agricultural news in marathi success story Gamewadi village from satara district preserved the splendor of trees | Agrowon

निसर्ग- वृक्षसंपदेचे वैभव जपलेले गमेवाडी

हेमंत पवार  
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गमेवाडी गावाने लोकसहभाग व प्रशासन यांच्या समन्वयातून वृक्षारोपण, संवर्धनाचा ‘बिहार पॅटर्न’ यशस्वी केला आहे. त्यातून तब्बल साडेसहा हजार झाडे लावून ती जगवली आहेत. पावसाचे पाणी गावात अडवून जलसंवर्धनाची कामे केली.  

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गमेवाडी गावाने लोकसहभाग व प्रशासन यांच्या समन्वयातून वृक्षारोपण, संवर्धनाचा ‘बिहार पॅटर्न’ यशस्वी केला आहे. त्यातून तब्बल साडेसहा हजार झाडे लावून ती जगवली आहेत. पावसाचे पाणी गावात अडवून जलसंवर्धनाची कामे केली. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण कामांमधूनही गावाने अन्य गावांपुढे वेगळा आदर्श तयार केला आहे. 

सातारा जिल्हयात कऱ्हाड तालुक्यातील गमेवाडी हे हद्दीवरील शेवटचे गाव आहे. पाठरवाडी डोंगराच्या पायथ्याला वसलेल्या या गावाची अवघी दीड हजारांच्या जवळपास लोकसंख्या आहे. गमेवाडी व पाठरवाडी अशी ‘ग्रुप ग्रामपंचायत’ आहे. महत्त्वाचे निर्णय ग्रामसभेत एकदिलाने होतात. वाद-विवादही गावातच मिटतात. ‘स्वच्छतेतून समृद्धीचा ध्यास...हाच आमचा ग्रामविकास’ हे ब्रीद घेऊन गावची वाटचाल सुरु आहे. 

निसर्गाचे वैभव लाभलेले गाव 
गावाला तिन्ही बाजूंनी डोंगराचा विळखा आहे. पाठरवाडीवर प्रसिद्ध तळी पठार, धबधबे, कोयना नदीचा सुंदर ‘नजारा’ असलेला ‘सी पॉइंट’, डोंगर माथ्यावरून दिसणारे रेखीव सूर्योदय व सूर्यास्त, वृक्षवल्ली व वनौषधी, निसर्गरम्य ठिकाणे, पाझर तलाव, वनतलाव असे वैभवसंपन्न हे गाव आहे.  जटेश्वर मंदिर व सातारा, सांगलीसह कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाठरवाडीतील भैरवनाथ मंदिर व विहीर यांच्या ब्रिटिशकालीन नोंदी व गावातील स्थळांच्या पांडवकालीन नोंदीही आहेत. प्रसिद्ध गोरक्षनाथ मंदिर व भव्य गोरक्ष चिंचेचे झाड येथे असून या देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. कुलदैवत निनाईदेवी, ग्रामदैवत हनुमान, बिगडीतील भैरोबा, अश्वत्थामा मथुरदास, नागोबा, सटवाई, म्हसोबा, नाईकबा आदी देवदेवतांच्या पौराणिक मंदिरांनी धार्मिक परंपरा जपल्या आहेत. पर्यटकांचे मन रमणारे गाव अशीच गमेवाडीची ओळख आहे.

विकासाकडे वाटचाल 
गावाला समृद्धीकडे नेण्यासाठी ग्रामपंचायत, शासन, प्रशासन, ग्रामस्थ यांच्या एकत्रीकरणातून विकास आराखडा तयार करण्यात आला. कामांना कालमर्यादा ठरवली. शासन निधी मिळाला तर ठीक, अन्यथा ग्रामपंचायत, लोकवर्गणीतून कामे करण्याचे ठरले. महत्त्वाचे निर्णय ग्रामसभेद्वारे घेण्यात आले.  सन २०१५-१६ पासून स्वच्छता, लोकसहभाग, श्रमदान, जलसंवर्धन, वृक्ष लागवड व संवर्धन, रोजगार निर्मिती, शेती सुधारणा आदींच्या माध्यमातून गावाने समृद्धीकडे मार्गक्रमण केले. शंभर टक्के लोकांकडे आधार कार्ड, बँक खाते पासबुक, नरेगा जॉब कार्ड, सर्व कुटुंबांकडे घरी शौचालय, घरगुती गॅस, वीज आदी सुविधा आहेत. शंभर टक्के बंदीस्त गटार व नळजोडण्या पूर्ण असून पाणी गुणांकनाला चंदेरी कार्ड आहे. 

जलसंधारण 
सुमारे ५० लाखांवर जलसंधारणाची कामे लोकसहभाग व श्रमदानातून पूर्ण झाली. आरोग्य सुविधांमुळे रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांखाली आहे.  बहुतांशी रस्ते लोकवर्गणीतून झाले. गावात स्वच्छतेला मोठे महत्त्व आहे. जलयुक्त शिवार योजनेतून उन्हाळ्यातील भासणारी पिकांसाठीची पाणीटंचाई दूर झाली. पाझर तलावाची पुनर्बांधणी, नव्याने तीन सिमेंट बंधारे, चार माती बंधारे, गॅबियन बंधारे बांधले. नैसर्गिक तलावांतील गाळ काढून सहा शेततळ्यांची कामे पूर्ण झाली. मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी साचून पाणीपातळी दोन फुटांनी वाढली. गावचा पाणीप्रश्न आता मिटला आहे. सर्व पाणंद रस्ते खुले असून रोजगार हमी योजनेतून त्यांचे मुरमी, खडीकरण करण्यात आले. त्यातून ग्रामस्थांना रोजगार मिळाला. प्रत्येक घरी स्वयंपाकाचा गॅस असल्याने वृक्षतोडीला बंदी आहे. वणवा नियंत्रण समिती स्थापन केल्याने प्राथमिक अवस्थेत वणवे विझविले जातात.

गमेवाडी गावची ठळक वैशिष्ट्ये

  • जिल्ह्यात सर्वाधिक फळझाडे लागवड.
  • लोकसहभागातून बिहार पॅटर्न यशस्वी
  • वणवा नियंत्रण समिती स्थापन करणारे गाव.
  • वनौषधी झाडांचे संवर्धन व माहिती देणारे गाव.
  • लोकवर्गणीतून पाच किलोमीटर रस्त्याची निर्मिती.
  • गांडूळ प्रकल्प, नाडेप योजना अग्रक्रमाने राबविणारे गाव.
  • निसर्ग पर्यटनास वाव. 
  • महिलांचे बचत गट. त्यातून रोजगार निर्मिती. अर्थकारणात त्यांचा सहभाग वाढला. 

वृक्षारोपण 
ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या सहकार्यातून तत्कालीन गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, डॉ. आबासाहेब पवार व विद्यमान गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या सहकार्याने गावात बिहार पॅटर्नव्दारे वृक्षलागवड करण्याचे ठरविले. त्यानुसार तब्बल साडेसहा हजार झाडे लावून ती जगविण्यात आली. झाडे रोजगार हमी योजनेतून लावल्याने संगोपनासाठी प्रति व्यक्ती दररोज दोनशे रुपये मिळतात. त्याअंतर्गत सध्या १५ ते २० तरुण झाडांना पाणी घालणे, देखभाल ठेवण्याची जबाबदारी सांभाळतात. गमेवाडी गाव हे झाडांचे गाव बनले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, वन अधिकारी भूपेंद्रसिंह हाडा यांच्याकडून गावाचा गौरव झाला आहे. वन विभागामार्फत गावाजवळच्या  क्षेत्रात सुमारे १० हजार वृक्षलागवड झाली आहे. वन विभाग कृषी विभागानेही बारा हजारांवर वृक्ष लागवड केली आहे. 

‘बिहार पॅटर्न’ द्वारे वृक्षलागवड आम्ही यशस्वी केली. त्याअंतर्गत गावात साडेसहा हजार झाडे लावून ती जगवली आहेत. अनेक बंधारे बांधले. जुने दुरुस्त केले. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढली असून, पाण्याची टंचाई आता भासत नाही. गावाने वनश्री पुरस्कारापर्यंत आता मजल मारली आहे. ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कारही मिळाला आहे. 
- संतोष जाधव  ९९३०३१११२१
प्रवर्तक - बिहार पॅटर्न


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
कांदा बीजोत्पादनात प्रावीण्य मिळवलेले...अंतापूर (ता.सटाणा. जि. नाशिक) येथील नानाजी...
उसातील सोयाबीनचे एकरी १८ क्विंटल उत्पादनपुणे जिल्ह्यात कोऱ्हाळे बु. थोपटेवाडी (ता....
सेंद्रिय खतनिर्मिती तंत्रातून आंबा...रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर तालुक्यातील पोचरी...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
मसाला उद्योगासोबत सेंद्रिय शेतीकडे...लवळे (ता.मुळशी, जि. पुणे) येथील ज्योती दत्तात्रय...
‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठपरभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख...
जातिवंत जनावरांसाठी दर्यापूरचा बाजारअमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील जनावरांचा बाजार...
जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे...मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह...
अभ्यासपूर्ण शेतीतून मिळवले हंगामी...मालेगाव (जि. वाशीम) येथील सय्यद शारीक सय्यद गफूर...
फळबाग, जिरॅनियम प्रक्रियेतून शाश्‍वत...नागठाणे (जि. सातारा) येथील सुनील हणमंत साळुंखे...
२४० एकरांसाठी सामुहिक स्वयंचलित ठिबक...ऊस व द्राक्षे या पिकांसाठी प्रसिद्ध अहिरवाडी (जि...
अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून दर्जेदार...जळके (ता.जि. जळगाव) येथील राजेश पाटील यांनी केळी...
आदर्श असावा तर खडतरे कुटुंबासारखामुक्त गोठा पद्धत, नेटके व्यवस्थापन, कुटुंबाची एकी...
शास्त्रीय पशुपालनातून मिळवले आर्थिक...कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे (ता. हातकणंगले)...
भाजीपाला,पूरक उद्योगातून महिलांची आघाडीमिरजोळी(ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) गावातील उपक्रमशील...
शेत ते बाजारपेठेपर्यंत युवकांची ‘...नाशिक येथील संगणक अभियंता अक्षय दीक्षित व...
सुपारीची पाने, करवंटीपासून पर्यावरणपूरक...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता.वेंगुर्ला) येथील...
निसर्ग- वृक्षसंपदेचे वैभव जपलेले गमेवाडीनिसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गमेवाडी...
इथे नांदते गोकूळ सौख्याचे...कोल्हापूर जिल्ह्यातील नूल (ता. गडहिंग्लज) येथील...