agricultural news in marathi success story Indigenous seed conservation, propagation techniques | Agrowon

सव्वाशेहून देशी बियाणे संवर्धन, प्रसाराचे तंत्र

बुधवार, 7 एप्रिल 2021

उस्मानाबाद जिल्ह्यातील आरळी बुद्रुक येथील धनाजी धोतरकर यांनी १२५ हून अधिक प्रकारच्या देशी बियाण्यांची बँक तयार केली आहे. देशी वाण संवर्धनाचा छंद जपताना अन्यत्र ठिकाणांहून बियाणे गोळा करताना बीजोत्पादनाचे तंत्र विकसित केले आहे. गरजू शेतकऱ्यांना हे बियाणे पुरवून त्याचा प्रसारही ते करीत आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील आरळी बुद्रुक येथील धनाजी धोतरकर यांनी १२५ हून अधिक प्रकारच्या देशी बियाण्यांची बँक तयार केली आहे. देशी वाण संवर्धनाचा छंद जपताना अन्यत्र ठिकाणांहून बियाणे गोळा करताना बीजोत्पादनाचे तंत्र विकसित केले आहे. गरजू शेतकऱ्यांना हे बियाणे पुरवून त्याचा प्रसारही ते करीत आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात आरळी ब्रुद्रुक नावाचे गाव आहे. येथील धनाजी धोतरकर यांची वडिलोपार्जित बारा एकर शेती आहे. त्यात सहा एकर ज्वारी, प्रत्येकी एक एकर गहू व हरभरा, अर्धा एकर पिवळी ज्वारी, प्रत्येकी दोन गुंठ्यांत हळद, आले, मिरची आणि अन्य क्षेत्रावर देशी वाणांच्या बियाण्यांची लागवड आहे. बारावीचे शिक्षण झाल्यानंतर काही काळ शेती करून धनाजी यांनी गावोगावी विविध जत्रा, कार्यक्रमांतून १६ मिमी. पडद्यावरील सिनेमे दाखवण्याचा व्यवसाय सोलापूर येथे राहून सुरू केला. साधारण १५ वर्षे यात गेली. पुढे काळ बदलू लागला. असे चित्रपट दाखवण्याची ‘क्रेझ’ संपत चालली. तसे धनाजी पुन्हा गावी परतले. शेतीत लक्ष घालण्यास सुरुवात केली. 

लहानपणापासूनच शेतीची सवय होतीच. लहानपणी गाय, बैल, वासरू, शेळ्यांना चारण्यासाठी ते रानात घेऊन जात असत. रानात विविध प्रकारची कडधान्ये, पालेभाज्या दिसायच्या. त्यांचे बियाणे गोळा करण्यासाठी त्यांची धडपड असे. त्यातूनच देशी बियाणांच्या संग्रहाची संकल्पना मनात रुजली. दरम्यान २००९ मध्ये पुणे येथील अफार्म आणि बायफ या स्वयंसेवी संस्थांच्या संपर्कात ते आले. त्यांच्या सहकार्यातून या संकल्पनेचा आणखीन विस्तार झाला.

सव्वाशे प्रकारचे बियाणे उपलब्ध
हळूहळू कुठून कुठून बियाण्यांचे संकलन वाढू लागले. आजमितीस धनाजी यांच्याकडे १२५ हून अधिक देशी बियाणांचा संग्रह आहे. एकूण साधारण ५० क्विंटलपर्यंत बियाणे त्यांच्याकडे उपलब्ध आहे. यात हुलगा, करड, अंबाडी, तीळ, जवस, मूग, मटकी, कारळ, नाचणी, राळ, साव, भगर, गहू, बाजरी, पिवळी ज्वारी, साळी, हरभरा आदी कडधान्ये, पालेभाज्या, फळवर्गीय, कंदवर्गीय, फुलवर्गीय अशा विविध प्रकारांतील बियाण्यांचा समावेश आहे. ज्या इतरत्र अभावाने मिळतात असेही काही वाण उपलब्ध आहेत.

बियाण्यांचा प्रसार 
देशी बियाण्यांच्या बँकेमुळे धनाजी यांचे नाव आता सगळीकडे झाले आहे. सोलापूरसह उस्मानाबाद, नगर, पुणे, सातारा, बीड, लातूर या भागांसह अन्य जिल्ह्यांतूनही शेतकरी त्यांच्याकडे बियाणे मागणीसाठी येतात. शिवाय विविध ठिकाणी फिरताना कुठे नवीन बियाणे मिळाले, की ते मिळवून त्याचे संवर्धन करण्याबरोबर ते वाढवण्यासाठी प्रयत्न असतो. १० ते ५० ग्रॅमचे पाऊच, अर्धा ते एक किलो आणि पाच किलोपर्यंतच्या बियाण्यांची विक्री ते करतात. यात पैसा कमावणे नव्हे तर देशी बियाण्यांचा प्रसार हा त्यामागे मुख्य उद्देश आहे. 

देशी बियाण्यांचे महत्त्व 
 देशी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दोन प्रकारचे फायदे होतात असे धनाजी सांगतात. एक म्हणजे बियाण्यांवरील खर्च वाचतो. दुसरे म्हणजे आवश्यक धान्य, फळे, भाज्यांची अस्सल देशी चव वा स्वाद चाखायला मिळते. विक्रीसाठी नाही पण किमान आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक शेतकऱ्याने  देशी बियाण्यांची थोड्या प्रमाणात तरी लावण करावी असा त्यांचा प्रयत्न आहे. 

सेंद्रिय पद्धतीचा वापर
धनाजी यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर भर दिला आहे. त्यांच्याकडे पूर्वी दहा देशी गायी होत्या. आजमितीला तीन गायी व दोन बैल आहेत. यंदा त्यांनी ज्वारी, गहू, हरभरा, पिवळी ज्वारी, हळद, आले आदी पिके घेतली आहेत. दशपर्णी, पंचामृत, गोमूत्र, जीवामृत व गांडूळखताचा वापर ते करतात. त्यामुळे मातीचा पोत टिकून राहिला आहे. पिकांचे उत्पादन चांगले मिळते. आणि शारीरीक आरोग्य देखील सुदृढ राहिल्याचे धनाजी सांगतात.  

बियाणे प्रसारासाठी संस्था
 पारंपारिक बियाणे चार भिंतीत बंदिस्त न ठेवता ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्यासाठी धनाजी यांनी दोन संस्था स्थापन केल्या आहेत. यात गावस्तरावर ग्रामविकास सेवा मंडळ तर राज्य स्तरासाठी लोकप्रबोधन संस्थेचा समावेश आहे. संस्थेच्या कार्यालयात देशी बियाण्यांचे प्रदर्शन पाहायला मिळते. संस्थेच्या माध्यमातून परिसरातील गावांमधील तीन हजारांहून अधिक महिलांना बियाणे संवर्धन व सेंद्रिय शेतीतील प्रशिक्षण दिल्याचे धनाजी सांगतात. परसबागेसाठी ते बियाणे पुरवतात. या भागातील शंभर कुटुंबांना असे बियाणे पुरवले आहे.  

कृषी प्रदर्शनांत सहभाग
धनाजी आतापर्यंत पाच हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. राज्य व परराज्यांतील विविध कृषी प्रदर्शनांतून तसेच कृषी कार्यशाळेतून त्यांनी देशी बियाणांचा प्रसार व सेंद्रिय शेतीबाबत प्रबोधन केले आहे. केरळ येथे झालेल्या जागतिक ‘ऑरगॅनिक फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये तसेच हिमाचल प्रदेशातील बीर येथे झालेल्या कार्यक्रमातही धनाजी यांनी हजेरी लावली आहे.

काही दुर्मीळ बियाणे व वैशिष्ट्ये 
काळे राळे -
लहान मुलांसाठी पोषक आहार. 
काळी साळी - या भाताची पेज लहान मुले तसेच आजारी व्यक्तींसाठी उपयोगी. 
हुलगे  - यात पांढरा, लाल व काळा असे तीन प्रकार उपलब्ध आहेत. हुलग्याचं माडगं सर्दीवर फारच प्रभावी आहे. 
नाचणी - अत्यंत पौष्टिक, लहान मुलांसाठी त्याचं विशेष महत्त्व. 
गावरान अंबाडी - तेल खाण्यासाठी उत्तम. जनावरांसाठी पेंड.
दगडी काळी गोंड ज्वारी - कमी पाण्यावर येते. भाकरी सकस. लवकर वाळत नाही. कडबा जनावरांसाठी चांगला.   
पिवळी ज्वारी - उच्च रक्तदाब, मधुमेही रुग्णांसाठी चांगली. 
गावरान बाजरी  - भाकरी पौष्टिक व शक्तिवर्धक. 

- धनाजी धोतरकर,  ९८२२९९८८२७

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
अल्पभूधारकांसाठी कमी खर्चातील रायपनिंग...तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी.वाय. पाटील...
शेतकरी गट ते कंपनी उभारली प्रगतीची गुढीशेतकऱ्यांसाठी अल्प दरात विविध अवजारे उपलब्ध...
जिरॅनियम तेलनिर्मिती, करार शेतीतून...देहरे (ता. जि. नगर) येथील वैभव विक्रम काळे या...
कांदा, कलिंगड पिकातून बसवले आर्थिक गणितकरडे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भाऊसाहेब बाळकू...
शिक्षकाची प्रयोगशील शेती ठरतेय फायद्याचीआश्रम शाळेत गेल्या २३ वर्षांपासून शिकविणारे सहायक...
बचत गटांना पूरक उद्योगांची साथपारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता उमेद अभियानाच्या...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
माळरानावर फळबागांतून समृद्धीरांजणगाव देवी (ता. नेवासा, जि. नगर) येथील संयुक्त...
प्रयत्नवाद, उद्योगी वृत्तीने उंचावले...पणज (जि. अकोला) येथील अनिल रामकृष्ण रोकडे यांनी...