agricultural news in marathi success story Increased financial profits from crop planning, direct sales | Agrowon

पीक नियोजन, थेट विक्रीतून वाढविला आर्थिक नफा

एकनाथ पवार
सोमवार, 12 जुलै 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला) गावातील सुशांत मोहन नाईक हे प्रयोगशील शेतकरी. बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी आंबा, काजू थेट विक्रीचे नियोजन केले. त्याचबरोबरीने हंगामी भाजीपाला, कणगर, चिबूड उत्पादनातूनही आर्थिक नफा वाढविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. 
 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला) गावातील सुशांत मोहन नाईक हे प्रयोगशील शेतकरी. बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी आंबा, काजू थेट विक्रीचे नियोजन केले. त्याचबरोबरीने उपलब्ध लागवड क्षेत्रामध्ये हंगामी भाजीपाला, कणगर, चिबूड उत्पादनातूनही आर्थिक नफा वाढविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. 

वेंगुर्ला-कुडाळ मार्गावरील वेतोरे शिवारात भात, आंबा, काजू आणि काही प्रमाणात भाजीपाला लागवड असते. या गावातील सुशांत नाईक यांची साडेबारा एकर शेती आहे. याशिवाय त्यांनी लगतच्या गावात अडीच एकर जमीन भाजीपाला लागवडीसाठी कराराने घेतली आहे. नाईक यांची बहुतांश जमीन डोंगराळ असल्याने टप्प्याटप्प्याने आंबा, काजू लागवड करत व्यवस्थापनाखाली आणली. साधारणपणे १९९८ पूर्वी नाईक कुटुंबीय पारंपरिक पद्धतीने भात आणि चिबूड लागवड करत होते. परंतु हळूहळू बाजारपेठेचा अभ्यास करत त्यांनी डोंगराळ जमीन आंबा, काजू लागवडीखाली आणली. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना घेऊन पडीक जमिनीची मशागत करण्यास सुरुवात केली. दरवर्षी या जमिनीत ५० आंबा, ५० काजू कलमांची लागवड करत आज बहुतांश जमीन लागवडीखाली आणली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने आर्थिक उत्पन्नात वाढ होऊ लागली. याचबरोबरीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध बाजारपेठांचा अभ्यास करून वर्षभर भाजीपाला लागवडीचे गणित बसविले. गोव्यातील बाजारपेठेचा अभ्यास करून कणगर लागवडीचे नियोजन केले. 

आंबा बागेचे नियोजन आणि विक्री 

  •  दोन हेक्टर क्षेत्रावर सघन पद्धतीने २५० कलमांची लागवड. यामध्ये ९५ टक्के हापूस उर्वरित पाच टक्क्यांमध्ये केसर, गोवा मानकूर कलमांची लागवड. परागीकरणासाठी फायदा. सध्या १०० कलमे उत्पादनक्षम. गोवा बाजारपेठेत गोवा मानकूरला चांगली मागणी. 
  • कलमांना पालापाचोळा आच्छादन, गांडूळ खत, शेणखत, जिवामृताचा वापर. सेंद्रिय कीडनाशकांच्या फवारणीवर भर.
  •  योग्य व्यवस्थापनामुळे फळांचे दर्जेदार उत्पादन. दरवर्षी उत्पादनक्षम कलमांपासून सहा डझनी १५० पेटी फळांचे उत्पादन. याचबरोबरीने मागणीनुसार १ डझन, २ डझनाची पेटी. या पेटीची ६०० रुपये डझन दराने ग्राहकांना थेट विक्री. सहा डझनाच्या पेटीस २००० ते २२०० रुपये दर. हाच दर थेट विक्रीपूर्वी ८०० ते ९०० रुपये मिळत असे. मुंबई, कोल्हापूर, सांगली, बेळगाव, पुणे शहरांमध्ये थेट ग्राहकांना आंबा विक्री करत नफ्यात दरवर्षी वाढ. खर्च वजा जाता सरासरी दोन लाखांची उलाढाल. 

काजू बागेचे नियोजन आणि विक्री  

  • सघन पद्धतीने तीन एकरात वेंगुर्ला-४ जातीच्या ६०० कलमांची लागवड. 
  • सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन. पालापाचोळ्याचे आच्छादन, शेणखत, गांडूळ खत, जिवामृताचा वापर. गरजेनुसार सेंद्रिय कीडनाशकांची फवारणी.
  • ऑक्टोबर महिन्यात बागेची स्वच्छता करून ग्रासकटरने रानमोडी, वेली, झुडपे तोडून काजू कलमांना आच्छादन. त्याचे कुजून चांगले खत तयार होते.
  • तीन एकरांतून साधारणपणे तीन टन काजू उत्पादन. जागेवर काजू बीला सरासरी १०० रुपये किलो दर. व्यवस्थापन खर्च वजा जाता सरासरी दोन लाखांची उलाढाल.

विविध प्रकारचा भाजीपाला 
ज्या वेळी गाव शिवारातील बाजारपेठेत कोणत्याही शेतकऱ्यांची भाजी येत नाही, त्या वेळी आपला भाजीपाला बाजारपेठेत यायला पाहिजे, अशा पद्धतीने नाईक लागवडीचे नियोजन करतात. साधारणपणे सप्टेंबरमध्ये एक एकरामध्ये जमिनीची योग्य मशागत करून शेणखत, गांडूळ खत मिसळून मुळा आणि लालभाजीची लागवड केली जाते. सेंद्रिय पद्धतीनेच पीक उत्पादनावर भर आहे. बाजारपेठेत प्रति पेंडी १० रुपये दर मिळतो. भाजीपाल्यातून सरासरी दीड लाखांची उलाढाल होते.  याशिवाय दरवर्षी एक हेक्टरमध्ये विविध फळभाज्या, भोपळा, मिरची आणि चिबूड लागवड करतात. चिबूड पिकातून चांगली आर्थिक उलाढाल होते. डोंगरी मिरचीला स्थानिक आणि गोवा बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने दरही किफायतशीर मिळतो. नाईक हे सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते आहेत. रसायन अवशेषमुक्त अन्नधान्य, भाजीपाला ग्राहकांना मिळाला पाहिजे यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. गावातील सोमेश्‍वर सेंद्रिय उत्पादक गटाचे नाईक अध्यक्ष आहेत.

आर्थिक गुंतवणुकीवर भर 
नाईक यांनी शेतीमधून मिळालेल्या नफ्यातून डोंगराळ आणि कातळ जमीन लागवड योग्य बनविली. त्यामध्ये आंबा, काजूची सघन पद्धतीने लागवड केली. चांगल्या पद्धतीने घरदेखील बांधले. भविष्यात शेतीमाल विक्री सुलभ होण्यासाठी वेंगुर्ला-कुडाळ रस्त्यालगत १० गुंठे जमिनीची खरेदी केली. याचबरोबरीने पॉवर टिलर, फवारणी पंप, ग्रास कटर, पाण्यासाठी पंप अशी खरेदी केली आहे. मिळालेल्या नफ्यातून भविष्यातील आर्थिक तरतूद म्हणून दरवर्षी किमान दीड लाख रुपये ते बाजूला काढून ठेवतात. 

दहा गुंठ्यांचे मॉडेल 
नाईक यांनी दहा गुंठ्यांचे मॉडेल तयार केले आहे. यामध्ये घरामध्ये दैनंदिन वापराकरिता लागणारी पिके घेतात. तीन गुंठ्यांत नाचणी, दोन गुंठ्यांत चवळी, एक गुंठ्यात भेंडी, दोन गुंठ्यांत कुळीथ, दोन गुंठ्यांत चारा पिकाची लागवड करतात. याशिवाय बांधावर वांगी, मका लागवड केली जाते. ही उन्हाळी हंगामात लागवड केली जाते.

कणगर ठरले फायद्याचे 
कणगर कंदाला गोवा बाजारपेठेत चांगली मागणी आहे. हे लक्षात घेऊन नाईक गेल्या दहा वर्षांपासून १५ गुंठे क्षेत्रावर कणगर लागवड करतात. या पिकाचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. एप्रिलमध्ये पाच फुटांचा गादीवाफा करून लागवड केली जाते. लागवडीनंतर दर पंधरा दिवसांनी किमान तीनदा जिवामृत दिले जाते. पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन ठेवण्यात येते. कणगर वेलांना आधार देण्यासाठी सहा ते आठ फुटांच्या काठ्या उभ्या केल्या जातात. लागवडीनंतर साडेपाच ते सहा महिन्यांनंतर कणगराची काढणी होते. बाजारपेठेच्या मागणीनुसार मोठा, मध्यम, लहान अशी कंदाची प्रतवारी करून विक्री होते. १५ गुंठ्यांतून सरासरी ६ टन उत्पादन मिळते. गोव्यातील व्यापारी गावात येऊन प्रति किलो ६० रुपये दराने खरेदी करतात. कणगर पिकातून दरवर्षी सरासरी दोन लाखांचे उत्पन्न नाईक मिळवितात.

पुरस्कारांनी सन्मान 
  २०१७-१८.................
.सिंधू शेतीनिष्ठ पुरस्कार
  २०१९........................समाजगौरव पुरस्कार 
  २०२०........................डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा सेंद्रिय शेती पुरस्कार. 

देशी गाईंचे संगोपन 
जो शेती करतो, त्याच्याकडे किमान दोन देशी गायी असल्याच पाहिजेत, असा सल्ला नाईक देतात. सध्या त्यांच्याकडे दोन देशी गायी आहेत. या गायी पावसाळ्यात आंबा, काजू बागांमध्ये सोडल्या जातात. त्यामुळे गाईंचे शेण, मूत्र बागेत पडून जमीन सुपीक होण्यास मदत झाली आहे. बागेत गाई चरत असल्याने आपोआप तणनियंत्रणही होते. 

-  सुशांत नाईक,  ९४०५१८४४७८


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
श्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल...स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
शास्त्रीय, उत्कृष्ट व्यवस्थापनातून बीटल...सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील जितेंद्र शेळके...
कांदा- लसूण शेतीत जरे यांचे देशभर नावबहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण...
नगदी पिकांना हंगामी पिकांची जोड देते...आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड)...
कुक्कुटपालन, पोषण बागेतून प्रगती न्यू राजापूर (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील २४...
पूरक उद्योगातून गटाने तयार केली ओळखदेवनाळ (ता. जत, जि. सांगली) गावातील उपक्रमशील...
खारपाणपट्ट्यात फुलवली प्रयोगशील...सांगवी मोहाडी (ता.. जि.. अकोला) येथील मनोहर...
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...
दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील...जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील...