दर्जेदार, शास्त्रीय पद्धतीने गांडूळ खतनिर्मिती; वर्षाला १२० टनांची विक्री

माळीवाडगाव (जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी गोरखनाथ गोरे यांनी डाळिंब व शेवगा शेतीसह शास्त्रीय पद्धतीने गांडूळ खतनिर्मिती सुरू केली. गुणवत्तापूर्ण उत्पादनात सातत्य ठेवल्याने त्यास मोठी मागणी मिळवली. वर्षाला सुमारे १२० टन खतासह गांडूळ बीज, व्हर्मिवॉशच्या विक्रीतून काही लाखांची उलाढाल करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.
Packing of earthworms in crates.
Packing of earthworms in crates.

माळीवाडगाव (जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी गोरखनाथ गोरे यांनी डाळिंब व शेवगा शेतीसह शास्त्रीय पद्धतीने गांडूळ खतनिर्मिती सुरू केली. गुणवत्तापूर्ण उत्पादनात सातत्य ठेवल्याने त्यास मोठी मागणी मिळवली. वर्षाला सुमारे १२० टन खतासह गांडूळ बीज, व्हर्मिवॉशच्या विक्रीतून काही लाखांची उलाढाल करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात माळीवाडगाव (ता. गंगापूर) येथील गोरखनाथ कचरू गोरे यांची १० एकर शेती आहे. डाळिंब, शेवगा व काही गुंठ्यांत फळझाडे व घरच्यापुरता सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला असे शेतीचे स्वरूप आहे. जून २००३ मध्ये त्यांनी डाळिंब लागवड केली. बुरशीजन्य मररोग, सूत्रकृमी आदी समस्या निर्माण झाल्या. मग गोरे यांनी कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. डाळिंब बागांना भेटी दिल्या. वैजापूरचे तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, नाशिक- मालेगाव भागातील कृषिभूषण अरुण बबनराव पवार, रवींद्र दशरथ पवार, प्रभाकर किसन तुपे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यातून सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन व गांडूळ खत वापराची दिशा मिळाली स्वतःसाठी खतनिर्मिती शेतातील लिंबाच्या झाडाखाली खुल्या पद्धतीने खतनिर्मिती सुरू केली. ऑक्‍टोबर २००३ मध्ये ऊस पाचट व बांबूपासून कमी खर्चात छप्पर तयार केले. गांडूळ खत व व्हर्मी वॉश यांचा डाळिंब बागेसाठी वापर सुरू झाला. त्यातून जमिनीचा पोत व उत्पादन क्षमता वाढली. हवा खेळती राहून पांढऱ्या मुळांची वाढ चांगली झाली. बागेची प्रतिकार शक्ती वाढवून मररोग, सूत्रकृमी आदी समस्या कमी होत गेल्या. सध्या ८ ते १० वर्षांच्या झाडांपासून एकरी ८ ते १० टनांपुढे उत्पादन तर शेवग्याचे एकरी ८ ते १० टनांपर्यंत उत्पादन मिळते. काही शेतकऱ्यांनी गोरे यांचे मार्गदर्शन घेत कमी खर्चात गांडूळ खत प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. गोरे यांच्या खतालाही मागणी येऊ लागली. मग उत्पादनात वाढ करण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांची साथ मोलाची संपूर्ण वाटचालीत गोरे यांना वडील कचरू, आई काशाबाई, पत्नी सुनीता या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळत गेले. मुलगा मंगेश कृषी पदवीचे शिक्षण घेत असतानाच प्रकल्पाला भेटी देणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून प्रकल्प उभारणी व प्रशिक्षण देण्याचे काम करतो. पुणे येथील अमर अंदुरे या मित्राच्या कंपनीच्या माध्यमातून ओमान देशात गांडुळे व काही खाद्य यांची नुकतीच निर्यात करण्यात गोरे यांना यश आले आहे. ...अशी होते गांडूळ खतनिर्मिती

  • हौद, पॉलिथिन (प्लॅस्टिक) व खुली अशा तीन पद्धतींचा वापर.
  • २७ फूट लांब, चार फूट रुंद व दोन फूट उंच असे सिमेंटचे १४ हौद. १२ बाय चार बाय दोन फूट आकाराचे चार प्लॅस्टिक बेड्‍स.
  • पहिल्या थरात (सहा इंच) मक्याची ताटे, कापूस कुट्‌टी, तण, काडीकचरा, पालापाचोळा भरला जातो. दुसऱ्या सहा इंच थरात अर्धवट कुजलेले शेणखत. तिसऱ्या थरात सहा इंचांपर्यंत अर्धवट कुजलेला काडीकचरा, मका कुट्‌टी आच्छादन. चौथ्या सहा इंच थरात अर्धवट कुजलेले शेणखत वापरून त्यावर दोन ते तीन टोपले ताजे शेण पसरून दिले जाते.
  • बेड थंड झाल्यानंतर हौदात प्रत्येकी १२ किलो, तर प्लॅस्टिक बेडमध्ये ५ किलो गांडुळे सोडली जातात.
  • उत्पादन

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठातून आणले गांडूळ बीज
  • वर्षाला एकूण सुमारे १२० टन खतनिर्मिती
  • प्रति प्लॅस्टिक बेडमधून दोन महिन्यांत एक टन गांडूळ खत, प्रति दिन एक ते दोन लिटर व्हर्मिव्हॉश तर वर्षाला किमान १०० किलोहून अधिक गांडूळ उत्पादन
  • दर- गांडूळ खत- १० हजार रुपये प्रति टन, गांडूळ बीज २५० रुपये प्रति किलो. व्हर्मिवॉश दर ५० रुपये प्रति लिटर. एका किलोत सुमारे १००० गांडुळे बसतात. सोबत अंडी व खाद्य दिले जाते.
  • पाच हजार लिटर जिवामृत एका वेळेला तयार करण्याचा प्रकल्प.
  • २० ते २५ किलो क्रेटमध्ये १० किलो गांडुळे व पाच किलो खाद्य हे हवा लागेल अशा कापडात गुंडाळून विक्रीची पद्धत.
  • गोरे यांच्या टिप्स

  • आयसेनिया फेटिडा, युड्रीलस युजेनी या जातीची गांडुळे बेडमध्ये सोडावी
  • १२ बाय ४ बाय दोन फूट आकाराच्या बेडमध्ये किमान दोन किलो गांडुळे बेडवर पसरावीत.
  • पावसाळा व हिवाळ्यात आठवड्यातून १ ते २ वेळा, तर उन्हाळ्यात दिवसाआड बेडला पाणी.
  • प्रति बेडला एका वेळी किमान ३० लिटर पाणी.
  • काळसर व चहापत्तीप्रमाणे झाले म्हणजे गांडूळ खत तयार झाले असे समजावे. खत तयार होण्याच्या पाच- सहा दिवस आधी पाणी देणे बंद करावे.
  • गांडुळे जसजशी खाली जातील तसतसे खत काढावे. खालील दोन ते तीन इंचांचा थर तसाच राहू द्यावा.
  • ठिबकच्या माध्यमातून एकरी १५ ते २० लिटर व्हर्मिव्हॉश.
  • संपर्क ः गोरखनाथ गोरे, ९८९००६८११२, ९४२३७८४७१२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com