सुयोग्य व्यवस्थापनाचा आले शेतीतील आदर्श

मौजे शेलगाव (खुर्द) (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील बालाजी दामोदर तुपेयांची नऊ एकर शेती असून, आठ एकर करारतत्त्वाने कसण्यास घेतली आहे. आले हे त्यांचे मुख्य पीक असून, सुनियोजन व व्यवस्थापनातून अनेक वर्षांच्या अनुभवातून त्यांनी या पिकात हातखंडा तयार केला आहे.
Tupe family
Tupe family

मौजे शेलगाव (खुर्द) (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील बालाजी दामोदर तुपे हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकी पेशा सांभाळून दहा वर्षांपासून शेती करीत आहेत. त्यांची नऊ एकर शेती असून, आठ एकर करारतत्त्वाने कसण्यास घेतली आहे. आले हे त्यांचे मुख्य पीक असून, सुनियोजन व व्यवस्थापनातून अनेक वर्षांच्या अनुभवातून त्यांनी या पिकात हातखंडा तयार केला आहे. जमीन सुपीकतेवर दिला भर तुपे यांची जमीन हलकी, खडकाळ आहे. प्रयत्न करून त्यांना गादीवाफे तयार करावे लागतात. रासायनिक अधिक सेंद्रिय अशा एकात्मिक पद्धतीवर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यातून आपली जमीन बलवान केली आहे. अशा सुपीक जमिनीत पीक उत्पादन चांगले येते याचा अनुभव ते घेत आहेत. दरवर्षी सुमारे तीन ते चार एकर आले असते. माहीम व गोद्रा हे वाण असतात. सिंचन शाश्‍वतता

  • सन २०१२ पर्यंत तुपे यांच्याकडे बागायत शेती नव्हती म्हटले तरी चालेल. पाऊस चांगला असेल तर कधी कधी ते फक्त अर्धा एकर आले घ्यायचे. या भागात जानेवारीनंतर विहिरीला पाणी राहत नाही.
  • यावर उपाय शोधण्यासाठी कृषी विभागाच्या मदतीने अस्तरीकरणासह त्यांनी ४२ लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारले. गावातील हे पहिले शेततळे होते. त्याचा आदर्श घेऊन गावात आज विविध योजनांमधून अनेक शेततळी तयार झाली आहेत. आपले बहुतांश सर्व क्षेत्र टप्प्याटप्प्याने ठिबक सिंचनाखाली आणले आहे. पाइपलाइन केली आहे.
  • आले शेतीतील ठळक बाबी

  • यंदा शेततळे पाण्याने भरले आहे. मेमध्ये चार एकरांत लागवड केली आहे.
  • प्रातिनिधिक नियोजन सांगायचे तर नांगरून रोटाव्हेटर वापरून एकूण क्षेत्रात १० टन कोंबडी खत, १२ ट्रॉली शेणखत पसरले.
  • प्रत्येकी पाच फुटांवर बेड्‍स पाडले. त्यामध्ये १०-२६-२६, निंबोळी पेंड, सूक्ष्म अन्नद्रव्ये, दाणेदार मायकोरायझा, ह्युमिक ॲसिड यांचा ‘बेसल डोस’ म्हणून वापर केला. कोळपे वापरून मिश्रण मातीत मिसळून घेतले.
  • ठिबकच्या लॅटरलवर सव्वा फुटांवर प्रति तास दोन लिटर पाणी सोडणाऱ्या ड्रीपरची निवड. त्याचा ‘डिस्चार्ज’ कमी असल्याने पाणी जमिनीत खोल न जाता गादीवाफा ओला होण्यास मदत होते व पाण्याचा अपधाव होत नाही.
  • नियमितपणे जिवामृताचा वापर. सुरुवातीला ड्रममध्ये तयार करायचे व मनुष्यबळाकरवी सोडायचे.
  • आता जिवामृत बनवण्याची व फिल्टर करण्याची टाकी बसवली आहे. ‘ॲग्रोवन’च्या प्रदर्शनात ती पाहिली. सन २०१७ मध्ये ती ४० हजार रुपयांना खरेदी केली. सुमारे १७०० लिटरच्या या टाकीत एका वेळेस १३०० लिटर जिवामृत तयार होते.
  • त्यात ८० किलो शेण, गरजेनुसार गोमूत्र, हरभरा पीठ, काळा गूळ आदींचा वापर होतो. मिश्रण चांगले ‘डीकंपोज’ केले जाते. दर ८ दिवसांच्या अंतराने पिकाला दिले जाते.
  • त्यामुळे पीक काटक बनते. जिवामृत देण्यास सुरुवात केल्यापासून उत्पादनात भर पडल्याचे दिसून आले आहे.
  • जिवामृताच्या द्रावणात फायदेशीर जिवाणू व मित्रबुरशींचाही वापर होतो. यात स्फुरद विरघळवणारे जिवाणू, ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसीस, रायझोबियम, सुडोमोनाज आदींचा समावेश असतो.
  • गांडूळ खताचे चार व नाडेपचे दोन बेड्‍स
  • आई अनसूया, वडील दामोदर यांचे मार्गदर्शन.
  • उत्पादन पूर्वी एकरी ७० ते ८० क्विंटलच्या दरम्यान उत्पादन व्हायचे. आता दरवर्षी एकरी १०० ते ११० क्विंटलच्या आसपास उत्पादन मिळते. गेल्या वर्षी तीन एकर आले घेतले होते. सुमारे २२ गुंठे खोडवा ठेवला. एकरी एकूण १५७ क्विंटलच्या पुढे उत्पादन मिळाले. सुमारे ४० क्विंटल बियाणे म्हणून ठेवले. गुणवत्ता चांगली असल्याने चार हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे दीडशे क्विंटल बियाणे शेतकरी घेऊन गेले. उर्वरित आल्याची तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री केली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन औरंगाबाद जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात आले घेतले जाते. अनेक शेतकरी या पिकात ‘मास्टर’ झाले आहेत. परंतु काही जणांकडे कंदकुजीची समस्या आहे. वारंवार आले घेतल्याने तसेच सेंद्रिय घटकांचा कमी वापर यामुळे कंदसड वाढत आहे. तुपे यांनी या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देऊन त्यांचे अनुभव व मार्गदर्शन घेत आहेत. ‘ॲग्रोवन’मधील यशकथाकारांच्या शेतांना भेटी बालाजी तुपे ‘ॲग्रोवन’चे जुने वाचक आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आवडलेल्या लेखांचे कात्रण काढून ते रजिस्टरमध्ये चिकटवून ठेवतात. त्याचा वापर अभ्यासासाठी करतात. यशकथांनी मोठी प्रेरणा दिल्याचे ते सांगतात. त्यातूनच सेंद्रिय घटकांच्या वापराला दिशा मिळाली. यशकथा प्रसिद्ध झालेल्या ३० ते ४० शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्याचे तुपे यांनी सांगितले. शेतीच्या नोंदी ठेवल्या

  • सन २०१२ पासून शेती व कौटुंबिक जमा-खर्चाचा हिशेब, आर्थिक नोंदी
  • प्रत्येक वर्षी नवीन रजिस्टरमध्ये ते आवक- जावक, हिशोब तारीखवार टिपून ठेवतात.
  • माल कोठून खरेदी केला, त्याची किंमत, कोणत्या वर्षी कोणत्या तारखेला पाऊस पडला, विहिरीत पाणी कधी उतरले, ती कधी कोरडी पडली, शेततळ्यात कधी पाणी भरले? ते भरायला किती दिवस लागले, आल्याचे तुडुंब भरलेले बेडस, पावसाची उघाड, पीक, वाण, खत-पाणी, उत्पादन आदी सारी टिपणे.
  • प्रयोगशील शेतकरी व कृषी प्रदर्शनांना भेटी देतात
  • संपर्क ः बालाजी तुपे, ९४२३१८८५७२, ७९७२५७३७९० (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com