शेणखतासह तूपनिर्मितीसाठी गीर गाय संगोपन

सांगवी भुसार (ता. कोपरगाव, जि. नगर) येथील मधुसूदन उद्धवराव मोरे यांनी शेतीसाठी सेंद्रिय खत व दुधापासून तूपनिर्मिती या उद्देशाने देशी गीर गाय संगोपन सुरू केले आहे. ‘सारंग डेअरी फार्म’ नावाने ब्रॅण्ड तयार केला आहे.
Raising of Gir cows and the Ghee produced from their milk
Raising of Gir cows and the Ghee produced from their milk

सांगवी भुसार (ता. कोपरगाव, जि. नगर) येथील मधुसूदन उद्धवराव मोरे यांनी शेतीसाठी सेंद्रिय खत व दुधापासून तूपनिर्मिती या उद्देशाने देशी गीर गाय संगोपन सुरू केले आहे. ‘सारंग डेअरी फार्म’ नावाने ब्रॅण्ड तयार केला आहे. राष्ट्रपती पारितोषिक विजेते प्रयोगशील शेतकरी संशोधक कृषिभूषण पंढरीनाथ मोरे हे त्यांचे आजोबा असून, त्यांची प्रेरणा मधुसूदन यांना मिळत आहे.   सांगवी भुसार (ता. कोपरगाव, जि. नगर) येथील पंढरीनाथ मोरे प्रयोगशील, अभ्यासू, संशोधक शेतकरी म्हणून संपूर्ण राज्याला परिचित आहेत. पाण्यातील क्षारांचे विघटन करणारे त्यांनी तयार केलेले वॉटर कंडिशनर यंत्र लोकप्रिय आहे. राष्ट्रपती पारितोषिक देऊन त्यांचा गौरव झाला आहे. विविध तंत्रज्ञानाचे संशोधक असलेले मोरे कृषिभूषण पुरस्कारानेही सन्मानित आहेत. आपल्या आजोबांचा वारसा त्यांचे नातू मधुसूदन पुढे चालवत आहेत. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.  शेती व दुग्ध व्यवसाय  मोरे परिवाराची एकत्रित चाळीस एकर शेती आहे. त्यातील पस्तीस एकरांत फळबाग असून, पंधरा एकरांवर एकत्रित आंबा व पेरू लागवड आहे. शेतीला सेंद्रिय खत, गोमूत्र व घरी दूध व तूप या उद्देशाने सुमारे दोन देशी गीर गायींचे संगोपन सुरू होते. त्याचा विस्तार करण्याचे पंढरीनाथ यांचे नातू मधुसूदन यांनी तीन वर्षांपूर्वी ठरवले. वडील उद्धवराव व भाऊ योगेश्‍वर शेती पाहतात. गीर गायींच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ करत आज संख्या बारापर्यंत नेली आहे. त्यासाठी २०१७ मध्ये पंधरा गुंठे क्षेत्रावर पाच ते साडेपाच लाख रुपये खर्च करून तांत्रिक पद्धतीने मुक्त गोठ्याची उभारणी केली आहे. पारंपरिक पद्धतीने तूपनिर्मिती दररोज पंचवीस ते तीस लिटर दुधाचे उत्पादन होते. त्यापासून पारंपरिक पद्धतीने महिन्याला सुमारे तीस ते पस्तीस किलोपर्यंत तूपनिर्मिती होते. स्थानिक पातळीवर व काही मोठ्या शहरांत मागणीनुसार अडीच हजार रुपये प्रति किलो दराने विक्री होते. त्यासाठी सोशल मीडियाची मदत होते. अलीकडेच शेणापासून गोवऱ्या, सुगंधी धूपनिर्मितीला मधुसूदन मोरे यांनी सुरुवात केली आहे.  व्यवस्थापनातील मुद्दे

  • चारा वाया जाणार नाही, सहजपणे खाता यावा यासाठी तीस बाय अडीच फूट आकाराची गव्हाण
  • तीनशे लिटर क्षमतेची अडीच बाय आठ फूट आकाराची टाकी. 
  • गोठ्यातील विजेच्या खर्चात बचत करण्यासाठी सोलर युनिट बसवले आहे. कुट्टी यंत्र आहे.
  • गोमूत्र आणि पाणी साठवणीसाठी पाचशे लिटरचा खड्डा. मडपंपाद्वारे ते बाहेर काढण्यात येते.
  • गायींना बसण्यासाठी ३५ बाय ३० फूट आकाराचे शेड. त्यावर सिमेंट कोबा. तेथील शेण दररोज उचलले जाते. त्याचा वापर स्लरीसाठी होतो. 
  • मुक्त गोठ्यातील शेण वर्षातून दोनदा उचलले जाते. 
  • उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी फॉगर्स आणि फॅन्सची व्यवस्था. 
  • दुधाचा दर्जा कायम राहण्यासाठी चारा सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला असावा यावर भर. 
  • बहुतांश चारा विकत घेतात. ज्यांच्याकडून खरेदी करतात त्यांना जास्तीत जास्त शेणखताचा वापर करण्याचे आवाहन..
  • दुधातील प्रथिन घटक व पोषणमूल्ये वाढावीत यासाठी पशुखाद्यात सरकी पेंडीसह स्वतः फॉर्म्यूला ठरवत तुरीची चुणी, मका भरडा, गव्हाचा कोंडा, सरकी पेंड, मिनरल मिक्सर यांचा वापर. एकत्रित दररोज सकाळी व सायंकाळी प्रत्येकी दीड किलो वापर.  
  • दैनंदिन चाऱ्यात मका, ऊस, कडवळ, गवत, ज्वारीचा कडबा यांचा समावेश. 
  • प्रति गायीला वीस ते पंचवीस किलो दिवसभरात चारा. गरजेनुसार मुरघास. 
  • वासरांसाठी स्वतंत्र व्यवस्था. 
  • सहा महिन्यांतून एकदा लाळ्या खुरकूत व घटसर्प लसीकरण.  
  • सुधारित ‘सिमेन’ वापरून दर्जेदार पैदास निर्मिती. 
  • मिल्किंग मशिनचा वापर. 
  • फळबागांची अधिक लागवड असल्याने ऊस, मका, अन्य चारा गरजेनुसार स्थानिक पातळीवर विकत घेतात. अडचण निर्माण होऊ नये यासाठी दरवर्षी मका विकत घेतात. तीस ते चाळीस टन मुरघास तयार करतात. ज्या वेळी दुष्काळी स्थिती निर्माण झाली त्या वेळी चाराटंचाईवर मात करता आली.   
  • संशोधनाची फलश्रुती  पंढरीनाथ मोरे यांनी कांदा रोपालागवड करणारे टॅक्टरचलित यंत्रही २० वर्षांपूर्वी विकसित केले. त्याला मान्यता व पेटंटही मिळाले. हे कार्य मधुसूदन पुढे चालवत आहेत. या यंत्रांची निर्मिती करून वर्षभरात पन्नासपेक्षा अधिक यंत्राची विक्री करतात. त्यास मागणीही चांगली आहे.  दूध व्यवसायाचा शेतीला आधार  आंबा, पेरू आदी फळबागांना शेणखत, गोमूत्राचा आधार मिळत आहे. तूपनिर्मिती करताना उपलब्ध होणाऱ्या ताकापासून दिवसाला सुमारे पाचशे लिटर जिवामृत तयार केले जाते. तर महिन्याला एक याप्रमाणे वर्षभरात सुमारे बारा ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्याच्या वापरामुळे दर्जेदार उत्पादन मिळते. व्यापाऱ्यांमार्फत गुजरात राज्यात विविध ठिकाणी फळांची विक्री होते.  - मधुसूदन मोरे  ९९६०८४९५५३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com