agricultural news in marathi success story of gained Financial stability from classical animal husbandry | Agrowon

शास्त्रीय पशुपालनातून मिळवले आर्थिक स्थैर्य

राजकुमार चौगुले
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे (ता. हातकणंगले) येथील प्रफुल्ल परीट या युवा शेतकऱ्याने प्रशिक्षण घेत शास्त्रीय पद्धतीने पशुपालन केले आहे. खर्चात बचत, जनावरांचे आरोग्य दोन्हीही साधताना कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. श्रीखंड, आम्रखंडासारखी प्रक्रिया उत्पादनांचा निर्मिती व्यवसाय सुरू केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे (ता. हातकणंगले) येथील प्रफुल्ल परीट या युवा शेतकऱ्याने प्रशिक्षण घेत शास्त्रीय पद्धतीने पशुपालन केले आहे. खर्चात बचत, जनावरांचे आरोग्य दोन्हीही साधताना कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. श्रीखंड, आम्रखंडासारखी प्रक्रिया उत्पादने मागणीनुसार पुरवत व्यवसायात वाढ केली आहे. 

सावर्डे शिवारात प्रफुल्ल पांडुरंग परीट (वय ३६ वर्षे) यांची अडीच एकर शेती आहे. त्यातील दोन एकर क्षेत्रात ऊस पीक असून, अर्धा एकर चारा पिके हत्ती गवत, ज्वारी, मका घेतली जातात. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर प्रफुल्ल यांनी अनेक छोटे मोठे व्यवसाय केले. दोन वर्ष साखर कारखान्यातही नोकरी केली. पण त्यात त्यांचा जीव फारसा रमला नाही. २०१६ पासून त्यांनी पशुपालनाचा मार्ग निवडला. त्यांच्याकडे घरगुती वापरासाठी चार म्हशी होत्या. त्यात विकत घेऊन दोन एचएफ गायींची भर घातली. व्यवसायाला सुरुवात केली. 

प्रशिक्षणातून व्यवस्थापनात सुधारणा 
सुरुवातीची एक दोन वर्ष पारंपरिक पद्धतीने केवळ चारा घाल आणि दूध काढ तत्त्वावर पशुपालन केले. मात्र अशा पद्धतीने खर्च वाढत होता, जनावरांचे आरोग्यही चांगले राहत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. एकदा लाळ्या खुरकूत रोगाच्या लसीबाबत माहिती घ्यायची म्हणून ते तळसंदे येथील कृषी विज्ञान केंद्रात गेले. तिथे विषय विशेषज्ञ (पशुपालन) सुधीर सूर्यगंध यांची भेट झाली. मार्गदर्शनासोबतच केव्हिकेमध्ये होणाऱ्या २१ दिवसाच्या पशुपालन प्रशिक्षणाविषयी माहिती समजली. व्यवसाय फायदेशीर करायचा, तर शास्त्रीय ज्ञान घ्यायलाच हवे, हे पटले. मग गावापासून ८ कि.मी. अंतरापर्यंत तळसंदे येथे रोज प्रवास करत ते प्रशिक्षण पूर्ण केले. २१ दिवसांचे प्रशिक्षण ४० दिवसांपर्यंत लांबले, तरी निर्धाराने पूर्ण केले. त्यातून गोठा व्यवस्थापनातील जनावरांचा आहार, आरोग्य, शरीररचना, विश्रांती आणि व्यायामाची आवश्यकता अशा अनेक बाबी, बारकावे समजले. शास्त्रीय बाबी अवलंबून बंदिस्त गोठा बांधला. जागा थोडी कमी असल्याने एक गुंठ्यांमध्ये मुक्त संचार गोठाही तयार केला. त्यातून जनावरांचे आरोग्य सुधारले. गेल्या तीन वर्षांमध्ये गोठ्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी येण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याचा त्यांचा अनुभव आहे. आजही केव्हिकेचे विषय विशेषज्ञ सुधीर सूर्यगंध यांचे मार्गदर्शन मिळते. 

शास्त्रीय आहार  व्यवस्थापनामुळे वाचतो खर्च

  • प्रफुल्ल यांच्याकडे बारा जनावरे असून, त्यात सहा एचएफ गाई, दोन व्यायला झालेल्या कालवडी, तर सुरती व मुऱ्हा जातीच्या दोन म्हशी आहेत. एक रेडी व कालवडही आहे. ही सगळी जनावरे घरी तयार केली आहेत. 
  • पहाटे पाचपासून गोठ्याचे व्यवस्थापन सुरू होते. ५०० किलो वजनाच्या गाई किंवा म्हशीला सरासरी २५ किलो हिरवा चारा, ५ किलो कोरडा चारा दिला जातो. हिरव्या चाऱ्यामध्ये हत्ती घास, मका, ज्वारी, याबरोबरच हरभऱ्याचे भुसकट मिश्रण करून देतात. पशू खाद्याच्या व्यवस्थापनामध्ये प्रति लिटर दूधामागे ४०० ग्रॅम गोळी पेंड, एक किलो सरकी पेंड व अर्धा किलो गहू भुस्सा असे पशुखाद्य देतात. दुधाच्या प्रमाणानुसार गोळी पेंडीचे प्रमाण कमी जास्त केले जाते. 

दूध व्यवसायाचे अर्थशास्त्र 

  • गोठ्यातील गायीपासून एका वेताला (साधारण ३०० दिवस) साडेचार हजार ते सहा हजार लिटर इतके दूध मिळते. म्हशीपासून एका वेताला (साधारण २०० दिवस) ३५०० लिटर दूध मिळते. 
  • गायीपासून सुमारे ७० लिटर, तर  म्हशीपासून २० ते ३० लिटर मिळते. सरासरी ९० ते १०० लिटर दूध मिळते. ते सर्व दूध संघास दिले जाते. त्यांच्याकडून गाईच्या दुधाला प्रति लिटर सरासरी २८ रुपये, तर म्हशीच्या दुधास ४५ ते ४८ रुपये इतका दर  मिळतो. 
  • महिन्याला दूध विक्रीतून सुमारे ८० ते ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. आहार आणि व्यवस्थापनावरील खर्च ५० टक्के गृहीत धरल्यास परीट कुटुंबीयांना गोठा व्यवस्थापनातून प्रति माह सुमारे ४५ ते ५० हजार रुपये शिल्लक राहतात. 
  • दूध संघाकडून वर्षाला तीस हजार रुपयापर्यंत बोनसही  मिळतो.
  • दरवर्षी निम्मे शेणखत स्वतःच्या शेतीसाठी ठेऊन उर्वरित मागणीनुसार विकले जाते. त्यातून ३० हजार रुपयांपर्यंत प्राप्ती होते. 

दहा गुंठे जमिनीची खरेदी 
गोठा व्यवसाय परवडत नसल्याचा सार्वत्रिक सूर आहे. मात्र पूर्ण अभ्यास आणि शास्त्रीय ज्ञानातून आहार आणि आरोग्यावरील अनेक खर्च वाचवणे शक्य झाले. व्यवसायामध्ये आई, वडील आणि पत्नी अशा घरातील सर्व सदस्यांची मदत होते. अलीकडेच ३० हजार रुपये खर्चून मिल्किंग मशिन घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी मेघा याही धारा काढू शकतात. गेल्या चार वर्षाच्या पशुपालन व्यवसायातून दहा लाख रुपयांपर्यंत रक्कम शिल्लक टाकू शकल्याने दहा गुंठे शेती खरेदी करू शकल्याचे प्रफुल्ल यांनी सांगितले. 

ऊस, ताज्या पैशामुळे आर्थिक स्थैर्य
वडील प्रामुख्याने ऊस शेतीकडे लक्ष देतात. दोन एकरमधून ८० ते १०० टन उत्पादन मिळते. त्यातून सुमारे २ ते २.५ लाख रुपये उत्पन्न कुटुंबात येते. दूध व्यवसायातून वेगवेगळ्या टप्प्यावर रक्कम मिळत राहते. कष्ट अधिक असले तरी ताजा पैसा येत असल्याने आर्थिक ताण फारसा जाणवत नसल्याचे परीट कुटुंबीय सांगतात. 

उपपदार्थांचीही निर्मिती
प्रशिक्षणातून दुधापासून प्रक्रिया उत्पादने तयार करण्याचीही माहिती मिळाली. सध्या परिसरातील सण, यात्रा, जत्रा आणि लग्नकार्ये या काळात मागणीनुसार श्रीखंड, आम्रखंड तयार करून देतात. तेवढ्या एक दोन दिवसापुरते दूध रोखून त्यापासून प्रक्रिया उत्पादन तयार केले जाते. हळूहळू या व्यवसायातही उतरण्याचा त्यांचा मानस असला तरी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप पूर्ण क्षमतेने प्रक्रिया उत्पादन करत नसले तरी त्यातून गेल्या वर्षभरात ५० हजार रुपये निव्वळ नफा मिळाल्याचे प्रफुल्ल सांगतात.

शास्त्रीय ज्ञानाने धोके कमी
अन्य व्यवसायाप्रमाणेच पशुपालन हा व्यवसाय पूर्ण ज्ञानाने केला पाहिजे. हा जिवंत जनावरांशी संबंधित आणि ताजा पैसा देणारा व्यवसाय असल्याने तज्ज्ञांकडून तांत्रिक ज्ञान, योग्य तिथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतलीच पाहिजे. त्यातून धोके कमी होतात, खर्चात बचत होत असल्याचा माझा अनुभव आहे.
- प्रफुल्ल परीट, ९९२३५५५००४


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...