घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती कामगिरी

एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घृष्णेश्‍वर शेतकरी कंपनीने पाच वर्षांत मोठी मजल मारली आहे. धान्य प्रक्रिया उद्योगावर विशेष लक्ष केंद्रित करीत वार्षिक ८० लाख रुपये उलाढालीचा पल्ला गाठला आहे.
Chief Director of Ghrishneshwar farmer producer Company.
Chief Director of Ghrishneshwar farmer producer Company.

एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घृष्णेश्‍वर शेतकरी कंपनीने पाच वर्षांत मोठी मजल मारली आहे. धान्य प्रक्रिया उद्योगावर विशेष लक्ष केंद्रित करीत वार्षिक ८० लाख रुपये उलाढालीचा पल्ला गाठला आहे. पळसवाडी (ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) येथील ‘घृष्णेश्वर शेतकरी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी’ पाच वर्षांच्या कालावधीत चांगली नावारूपाला आली आहे. या तालुक्यासह कन्नड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना जोडत कंपनीने विस्तार साधला. कृषी विभाग व आत्माच्या सहकार्यातून शेतीशाळेसह विविध उपक्रम सुरू केले. शेतकऱ्यांना प्रगतिशील शेतीचे प्रशिक्षण दिले. गट ते शेतकरी कंपनी सुरुवातीला जानेवारी, २०११ मध्ये घृष्णेश्‍वर शेतकरी बचत गट स्थापन झाला. त्या वेळी सभासद संख्या दहा व बचतीचे स्वरूप १०० रुपये प्रति महिना होती. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रकडून पाच लाखांचे कर्ज मिळाले. त्यातून आठ सभासदांनी संकरित गायी घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला. दोघांनी आपल्या किराणा व्यवसायातील भांडवल वापरले. सन २०१३ मध्ये कृषी विभाग ‘आत्मा’अंतर्गत पळसवाडीतच १५ शेतकरी गटांची स्थापना झाली. तर २१० सभासद एकत्र येऊन दोन जुलै, २०१५ मध्ये घृष्णेश्‍वर शेतकरी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली. गल्लेबोरगाव येथील अनिल हरदे अध्यक्ष, पळसवाडीचे यादवराव दिगंबरराव जगताप सचिव, तर देभेगावचे सागर सुरेश लगड, पळसवाडीचे बाळकृष्ण आसाराम ठेंगडे व शिवराईच्या आश्‍विनी संदीप चव्हाण ही मंडळी कंपनीचे मुख्य संचालक आहेत. कंपनीचे उपक्रम धान्य स्वच्छता, प्रतवारी यंत्र जागतिक बँक व ‘नाबार्ड’च्या साह्यातून २०१५-१६ मध्ये कंपनीला चांगला प्रकल्प मिळाला. त्यातून गोदाम, धान्य स्वच्छता व प्रतवारी यंत्र घेतले. त्याद्वारे शेतकऱ्यांकडील गहू, ज्वारी, बाजरी स्वच्छता व प्रतवारी करून हजारो क्विंटल ए ग्रेडचा माल तयार करून देण्यास सुरवात झाली. प्रसंगी शेतकऱ्याला गरज असल्यास मालाची खरेदी व साठवण करून थेट ग्राहक विक्रीचे काम कंपनीच्या माध्यमातून केले जाते. या व्यवसायातून वर्षाला साडेतीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळते.शेतकऱ्यांनाही आपल्या मालाला उत्तम दर मिळवता येऊ लागला. शेतीशाळा उपक्रम कंपनी स्थापन केल्यानंतर शेतकऱ्यांची संख्या वाढली. मका, कापूस, भाजीपाला पिकांवरील सुमारे १० ते १५ शेतीशाळा दरवर्षी घेतल्या जातात. ‘एमजीएम’ कृषी विज्ञान केंद्राने २०१८ ते २० दरम्यान तीन वर्षे गाव दत्तक घेतले. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना माती- पाणी परीक्षण, बीजप्रक्रिया, उगवणक्षमता, पीक संरक्षण आदींबाबत मार्गदर्शन दिले. त्यातून खर्चात बचत व उत्पादनात वाढ झाली. स्वखर्चातून नदी खोलीकरण शासकीय योजनेअंतर्गत जलसंधारण प्रकल्पात गावाचा सहभाग झाला नाही. मात्र निराश न होता २०१५-१६ मध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वखर्चातून एक किलोमीटर नदी खोलीकरणात प्रत्येकी पाच हजार रुपयांसह श्रमांचेही योगदान दिले. आधीच्या बांधाची दुरुस्ती व आणखी दोन मातीबांध नदीवर बांधत पाणी अडवा- पाणी जिरवा ही संकल्पना राबविली. जोडले पंधराशे शेतकरी सन २०१७ मध्ये नाफेड अंतर्गत शासकीय हमीभाव केंद्र कंपनीला मिळाले. शेतकऱ्यांचा माल शासकीय हमी भावात खरेदी केला. सोबतच सभासद संख्या वाढू लागली. २०१७ मध्ये ५००, पुढे एक हजार व आज रोजी पंधराशेपर्यंत सभासद संख्या पोहोचली आहे. खरेदी केंद्रामुळे अडत, हमाली यांसारखा कुठलाही खर्च न लागता चांगल्या प्रकारे दर मिळू लागला. त्यातून कंपनीची उलाढाल वाढू लागली. डाळ मिलचा हातभार कंपनीने २०१७ मध्ये मिनी डाळ मिल प्रकल्प कार्यान्वित केला. त्याद्वारे तूर, हरभरा, मूग, उडीद आदींच्या डाळी सभासदांना तयार करून देण्यास सुरू केले. प्रति किलो ८ रुपये दराप्रमाणे शुल्क घेत डाळनिर्मिती खर्चातही बचत केली. वर्षाला दीड लाख रुपयांचे उत्पन्न सुरू झाले. ‘घृष्णेश्‍वर’चे उपक्रम व संघटन

  • शेततळे बांधणे, दुग्ध व्यवसायास चालना देणे, खवा बनविणे, शेळीपालन यांसारख्या गोष्टींवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
  • मक्यापासून पशुखाद्य बनविणे. दुग्ध व्यवसाय वाढविण्याचा उद्देश.
  • पळसवाडीत सुमारे ४० दूध उत्पादक
  • सात-आठ शेतकऱ्यांकडून शेततळे उभारणी
  • सुमारे १२ शेतकरी करतात खवा उत्पादन
  • उलाढाल

  • सन २०१६-१७-
  • उपक्रम - धान्य स्वच्छता, प्रतवारी, डाळ मिल
  • वार्षिक उलाढाल - ६५ लाख रु.
  • रोजगारनिर्मिती -२४० दिवस
  • कामगारांना रोजगार - १२०
  • २०१७- १८

  • उपक्रम- वरील उपक्रमांत शासकीय तूर खरेदीचा समावेश.
  • वार्षिक उलाढाल- एक कोटी ८२ लाख रु.
  • रोजगारनिर्मिती- ४६० दिवस
  • २०१८-१९-८० लाख रु.
  • २०१९-१०-६५ लाख रु.
  • २०२०-२१- ८० लाख रु.
  • प्रतिक्रिया पीकनिहाय घेतल्या जाणाऱ्या शेतीशाळांमध्ये पळसवाडी येथील शेतकरी सातत्याने सहभागी होतात. तंत्रज्ञान आत्मसात करण्याकडे त्यांचा कल असतो. - जी. जी. मुंढे कृषी पर्यवेक्षक, खुलताबाद कंपनीच्या विविध उपक्रमांमुळे शेतकरी एकत्र आले. स्वच्छता व प्रतवारी करून मिळू लागल्याने शेतकऱ्यांना १० ते १५ टक्के अधिकचे दर मिळू लागले. आर्द्रता मापकाचेही महत्त्व शेतकऱ्यांनी ओळखले. कंपनीच्या खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या मालविक्रीच्या खर्चात बचत झाली. - प्रदीप पाठक, ९४२०४०५०२३ तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, ‘आत्मा’, खुलताबाद शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. पाच वर्षांत ‘घृष्णेश्‍वर’ने त्यासंबंधी राबविलेल्या उपक्रमांचे दृश्य परिणाम समोर आहेत. शेतकऱ्यांसह केव्हीके, कृषी विभाग यांचे सातत्याने सहकार्य लाभते आहे. - यादवराव जगताप, ९४२१४०७१७१ सचिव, ‘घृष्णेश्‍वर’, पळसवाडी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com