजर उत्पादनास सुरवात झाली. सुधारित वाणांअभावी उत्पादन मर्यादित होते. शेतकरी अधिक उत्पादक्षम संकरित वाण घेऊ लागले तसे उत्पादन व गुणवत्तेत वाढ झाली. सातत्यपूर्ण अभ्यास व प्रयोगांतून दिशा मिळत गेली. नदीकडील जमीन कसदार पोयट्याची व बाकी अधिक प्रमाणात मध्यम काळी आहे. काही भाग माळरान असल्याने काहीअंशी पावसाळी लागवडीही होतात. जमिनीच्या प्रतवारीनुसार लागवडीचे प्रमाण ठरते.

वाणाची निवड
रंग, एकसारखा आकार, चकाकी व आकर्षकपणामुळे गावातील गाजराला नाशिक बाजारात पहिली पसंती असते. गर्द केशरी रंग, निमुळता मध्यम आकार (लांबी ८ ते १२ से.मी.) आणि ३.५ से.मी. व्यास अशा वाणाची लागवड केली जाते.

लागवडीसंबंधी मुद्दे

 • गावात शेतीयोग्य क्षेत्र ६- १,०४७ हेक्टर. पैकी ९६१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली.
 • जवळपास ४०० हेक्टर क्षेत्र गाजराखाली.
 • १० गुंठ्यांपासून ते १० एकरांपर्यंत शेतकऱ्यांकडील क्षेत्र
 • लागवड कालावधी- ५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी
 • एकरी बियाणे- एक किलो ते १२०० ग्रॅम
 • पीक कालावधी- १२० ते १५० दिवस
 • एकरी उत्पादन- चव आणि गुणवत्तेसह सरासरी १० ते १५ टनांपर्यंत. काही शेतकऱ्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापनातून २० टनांपर्यंत पल्ला गाठला. काढणीस उशीर झाला तरी काही दिवस गाजरे जमिनीत चांगली राहतात.
 • एकरी खर्च- ८५ ते ९० हजार रु.
 • खर्चातील काही तपशील (रु.)
 • मशागत (नांगरणी, फणणी, रोटाव्हेटर, वाफानिर्मिती) - ८ हजार
 • बियाणे १५ हजार.
 • खते, कीडनाशके - ६ हजार
 • तणनियंत्रण - ५ हजार.
 • काढणी मजुरी - ३० हजार. (२४० रुपये प्रति क्विंटल)
 • यंत्राद्वारे धुणे - साडेसात हजार (५० रुपये प्रति क्विंटल)
 • वाहतूक - १२ हजार (८० रुपये प्रति क्विंटल)

अर्थकारण
पूर्वी ऊस लागवडी अधिक होत्या. मात्र तोडणीच्या समस्या, कार्यक्षेत्रातील बंद साखर उद्योग याशिवाय वार्षिक पिकामुळे अर्थकारणाची कोंडी व्हायची. आता गाजराने मोठा आर्थिक आधार दिला आहे. सुमारे चार महिन्यांत हाती रोख पैसे पडतात. त्यामुळे लागवडी वाढल्या. एक रुपया खर्च केल्यास जोडून एक रुपया मिळतोच असे गाजर उत्पादक रामकृष्ण गोपाळा डेर्ले सांगतात.

झालेल्या सुधारणा

 • पूर्वी सपाट वाफ्यात बियाणे फोकून दिले जायचे. प्रवाही सिंचन पद्धत असल्याने गाजराची सड होण्याचा धोका असायचा.
 • आता गादी वाफा, तसेच ठिबक सिंचनाचा वापर. त्यामुळे पाणी बचत, विद्राव्य खते देणे शक्य होते.
 • गाजराचे पोषण चांगले होऊन वजन व रंग येतो.
 • काढणी करताना सुलभता आली. काही जण उसात गाजर घेतात.

व्यवस्थापनातील प्रमुख बाबी

 • लागवडीपूर्वी सुपर फॉस्फेट व सेंद्रिय खतांचा वापर
 • १०:२६.२६, १८: ४६-० यानुसार नत्र-स्फुरद-पालाश या तिन्ही घटकांचा संतुलित वापर
 • ६० दिवसांनंतर वाढीच्या अवस्थेत जमीन थंड झाल्यानंतरच सिंचन
 • सोंड्या भुंगा, तुडतुडे व रूट फ्लाय या किडींचा तर करपा, भुरी, मर, पानांवरील ठिपके आदी रोगांचा प्रादुर्भाव. निरीक्षणे नोंदवून प्रतिबंधात्मक फवारण्या
 • १५ ते २० दिवस पाणी बंद केल्यानंतर परिपक्वता तपासून काढणी
 • सकाळी लवकर काढणीनंतर पाला खुडून यंत्राद्वारे स्वच्छ धुऊन प्रतवारी
 • दुपारनंतर लिलाव वेळेत होण्यासाठी वाहतूक

गाजर धुण्यासाठी ‘मेड इन शिंगवे’ मॉडेल
दररोज २०० क्विंटल व त्याहून जास्त काढणी होते. पूर्वी खाटेवर काथ्याचा वापर करून घासून गाजरे धुतली जायची. आता शेतकऱ्यांनी कल्पकतेने धुण्यासाठीचे यंत्र विकसित केले आहे. परिसरात ‘मेड इन शिंगवे’ अशी त्याची ओळख आहे. दंड गोलाकार आडव्या पद्धतीच्या यंत्राच्या आतील भागात पाण्यात भिजवलेली गाजरे टाकली जातात. आतील भागात घासण्यासाठी काथ्या, तर स्वच्छ होण्यासाठी गाजरांवर पाण्याचे तुषार फवारण्याची सोय आहे, पॉवर टिलर, पीटर मशिन यास यंत्राची जोडणी केलेली असते. धुण्याचे काम वेळेवर होण्यासाठी दोन टन क्षमतेची गावात २० हून अधिक अशी यंत्रे आहेत. पंजाबहूनही अत्याधुनिक यंत्रे आणली आहेत. त्यामुळे श्रम, वेळ यात बचत झाली आहे.

गाजरला उद्योगाचे स्वरूप
मागील २० वर्षांत गावात एक प्रकारे गाजर उद्योग नावारूपाला आला आहे. मजुरांच्या रोजगारनिर्मितीसह गाजर धुणे, वाहतूक, संबंधित साहित्य विक्री (बारदान, सुतळी) असे छोटे व्यवसाय उभे राहिले. त्यामुळे आर्थिक स्रोत वाढून जीवनमान सुधारले. बाहेरील गावातील शेतकरीही गाजर धुण्यासाठी येथे येतात. ५० रुपये प्रति कट्टा (५० किलोचा) दराप्रमाणे काम केले जाते. लागवड, काढणी, हाताळणी, प्रतवारी, वाहतूक या कामांमुळे उन्हाळ्यातही गाव गजबजलेले असते. हंगामात दररोज १५ ते २० वाहनांद्वारे वाहतूक होते.

आर्थिक उलाढाल
नाशिक बाजारात मार्चअखेर इंदूर भागातून गाजराची आवक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे स्थानिक गाजरांना दर नसतो. एप्रिलपासून पुढे इंदूर गाजराची आवक कमी होत असल्याने शिंगवे येथील गाजरांना जूनपर्यंत उठाव असतो. नाशिक बाजारासह पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद ही बाजारपेठ मिळते.

डिसेंबर ते जून असा कालावधी असतो. किमान ५ ते २० रुपये प्रति किलो तर सरासरी १२ रुपये दर मिळतो. ज्याचा माल अधिक काळ टिकतो त्यास फायदा होतो. हंगामात १५ कोटींच्या जवळपास आर्थिक उलाढाल गावात होत असावी असा जाणकारांचा अंदाज आहे.

घडले परिवर्तन
गावात सुमारे ९८१ कुटुंबे असून लोकसंख्या ५२३७ पर्यंत आहे. गाजर पिकामुळे स्वयंपूर्णता येण्यास मदत मिळाली आहे. पिकासंबंधी सर्व व्यवस्था उभ्या राहिल्या. त्यामुळे आर्थिक नियोजनासह टुमदार घरे, मुलांचे शिक्षण, आरोग्य आदी नियोजन झाले आहे.

प्रतिक्रिया
नियोजनास व्यवस्थापनाची जोड तसेच विक्री व्यवस्था सक्षम केल्यास हमखास पैसे देऊन जाणारे गाजर पीक आहे. हे पीक आमच्यासाठी वरदान ठरले आहे.
-कैलास डेर्ले, ज्ञानेश्वर डेर्ले

बारा वर्षांपासून गाजर घेतो. उसाच्या बरोबरीने उत्पन्न मिळते. दरांत चढ उतार असतात. मात्र मागणी कायम असल्याने पिकाने आर्थिक स्थैर्यता दिली आहे
-सतीश सानप

संपर्क 
कैलास डेर्ले- ७६२०५८५८५५
ज्ञानेश्वर डेर्ले- ८९९९७२१११३
सतीश सानप- ९८२३७७२३४६


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...